श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भान…’ – भाग – 3 ☆ श्री आनंदहरी 

(तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या विचारांचा, आठवणींचा हिंदोळा झुलत राहायचा, कधी कधी तिच्याही नकळत…) – इथून पुढे 

दीपकने दोन्ही कुटुंबांचा पिकनिक आणि सहभोजनाचा कार्यक्रम ठरवला. स्वप्नील ,त्याची बायको स्वप्ना आणि मुलगी तेजाला घेऊन आला. स्वप्नाला पाहून का कुणास ठाऊक पण तिला कसंसंच झाले. स्वप्ना तशी छान होती ,मोकळेपणाने बोलणारी, सहभागी होणारी..तिच्याशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागली. ती ही तशीच वागली .पण स्वप्नीलचं स्वप्नाशी असणारे वागणे तिला रुचले नाही. तसा तो तिच्याशी आवश्यकतेपेक्षा  थोडेसे जास्तच अंतर राखून वागतोय असे तिला जाणवले आणि ती मनोमन नाराज झाली होती. ती नाराजी फक्त त्यालाच जाणवेल अशी व्यक्त ही केली होती पण त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. मग तीही आस्ते आस्ते पण मनाविरुद्ध दीपककडे सरकली. तशा गप्पा छान झाल्या.पिकनिक ही मस्त झाली.. सोनू आणि तेजाची तर चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघांनी खूपच धमाल केली. फक्त ती मनातून अस्वस्थ झाली होती, कुठंतरी अंतर्यामी दुखावली होती. इत्तर कुणाच्याही ध्यानी-मनी आलं नसलं तरी स्वप्नीलला ते चांगलंच जाणवले होते 

घरी आले तेव्हा सारेच दमले होते, सोनू तर काही न खाताच लगेच झोपून गेला. दीपक हॉल मध्ये  टीव्ही वर बातम्या पाहत बसला होता. ती अस्वस्थ मनाने सोनूजवळ पहुडली होती. तिला खरेतर स्वप्नील काहीसा जास्तच त्रयस्थपणाने वागल्याने त्याचा राग आला होता. ती मनोमन दुखावली गेली होती. मोबाईलचा मेसेज टोन वाजला. स्वप्नीलचा मेसेज होता. तसाच डिलीट करावा असे तिला वाटत होते पण तिने तो वाचला.

‘सॉरी, तू समजूतदार आहेस, सारे समजून घेशील हा विश्वास आहे. एकच सांगतो, तू भेटल्यापासून मला दुसऱ्या कुणाचंच आकर्षण वाटत नाही… अगदी कुणाचंच . मिस यू..‘

तिने मेसेज वाचून डिलीट केला. तिच्या मनात आले ,दीपकच्या मनात काही येऊ नये म्हणून कदाचित आपणही असेच वागलो असतो, कदाचित नकळत वागतही असू आणि त्या विचाराबरोबर तिच्या मनातली अस्वस्थता, त्यांच्याबद्दलचा राग ही डिलीट झाला. तिने त्याला तसाच रिप्लाय दिला आणि ती उठून हॉलमध्ये दीपकजवळ येऊन त्याला बिलगून बसली.

ऑफिसात रोज भेट व्हायचीच,  बोलणे ही व्हायचं पण शब्दांचे, नजरेचे अर्थ बदलले होते. ‘अहो जाहो’ करणारा तो ‘अगं तूगं ‘ कधी करू लागला ते तिच्याही ध्यानात आले नसलं तरी  तिला ते मनापासून आवडू लागले होते. सहज भासवलेल्या स्पर्शात ओढ, हवेहवेसेपण पाझरू लागले होते. दिवस जात होते तसे भेटीची ओढ वाढत होती. घरी परतल्यावर, सुट्टीदिवशी कॉल, मेसेज तर होत होतेच पण ‘गुडनाईट’ शिवाय झोप लागत नव्हती आणि ‘गुडमॉर्निंग’ शिवाय जाग येत नव्हती. 

एकीकडे त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत असताना दीपकचा स्पर्श नकोसा वाटू लागला होता. ती ते दर्शवत नव्हती तरी दीपकला ते जाणवू लागले होते. त्याने ते एकदा बोलूनही दाखवले होते पण काहीतरी सबब तिने सांगितल्यावर त्याने ती सबब काहीही न बोलता मान्य केली होती,स्वीकारलीही होती. सुरवातीच्या काळात तिच्या मनात येणारी अपराधीपणाची भावना, विचार आताशा येईनासे झाले होते.. उलट ती स्वप्नील मध्ये जास्तच गुरफटत चालली होती आणि तिला त्याची जाणीवही होईनाशी झाली होती. आपण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हा विचार ही तिच्या मनाला स्पर्शत नव्हता..आणि ‘का ?’ हा प्रश्नही तिला पडत नव्हता. जणू तिच्या मनावर त्याचं गारुड होते.. त्या गारुडाने तिचे भान हरपले होते.. विचारशक्ती कुंठित झाली होती. योग्य अयोग्य याचा विचार ही मनात येत नव्हता .

दीपक दोन दिवसांकरीता ऑफिसच्या कामानिमित्त परगावी गेला तेव्हा कधी नव्हे ते तिला मोकळे मोकळे वाटले. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. कधी दीपक एखादा दिवस जरी येणार नसला तरी तिला कसेतरी वाटायचं..झोप यायची नाही. त्याकाळापूरती मनात आणि घरातही एक पोकळी जाणवायची. एकटं एकटं वाटायचं . ती त्याच्या येण्याची खूप आतुरतेने वाट पहायची. तो आला की खूप रिलॅक्स व्हायची. यावेळी मात्र तिला तसे काहीच वाटले नव्हते . 

तिने दीपक परगावी गेल्याचं बोलता बोलता स्वप्नीलला सांगितले होते. ते त्याला सहज सांगितले की मुद्दामहून हे तिला स्वतःला सुध्दा कदाचित सांगता आले नसते पण स्वप्नीलला ते सूचक वाटले आणि तो संध्याकाळी तेजाला घेऊन तिच्या घरी आला होता. तेजा आणि सोनूची जोडी उड्या मारतच खेळायला अंगणात पळाली. ती चहा ठेवायला किचन मध्ये जाताच मागून स्वप्नील आत गेला .. आणि असोशीने खसकन् तिला जवळ ओढले. ती त्या क्षणाची वाटच पाहत असल्यासारखी मिठीत विसावली पण पुढच्याच क्षणी भानावर आली.. ‘ मुले पटकन आत येतील..’ म्हणत पटकन बाजूला झाली. स्वप्नील काहीतरी म्हणत होता. तिला सांगत, समजावत होता पण ती त्याक्षणी ठाम राहिली.

“ रागावलात ? सॉरी.. .पण इथे शेजारच्या कुणीही घरच्यासारखं पटकन आत येतात.. भीती वाटते.. सोनू तर खेळताखेळता मध्येच पळत पळत आत येतो. “

स्वप्नील ‘ नाही ‘ असे म्हणाला असला तरी नाराज झालाय हे तिला जाणवले होते. तिने ‘सॉरी ‘ म्हणून, त्याचा हात स्वतःहून हातात घट्ट धरत त्याला खुलवायचा प्रयत्न केला.

थोडा वेळ थांबून जाता जाता त्याने विचारले, 

“ ठीक आहे. तिकडे तरी येशील ना? “

ती ‘ हो ‘ म्हणाली होती आणि आलीही होती. बाईक उभी करून कपडे सरळ करता करता तिला हे सारे आठवले तशी ती विचारात पडली..

‘ हे काय आहे? प्रेम की आकर्षण, शारीरिक ओढ? आपण तर दीपकवर प्रेम केले..त्याच्या सहवासात खूपच सुखी होतो. ओढ होती, असोशी होती.. मग अलीकडे आपल्याला हे झालंय तरी काय ? आपण एवढ्या कशा बदललो, एवढया कशा वाहवलो? काही दिवसातच आपण स्वप्नीलकडे आकर्षिलो गेलो आणि आपल्याला इतकी वर्षे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, ज्याच्यासाठी आपणच सर्वस्व आहोत त्या दीपकचाही आपल्याला विसर पडला.. ..त्याच्या प्रेमाशी आपण प्रतारणा करतोय हे ही आपल्या मनातही आलं नाही कधी…इतकंच नव्हे तर त्याचा सहवास, स्पर्शही नकोसा वाटू लागलाय… इतक्या कशा बदललो आपण?  इतक्या कशाला भाळलो आपण.. आपल्या स्तुतीला, गोड बोलण्याला..? आणि या साऱ्यात दीपकला मनातनं वजाच करून टाकल्यासारखे दूर ठेवले.. इतक्या कशा मोहात आंधळ्या झालो आपण .. आणि का? का? का?.. आणि स्वप्नीलचं, आपले  नाते तरी काय? या नात्याचं भविष्य तरी काय ? ‘

तिच्या मनात विचारांचं वादळ उठले.. शेवटी मोहमयी मन आणि तिचे अंतर्मन यांत  द्वंद्व सुरु झाले आणि त्या एका क्षणात आपण काय करतोय याचं तिला भान आले.

….आणि स्वप्नीलच्या बंगल्याचं गेट उघडण्यासाठी पुढे सरसावलेला तिचा हात थबकला.

— समाप्त —

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments