डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ सुंदर माझं घर – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(होईल ग सगळं मस्त सोनाली.हुशार माणसाला काहीही अवघड नाही.आपण आधी वरच्या खोल्यांपासून करत येऊ सगळं नीट.’) – इथून पुढे —
त्या शनिवारी सोनालीला सुट्टीच होती.
उमाने तिला दोन्ही बेडरूम्स कशा नीट आवरायच्या तेदाखवले.दर आठवड्याला दोन्ही बेडरूमच्या बेडशीट्स बदलल्या गेल्या पाहिजे हे सांगितलं.मुलांना वर बोलावलं आणि उमा म्हणाली,रोहन राही,तुमच्या रूम मध्ये अशी टॉईज पसरायची नाहीत.
आपलं खेळून झालं की छान आवरून त्या मोठ्या बास्केटमध्ये ठेवायची.ही बघा ममाने कित्ती सुंदर बास्केट आणलीय तुमच्यासाठी काल.’रोहन राही नी सगळा खेळ बास्केट मध्ये नीट ठेवला.शहाणी ग माझी बाळं ती!म्हणून उमाने दोघांना कवटाळले. शाबास.उमा म्हणाली,ही बघा मी तुम्हाला पिगी बँक आणलीय पुण्याहून.तुम्ही नीट रूम आवरली आणि उठल्यावर पांघरूण नीट घडी करून ठेवलं की मग वीक एंडला ममा तुम्हाला बक्षीस म्हणूंन डॉलर्स देणार आहे.ते या पिगी बँकेत टाकायचे हं. मग खूप साठले ना की तुमच्या आवडीची पुस्तकं घ्यायची हं.’मुलं खूषच झाली.
उमाने त्या पिगी मध्ये पहिले दोन दोन डॉलर्स टाकले.किती खूष झाली मुलं. सोनाली हे कौतुकाने बघत होती’.आई, हे मला कसं ग सुचलं नाही?किती छान दिसायला लागल्या ग सगळ्या रूम्स. सोनाली,यात अवघड काहीही नाही ग.वेळच्या वेळी कामं नीट केली नाहीत की ती साठत राहतात आणि मग कंटाळा येतो.आता तू दर शनिवारी रूम्स पटकन आवरून ठेवशील.चल खाली.उद्या रविवारी वॉशिंग मशीन लावायचं ठरवून टाक. म्हणजे कपडे साठणार नाहीत.तुला खूप काम पडतं मान्य आहे मला.पण इथे सोयीही खूप आहेत ना. दोघी खालच्या मजल्यावर आल्या.आज इतकं पुरे.उद्या बाकीचे आवरूया.’सुनील उमाकडे कौतुकाने बघत होता.’उमा वावा,किती हळुवारपणे सोनालीला तिच्या चुका दाखवून दिल्यास ग.मुळात ती आळशी नाहीये पण सवयच नाही ना शिस्तीची.आता बघ ती मस्त ठेवेल स्वतःचे घर’. दुसऱ्या दिवशी उमाने सोनालीला किचन आवरायला मदत केली.दोन तासांच्या मेहनती नंतर किचन एकदम लखलखू लागलं.मग सोनालीने आईच्या मार्गदर्शनाखाली साधी खिचडी कढी केली,तीही किती आवडीने खाल्ली मुलांनी.आजी मला पांढरी आमटी घाल असं राही म्हणाली तेव्हा हसूच लोटलं सगळ्यांना. सोन्या, ती कढी आहे बरं का.आता ममा नेहमी करेल हं तुमच्यासाठी! सोनाली रात्री आईजवळ बसली आणि म्हणाली,आई,किती साध्या सोप्या गोष्टी असतात ग.पण मी कधी लक्षच दिलं नाही.थँक्स आई,या एका महिन्यात तू मला खूप काही शिकवलंस.’सोनाली,तू खूप सरळ आणि भाबडी पण आहेस बाळा.अग परवा आपण तुझ्याच सोसायटीतल्या कुमुदकडे गेलो नव्हतो का?तिच्या सासूबाई सांगत होत्या, आमच्याकडे महिन्यातून दोनदा मेक्सिकन मेड येते सगळं क्लीन करायला.ती व्हॅक्यूम करते, फर्निचर पुसते, बेडशीट्स बदलते.तू का नाही बोलवत तशी मेड?म्हणजे बाकीचं काम हलकं नाही का होणार तुझं?इतका पैसा मिळवता दोघेही, तर करा की खर्च स्वतःच्या स्वास्थ्यासाठी.’सोनालीने पुढच्या आठवड्यातच डायना म्हणून मेड ला बोलावलं.तिने दर आठवड्याला यायचं कबूल केलं.सोनालीला फार आनंद झाला.हे मला कसं ग सुचलं नाही आई?
या मैत्रिणी तरी बघ,लबाड!कोणीही मला बोलल्या नाहीत की आमच्याकडे मेड येते.डायना सांगत होती मी या या घरी दर पंधरा दिवसांनी जाते.सगळ्या माझ्याच तर मैत्रिणी आहेत.दुष्ट कुठल्या.’उमा हसली म्हणाली ते जाऊ दे.तू तिला आणखी थोडा पगार दे आणि बाकीचीही कामे करशील का विचार.करेल की ती.कपड्याच्या घड्या करायच्या, लॉन्ड्री लावायची. हेही उमाचे गणित बरोबर ठरले.डायना हो म्हणाली आणि सोनालीचे बरेच काम कमी झाले. सोनालीचं घर आता खरोखर मस्त दिसायला लागलं. सहा महिन्यांनी एकदा राजीव येऊन गेला.अरे वा.एकदम चकाचक घर? मस्त सोनाली.’सोनाली म्हणाली ही माझ्या आईची जादू आहे.
राजीव,योजकस्तत्र दुर्लभ:बघ. मला नीट ऑर्गनायझेशन जमत नव्हतं ते आईने आखून दिलं बघ.आता आपल्याकडे डायना पण येते दर आठवड्याला मला मदत करायला.उमा म्हणाली राजीव ,तुम्हीही मदत केली पाहिजे घरात बरं का.केवढी मोठी मोठी घरं तुमची.मग सगळ्यांनी नको का हातभार लावायला? तुम्हीही सगळ्यांनी आपले कपडे दर रविवारीच इस्त्री करून ठेवलेत की आठवडाभर बघावे लागणार नाही. राजीवला हे अगदी पटलेच. त्या आठवडाभर सोनालीने मस्त स्वयंपाक केला आणि दुसऱ्या दिवशी पुरेल अशा भाज्याही करून ठेवल्या.पुढच्या महिन्यात मुलं डे केअर ला जाणार होती.त्यांचे टिफिनही तिने आठवडाभर आधी प्लॅन केल्याप्रमाणे तयारी करून ठेवले. उमाला आपल्या कर्तबगार लेकीचा अतिशय अभिमान वाटला. हुशार तर ती होतीच पण तिला फक्त नीट दिशा देण्याचं काम उमाने केलं. सुनील दोन महिन्याने निघून गेला.उमा आणखी दोन महिने राहिली.आता सोनाली तरबेज झाली सुंदर माझं घर ठेवण्यात.उमा जायच्या आदल्या आठवड्यात सोनालीने तिच्या मैत्रिणींना चहाला बोलावलं. सम्पूर्ण घराचा कायापालट बघून त्या थक्कच झाल्या .दडपे पोहे, बटाटेवडे,चटणी आणि गुलाबजाम हा मेनू बघून तर त्या आश्चर्यचकित झाल्या.’हे सगळं माझ्या सोनालीने केलंय हं. मी यातलं काहीही केलं नाहीये. बघा बर छान झालंय का!उमा म्हणाली.फक्त गुलाबजाम मात्र पटेलकडचे हं !उमा हसून म्हणाली. सगळ्यांनी ताव मारला आणि त्यातली खुशी म्हणाली’काकी मला पण असा चार्ट करून द्या ना हो प्लीज ! मीही वाईट ठेवते घर अगदी.सोनालीचं मस्त घर बघून मला हेवाच वाटू लागलाय हो तिचा.माझी सासू खूप बोलली मला.म्हणाली शी!किती पसारा हा खुशी!काही वळण लावलं नाही का तुझ्या आईनं. पण दोन मुलं आणि नोकरी सांभाळून नाही हो जमत मला.काकी,मलाही करा ना मदत प्लीज!’सगळ्या हसायला लागल्या. उमा म्हणाली खुशी,आता सोनाली कडूनच घे धडे .मी चालले ग इंडिया ला पुढच्या आठवड्यात.सगळ्या मैत्रिणी गेल्यावर सोनालीने आईला मिठी मारली.आई,किती ग गुणी आणि हुशार आहेस ग तू.याच सगळ्या भवान्या मला नावे ठेवायच्या. सोनाली आळशी आहे,काही येत नाही तिला.घर म्हणजे नेहमी पसरलेले! सोनालीचं घर म्हणजे अस्ताव्यस्त. माझी चेष्टा करायच्या पण कधी मार्ग नाही कोणी सुचवला की सांगितलं नाही की मेड येते आमच्याकडे.कशी असतात ना आई माणसं?मीच मूर्ख जाते धावून धावून यांच्याच मदतीला! आज बघ. गप्प बसल्या.शिवाय तू मला कित्ती वर्षांनी हातात ब्रश दिलास आणि ही पेंटिंग्ज करायला लावलीस ग!मी विसरूनच गेले होते माझं ड्रॉईंग उत्तम आहे ते.कित्ती शोभा आली सगळ्याखोल्याना माझी स्वतः केलेली सुंदर पेंटिंग्ज लावली म्हणून.’सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं.उमाने तिचे डोळे पुसले.अग वेडे,तू मुळात खूप हुशार आणि सिन्सीअर तर आहेसच.म्हणून तर तू हे केलंस.आणि मुख्य म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन शिकलीस, चुका मान्य केल्यास. हा गुण मोठाच आहे तुझा.अशीच मस्त रहा सुखात!’
उमा भारतात परत आली.
मराठी मंडळाच्या सुंदर माझं घर मधलं पहिलं बक्षिस यंदा सोनाली ला मिळालं आणि उत्कृष्ट पेंटिंग्ज काढल्याबद्दल ट्रॉफी पण. अभिमानाने ते व्हिडिओ वर आईला दाखवताना शेजारी उभ्याअसलेल्या राजीवच्याही डोळ्यात आपल्या हुशार बायकोबद्दलचा अभिमान चमकत होता. सासूबाई,ही ट्रॉफी खरं तर तुमचीच आहे बरं का!हसून राजीव म्हणाला आणि सोनालीने हसत त्याला दुजोरा दिला.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈