सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ तीन लघुकथा (१) संध्या-छाया सुखविती हृदया… (२) आनंदाची नशा… (३) भावना जपणार सासु सुनेचं नातं ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
☆☆
(१) संध्या-छाया सुखविती हृदया…
साने आजोबा भाजी घेऊन सावकाश जिना चढत होते.त्याचं ओझं उचलायला मी पुढे सरसावले.आम्ही आजींपर्यंत पोहोचलो.आजोबांनां वेळ लागला म्हणून आजी चिडल्या होत्या. गोळ्या देण्याची वेळ झाली होती. आजोबा टेकले पण नाहीत त्यांनी लगबगीनें गोळ्या आणि पाण्याच्या ग्लास आजींपुढे धरला. एक घोट घेऊन संतापलेल्या आजीने गोळ्या आणि पाण्याचं भांड भिरकावून दिलं. आजोबा पुढे धावले, आजींनी त्यांचा हात झिडकारला. . आजीच्या पाठीवरून हात फिरवत तें, म्हणाले, ” अगं हळू! ठसका लागंला कां तुला?सावकाश ! सावकाश जरा. थांब हं! मी दुसरं पाणीआणतो . धिम्या पावलांनी चालत जाऊन त्यांनी फरशी पुसायचं फडकं आणलं. मला चीडआलीआजींची.थकलेल्या, वाकलेल्या, नवऱ्याच्या वयाचा काही विचारच नाही ह्या बाईच्या मनांत. न राहून मी हंळूच विचारलं, ” आजोबा आजींचा राग नाही का येत तुम्हाला? किती करता तुम्ही त्यांच्यासाठी, दुःख नाही होत का तुम्हाला?” मला शांत करत आजोबा शांतपणे म्हणाले, ” असं बघ पोरी,रागावून कसं चालेल? आपल्या माणसांवर कधी कुणी रागवतं का? अगं कापलं तरी आपलंच असत ना ते ? कापऱ्या हाताने कन्यादान करताना तिच्या वडिलांना, देवा ब्राह्मणांसमोर मी वचन दिल आहे कीं,आजन्म तुमच्या ह्या काळजाच्या घडाला कधीही न, दुखवता प्रेमाने सांभाळीन म्हणून. आता दुखण्याने बेजार झाली आहे ती.तिचं दुःख आणि दुखणं मी घेऊ शकलो नाही,तरी सुखाची सोबत तर देऊ शकतो ना?आजोबांचं तत्व नाही पटलं मला. मी माझं घोडं पुढे दामटलं., ” आजोबा अहो तुमचं वय आणि ह्या वयातलं तुमचं, नवरा असून बायको साठी इतकं करणं म्हणजे’, अवघडचं आहे,नाही का? हसून ते म्हणाले, “वयाच् काय घेऊन बसलीस पोरी? नवरा बायकोचं कर्तव्य निभावत , एकमेकांना सुखदुःखात साथ देत, शांतपणे हिने माझा संसार केलाचं कीं नाही . माझ्या माणसांना आणि मलाही सांभाळले. पण आता दुखणं नाही सांभाळता येत तिला. बेजार झाल्यामुळे चिडचिडी झाली आहे ती. आता तिला सांभाळण्याचे दिवस माझे आहेत.संसाराच गणित तुही समजून घे बाळ.आजोबा म्हणतेस ना मला? मग वडिलकीच्या नात्याने सांगतोय, संसार रथाचं एक चाक डगमगायला लागलं तर,दुसऱ्या चाकाने सांवरायचं असतं. आणि असं बघ तिच्या ऐवजी माझ्यावर अशी वेळ आली असती तर,तिने माझाही तालमाल तोलून धरलाच असताच कीं.,”असं म्हणून साने आजोबांनी हळूवारपणे आजींच्या पाठीवरून हात फिरवला. आजी खूदकन हंसल्या. खरंच कित्ती जादू असते नाही का हाताच्या स्पर्शामध्ये!आधार देणारे हात,समजून घेणारे,प्रेमाने कुरवाळणारे,आजोबांचे थरथरणारे हात, खूप काही सांगून गेले मला. आयुष्याच्या संध्याकाळी,.. आहे ती परिस्थिती स्विकारून धर्म पत्नीला साथ देण्याचं त्यांचं तत्त्वज्ञान ऐकून मी मात्र अवाक झाले होते. प्रसंग साधा,पण आयुष्याच ‘ सार ‘ त्यात सामावलं होतं. मी तिथून बाहेर पडतांना आजींचे शब्द कानावर पडले. त्या विचारत होत्या,”अहो चुकलंच माझ् मघाशी. रागानी पाण्याचं भांड भिरकावले मी.लागलं का हो तुम्हाला? आजोबा गडगडाटी हंसले मिस्किल पणे म्हणाले, ” नाही नाही फुलं पडली माझ्या अंगावर” . , ” अरे पण ते जाऊ दे फुलांवरून आठवलं अरेच्चा! असा कसा विसरलो मी? अगं भाजीवाल्याच्या शेजारी गजरे वाला बसला होता तुझ्या साठी हा गजरा आणला होता., ” आजी लाजल्या. मगाशी रागाने लाल झालेला त्यांचा चेहरा आता गुलाबी झाला होता ! ते संध्याछायेचे प्रेम रंग बघून मी हंसतच घराबाहेर पडले. जाता जाता किती मोलाचा संदेश दिला नाही का आजोबांनी आपल्याला?. धन्यवाद् सानेआजोबा . …
☆☆
(२) आनंदाची नशा…
मी चौकात क्रॉसिंगला उभा होतो, आणि ती दिसली. केविलवाण्या चेहऱ्याने ती प्रत्येकाला विनवत होती,
“दादा बाळाला भूक लागलीया दुधाची पिशवी घेऊन द्या ना “… इतर भिकारी चहा, पाव, तंबाखू साठी भीक मागतात, पण तिची मागणी वेगळीच होती. काय तर म्हणे दूध हवंय आणि ते सुद्धा बाळासाठी. हिलाच प्यायचं असेल, बाळाचं नांव .. लबाड असतात ही लोकं, वेळ पडली तर बाळाची शपथ घ्यायला सुद्धा मागेपुढे बघणार नाहीत. मला तिची जिरवायची होती. कोणीच दाद दिली नाही, तेव्हां ती घाईघाईने बांधकामाच्या दिशेने निघाली. लांबवर नजर गेली तर झोळीतल्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. तिची पावलं वेगाने पडू लागली. माझं कुतूहल जागं झालं. मीही तिच्या मागोमागं गेलो. पळत जाऊन तिने बाळाला जवळ घेतलं, बाळाजवळ बसलेली छोटी मुलगी विचारत होती, ” आई कवाधरनं रडतया बाळ, मिळालं का ग दूध? मला बी भूक लागलीया “ रडकुंडीला येऊन आईने उत्तर दिलं, ” नाही मिळालं बाळा दूध. कुनी पैसं बी देना. कुट काम बी मिळना, एका बाबाच्या हातात दुधाची पिशवी व्हती.मला तुमचा भुकेला चेहरा आठवला, वाटलं हिसडा मारावा आणि घ्यावी पिशवी हिसकावून त्याच्या हातातून. पर मनात इचार आला, चोरी करनं पाप हाये, आपलं पोट आज भरलं पर चोरीचं पाप कायम पोटात फिरल. त्यो पांडुरंग मला माफ नाही करणार. “
मी खजिल झालो,माझी मलाच लाज वाटली. आपण उगीचच एखाद्याबद्दल गैरसमज करून घेतो,दिसतं तसं नसतं एवढं मात्र खरं. मघाशी माझ्या हातातल्या दुधाच्या पिशवीकडे बघून तिने दूध मागितलं होतं आईची माया गहिवरली होती, पण मला ते ढोंग वाटलं होतं.घरी दुधाच्या चार चार पिशव्या फुटत होत्या, पातेल्यातले दूध नेहमी उतू जात होतं,आणि इथे वाटीभर दुधाला ही माय महाग झाली होती.मी तिच्याबद्दल उगीचच गैरसमज करून घेतला होता.घाईघाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा अशा माणसांची परिस्थिती समजून घेणही महत्त्वाचं असतं. मी मागे वळलो,दुधाची आणखी एक पिशवी,ब्रेड बटर,आणि बिस्किटाचा मोठ्ठा पुडा तिच्या बाळांसाठी घेतला,आणि त्या मुलीला दिला तो घेताना बाळाची ताई हरखली.लेकरांच्या मायची नजर आनंदाने चमकली.आणि मी ? देण्यापेक्षाही घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किती मोठा असतो, या विचारांची सांगड मनात घालू लागलो. दुसऱ्या दिवशी बाळासाठी दुधाची बाटली,चमचा वाटी,आणि दूध गरम राहण्यासाठी,माझ्या मुलांसाठी आणलेला आणि अडगळीत फेकून दिलेला चांगला ग्लास घेऊन मी तिच्या दिशेला निघालो, बाळाला रोज दुधाची पिशवी पुरवण्याचा मी संकल्प केला.मला जणू काही बाळांच्या त्या माऊलीच्या चेहऱ्यावरच्या निर्मळ आनंद शोधण्याची नशा चढली होती.हो!अगदी निर्मळ ‘निष्पाप,निरागस निरामय आनंदाची नशा. आणि मग रस्ता ओलांडून मी पुढे चालू लागलो…
☆☆
(३) भावना जपणार सासु सुनेचं नातं
वझेआजी आता खूप थकल्यात. इतक्या की कमरेत पूर्ण वाकल्यांत . सूना म्हणतात. आता पूर्ण आराम करायचा. पण आजीचा वेळ जात नाही.मग त्यांच मन उदास होऊन, नको त्या विचाराने भरकटत जातं. आणि माहेर आठवतं. हॊ नां! अहो ! अजूनही त्यांना हक्काच माहेर आहे. आणि मायेच्या वयस्कर दादा वहिनीकडे त्यांचं मन ओढ घेतं.
आणि एकदम आजींच्या मनात आलं .. बस्स ठरलं. दादाला भेटून ४ दिवस माहेरी जाऊन सुखाचं माहेरपण उपभोगायचं. आणि मग ठरवल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. पण मनातला गोंधळ संपत नव्हता. काय नेऊ मी दादांकरता ? कपडे? नको. पैसे नको. तर मग काही वस्तु न्यायची.कां ? पण मग पुरेसे पैसे पण नाहीत जवळ .काय कराव बाई? आजी निघाल्या, भावाकडे. रिकाम्या हाताने. मनात रुखरुख होतीच, पण काय घ्यावं तेही सुचत नव्हतं .उदास झाल्या बिचाऱ्या. कित्ती केलंय दादांनी आपल्यासाठी आणि आपण मात्र रिक्त हस्ताने निघालोय.
एकदम त्यांच्या लक्षात आलं “ अग बाई ! कावेरी कुठंय ? केव्हाची बाहेर गेलीय .मला निघायला हवं आता.” .. आणि इतक्यांत धापा टाकत कावेरी .. त्यांची सून’ आली, आणि मनकवडी कावेरी म्हणते कशी? “आई ही घ्या . मामांसाठी नवीन पद्धतीची काठी. मामांची लाकडी काठी आता जुनी झालीय. आणि
हे.. मामीसाठी शुगर टेस्ट करायला छोटे मशिन, आता त्यांना दवाखान्यांत जायची भानगडच नाही. आई मामी पण थकल्यात आता. घराबाहेर पडणं होतं नाही त्यांच्याकडून. तुमच्याकडून ही सप्रेम
भेट द्या ना त्यांना. आता या वयात कपडे वस्तू काही नकोस वाटतं. काय द्याव प्रश्न पडला होता ना तुम्हांला ? “ आजी अवाक झाल्या .किती चुटकीसरशी प्रश्न सोडवला हिने. माझ्या मनातल्या भावना किती जपते माझी ही सून.. लाघवी आहे पोर.
आणि मग सगळं सामान घेऊन आजी समाधानाने माहेर घरी पोहोचल्या . मनाने त्या केव्हाच तिथे पोहोचल्या होत्या. आजींनी आणलेली वेगळी भेट बघून मामी गहिवरल्या आणि म्हणाल्या,” वन्स अगदी योग्य वस्तू आणल्यात तुम्ही आमच्यासाठी.” आणि मग कावेरीचं कौतुक करण्यात दोघी नणंद भावजया रंगून गेल्या. त्यात दादांनी पण भर टाकली. कारण धोरणी सुनेनी त्यांच्यासाठी आगळीवेगळी योग्य तीच भेट आणली होती.
खरंच किती योग्य भेट आणली होती नाही का कावेरीनी ! मला वाटतं तुम्हालाही ही आयडिया आवडेल. तर मंडळी असं होतं हे सासु-सुनेच ‘ भावना ‘ जपणार नातं.
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈