सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – प्रत्येकवेळी ….. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नुकतंच उजाडलं होतं. सूर्याची कोवळी सोनेरी किरणं सगळीकडे पसरली होती. रस्त्यावर रहदारी वाढायला लागली होती. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत काही झोपड्या उभारलेल्या होत्या. आणि तिथे, आज दिवसभर काय काय करायचं यावर विचार चालला होता.प्रत्येक जण काही ना काही सांगत होता. त्यातली एक बाई तिच्या मनातली योजना सांगतांना म्हणाली की —-
“बिन्नी, अगं काल सकाळी केलेल्या खेळात तू तर कमालच केलीस अगदी. दोर तुटला तेव्हा तू त्याचं टोक कसं घट्ट पकडलंस, आणि त्याला लोंबकळत शेवटपर्यंत कशी पोहोचलीस हे कुणाला कळलंही नाही. पाहणाऱ्यांना वाटलं की तो तुझ्या खेळाचाच एक भाग आहे. किती टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी ….. बाप रे….. त्या खेळात सगळ्यात जास्त पैसे मिळाले.”
“खाली पडले असते ना तर मेलेच असते माय मी. बानी आणि भैयानी तो दोर खूप उंचावर बांधला होता. खाली पहातांना मला चक्कर येत होती खरंच.”
“अगं पोरी, दोर बांधण्यासाठी कात्रीसारखे जे बांबू बांधले होते ना, त्यातला एक बांबू ऐनवेळी मोडला. म्हणून तुझ्या बाने दोराचं दुसरं टोक झाडाला बांधलं होतं. पण आज परत असं होणार नाही. त्याने नवे बांबू विकत आणलेत. आणि ढोलही चांगले शेकून घेतले आहेत. आणि आज रविवार आहे ना? आज बाजारात चार-पाच ठिकाणी दोर बांधुयात. भैय्या आणि बा अगदी जोरात ढोल वाजवतील. तू हातात काठी पकडून नाचत नाचत अगदी आरामात दोरावरून पलीकडे जायचंस. आणि घाई अजिबात करायची नाही. लोक अगदी श्वास रोखून तुझ्याकडे बघत असतात. त्या दोरावरून चालत दुसऱ्या टोकावर पोचायला तू जेवढा वेळ लावशील ना, तितकी लोकांवर जास्त छाप पडते, आणि मग त्यांचे खिसे जास्त मोकळे होतात. आणि हो, लक्षात ठेव, दोर कितीही उंचावर असला तरी जमिनीकडे अजिबात बघायचं नाहीस. तसं जर पाहिलंस तर डोळ्यावर अंधारी यायला लागते आणि मग तोल बिघडतो ….” बोलता बोलता आईने आणखी दोन चॉकलेटं बिन्नीपुढे धरली.
पण बिन्नीला ती चॉकलेटं घेण्याची इच्छाच झाली नाही. एकदम मान उंचावून तिने सूर्याकडे पाहिलं. जणू काही त्याच्यातली ऊर्जा ती स्वतःत भरून घेत होती. आणि तिने अचानक विचारलं ….. “आई तुम्ही लोक दरवेळी मलाच का चढायला लावता त्या दोरावर? भैय्याला का नाही चढवत कधी?”
“अगं आपल्या या सबंध वस्तीतल्या एका तरी मुलाला असा दोरावरचा खेळ करतांना कधी पाहिलं आहेस का तू? जास्त शहाणपणा सुचायला लागला आहे तुला. चल पटकन आंघोळ करून घे. गरम गरम पाणी काढून देते तुला….” असं म्हणत बिन्नीची आई उठून बाहेर गेली आणि उघड्यावर पेटवलेल्या चुलीतला विस्तव फुंकर मारून तिने आणखी फुलवला.
बिन्नीचे डोळे भरून आले होते… ते दुःखाने की संतापाने हे तिलाही सांगता आलं नसतं. डोक्यात एकच विचार घुमत होता—” म्हणजे एक वेळ मुलीचा जीव गेला तरी चालेल यांना…. पण मुलाचा?
मूळ हिंदी कथा : श्री भगवान वैद्य ‘प्रखर’
अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈