सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 2 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
मध्येमध्ये मला ऑफिसमधून फोन येत होते.
“किती फाडफाड इंग्रजी बोलतेस ग तू! कुठे शिकलीस?”
मी बघतच राहिले तिच्याकडे.
“साहेबांना खूप लाज वाटायची माझी,मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही म्हणून. शिकवणीही लावली होती. पण ती दीडदमडीची पोर माझ्या चुकाच काढत राहायची, म्हणून काढून टाकलं मी तिला.”
“अग पण ताई,तुझ्या चुका तुला कळल्या नाहीत, तर तू त्या सुधारणार कशा?”
“तेही खरंच म्हणा .”
“तू ‘इंग्लिश विंग्लिश’ बघितला होतास ना? त्यात ती कसं नेटाने शिकते इंग्लिश!”
“पण मला नाय बाय येत बुंदीचे लाडू करायला.”
मी लग्नापूर्वीच्या ताईला आठवायचा प्रयत्न केला. ती एवढी बावळट नक्कीच नव्हती. घमेंडखोरही नव्हती. उलट माझ्या हुशारीचं तिला कौतुकच वाटायचं.
“तुला शिकायचंय इंग्लिश?”
“पण आता वेळ कुठे आहे?”
“मी चौकशी करते. तू इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त इंग्लिशवरच लक्ष केंद्रित कर. जमेल तेवढे दिवस इथे शिक. पुढचं घरी गेल्यावर.”
“या वयात नाही ग जमायचं मला. शिवाय मी हुशार थोडीच आहे तुझ्यासारखी?”
“आठवून बघ जरा. शाळेत असताना माझ्यासारखा पहिला नसला तरी सात-आठच्या आत नंबर यायचा तुझा. तू नक्की शिकू शकशील.”
“ते तुझं इंग्लिश-बिंग्लिश नंतर.आधी डॉक्टर.”
"बरं। मी घेते अपॉइंटमेंट.”
“आणि रजा घे हं तू. नाहीतर मला बसवशील डॉक्टरकडे आणि जाशील निघून ऑफिसला.” हे असं ठणकावून की जसं काही हीच मला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे.
मग तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं, त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या टेस्टस, सोनोग्राफी वगैरे, ते सगळे रिपोर्टस डॉक्टरना दाखवणं…….सगळ्या गोष्टी साग्रसंगीत झाल्या.
“अजिबात घाबरायचं कारण नाही. तुम्ही ठणठणीत आहात. सगळे रिपोर्टस नॉर्मल आहेत.”
मी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पण तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा ताईची कटकट सुरू झाली, “कुठची डॉक्टरीण शोधून काढलीस ही? तसंही बाई डॉक्टर म्हटल्यावर मला शंका आलीच होती. पण आता तर खात्रीच पटलीय. तिला काहीही येत नाही. मला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन चल. पैशाकडे बघू नकोस.”
मग मी दुस-या -तेही पुरुष डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. पुन्हा नव्याने टेस्टस, सोनोग्राफी सगळे सोपस्कार झाल्यावर त्यांनीही ताईला काहीही झालेलं नसल्याचा निर्वाळा दिला.
“ह्याच्यापेक्षा चांगला डॉक्टर…..”
“ताई, हे दोन्ही मुंबईतले बेस्ट डॉक्टर्स होते. तरीही तुला पटत नसेल, तर मी भावोजींना कळवते. ते तुलाही युएसला बोलावून घेतील. तुला काहीही झालेलं नसलं तरी तुझ्या दोन्ही बाजू काढून टाकतील आणि नंतर प्लॅस्टिक सर्जरी करतील. मग तर खूश?”
“नको ग. साहेबांना नको कळवूस. कदाचित तू म्हणतेस तसं डॉक्टरांचंच बरोबर असेल.”
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मस्तच लेख! वाचून सकाळ प्रसन्न झाली. कुणाला काय कुणाला काय छान आवगत असतं….”व्यक्ती तितक्या प्रकृती ” ते अगदी खरं आहे!
माझी बहिण आणि मी पण दोन ध्रुवावर दोघी, ती शाळेत असल्यापासून खुपच हुषार, मेरीट मधे येणारी एम.एस्सी.पीएचडी!इंग्रजीवर प्रभुत्व!
मी मराठी साहित्यातील पीएचडी अर्धवट सोडून दिलेली….गाईडला जेव्हा सांगितलं ,”सर माझं इंग्रजी पुअर आहे”. तेंव्हा सर म्हणाले होते, त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. मराठी च्या लोकांचं मराठी ही चांगलं नसतं,तुमचं मराठी चांगलं आहे!