डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ सुंदर माझं घर – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
बाल्कनीत बसून निवांत आल्याचा चहा घेताना उमाला शशीचा फोन आला.’काय करते आहेस ग आज? छान नाटक लागलंय बघ.बरेच दिवस आपल्याला बघायचं होतं ना?काढू का तिकिटे?’शशी विचारत होती.’होहो. काढ काढ. जाऊया आपण बघ .’उमा म्हणाली. तेवढ्यात कामाची बाई आली. बाई आज काय करायचा स्वयंपाक? बाई,आज पावभाजी करूया.आम्ही नाटकाला जाणार आहोत चार वाजता.मग शशीताई इकडेच येतील.पावभाजी खूप आवडते तिला.तुमची मस्त होते पावभाजी. आणि साहेबांना पण आवडते.’’बाई बरं म्हणाल्या आणि कामाला लागल्या. काम सांगून उमा हॉल मध्ये येऊनबसली. सगळं काम आवरून बाई निघून गेल्या.उमाला सकाळीच सोनाली चा फोन येऊन गेला.आई, बरी आहेस ना काय चाललंय ? सोनालीचा फोन म्हणजे उमाला तासाची निश्चिती.तिला भरभरून सांगण्यासारखं खूप खूप असायचं आणि फक्त वीक एन्डलाच तिला वेळ असायचा. खूप खूप मन भरून गप्पा मारून झाल्यावर उमाने सगळं आवरलं आणि मार्केट मध्ये चक्कर टाकावी म्हणून साडी बदलून तयार झाली. छान मनासारखी खरेदी करून उमा घरी आली.शेजारच्या प्रतिभा काकू सहज म्हणाल्या’उमा,ये ग घरात.टेक जरा.मस्त कॉफी पिऊया .वाटच बघत होते तुझी.’ सुनील आला नाही वाटतं घरी?अहो तो गेलाय चार दिवस ट्रेकला मित्रांबरोबर.माझं एकटीचंच राज्य आता घरी!उमा हसून म्हणाली.
काकू,ही तुमची भाजी,ही बिस्किट्स आणि हा माझ्याकडून तुम्हाला चिवडा. मी केलेला आवडतो ना तुम्हाला?कालच केला बघा.’प्रतिभाकाकू खूष झाल्या.वावा मस्तच ग.थँक्स हं.नेहमी माझं सगळं सामान अगदी न चुकता मला बाहेर जाताना विचारून आणतेस बाई!हल्ली कोण करतंय एवढं कोणासाठी?’कॉफीचा मग हातात ठेवत काकू म्हणाल्या. झालं की ग वर्षं तुला अमेरिकेहून परत येऊन ना?आता कधी पुन्हा जाणार लेकीला नातवाला भेटायला?’उमा म्हणाली,बघूया. अजून काही ठरवलं नाही हो मी.’उमा घरी परतली. काकूंचा सहजच विचारलेला प्रश्न तिच्याभोवती फेर धरून नाचू लागला.पुन्हा कधी जाणार तू?उमाच्या मनात उत्तर होतं जाईनच की पुढच्या वर्षी आता.. माझ्या लाडक्या मुलीला नातवंडांना आणि जावयाला भेटायला. उमाचं मन खूप मागे गेलं. तेव्हाचे दिवस आठवले तिला.सुनील उमा आणि सोनालीचं ते सुंदर जग. उमा तेव्हा बँकेत नोकरी करत होती आणि सुनीलचा छोटासा कारखाना होता. छान चालला होता तो.उमाच्या बँकेतल्या नोकरीचा भक्कम आधार होता सुनीलला.सोनाली सी ए झाली आणि तिने राजीव गद्रेशी लग्न ठरवलं.चांगलाच मुलगा होता तो.फक्त अमेरिकेला कायम रहाणारा होता. एकुलती एक मुलगी कायमची परदेशी जाणार म्हणून उमा सुनीलला वाईट वाटलं पण सोनालीला त्याचं काहीच नव्हतं.आईबाबा,मला तिकडे छान जॉब मिळेल आणि तुम्हीही तिकडे येऊ शकालच की.जग किती जवळ आलंय ग.असं म्हणत सोनाली लग्न करून निघून गेलीसुद्धा.या घरात उरले फक्त उमा आणि सुनील. एकदोनदा सुनील उमा सोनालीकडे जाऊन आलेआणि मग मात्र सुनील म्हणाला’,उमा तू एकटीच जात जा.मला फार कंटाळा येतो तिकडे.दिवसभर नुसतं बसायचं आणि ते म्हणतील तेव्हा हिंडून यायचं.मला बोअर होतं. मी मुळीच येणार नाही .तू खुशाल जा.मी इकडे मस्त राहीन.माझं मित्रमंडळ, जिम सगळं सोडून मी येणारनाही.नाईलाजाने उमा या ना त्या कारणाने सोनालीकडे एकटी जात राहिली.दोनदा सोनालीच्या बाळंतपणासाठी तर ती सहा सहा महिने राहिली. सुनील मजेत एकटा रहायचा.
त्यानेही आता कारखान्याचे व्याप कमी करत आणले होते. अचानक सोनालीचा फोन आला. राजीवला एक वर्षासाठी मलेशियाला जावे लागणार होते. आईबाबा,तुम्ही दोघे याल का इकडे?मी तर तिकडे जाऊ शकत नाही आणि मुलांना बघायला आणि नोकरी दोन्ही मला जमणार नाही बाबा,याल का?’सुनीलने सांगितले हे बघ सोनाली,मी तर असा वर्षभर कारखाना बंद ठेवू शकणार नाही.मी फार तर दोन महिने येईन.तुझ्या आईला विचार ती काय म्हणते ते.’ उमा विचारात पडली.वर्षभर तिकडे राहायचं म्हणजे कठीणच होतं. इकडे सुनील एकटा आणि तिकडे ती एकटी.पण सोनालीची अडचण लक्षात घेऊन उमा म्हणाली,’हे बघ सोनाली,मी सहा महिने येईन.मग सासूबाईंना बोलावून घे किंवा मग चांगल्या क्रेश मध्ये ठेवूया मुलांना.मी आले की मग बघूया.’ठरल्या वेळी सुनील उमा सोनालीच्या घरी पोचले. दोन्ही नातवंडं उमा आणि आजोबांना चिकटली. राजीव दुसऱ्याच दिवशी मलेशियाला निघून गेला.
सोनाली सकाळी सातला घर सोडे, ती संध्याकाळी 5 ला घरी येई.मुलं अजून लहान होती.त्यामुळे शाळेत पोचवायची तरी जबाबदारी नव्हती.
सोनाली एकुलती एक असल्याने लाडावलेली, कामाची सवय नसलेली आणि हुशार हुशार म्हणून उमानेच तिला घरात काहीच करू दिले नव्हते.
कौतुकाने उमा म्हणायची,सोनाली हुशारआहे.पन्नास नोकर ठेवेल कामाला. उमाच्या सासूबाई आणि आई सुद्धा म्हणायच्या,उमा चूक करते आहेस तू.मुलीच्या जातीला सगळं यायला हवं ग बाई.शिकव तिला सगळं नीट. घर आवरायचं,नीट नेटकं ठेवायचं, स्वयंपाक सुद्धा आला पाहिजे.तू नाही का सगळं करत बँकेत असूनही?’उमाने ते कधी मनावर घेतलेच नाही.आणि ध्यानीमनी नसताना सोनाली परदेशी गेली.जिथे नोकर मिळणं अशक्य. सोनालीचं घर बघून उमा सुनील चकित झाले.एवढं सुंदर घर पण कुठेही काहीही ठेवलेलं! स्वयंपाकघरात पसारा.मुलांचे कपडे नीट घड्या न करता कोंबलेले! उमा गप्प बसून हे बघत होती.तिने सगळं घर हळूहळू ताब्यात घेतलं. सोनालीला सांगितलं,मी तुझ्यासाठी असं असं टाइम टेबल केलंय. तुला या प्रमाणे नीट फॉलो केलंस तर काहीही जड जाणार नाही.उमाने सोनालीच्या किचन मध्ये आठवड्याचा मेनू आणि घरातली कामे याचा फळाच लावला. सोनाली म्हणाली बाई ग!असली शिस्त जमणार का मला? ‘उमा म्हणाली जमवावी लागेल सोनाली. तुझ्याच सारख्या इतर मुलीही नोकरी करतातच.कालच आपण जयाकडे गेलो होतो ना?तीही नोकरी करते.किती सुंदर ठेवलंय घर तिनं. तुलाही जमेल हे. मुलांनाही छोटी छोटी कामं करायला शिकवलीस की तीही शिकतील हे सगळं.’तू आता शनिवार रविवार रोज एक सोपा पदार्थ माझ्याकडून शिक.अग काहीही अवघड नाही तुझ्यासारख्या हुशार मुलीला.’
सोनालीला हे पटलं.परवाच राजीव ओरडत होता, तू लॉन्ड्री लावली नाहीस म्हणून माझा एकही शर्ट नीट नाहीये.इस्त्री करणं तर बाजूलाच राहिलं.’सोनालीला वाईट वाटलं. आई बरोबर आहे तुझं. मीच कधी लक्ष दिलं नाही आणि मग कामाचे ढीग साठत गेले की मग मला आणखीच गोंधळायला होतं. मग ते वाढतच जातं.मी तू सांगतेस तर तसं करायला लागते ’उमा हसली.
होईल ग सगळं मस्त सोनाली.हुशार माणसाला काहीही अवघड नाही.आपण आधी वरच्या खोल्यांपासून करत येऊ सगळं नीट.’
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈