श्री मेहबूब जमादार
जीवनरंग
☆ बिन पैशाचे दिवस… भाग – २ ☆ मेहबूब जमादार ☆
(कामावरचे गडी दिवस मावळला तरी कामावरून घरी जात नसत. काही वेळेला रात्रीला जेवणाचा वकुत होई. तरीपण अर्ध काम सोडून कोण घरी जात नसे. त्यावेळी मालक सुद्धा दुप्पट धान्य गडयानां मजुरी म्हणून देत असे.) येथून पुढे. .. .
आम्ही शाळेत जात असताना चुकून एखादा गारेगारवाला म्हणजे बर्फाचा गोळा विकणारा भेटे. आमच्या हातातच काय खिशात सुद्धा दमडी नसायची. त्यावेळी शेजारच्या रानातील आठ दहा ज्वारीची कणसं दिली की तो आम्हाला एक गोळा बर्फाचा देई. त्यावर तांबडा पिवळा गोड पाण्याचा फवारा मारुन देई. तो आम्ही अगदी चवीने खात शाळेत जात असू.
आमच्या वाडीत पाच मोठी चिंचेची झाडं होती. तिला चिंचा लागायला लागल्या की त्या चिंचा कोवळ्या असताना पाडून आम्ही खिशात भरून शाळेत नेत असू. त्या चिंचा दुसऱ्या मुलांना द्यायच्या त्या बदल्यात मुलाकडून गोळ्या किंवा पेन्सिल घेत असू. कुणीच आम्ही या वस्तू घेत असताना पैशाचा वापर केला नाही.
वाडीत जर एखादं लग्न असेल तर आम्हा मुलांना ती एक संधीच असायची. शक्यतो लग्न मे महिन्याच्या सुट्टीत असायची. लग्नात मांडव घालण्याचे जेवणापासून ते पाणी आण ण्या पर्यंतची सर्व कामे आम्ही करत असू. मांडव घालताना लागणाऱ्या करंजी, आंब्याच्या डहाळ्या तसेच नारळाच्या झाडाच्या झावळ्या हे सर्व आम्ही आणत असू. मांडव घातल्यानंतर सर्वांसाठी जेवण असायचे. मोठ्या लोकांबरोबर पंक्तीत बसून जेवताना फार मजा यायची. दुसऱ्या दिवशी लग्नाच्या घरात आडावरून किंवा आमच्या नव्या विहिरीवरून पाणी भरावं लागे. त्यावेळी मोठं मांदाणं किंवा लोखंडी बॅरेल ठेवलेला असे. त्याच्यावर एक दोन लाकडी दांडकी ठेवून त्यावर भिजलेले कापड अंतरलेले असे त्यामुळे पाण्याचे धुळीपासून संरक्षण होई. पाणी आणणाऱ्यांना दुपारी एक लाडू, दोन कानवले व थोडासा चिवडा मिळे. आम्ही मुलं यावर फार आनंदी असू. कारण लग्न सोडलं तर लाडू किंवा चिवडा कुठेच मिळत नसे.
लग्नात सगळी वाडी गुंतलेली असे. लग्नाचा मालक निवांत बसून पान सुपारी कात्रत बसायचा. बाकीची सारी कामे वाडीतील माणसे करायची माणसात आपलेपणा होता. लग्न कोणाचेही असो ते आपलं समजून त्यातील सर्व कामे माणसे करायची. बायका हळद लावणे. जेवण बनवणे या कामातच गुंतलेल्या असायच्या.
एखादं लग्न बाहेरगावी असलं तर सात ते आठ बैलगाड्यांना सजवून वरती कळकाच्या कांबी बांधून त्यावर कापड बांधले जायचं आणि त्या गाड्यांमधून व-हाड जायचं. आंतर जास्त असलं तर मध्ये जेवणासाठी हारा भरून भाकरी, एक पातेलं भरून देशी वांग्याची भाजी, पिठलं आणि खर्डा हा सारा लवाजमा बरोबर घ्यावा लागत असे. जेवणाची वेळ झाली की एखादी नदी किंवा ओढा किंवा विहीर बघून निवांत गाड्या सोडल्या जात. पहिल्यांदा बैलांना पाणी पाजले जाई. मग त्यांना वैरण टाकून माणसं झाडाखाली जेवायला बसत.
वऱ्हाडातल्या बायका सगळ्यांना जेवायला वाढायच्या. था टली असली तर बरं,नाहीतर माणसं हातातच भाकरी घ्यायची .त्यावर वांग्याची भाजी, पिठलं, खर्डा असं चवदार जेवण असायचं .आम्हा मुलांना या जेवणाची फार मजा वाटायची. माणसं दोन-तीन भाकरी निवांत खायची .आम्ही मुलं तर एक दिड भाकरी खात असू.सगळ्यांची जेवणं झाली की पान तंबाखू खाऊन परत लगेच गाड्या जुंपल्या जायच्या. त्यावेळी लग्न संध्याकाळी असायची.
किरकोळ मान पानावरून सुद्धा पाव्हण्यात भांडण लागायची. पण त्यातली समजूतदार पंच माणसं ती मिटवायची. लग्न लागलं की रात्री नऊ नंतर सगळ्यांना जेवण मिळत असे. गाव लांब असलं तर गाड्यांचा मुक्काम तिथेच असायचा. तिथला लग्नाचा मालक जनावरांना कडबा गवताच्या पेंड्या आणून द्यायचा. त्याचबरोबर बैलांची बांधायची सोय करायचा.
सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यावर चहा पाणी व्हायचं. शिल्लक जेवण राहिलं असेल तर जेवण तिथेच कराव लागायचं. ज्यादाच जेवण असेल तर तो पाहुणा दुर्डीतून बांधून द्यायचा.
नवरी निघताना मात्र तिथली सारी मंडळी रडायची बायका तर नवरीला मिठी मारून रडायच्या अन म्हणायच्या,
“सुखी राहा गं ! इथली काय काळजी करू नकं ”
“आता सासू-सासरेच तुझ आई बा समज”
अशा बऱ्याच सूचना केल्या जायच्या. नवरी का रडते हे त्यावेळी आमच्या बालमनाला कळत नसे. एवढी नवी कापडं, गळ्यात दाग दागिने घातलेले असताना ही नवरी का बर रडते आहे. हेच आम्हाला कळत नसे. अर्थात हे कळण्याचं आमचं वय ही नव्हतं.
उन्हाळ्यात सुगी संपली की आमची मांडवाची पट्टी होती तिथे सगळेजण जनावरासाठी मांडव घालत. सगळे माझे भाऊबंदच राहत होते. त्यामुळे सगळ्यांना थोडी का होईना तिथे शेती होती. त्यामुळे सगळ्यांचे मांडव त्या पट्टीत ओळीने घातलेले असायचे. जेवढी जनावर तेवढ्या मेढाचा मांडव असे. शिवाय दोन खणांचा मांडव वैरणीसाठी किंवा झोपण्यासाठी ठेवलेला असे. अशाच एका मांडवात आमचा रात्रीचा मुक्काम ठरलेला असायचा. परीक्षा संपल्या की सगळेजण मांडवात एकत्र झोपत. एक जण कंदील घेऊन येई. त्याला फिरून फिरून आम्ही रॉकेल घालत असू. रात्री एक तर गाण्याच्या भेंड्या लावत असू. किंवा पत्त्यांचा तरी डाव चाले रात्री बारा ते एक वाजेपर्यंत आम्ही खेळत बसू. त्याचवेळी आंबे पाडाला येत. प्रत्येकाच्या रानात आंब्याची झाडं असली तरी आम्ही पहाटे पाच वाजता ओढ्यावर आंब्याच्या हंगामात पाड पडलेली वेचायला जात असू. कोणा तरी एकाकडे पिशवी असे. मिळालेले सगळे पाड आम्ही एकत्र बसून त्याचा फडशा पाडत असू. एक तर ते आंबे पिकलेले असायचे किंवा अर्धे कच्चे असायचे. ते आंबे आम्ही भाताच्या अडीत पिकाला घालत असू. ते ज्यावेळी पिकत त्यावेळी तोंड धुतले की आमचा तो कार्यक्रम ठरलेला असे. आमच्या मांडवाच्या पट्टी शेजारच्या वाडीतल्या सखाराम जाधवांनी तंबाखू केली होती. रोज सकाळी आम्ही शेकोटीसाठी जाळ करीत असू. त्या जाळावर त्या तंबाखूची पानं भाजली जात व त्याची मिस्त्री आम्ही लावत असू. मांडवात घागर किंवा मातीचा मोगा ठेवलेला असे. तिथेच आम्ही तोंड धुत असू. चहा पिण्याचा काय प्रश्नच नव्हता. कारण चहा कोणीच पीत नव्हतं. माणसं भाजलेल्या गुळ शेंगा खात पण कोण चहाला धक्का लावत नसे. सर्वच घरांमध्ये त्यावेळी चहा आला नव्हता.
क्रमश : भाग दुसरा
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈