डॉ. जयंत गुजराती
जीवनरंग
☆ कसा विसरलास तू? ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
संध्याकाळ कधीची उलटून गेलेली. रात्रीचा दुसरा प्रहर उदासपणे जात असलेला. समोर टेबलावर सुरकुतलेला लाल गुलाब मन्या एकटक पाहात असलेला. एक मोठी आशा, मोठं स्वप्न बाळगून सकाळीसच खरेदी केलं होतं ते. प्रेमाचं प्रतिक असलेलं फूल आता मलूल होऊन पडलेलं. सकाळीस घेतलं त्यावेळेस एकदम ताजंतवानं, रसरशीत, निम्मं उमललेलं जे हात त्याचे हकदार होते त्या हातात विसावण्यासाठी आसुसलेलं. योग्य वेळेची वाट पाहात पाण्याच्या बाटलीत स्थिरावलेलं होतं. सकाळपासूनचं आठवत मनीष स्तब्ध बसून असलेला.
मनातल्या मधूर भावना व्यक्त करण्यासाठी मनीषने मनापासून तयारी केली होती. चिंगीच्या आवडीच्या रंगाचा शर्ट त्याने आदल्याच दिवशी खरेदी केला होता. टायची गाठ परफेक्ट कशी बांधायची याचं प्रात्यक्षिक तर कितीतरी वेळा मनीषने करून पाहिलं होतं. बुटांना पॉलिश करून चमकवून ठेवलं होतं अगोदरच. आजचा दिवस तसा खासच पॉलिश्ड राहण्याचा. दाढी तर दोनदा केली होती. परफ्यूमची निवडही चिंगीच्या पसंतीने केलेली. आता तसं यापुढे सगळं एकमेकांच्या पसंतीचंच करायचं असं ठरवून झालेलं. बस त्यावर शिक्कामोर्तब वेगळ्या पद्धतीने आजच्या दिवशी, प्रेमीजनांच्या दिवशी करायचं असं ठरलेलं. बस संध्याकाळ होण्याचीच वाट पहायची होती.
वाट पाहाणं किती अवघड असतं हे कुणी प्रेमीजनांनाच विचारावं. सकाळच्या उत्साहाची जागा दुपारी उत्कंठेने घेतलेली. दुपारी घड्याळाचे काटे नेहमीपेक्षा हळूहळू सरकत असलेले. हा वेळेचा अपव्यय नाही का? मनीषला वाटत होतं. तास सेकंदांचं गणित बिघडलंय की काय? की वेळेनं मुद्दामहून छळण्याचं ठरवून संथपणे मार्गक्रमणा करण्याचं चालवलंय, असे प्रश्न. कितीदा तरी मनीष खोलीतून गेलेरीत, गेलेरीतून खोलीत. सारखी घालमेल. सारखं मनात यायचं किती मोलाचे क्षण असतील ना ते जेव्हा चिंगी काहीतरी बोलेल मी काहीतरी बोलेन. हात हाताशी घेऊ. नाहीतर डोळ्याला डोळा भिडवून गप्पच राहू , निदान काही क्षण. बेचैनीतच टळून गेली दुपार.
मनीष व चिंगीचं लहानपणापासूनचे सख्य. दोघांचे कुटुंब परिचित असलेलं. लहानपणीची मैत्री शाळेपासूनची. अगदी पहिलीपासूनची. एकमेकांना पूरक असलेली. तशी चढाओढ ही असायची. कोण परिक्षेत किती गुण मिळवतो ते. कधी चिंगी पुढे असायची कधी मनीष. शाळेचे दिवस असेच सरले चढाओढीत. मग आले कॉलेजचे दिवस अन् दोघांचं जगच बदललं. ते वयच तसं धोक्याचं का काय म्हणतात तसं. सोनेरी स्वप्नांवर स्वार होण्याचं. शाळेत असताना पुस्तके वही दिली घेतली जायची, कॉलेजमधेही दिली घेतली जात असणारी मात्र त्यातील अक्षरांचे संदर्भ बदलत असलेले. हे सगळं नकळत घडत असलेलं. काहीतरी विचित्र असं. नेहेमीसारखं साधं सरळ नव्हे तर आतून आतून येणारं. जवळीक लहानपणापासूनची पण हे तर हवंहवसं, मनापासूनचं. यावर कधीतरी बोललंच पाहिजे व ते आजच हा निर्णय दोघांचा.
मनीष तसा सकाळपासून संभ्रमात पडलेला. चिंगीशी संध्याकाळी काय बोलावं कसं बोलावं यावर विचारच करत बसलेला. टेबलावर चिठ्ठ्यांचा ढीग. ओळीवर ओळी लिहून झालेल्या पण मनाला एकही पटेना. कविताही करून झालेल्या. त्याही फिक्या वाटत होत्या. शाळेत निबंधात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा मनीष आज अडखळत होता. खरंतर प्रेमाची भाषा किती गोड, नाजूक, तरल अशी पण नेमकं आजच असं का वाटावं की आपण योग्य तेच बोललं पाहिजे. चुकीचं असं ओठांतून बाहेर पडता कामा नये. काही अधिक उणे बोललं गेलं तर सगळं मुसळ केरात जायचं. ही अनामिक भीति व हुरहुर. मनीष त्रस्त.
संध्याकाळ झाल्यावर मनीषने मनाला आवरलं. नाहीच काही जमलं तर आय लव यू तरी म्हणायचं. वेलेंटाइन वीकमधले सर्व डेज जरी साजरे करणं जमलं नसलं तरी आजचा दिवस संस्मरणीय करायचाच असं मनाशी पक्कं ठरवून तो बाहेर पडला. नेहेमीच्या कॉफी शॉपमधील कॉर्नरचं टेबल त्यानं बुक करून ठेवलं होतं. तेथून रस्यावरनं वाहणारी वाहतूक स्पष्ट दिसत असे. कोपऱ्यावरचं लाल हिरवं पिवळं होणारं सिग्नल, काचेच्या तावदानातून दिसणाऱ्या नियोन साईनच्या पाट्या, जोडीला कॉफी शॉपमधील मंद सुरावट त्या कोपऱ्यावरच्या टेबलावर बसलं की जिवंतपणा आणायच्या. कॉफी शॉपमधील मंद सुरावटीशी ताल जुळवत मनीष चिंगीची वाट बघत बसला. हातात तब्बल पावणे दोनशे रुपये मोजून आणलेलं गुलाब, साडेतीन हजाराचे टायटनचे घड्याळाचे गीफ्टपेक, अंगभर दरवळत असलेलं परफ्यूम, व मनात उमटणारी आंदोलने, एक सुंदर भाववाही क्षण जवळ येत असल्याची जाणीव घेऊन मनीष रस्त्याकडे अनिमिष नजरेनं बघत बसला. चिंगी आलीच नाही.
मनीष हिरमुसला. संध्याकाळ सरली. रात्र झाली. मनीषने ठरवलं चिंगीच्या घरी जाऊन येऊ. चिंगीच्या कॉलनीत शिरत असताना त्याने पाहिलं, चिंगी आकाश बरोबर बाईकवरून येत होती. दोघं एकमेकांशी बोलतही होती. मनीष तडक घरी आला. गीफ्टपेक व गुलाब त्याने टेबलावर टाकले. गुलाब कोमेजत आलेले. त्या गुलाबाची किंमत पावणे दोनशे रूपयांपेक्षा कैक अधिक होती. डोळ्यांच्या कडेला आलेले अश्रू सावरण्याच्या प्रयत्नात एकटक तो लालजर्द गुलाबाकडे पाहात पाहात तसाच झोपी गेला. सकाळी जाग आली तर ते लाल गुलाब अजूनही हाताशीच. ते फूल डस्टबीनमधे टाकण्यासाठी मनीष बाल्कनीत गेला अन् पाहतो तर चिंगी गेटजवळ ऊभी. मनीष तसाच धावत खाली गेला व चिंगीला घेऊन आला. “ काल का नाही आलीस? “ मनीषचा नाराजीचा सूर. “ अरे, काल मावशीची तब्येत बिघडली. हॉस्पिटलला ठेवावं लागलं. दिवस त्यातच गेला. तुला कळवणंही जमलं नाही. रात्री आकाशने घरी सोडलं. नाराज असशील ना? “ चिंगीच्या प्रश्नावर काय बोलावं तेच मनीषला सुचेना. “अगं ते काल व्हेलेंटाईन डेचं आपलं….. “ मनीषचं म्हणणं तोडत चिंगी म्हणाली, “ जाऊ दे ते डेजबीज, आज काय आहे ते सांग ! “ मनीष पुन्हा बावचळला. त्याच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे मिश्किलपणे पाहात चिंगी उत्तरली, “ अरे आज माझा वाढदिवस नाही का? कसा विसरलात तू? आणि यापुढे विसरलास तर गाठ माझ्याशी आहे आयुष्यभर !! “ मनीष म्हणाला मंजूर, आजपासून १४ फेब्रुवारी नव्हे १५ फेब्रुवारी माझ्यासाठी लाखमोलाची. “ आणि चिंगीच्या मनगटावर घड्याळ बांधत म्हणाला,” तुझ्या मनगटावरचं हे घड्याळ मला सदैव ते आठवून देईल. “
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈