श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ वेंकीचा सल्ला— भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.) – इथून पुढे 

पहिल्यांदाच खुलासा करतो, पत्रातील हा मजकूर म्हणजे एखाद्या पोक्त व्यक्तीचा सल्ला वगैरे आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. माझा सल्ला फक्त मित्रत्वाचा सल्ला असेल. साप्ताहिकांतून व्यावसायिक दृष्ट्या चटपटीत वाटणारा ‘वहिनींचा सल्ला’ वा ‘ताईंचा सल्ला’ नव्हे हे लक्षात ठेव. केवळ तुझ्यासाठी म्हणून हा पत्र प्रपंच. 

खरं सांगायचं झालं तर, संसाराचा गाडा सुरळीत चालवण्याचा रामबाण उपाय अजूनपर्यंत तरी कुणालाही सापडलेला नाही. प्रत्येक माणसाच्या हाताचे ठसे जसे वेगळे असतात तसा प्रत्येकाचा संसारही वेगळा असतो. अमुक एखाद्याचा संसार सुरळीत चालेल की रखडत राहील हे कधीच सांगता येत नाही. 

कॅलिडोस्कोपमध्ये एखादा काचेचा तुकडा टाकून हलवला तर आतील रंग आणि नक्षीकाम बदलत जातात. माणसांची व्यक्तिमत्वे देखील कॅलिडोस्कोप मधील काचेच्या तुकड्यांसारखे प्रत्येक भूमिकेनुसार रंग बदलत जातात. 

ऑफिसात खडूस म्हणून ख्याति असलेला पुरूष घरात बायको आणि मुलांशी फार प्रेमाने वागतो. आई बाबांची लाडकी, भावाची प्रेमळ बहीण आणि सगळ्याच नात्यांत प्रिय असणारी स्त्री, नवर्‍याची पत्नी म्हणून आदर्श असेलच असे नाही. बाहेर मनमिळावू असलेला पुरूष घरात आदर्श पति असेलच असे नाही. कारण माणूस हा यंत्र नाही. त्यामुळे तो कधी कसे वागेल हे सांगता येत नाही. 

पत्नी किंवा पती ही एक व्यक्ति आहे. तिला आणि त्याला स्वतंत्र भावभावना, आवडीनिवडी, अपेक्षा  असतात बहुतेक लोक हेच विसरतात आणि दोघांमधला ‘स्व’ जागृत झाला की, विसंवाद सुरू होतो. सूर जुळले तर मैफल जशी रंगत जाते, तसंच संसारातही सूर जुळावे लागतात. 

ज्या जोडीदारांत समंजसपणा असतो त्यांच्यात वाद कमी प्रमाणात होतात. पण कधीच भांडण किंवा एकमेकात मतभेद झालेले नाहीत, असे जोडपे या भूमंडलावर सापडणे अवघड आहे हे मात्र नक्की. दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती एकत्र आल्या की, प्रत्येक गोष्टीत फरक असणारच. संसार ही एक तडजोड असते. कधी त्याला तर कधी तिला थोडंफार बदलावेच लागते.

यशस्वी वैवाहिक जीवन हे योग्य जोडीदारावर अवलंबून नसून आपण स्वत: चांगला जोडीदार असणं किंवा होण्याचा प्रयत्न करणे यावरही संसाराची यशस्विता असते. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात पण स्वर्ग काही कुणी पाहिलेला नसतो. तो इथेच निर्माण करायचा असतो. हाती आलेला डाव नीट मांडला तर कोणत्याही प्रकारचं लग्न यशस्वी होऊ शकते. मात्र ही आनंद टाळी एका हाताने वाजत नाही.

आज सौ. वहिनी देखील नोकरी करतात. घर आणि नोकरी ही दोन्ही अवधानं सांभाळताना त्यांची किती त्रेधातिरपिट उडत असेल याचा कधी विचार केलायस का? नाही, अर्थात ती तुझी वृत्ती नाही. तुलाही परिस्थितीनुसार थोडं बदलायला हवं. लग्नाआधी तुला प्रत्येक गोष्टीत स्वतःच निर्णय घ्यायची सवय असेल. पण लग्नानंतर मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं म्हणणार्‍या जोडीदारासोबत कुणाचंच पटत नाही. एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून निर्णय घेणं तर गरजेचं आहे. तुमची मतं कुठं जुळत नाहीत त्यावर दोघं मिळून चर्चा करा. त्यामुळे कदाचित आपली ताठर भूमिका लवचिक होण्याची शक्यताही असते. 

तुम्ही बोलायला कशी सुरुवात करता त्यावर त्याचा शेवट अवलंबून असतो. उद्धटपणे बोलण्याने समस्येतून तोडगा निघण्याची शक्यताच नसते. कित्येकदा पती-पत्नीतील वादाचं कारण इतकं क्षुल्लक असतं की त्यावर त्यांनी शांतपणे विचार केला की आपण विनाकारण ह्या गोष्टींसाठी भांडत बसलो हे त्यांच्या लक्षात येते.   

जिथे आई-वडीलांमध्ये वैचारिक सामंजस्य असते त्या घरातील मुले मनाने निकोप असतात. पती-पत्नीच्या संबंधातील ताणतणावाचे पडसाद मुलांवर पडतातच. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं ही तुझीदेखील जबाबदारी आहे. काचेच्या वस्तूंना तडा जाऊ नये म्हणून ‘ग्लास, हॅंडल विथ केअर’ अशी सूचना असते, तसंच कुटुंबातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही काळजी घ्यायला हवी.

कुणाच्या सल्ल्याने कुठलेही संसार तरत नसतात. आपला मार्ग आपणच काढावा. या पत्र वाचनाच्या शिक्षेनंतर यापुढे तरी ‘वेंकीचा सल्ला’ टाळशील अशी अपेक्षा करून रजा घेतो. पत्रोत्तराची वाट पाहतो. 

चार ओळीत या पत्राचं उत्तर आलं. ‘आम्ही उभयता तुमचे आभारी आहोत. यापुढे ह्या विषयावर तुमच्या सल्ल्याची आवश्यकता भासणार नाही ह्याची खात्री देतो. सहकुटुंब नागपूरला या. तुमचे स्वागत करायला आम्हाला आवडेल.’ 

त्यानंतर मात्र माझा सल्ला कुणी मागितला नाही. मागितले असते तर याच पत्राची छायांकन प्रत पाठवून दिली असती.  

मागच्या वर्षी वसंता सहकुटुंब दक्षिण भारत सहलीला चालला होता. आधीच कळवल्याने बेंगलूरू स्टेशनवर त्यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या भेटीत त्या उभयतांना काय बोलू अन काय नको असं झालं होतं. मी सहज विचारलं, ‘वसंता प्रमोशनसाठी प्रयत्नच केला नाहीस वाटतं.’ 

त्यावर वसंता म्हणाला, ‘हे बघ वेंकी, माणसाला काय हवं असतं रे? आम्ही दोघेही कमावतो. वसुधासारखी समंजस जोडीदार मिळाली. चांगल्या मार्कांनी पास होणारी मुलं आहेत, स्वत:चं असं एक छोटेसे घर आणि महत्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांचं कृपाछत्र माझ्या डोक्यावर आहे ह्यातच मी समाधानी आहे.’ 

तितक्यात गाडीने शिट्टी दिली. एवढ्या प्रवासाच्या दगदगीत देखील वहिनींच्या चेहर्‍यावर एक असीम तृप्ती दिसत होती. वसंताचे आई वडील नातवांशी गप्पा मारण्यात मश्गुल होते. गाडीने गती घेतली. थोड्याच वेळेत वसंताचा हेलकावणारा हात माझ्या नजरेआड झाला. त्यानंतर आमची भेट झाली नाही. परंतु वसंता व्हॉट्सअपच्या सौजन्याने, मला कित्येक  उपदेशपर संदेश नियमितपणे पाठवत असतो.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments