सौ. प्रांजली लाळे

अल्प परिचय :

सौ.प्रांजली हेमंत लाळे.

शिक्षण – एम.ए.बी.एड.(इंग्रजी साहित्य)

व्यवसाय – शिक्षिका आणि बिझिनेस(पैठणी व ज्वेलरी)उद्योजिका.

आवड – चित्रकला, काव्य लेखन, कथा लेखन. समाजसेवा.

सध्या मनमाड येथे वास्तव्य.

? जीवनरंग ?

☆ बकेट लिस्ट…  ☆ सौ. प्रांजली लाळे

लिनाने धाडकन दरवाजा आपटला आणि सोफ्यावर स्वतःला झोकून दिले. खुपच वैतागली होती आज ती. घरातील कामे, मुलांची चिडचिड, नवरोबाची आरडा-ओरड.. ओह माय गॉड!! कुठेतरी निघून जावं इथून.. डोळे गच्च मिटून घेतले.. 

डोळ्यासमोर आधी माहेरचे तरंगले.. आई, जी तिची मनापासून वाट पहातेय.. तिच अशी एकमेव व्यक्ती आहे जी तिच्यावर निरपेक्षपणे प्रेम करते.. ‘हम्म.. जावं का आईच्या कुशीत शिरायला.. मनसोक्त रडायला..’ क्षणात आसू तरळले.. पण आईबरोबर बरीच माणसं आहेत तिथे.. ज्यांना आपलं येणं पटत नाही.. मग कुठे जावं..एक हुंदका देत तिने स्वतःलाच विचारले..

लिना आणि तिचा धाकटा भाऊ आईची लाडकी लेकरं.. बाबांनंतर एकमेकांना सांभाळत मोठी झालेली.. एकमेकांचा आधार होते ते.. आईनं बाबांची कमी कधी भासू दिली नाही.. मुलंही वेळेआधीच समजदार झाली. आईच्या पेन्शनमध्ये भागत नव्हते. म्हणून धाकटा लवकर नोकरीस लागला.. नोकरी सरकारी असल्याने भवितव्याची चिंता नव्हती.. पुढे लग्न होऊन स्थिरस्थावर झाला. 

लिनाने नोकरी करता करता पदव्युत्तर शिक्षण घेतले.. अबिरचे स्थळ सांगून आले.. अबिरमध्ये नावं ठेवण्यासारखे काही नव्हते. देखणा नवरोबा मिळाला.. थोडी घाईच झाली लग्नाची.. अवघं विसावं संपून एकवीस लागलेलं.. पहिल वहिलं स्थळ.. ‘झट मंगनी पट शादी’ झाली..

बालपणापासून गाण्याची प्रचंड आवड होती लिनाला.. गाण्याच्या दोन परीक्षा पास होती ती.. पण ती आवड तिथेच थांबवावी लागली. अगदी गानकोकिळा नव्हती ती, पण आवाज सुरेल होता लिनाचा.. 

बाप नसलेल्या घरात एक अनामिक पोरकेपण असतं.. घरात एक भिती वावरत असते हळुवारपणे.. चुकायचे नाही कुठे.. खुप मर्यादा येतात मुलींना सगळीकडे.. असो..

आज लिनाची खुप चिडचिड होत होती.. पहाटे पाच पासनं तिचं स्वयंपाकघर जागं व्हायचं.. भांड्यांचे सुरेल संगीत जे सुरु व्हायचे ते दुपारी आवरसावर झाले कीच थांबायचे.. राग भैरवी पासून राग मल्हार पर्यंतचे अनेक राग इथेच उमटायचे.. स्वयंपाक घर हेच  तिचे संगीत मंच!! प्रत्येकाची आवड जपता जपता तिनं स्वतःकडे कधी पाहिलेच नाही.. आणि म्हणूनच आज तिची घुसमट बाहेर पडली..

आज कारणही तसेच घडले होते.. अबिर आज जरा उशिरा जाणार होता ऑफिसला.. तिलाही जरा बरं वाटले.. ती खरंच कंटाळली होती ‘मै और मेरी तनहाई’वाला अमिताभचा डायलॉग म्हणून.. अबिरच्या गळ्यात हात टाकून लडिवाळपणे म्हंटली, “नकोच ना जाऊस आज बाहेर.. आपण कुठेतरी फिरून येऊ..”

अबिर एका वेगळ्याच तालात होता.. फटकन म्हंटला, “आता काय आपले फिरायचे दिवस राहिलेत का? दोन-तीन वर्षांत मुलांची लग्न होतील..”

लिना खरर्कन जमिनीवर आली.. इतकी वर्षे ज्या घरासाठी राबली, ज्या माणसासाठी त्याग केला.. त्याच्या खिजगणतीतही आपण नाहीत.. आपण काहीही केले तरी इथे कुठेही नोंद होणार नाही.. खूप तळमळली बिचारी..

सोफ्यावर बसल्या बसल्या मोनाची आठवण आली.. आणि तीला फोन केला.. 

मोना एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.. भरपूर मैत्रीणी होत्या तिला.. “मोना येतेस का गं घरी..” डोळ्यात अश्रू होते. आवंढा गिळला तिनं.. “हो येते गं..  बरेच दिवस आपली भेट ही नाही. आज क्लबची मिटिंग आहे. दुपारी येते.” म्हटलं.

दुपारी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मोनाचे घरात आगमन झाले.. हिने भावनातिरेकाने कडकडून मिठीच मारली तिला.. मनमोकळे रडून घेतले तिच्याजवळ.. कुठेतरी रितेपण जाणवत होते तिला आज.. मोनाने पाठीवर थोपटत शांत केले तिला…

“मोना मला आता स्वतंत्र व्हायचे आहे.. मनसोक्त जगायचं आहे. उंच आकाशात भरारी घ्यायची आहे गं..”

मोना उद्गारली, “काय झाले गं.. इतकी काय दुखावलीस?”

सकाळचा प्रसंग सांगितला लिनानं तिला.. मोना स्तब्ध होऊन ऐकत होती.. कारण एन जीओत रोजचेच होते हे. “दुपार नंतर फ्रीच असतेस ना तु.. मला जॉईन हो.. ग्रुप्समधे सामिल करते तुला.. घरातील टेन्शन उंबरठ्याच्या आत.. तुझ्या गाण्याला मुक्त कंठ दे.. परीक्षा दे.. आमच्या शाळेत गायन शिकवायला हवंच आहे मला कोणीतरी.. उद्याचा उषःकाल वेगळाच असेल बघ.

आणि हे बघ, आपली मुलं आता मोठी झालीत. त्यांचे त्यांना पाहू दे जरा.. काम करण्याची सवय लाव त्यांना.. स्वयंपूर्ण बनव मुलांना.. कोठेही अडायला नको त्यांचे तुझ्यावाचून.. नवऱ्याशी सविस्तर मोकळेपणाने बोल.. नाही तर कुढतच जगशील.. बकेट लिस्ट रिकामी करायला लाग.. हवं तसं जग.. मेकओव्हर कर स्वतःचा.. बघ नवराही म्हणेल ‘ओ मेरी जोहरजबी’ तुला..

कालच महिला दिन साजरा झाला आहे.. तेव्हा तु यायचं आहेस महिला मंडळात.. आजच तुला निमंत्रण देऊन ठेवते.. शुभस्य शिघ्रम।”

लिनानं मनाशी ठाम रहायचे ठरवले. सुरुवात केली आजपासूनच.. मुलं आली की लगेच त्यांना हॉलमध्ये बोलावले.. स्पष्ट मतं मांडली.. कामं ठरवून दिली.. मुलांनाही जाणवलं आई बदलतीये.. थोडे नाराज वाटले.. पण होममिनिस्टरनेच बंड पुकारला म्हंटल्यावर काय करणार? 

नवरोबा थकून भागून आले.. पाणी टेबलवर होते.. घ्या म्हंटली हाताने.. “उद्या मिटिंग आहे माझी मंडळाची.. उद्या बाहेरुन काही मागवून घ्या.. रोज सकाळी शाळेत जाणार मी गाणं शिकवायला.. बिझी असणार मी सुद्धा आता..” 

अबिर पहातच राहिला.. हा मेकओव्हर पचनी पडायला जड जाणार हे त्याने ओळखले.. पण काही पर्याय ही दिसत नव्हता.. स्वतःलाच शोधायला निघालेल्या बायकोला बकेट लिस्ट पुर्ण करण्यात मदत करायलाच हवी आहे ना!!!

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments