श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

का गं तुझे डोळे ओले– भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

पूर्वसूत्र : “असं म्हणाला..?”त्या बोलल्या आणि एकदम हसतच सुटल्या. त्यांचं हसणं खरं की खोटं निमाला चटकन् समजेचना.

स्वतःला सावरण्यासाठी जवळ केलेल्या या खोट्या हसण्याच्या एवढ्याशा धक्क्यानेही कमलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा तडकून गेला…! ) इथून पुढे — 

“भांडण म्हणजे पैशावरून हो”अगदी सहजपणे जवळच्या माणसाला सांगावं तसं कमलाबाई मनाच्या पार तळातलं बोलू लागल्या….,

“घरात तान्ही नात आहे माझी.याचीच मुलगी.सून ओली बाळंतीण आहे. कधी दुधातुपाला चार पैसे लागले तर जवळ नकोत माझ्या? याला कां म्हणून घ्यायचे दारू ढोसायला?

इतके दिवस मी कमावतेय. खातेय, खाऊही घालतेय. पण हे पिणं म्हटलं की डोकं सणकतंच बघा माझं.ंँनंअहो, स्वैपाककामांची एक दोन घरं  धरून रहावं म्हटलं,तरी याने मला आजपर्यंत दहा घरं फिरवलंय. असे प्रत्येक ठिकाणी खरे-खोटे निरोप सांग, हातउसने पैसे घे, सुरूच याचं. माझ्या जीवावर याची चैन. लपवून तरी कुणापासून आणि किती दिवस ठेवायचं? एक काम सुटलं की मग दुसरं घर असंच सुरू आहे बघा.

पण आता मात्र हे गुडघे दुखतायत. लांबचं थोडसं अंधुक दिसायला लागलंय. मधेच कधीतरी चक्कर येते. असं कांही झालं,की मी मोठ्या आशेने मुलाकडे बघते. उगीचच वाटत रहातं, हा विचारेल, ‘ आई काय होतंय गं?’ हा एकुलता एकच मुलगा आहे वहिनी माझा आणि त्याच्याकडून माझी एवढीच अपेक्षा. पण हा?..हा सतत आपल्याच तंद्रीत!”

“कमलाबाई…पण हा..”

”हा माझा असून असा कसा, असंच ना?”

कमलाबाईंनी रोखठोक प्रश्न विचारला. शांतपणे नजर वर उचलून निमाकडे पाहिलं. पहात राहिल्या. त्या नजरेला अचानक विलक्षण धार आली.ती धारसुध्दा क्षणभर पाणावली. म्हणाल्या,

“सांगू..? तो थेट त्याच्या वडलांच्या वळणावर गेलाय.”

निमाला धस्स झालं.

कमलाबाईंनी या एकाच वाक्यात आपल्या फाटक्या संसाराची सगळी चित्त्तरकथा तिच्यासमोर एका क्षणात रेखाटलेली होती!

“ते काय करतात सध्या?”

“खोकत पडून असतात. उमेद होती तेव्हाही अंग मोडून फारसं काही करायचे नाहीतच. अतिशय आळशी, मुलखाचे हेकट, तुसडे आणि तिरसट. लग्न करून संसार थाटला पण संसाराची काळजी कशी ती नव्हतीच. घरी राबायला आणि संसाराची काळजी करायला मी होतेच की. त्यांची हक्काची ‘बाई’ आणि या पोराची हक्काची ‘आई’ म्हणून घरात आणि घराबाहेर मी राबतच राहिले. लग्नानंतर एकंदर रागरंग बघून बरोबर आठव्या दिवशी हे पोळपाट लाटणं हातात धरलं ते अजून सुटलेलं नाहीय. मुलगा लग्न करून संसाराला लागला तरीही सुटलेलं नाही..!

माहेरीही गरिबीच होती. फक्त एकच वेळ कसंबसं खायला मिळायचं. पण तो घास सुखाचा होता. रात्री पाठ टेकायला फाटकं कांबळंच असायचं, पण त्यावर सुद्धा शांत झोप लागायची. इथं सासरी येताना ती गरिबी पाठराखीणी सारखी आलीच पण तो सुखाचा घास मात्र तिथंच राहिला आणि ती शांत झोपसुद्धा!”

“पण हे इतकं सगळं सोसूनही तुम्ही…”

“मी तिथं कां रहातेय हेच ना? फक्त सूनेसाठी! एरवी जीव अडकून पडावा असं दुसरं कांही आता शिल्लकच नाहीये. पण सूनेच्या काळजीने जीव पोखरतो. आता तिच्यासाठी राबायचं. तग धरून रहायचं. लग्न झालं की पोरगा सुधारेल म्हणून मीच पुढाकार घेऊन त्याचं लग्न केलं. तिला या घरात आणली.’लग्न करून  आपला नवरा कुठं सुधारला होता?’ हा रोखठोक प्रश्न मायेपोटी तेव्हा माझ्या मनाला शिवलाच नव्हता. आज ती चूक उमगतीय.आता ती निस्तरायची. जन्मभर निस्तरत रहायची. सुनेला पाहिलं की मला लग्नानंतरची ‘मी’ आठवते. माझी परवड, माझे हाल आठवतात.

हा रात्री अपरात्री ढोसून घरी येणार, तिच्या अंगावर हात टाकणार,अर्वाच्य बरळत रहाणार, तेव्हा मधे पडून त्याला अडवायला मी तिथे नको? मग सगळं सोडून मी जाऊ कुठं न्  कशी? सून म्हणून राहू दे, पण आपल्याच पुढाकारामुळे या फुफाट्यात येऊन पडलेल्या एका बाईला ‘बाई’ म्हणून तरी मीच सांभाळून घ्यायचं नाही तर कुणी?

बाहेरच्या कामांनाही यायची तिची तयारी आहे. मला घरी बसा, आराम करा म्हणते.पण माझ्या पोराच्याच अंगात माज आहे. ‘माझी बायको दुसऱ्यांच्या घरी कामाला जाणार नाही’ असं  म्हणतो. आजवर आई फिरत होती इतकी घरं त्याचं त्याला सोयरसुतक नाही..”

काम आवरेपर्यंत कमलाबाई असंच काही ना काही बोलत राहिल्या. काम आवरलं तसा आपला चेहरा पदराने खसखसून पुसला.त्या चेहऱ्यावरचा तडकून गेलेला तो मुखवटा व्यवस्थित सांधून टाकला आणि छान समाधानी हसल्या.

“अहो, संसार म्हणजे हे असंच. बाईमाणसाचा जन्म आपला. कुठं काय तर कुठं काय सुरु रहाणारच. पण म्हणूनच आपण खंबीर रहायचं. घरात आता एकमेकीला सांभाळायला आम्ही एकीला दोघी आहोत. छान बेस चाललंय”.

त्या गेल्या. त्या गेल्या आणि निमाला उगीचच आपली शक्ती कुणीतरी काढून घेतल्यासारखं अशक्त वाटायला लागलं. तिचा नवरा आणि केदार रिकाम्या ताटांसमोर ताटकळत बसून होते.

” संपलं ‘कमलपुराण’? वाढाs आताs” नवरा खेकसला.

दुःख कोळून पिणाऱ्या आणि तरीही हसतमुख रहाणाऱ्या, वयाने याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या अशा कमलाबाईंच्या जीवघेण्या व्यथेचा  आपल्या नवऱ्याकडून झालेला हेटाळणीयुक्त एकेरी उल्लेख निमाला खटकला.तिने नजर वर उचलून रागाने त्याच्याकडं पाहिलं. तिला त्याचा चेहरा पूर्वी कधीही न पाहिलेल्या, एका कोपऱ्यात खोकत पडून राहिलेल्या कमलाबाईंच्या नवऱ्याच्या चेहऱ्यासारखाच भासू लागला आणि तिच्या नजरेतून त्याच्याबद्दलचा तिरस्कार एकाएकी भरभरून वाहू लागला.

“आईs,वाढ की गं लवकर” 

तिने त्रासून केदारकडे पाहिलं. पानावर बसूनसुद्धा त्याचं डोकं हातातल्या कॉमिक्समधेच होतं. तिने पुढे होत जे पुस्तक खसकन् ओढून घेतलं आणि दूर भिरकावून दिलं.

“काय झालं..?” तिच्या नवऱ्याने त्रासिकपणे विचारलं. ती जळजळीत नजरेने त्याच्याकडेच पहात राहिली. वाढायला सुरुवात करावी म्हणून नवऱ्यानं स्वतःचं ताट पुढं सरकवलं. काहीही न बोलता तिनं स्वतःपुरतं वाढून घेतलं आणि अन्न पुढे केलं.

“मला उशीर होतोय.तुम्ही घ्या आपापलं.आणि त्यालाही वाढा” तिचा आवाज तिच्याही नकळत चढला होता. नवरा पहातच राहिला.

‘सुनेला सांभाळून घ्यायला त्या घरी कमलाबाई होत्या आणि त्यांना सांभाळायला त्यांची सून. या घरात कमलाबाई मीच आणि त्यांची सूनसुध्दा मीच.’….हा विचार मनात येताच निमाचे डोळे एकाएकी भरून आले..

“काय झालं..?” नवऱ्यानं अनपेक्षित हळुवारपणे विचारलं. पण..? काही न सांगता हा कधी आपलं दुःख समजूनच घेऊ शकत नाही हेच तर तिचं दुःख होतं!नवऱ्याचा ‘काय झालं?’हा प्रश्न तिला  कवितेतल्या त्या चिमणीला पिंजऱ्यातल्या पोपटाने विचारलेल्या ‘कां ग तुझे डोळे ओले?’  या प्रश्नासारखाच वाटत राहिला! ‘माझे डोळे ओले कां? हे न सांगता राहू दे, पण सांगून तरी याला समजणाराय का?’.. मोठ्या आशेने तिने मान वर करून नवऱ्याकडे पाहिले. तो..? तो खाली मान घालून शांतपणे भुरके मारत जेवत होता!आता कधीही रडायचं नाही या निर्धाराने निमाने आपले डोळे स्वच्छ पुसून कोरडे केले. पण ते तिच्याही नकळत आतआतून ओलावतच राहिले..!

— समाप्त — 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments