सुश्री वर्षा बालगोपाल
जीवनरंग
☆ न आवडणार्या गोष्टी — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
“आई गं किती वेळा सांगितलं मी तुला, मला कोथिंबीर आवडत नाही म्हणून? तरीही सगळ्या भाज्यात इतर पदार्थात बचकभर कोथिंबीर घातल्या शिवाय चैन पडत नाही तुला.” प्रतिमा किंचाळलीच.
आई म्हणाली, “बाहेरची भेळ, मिसळ, पावभाजी खाताना बरं चालतं सगळं. आईलाच फक्त रागवायचं का? आणि उद्या लग्न झाल्यावर काय करणार? तिथं खाशीलच ना गुमान ? तिथे स्वत: स्वयंपाक करताना तूच स्वत: घालशील.”
प्रतिमा आणि आईचे हे रोजचे म्हटले तरी वाद चालत. ती म्हणायची, “तेव्हा खावे लागणार म्हणून आता तरी मला मना सारखे खाऊ दे….” तर आई म्हणायची, “नंतर खावे लागेल म्हणून आता पासूनच नको का सवय करायला?”
अशाच कुरबुरीत प्रतिमाचे लग्न झाले. तिला छान सासर मिळाले होते. सासू सासरे, दीर, नणंद असलेले सुशिक्षित , धनाढ्य सासर.
प्रतिमाची सासू तशी मायाळू होती. प्रतिमाला कोथिंबीर आवडत नाही म्हणून ती तिच्यासाठी सगळे वेगळे काढून मग बाकीच्यांच्यासाठी पदार्थात कोथिंबीर घालायची. काही दिवसांनी प्रतिमालाच स्वत:ची लाज वाटू लागली आणि हळूहळू ती कोथिंबीर खाऊ लागली; नव्हे तिला ती आवडू लागली. अजूनही बर्याच अशा गोष्टी होत्या ज्या तिला आवडत नव्हत्या त्या तिच्या आवडीच्या बनल्या. याला कारणही तिची सासूच होती.
सासूने सांगितले लग्न ठरवायच्या वेळी जेव्हा तिच्या घरी पहिल्यांदा प्रमोद जेवायला आला होता तेव्हा त्यांच्याघरी भरल्या वांग्याचा बेत होता. प्रमोदला वांगेच आवडत नव्हते म्हणून त्याने सगळ्यात आधी ती भाजी संपवली की जेणेकरून आवडीचे पदार्थ नंतर नीट खाल्ले जातील. पण झाले उलटेच प्रमोदच्या ताटातील भाजी संपलेली पाहून त्याला पुन्हा ती वाढली. याने परत ती खाऊन टाकल्यावर जावईबापूंना वांगे फार आवडते दिसते असे वाटून पुन्हा पुन्हा आग्रह करून वांग्याची भाजी खाऊ घातली. एवढेच नाही तर त्या नंतर जेव्हा जेब्हा प्रमोद तिकडे जेवायला आला तेव्हा तेव्हा लक्षात ठेऊन वांग्याची भाजी फार आवडते वाटून तीच भाजी खावी लागली.
आता मात्र प्रतिमाला हसू आले आणि आपल्यासारखीच गत प्रमोदची झाली हे ऐकून गंमत वाटली. पण प्रमोदने हे कुणाला कळू न देता चेहर्यावर तसे दाखवू न देता खाल्ले याबद्दल कौतूक अभिमान पण वाटला. त्याने आपल्यासाठी स्वत:ला बदलले मग आपणही बदलायला पाहिजे याची जाणिव झाली. आणि बर्याच गोष्टिंशी तडजोडही केली.
पण म्हणतात ना ‘काहीही झाले तरी शेवटी सासू ती सासूच’ असा ग्रह प्रतिमाचा झालाच. कारण सणवार असले, कोणाकडे जायचे असले की प्रतिमाची सासू म्हणायची “ड्रेस जिन्स काय घालतेस? साडी नेसायची. नुसते बारीक मंगळसूत्र काय? चांगले ठसठशीत आहे ना… ते घाल… कपाळाला टिकली नाही? ती आधी लाव… हातात बांगड्या नकोत का? घाल गंऽऽ.” अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सासूला काय आवडत नाही हे प्रतिमाला कळायला लागले. पण सासूचे मन आणि मान दोन्ही राखण्यासाठी ती तसे तसे नाईलाजाने का होईना पण वागत होती.
बघता बघता प्रतिमाच्या लग्नालाही २५ वर्ष झाली. तिची २२ वर्षाची मुलगी प्रिती आजीची फार लाडकी होती. लग्नाच्या २५व्या वाढदिवसा निमित्ताने छोटेखानी फंक्शन ठेवले होते. प्रितीने जिन्स शॉर्ट टॉप घातले होते. मग त्याला सूट होत नाही म्हणून कपाळाला टिकली नाही, गळ्यात, कानात काही नाही, हातात बांगड्या देखील नाहीत हे पाहून प्रतिमाच प्रितीला रागवली आणि ‘निदान आज तरी हे घाल की’ म्हणू लागली. तशी आजी म्हणाली, “अगं तिला नाही ना आवडत तर नको करू बळजबरी. राहू दे अशीच. काही वाईट नाही दिसत. आमची प्रिती आहेच छान.”
“अहो पण आई तुम्हाला हे चालणार आहे का?….” प्रतिमाने विचारले आणि सासूबाई म्हटल्या, “अगं आताच त्यांना मनमुराद जसे हवे तसे जगू द्यायला हवं नाही का? नाहीतरी हे सगळं घालायचा कंटाळाच येतो. कधीतरी रहावं असचं. मेघाविन मोकळे सौंदर्य पहायला सुद्धा कोणीतरी टपलेले असतवच की….”
शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी काळ हेच औषध असते. कालौघात अशाच न अावडणार्या गोष्टी आवडू लागतात हेच खरे!!
प्रतिमाला नव्या सासूचा शोध लागला आणि अचानक सासूबाईपण जास्त म्हणजे आईपेक्षाही जास्त आवडू लागल्या होत्या.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈