डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सांताक्लॉज – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

छोटी मेरी पायरीवर बसून आजूबाजूचा आनंदात साजरा करत असलेला नाताळ बघत होती..मुलं फटाके उडवत होती, मिठाया खात होती.नवे कपडे घालून चर्चला जाणार होती..मेरी हे बघत होती.तिची ममा अजून कामावरून आलेली नव्हती.  मेरीला आता खूप भूक लागली.घराची किल्ली तिच्याकडे होती. छोटीशी खोली त्या दोघींची.आणि किती छोटे विश्व सुद्धा. चार वर्षांपूर्वीचं मेरीचं जग किती वेगळं आणि सुंदर होतं. तिचे पपा ममा आणि मेरी.खूप लाड करत तिचे पपा ..लाडकी एंजल होती मेरी त्यांची.  पपाना चांगली नोकरी होती आणि खुशीत रहात ते तिघे. कामावरून घरी येताना  अचानक पपाना एका ट्रकने उडवलं आणि हॉस्पिटलला नेण्याआधीच सगळं काही संपलं होतं. त्या दिवसापासून मेरी आणि तिची आई रोझीचे सुखाचे दिवस  संपून गेले.  चांगल्या कॉन्व्हेंट  स्कूल मधून मेरीचं नाव काढलं आणि साध्या कॉर्पोरेशनच्या शाळेत तिला नाईलाजाने रोझीने प्रवेश घेऊन दिला.रोझी फार शिकली नव्हती.एका मॉल मध्ये तिला सकाळी आठ ते आठ अशी बारा तास नोकरी करावी लागे.  पिचून जाई रोझी या कामाच्या रगाड्यात.घरी आल्यावर तिला नवीन  काही करायची उमेद रहात नसे.मॉल मध्ये उद्या एक्सपायर होणारे ब्रेड अंडी असे पदार्थ तिला फुकट घरी आणता येत.मेरी लहान होती तरीअतिशय समजूतदार होती.तिने कसलाही हट्ट कधी केला नाही की नवे कपडे मागितले नाहीत.किती गुणी लेकरू होतं ते.तिला पोटाशी धरून रोझी अश्रू ढाळे. आपल्या चिमुकल्या हातानी मेरी ममाचे अश्रू पुसे आणि म्हणे, रडू नको ग ममा. मी खूप शिकेन आणि खूप पैसे मिळवींन.मग बघ, आपण मोठ्या घरात जाऊ.’ रोझीला आणखीच उमाळे येत.मेरीच्या शाळेत अतिशय उत्तम ग्रेडस् असत.शिक्षक रोझीला म्हणत तिला या शाळेत नका हो ठेवू.फार हुशार आहे मेरी.चांगल्या शाळेत तिचे शिक्षण आणखी छान नाही का होणार?’रोझी खिन्न हसून म्हणे,सर,ते बरोबर आहे पण मी एवढी फी कुठून आणू?शिकेल इथेच. असेल तिच्या नशिबात तेच होणार ना . मेरी सातच तर  वर्षाची होती.चाळीतल्या घराशेजारी  मायकेल अंकल रहात. एकटे होते अंकल. पायरीवर सणाच्या दिवशी उदास बसलेली ती छोटी मुलगी बघून पोटात तुटलं त्यांच्या.. मेरीचे वडील जोसेफ आणि मायकेल चांगले मित्र होते. दुसऱ्या दिवशी पंचवीस डिसेंबर!  आज नाताळ बाबा हळूच मुलांना सरप्राईज गिफ्ट देणार.मेरीने आईला विचारलं” ममा,खरंच का ग इतक्या लांबून मुलांना भेटायला येतो ख्रिसमस बाबा?मला भेटेल तो?मी सांगेन मग त्याला , मला माझे पपा  आणून दे परत .बाकी नको   मला काही.’रोझीच्या डोळ्यात पाणी आलं.तिने आज मेरीला आवडतात म्हणून केक आणले होते.जा मेरी ,शेजारी मायकेल अंकलला नेऊन दे.’मेरीने मायकेलला डिश नेऊन दिली.मायकेलने हे सगळं संभाषण ऐकलं होतं.फार वाईट वाटलं त्याला.मनात एक विचार आला त्याच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मेरी बघते तर तिच्या उशाशी छान पुस्तकं एक  बाहुली आणि थोडा खाऊ होता.मेरीला इतका आनंद झाला.’ममा कधी ग आला नाताळ बाबा?कधी ठेवल्या त्याने या गिफ्ट्स?का माझे पपा येऊन ठेवून गेले?’रोझीही आश्चर्यचकित झाली.पण लेकीच्या आनंदात तीही सहभागी झाली.ते चिमुकलं घर आनंदाने  भरून गेलं.दुरून बघणाऱ्या मायकेलच्या डोळ्यात  आनंदाश्रू आले.आपण आता या लेकरासाठी एवढं दर वर्षी करायचंच असं त्याने मनाशी ठरवलं.हे रोझीला समजलं असतं तर तिला आवडलं नसतं. तिच्या  स्वाभिमानाला धक्का लागला असता. रोज शाळा सुटली की ममा येईपर्यंत मेरी पायरीवर बसे.शेजारी मायकेल अंकल कधीकधी येऊन बसत.तिला  छान गोष्टी सांगत.तिचा अभ्यास घेत.

आजोबांसारखा एक दोस्तच मिळाला मेरीला.मेरी वरच्या वर्गात उत्तम मार्क्स मिळवून जात होती.अजूनही दर वर्षी ख्रिसमस ला तिला हव्या त्या गोष्टीअचूक कोण ठेवून जातं हे तिला समजलं नव्हतं.कितीवेळा ती जागत बसायची पण नेमकी तिला पहाटे झोपच लागून जायची. मेरी मोठी होत होती. आता सांता क्लॉज चे फारसे नाविन्य राहिले नव्हते तिला.पण दर वर्षी  बरोबर पंचवीस डिसेंबरला येणारी   छोटी मोठी भेट वस्तू मात्र येतच राहिली.मेरीला बारावीत सुंदर मार्क्स  मिळाले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मेरिट वर प्रवेश मिळाला तिला.रोझीला अत्यानंद झाला.पण ही फी तरी तिला कुठे परवडणार होती?’ममा, फक्त चार वर्ष ग.आपण कशीही काढू.पण यावेळी मला नाही म्हणू नको ना.  मी  स्कॉलरशिप साठी प्रयत्न करीन.चर्च थोडी फी भरेल पण मी मेडिकलला जाणारच.’मेरीचा निर्धार कायम होता. पहिल्या वर्षाची फीची सोय झाली.मेरी त्यावर्षी कॉलेजमध्ये पहिली आली. त्या वर्षी पुढची फी माफ झाली तिला.पण बाकीचे खर्च आ वासून उभेच होते.पुस्तकं इतकी महाग होती  आणि काहीकाही तर विकत  घ्यावी लागणारच होती.मेरी आणि रोझी चिंतेत पडल्या.लायब्ररीत त्या पुस्तकावर इतके क्लेम्स होतें की मेरीला ते मिळणे अशक्यच वाटलं. बरं स्वस्त नव्हतं ते पुस्तक. काही  पौंडस मध्ये होती किंमत त्याची.  मेरीने जुनं कोणाचं मिळतं का म्हणून कॉलेज बोर्डवर नोटीस लावली.तिला मुळीच अपेक्षा नव्हती कोणी प्रतिसाद देईल.चार दिवसांनी तिला उत्तर मिळाले, माझ्याकडे आहे हे.येऊन घेऊन जा.’अत्यानंदाने मेरी त्या नोटीस लिहिणाऱ्या मुलाला भेटूनआली. रॉबिन नाव होतं त्याचं. तो मेरीच्या पुढे दोन वर्षे होता आणि म्हणाला’अग, चुकूनच हे राहिलं माझ्याकडे. माझीपुस्तकं मी मागच्या मुलांना देऊन टाकतो.मेरी म्हणाली,मला दर वर्षी विकत देत जाशील का?मी निम्मे पैसे देऊन घेईन सगळी.मला फार गरज आहे रे.पण मी बुडवणार नाही तुझे पैसे.’रॉबिनला  ही गरीब हुशार मुलगी मनापासून आवडली.अग, विकत काय?तशीच नेत जा.मला काही कमी नाही आणि तुला उपयोग होत असेलतर मला आनंदच होईल मेरी.’रॉबिन ने तिला आपली जर्नल्स पण दिली.

अत्यानंदात मेरी घरी आली.त्या 25 डिसेंबर ला तिच्या उशाशी पुढच्या फी इतके पौंड्स होते. मेरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.हा कोंण देवदूत हे करतो याचे कोडे तिला सुटले नाही.शेजारच्या मायकेल अंकलला ती घडलेली प्रत्येक गोष्ट सांगत असे.तेच एक जिवलग होते तिला.दुसरं होतंच कोण?  आणि मायकेल अंकल ती सांगेल ते सगळं ऐकून घेत.ती म्हणाली,’ अंकल मला आयुष्यात एकदा तरी या सांताक्लॉज ला भेटायचं आहे.त्याचे आभार मानायचे आहेत हो.’मायकेल अंकल हसले आणि म्हणाले,तुझी इच्छा आहे ना?मग होईल ही पण पूर्ण.’ मेरी उत्कृष्ट ग्रेडस् मिळवून डॉक्टर झाली. आयर्लंडच्या एका विख्यात हॉस्पिटलमध्ये तिला जॉब मिळाला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments