प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
🌸 जीवनरंग 🌸
☆ वंध्यत्व… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
पौषची हुडीहुडी भरणारी बोचरी थंडी, अन गार गार वारा. जिकडे तिकडे बनशांकरीच्या देवळात, घरोघरी नवरात्र झोकात चाललं व्हत. नैवेद्याची रेलचेल, भजन काकडा आरती समदीकडे जोमात सुरू व्हतीच. पण गजाभाऊंच्या घरी येगळीच वर्दळ चालू व्हती. राधकाकू तर भल्या पहाटे उठून रांधत व्हत्या. चपात्या, वाटलेली डाळ, घट्ट झुणका, दहीभात , लोणचं इत्यादी दुरडीत भरून घेत व्हत्या.
दारात सवारीची बैलगाडी उभी व्हती. शेतातला वाटेकरी सिध्दाप्पा बैल जुंपून तयार व्हता. तस गजाभाऊ अन राधकाकू लगबगीनं गाडीत बसल्या.
शुक्राची चांदणी इरघळत व्हतीच. कोंबड्याची बांग बी झाली. घराघरात छप्परा वरून धूर भैर पडत व्हता. आंबाबईच्या देवळात घंटा वाजत व्हती.
चिमण्यांची चिवचिवाट चालू झाल्याली. अन बैलगाडी पांनदीच्या वाटला लागल्याली. धुकं शाल पसरून बसल्याल. दहिवर चौकडं पडल्याल. गाडी ओढ्या जवळ आली. तस मोराच केकाटन चालू झालं.
मधीच कुठंतर वटवाघूळ फडफडत जाऊन झाडाला उलट टांगल्याल व्हत. आता गाडी मुख्य रस्त्याला आली. तस झुंजूमंजू झालं. गाडी मुत्नालच्या रस्त्याला लागली. मुत्नाल गाव तस छोटंसं पण तिथला ज्योतिषी व्होरा पंडित गुंडाचार्य लै परसिध्द गडी. त्याच्या अंगणात सकाळ दरण लोकांची गर्दी ! अडीअडचणी घेऊन लोक त्याच्याकडे येत व्हत व गुण पण येत व्हतंच !
गजाभाऊ अन राधकाकू आज त्याच कामगिरीसाठी चाललं व्हत. बघता बघता दिस कासराभर वर आला, हवेत जरा ऊब पण आली.
गाडीच चाक करकरत एकदा मुत्नालच्या येशीत धडकली.
जवळच् वडाचा पार , तिथंच सिद्धाप्पांन गाडी थांबवली. अन बैलाचा जु रिकामा केला. गाडीतन दोघबी उतरल्यालीच. गाडीतला कडबा बैलाम्होर टाकून बैल बांधली.
गजाभाऊ कदम अन राधकाकू गुंडाचार्यच घर जवळ केलं. बघत्यात तर काय ! त्याच अंगण सोडून गल्लीतबी लोकांची तोबा गर्दी ! कसबस राधकाकू अंगणातून सोप्यात आल्या.
सोप्यात समदिकड जाजम घातल्याल. दाटी वटीन लोक अन बाया पण बसल्याल.
गुंडाचार्य म्हणत्याला जरिकाटी धोतर,अंगात बारबंदी अन डोईवर कोषा पटका. खांद्यावर लाल जरिकाटी उपरण, कपाळावर उभं गोपीचंदी टिळा, गळ्यात तुळशीची माळ अस साग्र संगीत बसल्याल. त्याच्या म्होर चौरंग त्यावर चार पाच नमुन्यांची पंचांग ! बाजूला कवड्याची रास !
एकेक गडी म्होर येत त्याला डोकं टेकवून नमस्कार करीत व्हता अन आपलं गाऱ्हाणं घालीत व्हता ! तस गुंडाचार्य काहीतरी बोटांची आकडे मोड करीत व्हता, पंचांग बघून त्याला काहीतर तोडगे सांगत व्हता. अस करताकरता जवळपास बारा वाजलं तस राधकाकू अन गजाभाऊचा लंबर लागला !
तस गुंडाचार्यन ईचारल बोला, काय अडचण हाय.
त्यावर दोघबी पंचांगला डोस्क टेकवून नमस्कार केला, अन बोललं काय सांगणार गुरुजी –
गुरुजी – काय असलं ते भीडभाड न ठेवता बोला.
राधकाकू – आमचं एकुलता येक ल्योक अन सून. लगीन व्होहून बारा वरीस झालं ! अजून घरात पाळणा हलना, अन आम्हाला वारीस घावना ! अस म्हटल्याव
गुंडाचार्य डोळ मिटून शांत बसलं अन हातानी आकडेमोड केली. घड्याळ बघितलं अन पंचांग मांडलं.
जवळच्या पाटीवर पेन्सिलने कुंडली मांडली. गजाभाऊंच्या हातात कवड्या देऊन फास फेकायला सांगितलं. त्याच दान पडल्यावर गुरुजींना डोळ जरा किलकिल करून, पांडुरंग पांडुरंग अस म्हटलं !
दोघबी गुरुजी काय सांगत्यात ह्याचाकड लक्ष्य व्हत.
गुंडाचार्य – भिऊ नकोस इत्याल्या बुधवारी, मुलावरून अन सून वरून सात पिठाची दामटी, केळ, लिंबू, तेल तिखट अस घेऊन, दोघांच्या वरून उतारा कर अन गावच्या येशी भैर टाक !
राधकाकू – आणि काय दोष हाय म्हणायचं ?
गुंडाचार्य – दोघांना पण कालसर्प दोष आहे ! त्याची शांती नरसिंह वाडीला करून घे ! म्हणजे तुच्या घरात एक वर्षात पाळणा हललाच म्हणून समज !
तस दोघं गुंडाचार्यला परत नमस्कार करून जवळ असल्याला नारळ धोतर जोडी अन पान सुपारी दक्षणा ठेऊन, भैर पडलं.
दुपारचं एक वाजला होता, परत वेशीबाहेर येऊन जवळच्या मारुती देवळात बसून आणलेली शिदोरी सोडली. जेवण झाली तस सिद्धाप्पांन परत गाडी जुंपली. अन परतीच्या मार्गाला लागलं !
घरी आल्याव गुंडाचार्य नी सांगितलेला सर्व तोडगा केला. दिस,मास करीत कॅलेंडर फिरू लागला. दोन वरीस झालं तरी, इकडची कडी तिकडं झाली न्हाय.
गावच्या ग्रामदेवतेच नैवेद्य, ओटी अन दंडवत बी झालं. गजाभाऊ कटाळून गेलं. तस एकदा वडाच्या पारावर बसलं व्हत. गावची भावकी बी बसल्याळी. सीतारामन उगाचच खाकरून इशय काढला. गजाभाऊ काय काय केलसा औंदा शेतात. म्हटल्याव गजाभाऊनी पानांची चंची भैर काढली. अन सुपारी कातरत सीतारामला दिली. पान अन चुना बी दिला तस तांबकुची चिमट बी दिली. सीताराम गडी खुश झाला. अन म्हणाला वरच्या अळीतला,नाम्याच्या पोराला मुलगा झाला. एक वरीस दवाखाना करीत व्हता. असा विषय काढल्यावर, गजाभाऊच्या काळजात चरर झालं. अरर इसरलो गड्या मला रानात जाय पाहिजे ! आता सांच्याला कस काय काम हाय बा तुझं
इति सीताराम.
त्याच काय हाय सीताराम, म्या रानात मेंढरं बसवल्यात, त्यांचं रातच जेवण शिदोरी द्यायचं ठरलं हाय. बर झालं तू राना ची आठवण करून दिली. अस म्ह्णूनश्यान गजाभाऊन पिचकारी टाकली अन तडक गप्पगुमान वरच्या आळीतील नाम्याच्या घरी गेला.
नाम्या म्हसरांचं धार काढीत व्हता. गजाभाऊ अलगदपणे आतल्या सोप्यात जाऊन बसला. धार काढल्यावर भैर येऊन बघतोय तर गजाभाऊ दिसलं ! तस राम राम गजाभाऊ आज हिकड कुठं
वाकडी वाट केलायस, अस नाम्या म्हणताच , गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली, अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं.
– क्रमशः भाग पहिला
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈