श्री मेहबूब जमादार
जीवनरंग
☆ बिन पैशाचे दिवस… भाग – ३ ☆ मेहबूब जमादार ☆
(तिथेच आम्ही तोंड धुत असू. चहा पिण्याचा काय प्रश्नच नव्हता. कारण चहा कोणीच पीत नव्हतं. माणसं भाजलेल्या गुळ शेंगा खात पण कोण चहाला धक्का लावत नसे. सर्वच घरांमध्ये त्यावेळी चहा आला नव्हता.) येथून पुढे………
त्यावेळी आमची न्याहरी म्हणजे हे पिकलेले आंबे असत. त्यावेळी घरातील काढलेले आंबे असायचे. मी तर दिवसा 25 ते 30 आंबे खात असेन. माझी सगळी भूक आंबे खाऊनच भागवली जात असे. त्यावेळी राघू आंबा, शेपू आंबा, तोतापुरी असे निरनिराळ्या प्रकारचे पण गोड आंबे होते. या सगळ्या वस्तू आम्ही केव्हाच विकत आणल्या नव्हत्या. एवढ्या मुबलक त्या घरात मिळत .आंबे जास्त असले तर पाटी भरून शेजारी देत असत. ज्यांच्याकडे आंब्याचे झाड नाही त्याला सगळेजण थोडे थोडे आंबे देत असू. त्यावेळी शेजारधर्म पाळला जात होता. कोण शेजारी दुःखी राहणार नाही याची काळजी घेतली जायची. त्याच्या दुःखात सारी वाडी सामील व्हायची त्याचबरोबर त्याच्या सुखात तो सगळ्यांना बोलवत असे. त्यामुळे ते दिवसच सोन्याचे होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हाच मोसम जांभळे खाण्याचाही असे. आमच्या ओढ्यात जांभळाची फार झाडं होती. दुपारी आम्हा सगळ्यांचा मोर्चा जांभळ खाण्या साठी ओढ्याकडे जात असे. ज्याला झाडावर चढता येईल तो झाडावर चढे व बाकीची पिकलेली जांभळं तो वरून खाली टाके ते आम्ही झेलत असू. सगळी गोळा करून एखाद्या पिशवीत ठेवत असून त्यावेळी खादीच्या किंवा गोणपाटाच्या पिशव्या होत्या.
केंव्हा केंव्हा वानरं ह्या झाडावर मुक्काम करत असत. काही वेळा त्यांना हुसकावं लागे. तरी पण ती दात वेंगाडून काढून व ख्या…ख्या … करत अंगावर येण्याचा प्रयत्न करत. आमच्यातली दांडगी पोरं वानर जिथं बसलेत तिथे दगडांचा टीपीरा मारत. दगड वांनर बरोबर चुकवी. एखादा दगड लागला तर ती पळून जात. वानरांच एक असे जर त्यांचा म्होरक्या पळाला की सगळी वांनरं लांब उड्या मारत ह्या फांदीवरून त्या फांदीवर असं करत दुसऱ्या झाडावर जाऊन बसत.
वांनरं पळाली की आम्ही निवांत झाडावर चढून जांभळे काढत असू. जांभळे पोटभर खात असू. जांभळे खाल्ली की सारं तोंड नीळ शार होई. जीभ निळी होई. हा रानचा मेवा फार गोड लागे. त्याचं वर्णन करणे केवळ असंभव आहे, असे ते दिवस होते.
त्यावेळचे खेळ अजब होते. बरीचशी मुलं गोट्याने खेळत. त्यावेळी सिमेंटने तयार केलेल्या गोठ्या होत्या. काचेच्या गोट्या होत्या. काही गोट्या तर आम्ही ओढ्यातून गोल गोटे आणत असू. आणि त्या दगडावर ठेवून दगडानेच त्याला घडवत असू. त्या घासून घासून गोल करत असू. काही केलं तर त्या गोठ्या केंव्हाच फूटत नसत. शाळा सुटली की आमचा हा खेळ चाले.
दुसरा खेळ म्हणजे लोखंडी तवा फुटला की त्याची जी किनार असते ती व्यवस्थित कापून तो गोल तयार करायचा. त्याला लोखंडी सळीचा हुक तयार करून त्यांनं ते तयार झालेले चाक फिरवायचं. काही मुलं सायकलची रिम फिरवत. तर काही बाद झालेले सायकलचे टायर्स फिरवत. याच्या व्यतिरिक्त सूरपारंबीचा खेळ आमचा चिंचेच्या सावलीत फारच रंगे. तिथे झाडावर चढायला जागा होती. शिवाय झाडांची सावली होती.
आट्यापाट्यांचा खेळ आमच्या वाडीत प्रसिद्ध होता. अगदी लग्न झालेली माणसं सुद्धा हा खेळ खेळायला येत. आमच्या मुलांचा लपाछपी हा खेळ जोरात चाले. कुठेही एखाद्या गोठ्यात किंवा एखाद्याच्या घरात सुद्धा पोरं लपून बसत. या सा-या खेळांना काहीही लागत नसे. हे सर्व बिन पैशांचे खेळ होते.
त्याकाळी जुन्या विहिरीवर मोट होती. तर नव्या विहिरीवर नवीन आलेले इंजिन बसवलं होतं. त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. पण ज्या विहिरीवर मोट होती ती विहीर चांगल्या दगडांनी मातीतच बांधली होती. त्या दगडाच्या पहाडीनां एवढा दुमाला होता की त्या भिंतीची जाडी तीन फूट होती. तिला घडीव पायऱ्या होत्या. मोट जिथून ओढली जायची तिथं कोरीव दगडांच बांधकाम केलेल होत. त्या दगडांना छिद्र पाडून सागवानी खांब उभे केलेले होते. त्या खांबांच्या टोकावरती लोखंडी मोठा रॉड बसवून त्यावरती मोट ओढण्यासाठी लाकडी खाचेचे चाक बसवलेलं होतं. एक मोठा दोर (नाडा) त्या चाकावरुन जाई. तर खालचा दोर खाली तीन फूट लांबीचा लाकडी गोल उंबरा(कणा ) पद्धतीचा बसवला होता त्यावरून एक दोर फिरत असे.
मोट चालू झाली की कुई$$… कुई $$…असा आवाज येई. साऱ्या शिवारात तो आवाज घुमे. मोट सकाळी लवकर चालू होई व सकाळी अकरापर्यंत चाले. कारण बैलं मागं येऊन आणि मोट ओढून थकलेली असत. परत दुपारी चार वाजता मोट चालू होऊन ती दिवस मावळायला बंद होई. ज्या विहिरीवर मोट बसवली होती त्या विहिरीचे पाणी केव्हाच आटत नसे. त्या. विहिरीला चांगल्या पायऱ्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळे पोहायला शिकलो.
त्या काळात आमची सकाळची शाळा होती. सकाळी आठला शाळा भरे व ती अकराला सुटे. आम्ही पावसाळा सोडला तर शाळा सुटली की कसं बसं जेवण उरकून सगळीच पोहायला जात असू. पोहण्यात आमचा बराच वेळ जायचा. शेवटी दुपारच्या शाळेसाठी घरातली माणसं काठी घेऊन यायची. अन आम्हाला वर बोलवायची. कोण मारत नसे. पण भीती दाखविण्यासाठी बहुधा काठी आणली असावी. पुन्हा दुपारी दोन ते साडेपाच अशी शाळा भरे.
एकंदरीत त्याकाळचे जीवन बिन दगदगीच होतं. शेतकरी खरीप पिके घेत. चुकून हरभरा किंवा शाळू पेरला जाई. तोही थंडीवर येत असे. पुन्हा मार्च ते जून महिन्या पर्यंत शेतकरी निवांत असत.
त्यावेळी पाहुण्यांचे यात्रेसाठी किंवा ऊरुसाला दोन चार दिवस माणसं जाऊन राहत. आम्ही सुद्धा मुलं यात्रेला व ऊरुसाला जात असू.
तो काळ असा होता की जगण्यासाठी सारं काही घरात असायचे. किराणा माल लागला तर तो ज्वारी किंवा शें गा विकून माणसं आणत. त्यामुळे बिन पैशाने सारं काही चालत असे. पैशामुळे काही थांबत नसे. त्यामुळे आज या सर्व गोष्टींचा विचार करता पैशाविना सर्व माणसे निवांतपणे जगत होती. पण एक मात्र होतं माणसाकडे सोनं नव्हतं. पण माणस सोन्या सारखी होती एवढे मात्र निश्चित….!!!
— समाप्त —
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈