श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘भान…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆
तिने दुचाकी उभी केली. इकडेतिकडे पाहिले. दुपारची वेळ असल्याने रस्ता निर्जन होता. सारा परिसरच दुपारी वामकुक्षी घेत असल्यासारखा शांत, निद्रिस्त.. उपनगरातली नवी कॉलनी. सारेच बंगले जणू माणसा-माणसात आलेली अलिप्तता दाखवत होते. मोठे नोकरीला, छोटे शाळा- कॉलेजला. बऱ्याच बंगल्यांना कुलपे. तशी ती काही पहिल्यांदाच तिथं येत नव्हती. नवरा, मुलगा यांच्या बरोबर बऱ्याच वेळा आली होती. तरीही तिला सारे नवखे वाटत होते. तिने खाली उतरून स्वतःचा ड्रेस ठीकठाक केला.
सकाळपासूनच तिचं चित्त थाऱ्यावर नव्हते. चहात साखरच नाही, भाजीत मीठ जास्त तर आमटी आळणी असे काही ना काही सकाळपासून घडतच होतं.
“तुला काही होतंय काय? बरे वाटत नसले तर डॉक्टरकडे जाऊया. उगाच अंगावर काढू नकोस. ”
दीपक, तिचा नवरा तिच्या कपाळावर हात ठेवून ताप नाही ना याची खात्री करत तिला काळजीने म्हणाला तेव्हा त्याच्या स्पर्शाने तिचे मन आक्रसले होते. मनाच्या आक्रसलेपणाची जाणीव होताच तिला कसेसेच झाले होते. मनात अपराधीपणाची जाणीव जागी झाली होती पण पुढच्याच क्षणी तापल्या तव्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखी ती जाणीव वाफ होऊन गेली होती.
‘’ डॉक्टरकडे कशाला? मला काय झालंय? उगाचच तुमचं काहीतरी असते. “
“घर, ऑफिसचं काम, त्यात अलीकडे सोनू पण फार हट्टी होत चाललाय. खूपच दगदग होते तुझी. आज रजा घेतेस का? जरा आराम कर.. जरा विश्रांती घेतलीस की बरं वाटेल तुला…”
त्याच्या ‘ रजा घेतेस का ‘ या शब्दांनी तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. तो स्वतःचं आवरण्याच्या नादात होता. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिला हायसे वाटले.
तिच्याशी बोलता बोलता त्याने स्वतःचा, तिचा डबा भरला होता, सोनूची बॅग भरली होती.
“ तू आवर तुझे. आज जरा उशीरच झालाय. आठ वाजत आलेत.. हवं तर सोनूला मी सोडते आईकडे.. ”
तिच्या वाक्याने त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ती आपल्याच विचारात असल्यासारखी.. स्वतःचा डबा पर्स मध्ये ठेवत होती. त्याला बसने ऑफिसला जावे लागायचं. तिच्या आईचं घर त्याच्या वाटेवर असल्याने रोजच तो सोनूला तिथे सोडून, स्टँडवर जाऊन बसने ऑफिसला जायचा आणि ऑफिस मधून येताना सोनूला घेऊन यायचा. तिचं ऑफिस आईच्या घराच्या नेमके उलट दिशेला होतं. सारे आवरून ऑफिसला जायचं म्हणल्यावर तिची नेहमीच घाई व्हायची. सहसा ती सोनूला सोडायला, आणायला जायची नाही. त्यामुळे तिच्या वाक्याने त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा चमकून पाहिले होते.
“गेले काही दिवस झाले पाहतोय तुला.. तुझं लक्ष नसतं, स्वतःच्याच नादात, विचारात असतेस… एवढी कसल्या विचारात असतेस ? ऑफिसमध्ये काही झालंय काय ?“
“ मला काही म्हणालास काय?”
तिने दचकून भानावर येत त्याला विचारले. तिचे दचकणे त्याच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तिला पुन्हा तेच विचारले.
“काही नाही रे. ऑडिट जवळ आलंय. पेंडिग कामे खूप आहेत त्याचा विचार करत होते. ”
तिने सावरत त्याला उत्तर दिले. त्याला ते उत्तर विचार करून, ठरवून दिल्यासारखं वाटलं. तो पुढे काही बोलला नाही. नुसतं‘ हं ‘ म्हणून स्वतःच आवरायला आत गेला. तिने सोनूचं सारे आवरले.
तिला ‘बाय‘ करून, सोनूला घेऊन तो गेला तशी ती रिलॅक्स होऊन मटकन सोफ्यावर बसली.
काही क्षण स्वस्थतेत गेले आणि पुन्हा अस्वस्थता मनाला बोचू लागली.. मनात द्वंद्व सुरु झाले…’काय करावे ? ‘ प्रश्नाचा भोवरा मनात गरगरु लागला.
मोबाईलची रिंग वाजली तशी ती विचारातून भानावर आली. तिने पाहिले. फोन स्वप्नीलचाच होता. उजाडायला सुरवात झाली की नकळत हळूहळू अंधार हटत जातो तसे तिच्या मनातले विचार, मनाची संभ्रमावस्था हटत गेली.
“ सुप्रभात ! आवरले काय ? सोनू काय म्हणतोय? झाली तयारी?”
स्वप्नीलचा खर्जातला आवाज कानावर पडला.. आणि ती भारावल्यासारखी झाली.
“ सुप्रभात ! दोघेही आत्ताच बाहेर पडले. आत्ता आठवण झाली वाटते?”
“ आठवण व्हायला विसरावे लागते… आणि कितीही, काहीही वाटले तरी तू थोडीच माझ्यासाठी फ्री आहेस ? तुझी वाट पाहणे हेच आयुष्य झालंय माझे… वाट पाहतोय.. येतेस ना लगेच ?”
“हं. ऑफिसला जाऊन येते.. ”
“ऑफिसला जाऊन.. ?”
त्याचा रुसल्यासारखा स्वर.. तिचे मधाळ हसणे. काही क्षणांनी तिने फोन ठेवला. तिचा चेहरा आणि मन खुलून आले होते.. मनात स्वप्नील रेंगाळत असतानाच तिने सारे आवरले.
ती आरशासमोर उभं राहून आवरत असताना तिने स्वतःच्या प्रतिबिंबकडे पाहत, ‘ मॅडम, रागावणार असला तर रागवा.. पण राहवत नाही म्हणून सांगतो.. आज तुम्ही खूप खूप छान दिसताय.. ‘ हे स्वप्नीलचे पहिले वहिले वाक्य अंगभर लपेटून घेतले.
ऑफिसमध्ये नव्यानेच बदलून आलेला स्वप्नील.. एकाच ऑफिसात असल्यावर ओळख व्हायला कितीसा वेळ लागणार? मुळात त्याचं व्यक्तीमत्व प्रथमदर्शनी प्रभाव पाडणारे होतंच. त्यात त्याचा खर्जातला, सतत ऐकावा वाटणारा आवाज.. , आपलेपणा वाटावा असे बोलणे, मदतीला सतत तत्पर असणे.. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी भरभरून प्रशंसा करणे, प्रोत्साहित करणे.. त्याचं सारेच कसे भुरळ पाडणारे होते… पण भुरळ पडायला ती काही षोडशवर्षीया नव्हती. ती विवाहिता होती. तिचा दीपकशी प्रेमविवाह झाला होता आणि ती एका मुलाची, सोनूची आईही होती..
स्वप्नीलने केलेली तिच्या सौन्दर्याची प्रशंसा तिने काहीही न बोलता फक्त हसून स्वीकारली होती… पण त्याचे ते वेगळे शब्द, बोलण्याची वेगळी पद्धत तिला भावून गेली होती.. नकळत कुठेतरी तिच्या मनात.. अंतर्मनात रुजली होती. मनात त्याच्याबद्दल आपलेपणा रुजू लागला होता.
स्वप्नीलला ऑफिसच्या कामांची माहिती तर खूप होतीच त्याशिवाय इत्तर सर्वसाधारण माहितीही त्याला जास्त होती. त्याचं इंग्रजीवरचं प्रभुत्व खरंच वाखाणण्यासारखं होते त्यामुळे काहीही अडचण आली की सारेच त्याचे मार्गदर्शन घ्यायचे. तो ही हसतमुखाने आनंदाने, आपलेपणाने सगळ्यांना मदत करायचा.
तो तसा सगळ्यांनाच मदत करीत असला तरी आपल्याबाबतीत जरा जास्तच जवळकीने वागतो हे तिच्या लक्षात आले होते.. काळजीने, आपुलकीने चौकशी करणे, प्रोत्साहित करणे, हे सारेच तिला आवडायला लागले होते.. तिची स्तुती करणारे अनेकजण तिला भेटायचे त्यांना ती हसून दाद ही द्यायची पण स्तुतीने हुरळून जायची नाही. स्वप्नीलच्या बाबतीत मात्र वेगळे घडत होते. त्याने स्तुती केली की ती सुखावत होती. तिला त्याने केलेली स्तुती आवडू लागली होती, सतत त्याने स्तुती करावी आणि आपण ऐकत राहावी असे वाटायला लागले होतं. त्याचे शब्द तिच्या मनात रेंगाळायचे.. ती त्या शब्दांच्याआणि त्याच्या आठवणीत रमायला लागली होती.
ऑफीसातले काम घरी घेऊन यावे तसे ती त्याच्या आठवणीची फाईल घरी घेऊन येऊ लागली होती. हातातली कामं झटपट आटपून ती त्या फाईलमध्ये डोके खुपसून बसू लागली होती..
क्रमशः भाग पहिला
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈