श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ वेंकीचा सल्ला— भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली☆
पत्र म्हणजे अलगद उलगडत जाणार्या एकाद्या रेशमी भावबंधाचा सांगावा असतो…. अशी पत्रे कधी नवी उमेद व अनामिक भावनिक बळ देऊन जातात तर कधी डोळ्यांतून अलगद आसवं ओघळायला लावतात. कधी भूतकाळात डोकावयाला लावतात. कालमानाप्रमाणे त्यात विविध तरंग उमटलेले असतात. अशी बरीच हस्तलिखित पत्रे मी जपून ठेवलेली आहेत. फुरसतीच्या वेळेत ती पत्रं चाळताना कितीतरी वेळ निघून जातो.
गेल्या रविवारी असंच चाळताना वसंताचे पत्र आणि मी लिहिलेल्या उत्तराची छायांकित प्रत सापडली. त्या पत्राला तब्बल पस्तीस वर्षे झाली आहेत.
नोकरीच्या निमित्ताने वसंताची पोस्टिंग सोलापूरला झाली होती. कामाव्यतिरिक्त ऑफिसात तो कुणाशी बोलायचा नाही. शांत व गंभीर प्रकृतीचा वसंता आणि मी समवयस्क असल्याने आमची लवकरच गट्टी जमली. नोकरीत कायम झाल्यावर वसंताला स्थळं सांगून येत होती. अखेर त्याच्याच नात्यातल्या एका मुलीशी त्याचं लग्न जमलं. त्यांची एकमेकांशी ओळख होती पण घनिष्ठ परिचय नव्हता.
वाङनिश्चय झाल्यानंतर वसुधा वहिनींचे प्रेमाने ओथंबलेले एक पत्र त्याने मला दाखवले. दुसर्यांची प्रेमपत्रे वाचणे म्हणजे दुसर्यांच्या बेडरूममध्ये डोकावण्यासारखे आहे, असं म्हणत मी वाचायला नकार दिला. मी त्याला म्हटलं, “तू ही एक छानसे प्रेमपत्र लिही. कवितेतल्या काही सुंदर ओळी अधून मधून पेरून टाक. मध्येच कुणाची तरी एखादी चारोळी लिही आणि अत्तर शिंपडलेल्या एखाद्या गुलाबी पाकिटातून पाठवून दे.”
वसंता हिरमुसला चेहरा करून म्हणाला, “ते आपलं काम नाही गड्या. मला तसं लिहिता आलं असतं तर वसुधेचं पत्र तुला कशाला दाखवलं असतं? या पत्राचं उत्तर तू लिहावं, म्हणून मी तुला देतोय. तू कच्चं ड्राफ्ट लिहून दे, मी फेअर करून पाठवतो.”
झालं, त्यानंतर मी वसंताच्या प्रेमपत्रांचा घोस्ट रायटर झालो. खरं तर, दुसर्याची मदत घेऊन प्रेमपत्रे लिहिणे आणि फुकटचा भाव मारावा हे वसंताच्या स्वभावाला अनुसरून नव्हतं. ‘हम भी कुछ कम नही’ असं वसुधा वहिनींना दाखवणं एवढाच माफक विचार त्याच्या पत्र लेखनामागे असायचा.
एकमेकांच्या मनाला भुरळ पाडणार्या, पुढच्या पत्रासाठी हुरहूर लावणार्या, उत्सुकता शिगेला नेणार्या या पत्रांच्या आधाराने ते दोघेही काही महिने काव्यात्मक स्वप्निल विश्वात तरंगत होते. आजच्या ईमेलच्या, टेक्स्टींगच्या जमान्यात हस्तलिखित पत्र लिहिणे म्हणजे वेडेपणा वाटेल. परंतु हा वेडेपणा चिरंतन आनंद देणारा असतो एवढं मात्र नक्की.
एका शुभदिनी त्या दोघांचा या भूमंडली शुभमंगल विवाह संपन्न झाला. काव्यात्मक पत्रे लिहिणारा भावुक नवरा थोड्याच दिवसात सौ. वसुधा वहिनींना एकदम रूक्ष वाटू लागला. त्याकाळी शब्दागणिक पैसे लागायचे म्हणून टेलिग्रामचे मजकूर कमीत कमी शब्दांत लिहायचे. अगदी तसंच वसंताचे संभाषण त्रोटक असायचे. ‘चहा दे. जेवायला वाढ, पाणी दे, ऑफिसला निघालोय. किराणा माल शेजारच्या दुकानातून घे.’ या पलीकडे काही नाही. पत्रांतून रसिक वाटलेल्या वसंताचं असं वागणं वहिनींना अगदी अनपेक्षित होतं.
वसंताच्या देखतच सौ. वहिनींनी एकदा ही व्यथा माझ्यासमोर निराळ्या पद्धतीने बोलून दाखवली. वसंताच्या अशा वागण्यामागे त्याचं स्वत:चं असं एक तत्वज्ञान होतं. ‘जास्त बोललो तर ती उगाच डोक्यावर बसायला नको!’ त्या तत्वज्ञानाला मी सुरूंग लावला. मी त्याला खूप सुनावलं. त्यानंतर थोडा अपेक्षित बदल झाला असावा.
इथे असतांनाच त्यांना एक मुलगा झाला. वसंताच्या वागण्यावरून वहिनींचं लक्ष विकेंद्रित झालं. बाळाच्या नादात ते सुखी कुटुंब आनंदात होतं. एका वर्षानंतर त्यांची बदली नागपूरकडे झाली. त्यानंतर आमच्यात खूप मोठी कम्युनिकेशन गॅप राहिली. आणि अचानक एके दिवशी एखादा विद्ध पक्षी पुढ्यात येऊन पडावा तसं वसंताचं पत्र टाकून पोस्टमन निघून गेला. माझ्या संग्रहातले ते पत्र हेच,
प्रिय वेंकी,
आपण जवळचे मित्र म्हणवत होतो. दिवाळीच्या ग्रीटींग्जशिवाय आपण एकमेकांना कधी पत्र पाठवतच नाही. पत्र लिहिण्याविषयी माझा ‘उत्साह’ तुला माहीतच आहे. त्यातून मराठीतून लिहिणं तर जवळपास संपल्यातच जमा झाले आहे. असो.
मध्यंतरी सुनील भेटला होता. त्यानं तुझ्याबद्दल सांगितलं. तू कुठल्यातरी क्लबचा चार्टर्ड प्रेसिंडेट झाला आहेस. एका शाळेच्या बक्षीस समारंभाला तू प्रमुख पाहुणा होतास म्हणे. हे ऐकून मला तुझा अभिमान वाटला. एकंदरीत तू ग्रेटच आहेस. असो.
मला तुझ्याकडून एक बहुमोल ‘सल्ला’ हवा आहे. तू योग्य सल्ला देशील ह्याची मला खात्री आहे.
हल्ली तुझ्या वहिनींचे आणि माझे बर्याच गोष्टींवर मतभेद होत असतात, त्यामुळे वारंवार खटके उडत असतात. साध्या साध्या गोष्टीवरून ती चिडचिड करते. मुलांनी उच्छाद मांडला आहे. अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. ऑफिसमधून येऊन ती मुलांचा तासभर अभ्यास घेते परंतु त्यांच्या प्रगतीत फरक नाही.
माझा स्वभाव तुला माहीतच आहे. वादविवाद टाळण्यासाठी म्हणून मी मूग गिळून बसतो त्यामुळे तिचा त्रागा आणखीनच वाढतो. आम्ही दोघेही कमावतो पण घरात मात्र सुखशांती नाही.
कृपा करून एक सविस्तर पत्र अवश्य लिही, जेणेकरून तुझ्या वहिनींचा नूर पालटेल व आमच्या संसाराचा गाडा सुरळीत चालेल… वगैरे.
लगेच समोरचा पॅड घेऊन एक सुदीर्घ पत्र लिहिलं, त्यातील हा मजकूर:
प्रिय वसंता,
एवढ्या काळानंतर तुझे अशा तर्हेचे पत्र येईल अशी अपेक्षा नव्हती. मला काही लिहिण्यासाठी माझ्याबद्दल खोट्या कौतुकाच्या प्रस्तावनेची आवश्यकता निश्चितच नव्हती. असो.
कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुंडलीत देखील उच्चीचे ग्रह आले असतील. तालुक्यातल्या का असेना एका शाळेच्या बक्षिस समारंभाला प्रमुख पाहुणा होतो. एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈