श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.) –इथून पुढे –
आई -चलात का चलात… मला चालणार नाही, ती कुठल्या जातीची मुलगी आमच्या घरात राहू शकत नाही.
आजोबा – आम्ही कधी जातीचा विचार केला नाही, ज्याला गरज आहे त्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आमचा खरा धर्म. वरच्या जातीचा खालच्या जातीचा उल्लेख करणे आमच्या घराण्याला शोभत नाही.
आई – पण माझ्यावर माझ्या माहेरी तसे संस्कार झाले त्याचे काय?
आजोबा चिडून म्हणाले ” अशा संस्कारामुळे समाजाचे आणि देशाचे नुकसान होते आहे ‘
असे मोठ्याने बोलून आजोबा घराबाहेर पडले.
नंदूच्या बाबाच्या बँकेत शिपाई होता, त्याची बायको त्याचा डबा घेऊन बँकेत द्यायची. नंदूच्या बाबानी तिला बोलावून घेतले आणि सुलुची राहायची व्यवस्था तिच्याकडे केली. त्यामुळे सुरू चा रोज जाण्या-येण्याचा त्रास वाचला आणि ती शहरातच राहू लागली.
नंदू अकरावीच्या क्लासला जात होती, क्लासच्या शिक्षकांचे नोट्स सुलु ला दाखवत होती, अकरावी बारावीत सुद्धा सुलु वर्गात पहिली आली. त्या काळात बारावीनंतर मेडिकलला प्रवेश मिळत होते.
नंदूचे आजोबा पुन्हा तिच्या मागे राहिले, आपल्या सुनेच्या रोशाकडे दुर्लक्ष करून सुलु ला मेडिकल ला पाठवायचा चन्ग त्यांनी बांधला, पैशाची गरज होती.
एक दिवस सकाळीच ते त्यांच्या विभागात निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याच्या घरी गेले, एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या घरी आले म्हणून तो सदस्य गडबडला.
नंदूचे आजोबा – मी तुमच्यकडे एका मुलीच्या शिक्षणा साठी मदत मागूक इलंय, माझ्या नातीसाठी न्हय, आमच्या गावाततली सुभाष मेस्त्रीच्या मुलीक मेडिकल कडे ऍडमिशन मिळतली, लहानपणा पासून हुशार मुलगी, आता पर्यत चो खर्च कसो तरी केलो पण हो मोठो खर्च आसा, चार वर्षाची फी आणि हॉस्टेल आणि इतर खर्च, एक गरीब कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली तर समाजाचो फायदो आसा, तुमी त्या मुलींसाठी काय मदत करशात?
तो जिल्हा परिषद सदस्य आश्चर्यचकित झाला, आतापर्यंत येणारे,आपल्या मुलासाठी किंवा नातू नातवा साठी मदत मागायचे, पण हा माणूस एका गरीब मुलींसाठी सकाळी सकाळी घरी येतो?
त्यांनी आजोबांना आमदारांना सांगून तिचा सर्व खर्च उचलण्याचा शब्द दिला, आमदार पण मुद्दाम येऊन भेटले, सुलु चें कौतुक केले आणि नंदुच्या आजोबांना नमस्कार करून गेले.
सुलुची ऍडमिशन पक्की झाली आणि अख्ख्या गावात आनंद झाला.आमदारांनी आपला शब्द पाळला, दर वर्षी नियमित पैसे पाठविले. सुलु MBBS झाली, मग एक वर्ष एंटर्नल कोल्हापूर मध्ये करून पोस्ट graduation चा अभ्यास करू लागली.
बारावी काठावर पास झालेल्या नंदूने बीएससी ला ऍडमिशन घेतले, पण पहिल्याच वर्षाला ती दोनदा नापास झाली, आणि शेवटी तिचे शिक्षण थांबले, आपल्या मुलीसाठी नंदूच्या आईने खूप प्रयत्न केले पण नंदूला अभ्यासात गती नव्हती हे खरे, नंदू ने डीएड ला ऍडमिशन घेतली, डीएड होऊन एक वर्ष घरी बसल्यावर ती प्राथमिक शिक्षिकेच्या नोकरीला लागली. आणखी एक वर्षांनी तिचे एका हायस्कूल शिक्षकाबरोबर लग्न झाले.
त्या दरम्यानच नंदूच्या आजोबांचे निधन झाले. नंदूची आजी गावी एकटी राहू लागली.
दीड वर्षानंतर नंदूची प्रसूती जवळ आली, शहरातल्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव घातले होते. त्या काळात छोट्या शहरात सोनोग्राफी वगैरे यंत्रे आली नव्हती.
प्रसूती वेदना सुरू झाल्याबरोबर नंदूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले मुल आडवे आले आहे, सर्जरी करावी लागेल, एकतर डॉक्टर बाहेरून मागवावा लागेल किंवा किंवा जिल्हा रुग्णालयात नवीन लेडी डॉक्टर आली आहे तिच्याकडे तातडीने न्यावे लागेल. नंदूच्या बाबांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. ॲम्बुलन्स वीस किलोमीटर वरील जिल्हा रुग्णालयात पोहोचली, तेव्हा नवीन लेडी डॉक्टर जवळ भरपूर पेशंट जमले होते. सिरीयस पेशंट आल्यामुळे डॉक्टरने आपली ओपीडी थांबवून पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यास सांगितले. त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये गुंगीचे औषध पण स्वतः डॉक्टरच देणार होत्या. गुंगी देण्याची तयारी करण्यासाठी पेशंटच्या बेड जवळ आल्या, तर डॉक्टरना बेडवर दिसली त्यांची प्रिय मैत्रीण नंदू.
तशाच डॉक्टर सुलभा मिस्त्री बाहेर आल्या, बाहेर काळजीत बसलेल्या नंदूच्या आई आणि बाबांना त्यांनी वाकून नमस्कार केला. प्रत्यक्ष सुलभाला डॉक्टरच्या वेशात समोर पाहून आश्चर्य वाटले व आनंद झाला. काही काळजी करू नका मी सर्व काही योग्य करते असं सांगून डॉक्टर मिस्त्री आत गेल्या.
तीन तासानंतर प्रसुती उत्तम पार पडून मुलगा झाला. नंदूच्या आई-बाबांना आणि नातेवाईकांना ही बातमी कळली. ते दोघे आणि नंदूचा नवरा डॉक्टर मिस्त्री ला भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना प्रसूती अवघड होती पण मी उत्तम केली काही काळजी करू नये असे सांगून निर्धास्त केले.
आणखी दोन तासांनी नंदू शुद्धीवर आली, तिच्या शेजारी तिची प्रिय मैत्रीण सुलु उभी होती, नंदू ने सुरु चा हात घट्ट पकडला.
“सुले, तुझ्यामुळे माझा पुनःर्जनम झाला ग.’.
“तसा काय नसता गो नंदू, तूझ्या माझ्या आजोबानी जन्म घेतलोवा तूझ्या पोटी, तेंचो जन्म होऊक माझो हात लागलो इतकोच ‘.
हातात हात घेऊन सुलु आणि नंदू हसू लागल्या, शाळा सुटल्यावर घरी जाताना हसायच्या तशाच, तीच मैत्री अजून तशीच,.
नंदूची आई भरलेल्या डोळ्यांनी त्यांची मैत्री अनुभवत होती.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈