श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एस ए ग्रुप … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

सकाळी आठ वाजता वंदनाला जाग आली, तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं ..  नाहीतर गजर लावून उठायची तिला सवय. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी हजर राहावं लागे, सेटवर सहा वाजता पोहोचायचं तर तिला पाचची ट्रेन पकडावी लागे. तिचा शॉर्ट कधी कधी रात्री आठ वाजता यायचा, कधी यायचा पण नाही, पण तिच्यासारख्या नवीन एक्ट्रेसना हजर रहावच लागे. दिलेले कपडे घालून दिवसभर तिथे बसायचे, जेवायचे. सोबतच्या कनिष्ठ कलाकारांबरोबर गप्पा झोडायच्या. कंटाळा आला की एखादी सिगरेट ओढायची. एवढे करून दिवसाला जेमतेम अडीच हजार रुपये हाताला टेकायचे.

रात्री उशीर झाला तर टॅक्सी करून यावे लागे, म्हणजे त्याच्यात सहा सातशे रुपयाची फोडणी. रात्रीचे जेवण करायचा कंटाळा म्हणजे बाहेरच कुठल्यातरी गाड्यावर खावे लागे. त्याचे दोन अडीचशे रुपये.

वंदना विचार करत होती, शेवटी शिल्लक काय राहते. सेटवर मोठ्या कलाकारांचे लाड आणि आम्हा ज्युनिअर कलाकारांना लाथा. पण विचारतो कोण? आपण सोडलं तर एकापेक्षा एक कलाकार जागा घ्यायला टपून बसलेले आहेत. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी आपली परिस्थिती. करोना साथीनंतर कामे कमी झाली. आपल्याकडे एक नाटक होते ते बंद झाले. त्या नाटकाचे महिन्याला दहा प्रयोग झाले तर निदान महिन्याला पंधरा हजार रुपये मिळायचे. ते पण नाटक बंद. आता फक्त राहिली ही एक मालिका. या मालिकेला फारसा टीआरपी नाही, म्हणजे ही मालिका पण कधी राम म्हणेल सांगता येत नाही. वरळीच्या घोस्ट सप्लायर्सकडून ही मालिका आपल्याला मिळाली होती. मुंबईत असे अनेक कलाकार सप्लाय करणारे एजंट आहेत. आपण सहा एजंटाकडे मेंबर्स झाले आहे, त्यांना प्रत्येकी दर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात. आपल्यासारखे हजारो न्यू स्ट्रगलर  त्यांचे मेंबर आहेत. ते सुचवतील तेव्हा आपल्याला काम मिळतं .

वंदनाने आळोखेपाळोखे दिले आणि ती बेडवरून बाहेर आली, समोरील टेबलवर काल रात्री प्यालेला बियरचा टिन तसाच पडला होता. तिने तो उचलला आणि वेस्ट बॉक्समध्ये टाकला. त्या एका रूममध्येच ती राहत होती, त्याच रूममध्ये ती गॅसवर चहा कॉफी करत होती आणि एक छोटीशी बाथरूम तिला होती.

वंदनाने गॅस पेटवून त्यावर पाणी गरम  केले, त्यात कॉफी पूड टाकली, दूध नव्हतेच त्यामुळे तिने तशीच कॉफी बनवली आणि एका कपात ओतून ती पिऊ लागली. तिने मोबाईल उघडला आणि आपला ग्रुप वाचू लागली, त्या एरियात राहणाऱ्या नवीन धडपड करणाऱ्या नाटक टीव्ही मालिका मधील कलाकारांचा ग्रुप होता, त्याचे नाव होते, S A  ग्रुप म्हणजेच strugllar actors ग्रुप. या ग्रुपमधील नेहेमीचे मेसेज, कुणाला कुठे काम मिळालं, कुणाचं काम बंद झालं, कुठल्या actors सप्लायरकडे जास्त निर्माते आहेत, अमीर खानचें कुठे शूटिंग सुरु होणार आहें, चोप्रा कुठला सिनेमा घेऊन येत आहेत, त्यांना जुनिअर actors किती लागतील वगैरे. हे नेहेमीचे मेसेज वाचून वंदनाला कंटाळा आला, तिने फेसबुक ओपन केल आणि ती वरखाली करू लागली.

एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली,  ” अरे ही तर प्रणिता नांदे, सहा महिन्यापूर्वी मराठी मालिकेच्या सेटवर दोन दिवस आपल्यासोबत होती. नंतर तिची कधी भेट झाली नाही, पण ती या फेसबुकमध्ये काय करते, असे म्हणून वंदनाने तिने लिहिलेले वाचले आणि  तिला धक्का बसला.

प्रणिताने लिहिले होते… ” आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडीलांशी भांडून मी मुंबईत आले पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत. अलविदा “ .

वंदनाने बारकाईने फोटो पाहिला, तिचा गाऊन मांड्यांपर्यंत वर आला होता, एक हात कॉट खाली लोंबत होता, वंदनाच्या काळजात धडधड सुरु झाली, ही पोरगी जिवंत आहे का नाही, असा तिला प्रश्न पडला. ती राहते कुठे हे तिला माहित नव्हते किंवा तिचा नंबर नव्हता. काही करून तिच्यापर्यत पोहोचायला हवे हे तिला कळत होते, ती आपल्या S A ग्रुप वर आहे की नाही, हेही तिला माहित नव्हते. तिने ग्रुपचा ऍडमिन मनिषला कॉल लावला. मनिष गाडीत होता.

वंदना – मनिष, अरे प्रणिता नांदे नावाची मुलगी तुला माहित आहें का, आपल्यासारखीच आहें, दोन तीन वर्षांपूर्वी कुठूनतरी आलेली.

मनीष – तिचे काय?

वंदना –अरे तिने फेसबुक वर पोस्ट टाकली आहें, आपला या जगातील शेवटचा दिवस म्हणून, तिचे विचित्र फोटो टाकलेत, ती जिवंत आहें का ते कळत नाही, आपण तिला शोधायला हवं, तू तिला ओखतॊस काय?

मनीष – मी तिला ओळखत नाही पण तिचे नाव ऐकल्यासारखे वाटते, आपल्या ग्रुपची मेंबर आहे का ते पाहावे लागेल.

वंदना – ग्रुपची मेंबर वगैरे ते लांबचे रे, ती मेंबर असो वा नसो, तिचा जीव वाचवायला हवा, याकरता तिच्यापर्यंत ताबडतोब पोहोचायला हवे.

मनीष – मग ग्रुपवर तशी बातमी टाक, फेसबुक वरून तिचे फोटो घे आणि ते आपल्या ग्रुपवर घे. कुणाला तिचा फोन नंबर माहिती आहे का ते विचार. तसेच ती कुठे राहते हे माहिती आहे का विचार. मी आता वांद्र्याला चाललो आहे. पुढे काय होते ते मला कळव.

मनीष ने फोन बंद केला, वंदनाने फेसबुक वरून प्रणिताचे फोटो घेतले आणि  S A ग्रुप च्या व्हाट्सअप वर टाकले, तसेच तिचा मोबाईल नंबर आणि तिचा पत्ता कुणाला माहिती असल्यास कळवण्यास सांगितले.

थोड्याच वेळात ग्रुप वर धडाधड मेसेज येऊ लागले. बऱ्याच जणांनी तिच्याबरोबर काम केले होते. संगीता जाधव जवळ तिचा मोबाईल नंबर होता. तो तिने ग्रुप वर टाकला. तसेच तिने वंदनाला फोन लावला.

संगीता –अग वंदना, आम्ही दोघं दोन महिन्यापूर्वी एका बेब सिरीज मध्ये होतो, दोन दिवसाचे काम होते त्यावेळी तिच्याकडून मी हा तिचा नंबर घेतला होता. पण ती राहते कुठे हे मला माहीत नाही. पण माझ्या अंदाजाने ती वाशीच्या आसपास राहत असावी. तिचा कोणीतरी बॉयफ्रेंड होता, त्याच्यासोबत ती रिलेशन मध्ये होती. पण त्यांचे आता फारसे जमत नव्हते. म्हणून तो आता आपल्या मूळ घरी गेला होता. म्हणून ही डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे वाटत होते.

वंदना – पण ती राहते कुठे? तिला तातडीने शोधायला लागेल नाहीतर ती जीवाचे काही बरे वाईट करून घेईल.

मनीषा – मी आणखी काही लोकांना संपर्क करून तिचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मग तुला कळविते.

मनीषाने फोन ठेवला, आता ग्रुप वर अनेकांचे मेसेज येत होते, अनेक जण तिला ओळखत होते पण कुणालाच तिचा पत्ता माहित नव्हता किंवा ती मुद्दामच कुणाला पत्ता देत नव्हती. थोड्यावेळाने मनीषचा फोन आला. त्याला स्टेशनवर  प्रभात भेटला होता. प्रभातचे म्हणणे हल्ली तिचे पिणे फार वाढले होते, हल्ली ती कुणाच्याही गाडीत दिसायची.  तिची मनस्थिती ठीक नसल्याचे प्रभातला वाटत होते.

… वंदनाने मग तिच्या फोनवर फोन करण्याचे प्रयत्न केले. पण पलीकडून कुणी फोन उचलत नव्हते.

थोड्यावेळाने मनीष वंदनाच्या रूमवर आला, तिचा पत्ता मिळत नसेल तर तिच्या फोनवरून पोलीस तिचा पत्ता शोधू शकतात असे त्याचे म्हणणे. मनीषने पोलीस स्टेशनचा फोन नंबर आणला होता. त्याने पोलीस स्टेशनला फोन नंबर देऊन या फोनची मालकीण फोन उचलत नसल्याचे त्यांना कळवले. तसेच तिच्या जीवाचे काही बरे वाईट होण्याची शक्यता पण त्याने पोलिसांना सांगितली. पंधरा मिनिटांनी पोलीस स्टेशन वरून फोन आला, त्या मोबाईल नंबरवरून त्यांनी तिचा पत्ता शोधून काढला होता. वाशीच्या सेक्टर 20 मध्ये ती रहात होती असे त्यांना कळले.

वंदनाने त्वरित ही बातमी S A ग्रुप वर टाकली आणि पोलीस स्टेशनकडे आपण आणि मनीष जात असल्याचे पण ग्रुप वर टाकले. अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशन वर पोहोचली, तोपर्यंत  S A ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशन कडे जमा झाले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments