श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
इयत्ता दुसरीतील सुलु आणि नंदू घरी निघाल्या. दोघींच्या हातात परीक्षेचे रिझल्ट होते, सुलु वर्गात पहिली आली होती आणि नंदू जेमतेम पास झाली होती. पण सुलु आणि नंदू यांना त्याची जाणीव नव्हती. ओढ्यातील पाण्यात खेळत, एकमेकांवर पाणी उडवत त्या घरी निघाल्या.
ओढा संपल्या संपल्या मेस्त्रीची आळी लागायची, सर्व मेस्त्रीची घर, घराच्या छप्पर दुरुस्तीचे काम करणारे मेस्त्री. सुलु मातीच्या, जुन्या घरात शिरली तेंव्हा आई ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती, मोठया दोन बहिणी जंगलात लाकडे गोळा करायला गेल्या होत्या, सुलु च्या आईने चुलीवर पेज शिजवून ठेवली होती, त्या मडक्यातील पेज भांड्यात ओतून सुलु पेज जेऊ लागली.
नंदूची आई नंदूची वाटच बघत होती, नंदू गावातील सुस्थितीतील मुलगी, तिचे बाबा बँकेत तालुक्याच्या गावी नोकरीला होते, आजोबा प्रतिष्ठित माणूस, गोरगरिबांच्या उपयोगी पडणारे, गरिबांचा कनवाळा असलेले. नंदूची आई रत्नागिरीतील शहरात राहिलेली, तिचे माहेरचे सगळे शिकलेले.
नंदू ने दुसरीचे मार्कलिस्ट आईच्या हातात दिले, नंदूची आई चिडली, तिने नंदूच्या पाठीत दोन धपाटे घातले. नंदूच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजी आणि आजोबा धावून आले.
आजोबा – अग का मारतेस तिला?
आई – मार्क बघा तिचे, अशी बशी पास झाली आहे, एवढा मी अभ्यास घेते तरी हिच्या अभ्यासात सुधारणा नाही, माझ्या भावाची बहिणीची मुले किती हुशार, पण हिचे या खेड्यात राहून नुकसान होते आहे.
आजोबा –मग ती मेस्त्रीची सुलु कसे मार्क मिळविते? तिचा वर्गात पहिला नंबर आला आहे.
आई – मला माझ्या मुलीची काळजी आहे, या खेड्यात राहून तिचे नुकसान होणार, नाहीतरी तिच्या बाबांची नोकरी तालुक्याच्या गावीच आहे, तेव्हा यांना सांगणार आपण आता तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करू, त्याशिवाय नंदूच्या अभ्यासात प्रगती होणार नाही.”
नंदूची आजी काहीतरी सांगायला जात होती, पण आजोबांनी हात दाखवून तिला गप्प केले, नाहीतरी हल्ली नंदूची आई सतत आम्ही तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करणाऱ्याचे तुंतून वाजवत होती.
संध्याकाळी नंदूचे बाबा आल्यानंतर नंदूच्या आईने नंदूचे मार्क दाखवले, आणि आता शहरात जाण्याशिवाय मार्ग नाही तेव्हा शहरात बिऱ्हाड करायचे आहे असे निक्षुन सांगितले. नंदूच्या आईला काहीतरी समजावत होते, पण आजोबा म्हणाले” मिलिंद, नंदुच्या आईचे जर असे मत असेल की शहरात गेल्यावर तिची प्रगती होईल, तर होऊ दे तिच्या मनासारखे.
अशा रीतीने जून महिन्यात नंदूच्या बाबांनी शहरात बिऱ्हाड केले. नंदू शहरात जाताना सुलू च्या घरी जाऊन सुरूला मिठी मारून खूप रडली. सुलु ने तिची समजूत घातली, नंदू म्हणाली अधून मधून मी घरी येतच असणार तेव्हा आपण भेटू.
शहरात आल्यावर नंदूच्या आईने नंदूचे नाव कलासात घातले तसेच चांगले शाळेमध्ये नाव घातले, पण नंदूची तिसरीतही प्रगती दिसेना, चौथी स्कॉलरशिप साठी नंदूच्या आईने नंदूसाठी खूप प्रयत्न केले, पण चौथी स्कॉलरशिप नंदूला खूप कमी मार्क मिळाले, खेडेगावात राहून सुलु ने स्कॉलरशिप मिळवली.
नंदूच्या आजोबांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून सुलु चा सत्कार केला, नंदूच्या आईला आजोबांचा फार राग आला. तिने रागाने नंदूच्या आजोबांनाविचारले
नंदूची आई – तुमच्या नातीला स्कॉलरशिप मध्ये एवढे कमी मार्क असताना, तुम्ही त्या गावातल्या सुलु चा सत्कार का घडवून आणलात? तुम्हाला तुमच्या नातीचें मार्क बघून वाईट नाही का वाटले?
आजोबा – माझ्या नातीला जर चांगले मार्क मिळाले असते तर मला त्याचा खूप आनंद झाला असता, पण तिला ते मिळाले नाहीत, खेडेगावात राहून कसलेही क्लास न करता सुलु ने स्कॉलरशिप मिळवली याचा पण मला खूप आनंद आहे. यापुढे पण मी तिच्या मागे असणार. तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मी तिला प्रोत्साहन देत राहणार.
नंदूच्या आईचा जळफळात झाला, तिने आपल्या नवऱ्याला पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण नंदूच्या बाबांनी पण तिच्याकडे दुर्लक्ष केले.
दहावी परीक्षेतही नंदू कशीबशी पास झाली उलट मेस्त्रीची सुलु जिल्ह्यात दुसरी आली, परत एकदा नंदूचे आजोबा तिच्या पाठी उभे राहिले, सुलुच्या आई बाबांना पटवून सुलूला तालुक्याच्या गावी अकरावी बारावी साठी पाठविले.
दहावी जेमतेम पास झालेली नंदू पण त्याच शाळेमध्ये अकरावीसाठी आली, पुन्हा नंदू आणि सुलु एका बेंचवर बसू लागल्या, सुलु गावातून st ने जाऊ लागली, पण गावातून फक्त जाणाऱ्या दोन एसटी बसेस होत्या, त्यामुळे सुलूची पंचायत होऊ लागली, संपले की दुपारी चार वाजेपर्यंत गावी जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यामुळे उपाशी सुलु एसटी स्टँडवर एसटी ची वाट पहात बसू लागली.
नंदूच्या आजोबांच्या हे लक्षात आले, ते आपल्या मुलाच्या बिऱ्हाडी आले आणि आपल्या मुलाला म्हणाले
आजोबा –अरे मिलिंद, त्या मेस्त्रीच्या सुलु चो वेळ st ची वाट बघण्यात जाता, पाच नंतर ता दमान घरात पोचता, अशाने तेचो अभ्यास कसो व्हतलो, तसा नंदू आणि सुलु लहानपणापासून मैत्रिणी, आता एका वर्गात असत एका बेंचवर बसतात,तेव्हा सुलु हय तुमच्या कडे रवान शाळेत गेला तर…
मिलिंदप्रदीप केळूसकर – हो चलत ना बाबा..
एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈