श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ कन्यादान— भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
तो काळच असा होता, मुंबईतल्या कार्पोरेट ऑफिसच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांत उत्तर भारतीय आणि बंगाली अधिकारी वर्गच अधिक होता. त्याच सुमारास डिपार्टमेंटमध्ये जनरल मॅनेजर म्हणून लाटकर साहेबांची नियुक्ती झाली. जनरल मॅनेजर कुणीही येवोत हरीशला फरक पडत नव्हता. कारण ‘हेड ऑफ दि डिपार्टमेंट’ कुणीही असला तरी ‘ब्रेन ऑफ दि डिपार्टमेंट’ हरीशच होता.
कंपनीच्या विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय करता येईल ह्याविषयी हरीश नवनवीन कल्पक प्रेझेंटेशन सादर करायचा. लाटकर साहेब मराठी असल्याने तो साहेबांशी चक्क मराठीतच बोलायचा. त्या अधिकाऱ्यांचा जळफळाट व्हायचा.
हरीश वेगळं काही करत नव्हता. पूर्वीसारखेच काम करत होता, परंतु आता साहेबांच्याकडून वेळोवेळी त्याच्या कामाचं कौतुक होत होतं, त्यामुळे त्याला एक वेगळंच समाधान लाभत होतं. हरीश दर शनिवारी पुण्याला जाऊन सोमवारी मुंबईला परत यायचा.
हरीश अशाच एका सोमवारी सकाळच्या बसने मुंबईला पोहोचला. त्याचा नेहमीचा ओसंडून वाहणारा उत्साह मात्र आज कुठेतरी हरवला होता. साहेबांनी बोलावताच डायरी घेऊन त्यांच्या केबिनमध्ये हजर झाला.
“हरीश, पुढच्या तिमाहीत विक्रीचे लक्ष्य गाठण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटजी करता येईल याचा विचार करून आराखडा तयार कर आणि जमल्यास मला संध्याकाळपर्यंत दाखव.”
लाटकर साहेबांच्या आदेशावर हरीश थंडपणे म्हणाला, “होय साहेब, तयार करतो.”
हरीशची देहबोली पाहून साहेब लगेच म्हणाले, “काय रे, आज तुझी तब्येत बरी नाहीये का? तुझा चेहरा पडलाय म्हणून विचारतोय.”
हरीशच्या डोळ्यांत पाणी तरारलं.
“हरीश तू आधी बस पाहू. कामं होत राहतील रे. सांग काय झालं ते ”
“साहेब, गेल्या महिन्यात मी किती उत्साहानं माझ्या लेकीचा वाङनिश्चय साजरा केला होता, डिसेंबरमध्ये लग्न ठरलं होतं. पण अतिशय क्षुल्लक कारणावरून हे लग्न मोडलं.”
“हरीश, अरे तुझं मन:पूर्वक अभिनंदन. अक्षता पडायच्या आधीच त्या कुटुंबाचं खरं स्वरूप बाहेर पडलं, तुझं पूर्वसंचित कामाला आलं आहे. तुझी कन्याही नशिबवान आहे म्हणायची. लग्न लागल्यानंतर असं काही झालं असतं तर मात्र अख्खं कुटुंब हवालदिल होऊन गेलं असतं. असो. तुझ्या बाबतीत तरी त्या विधात्याने आपली चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय. काळजी करू नकोस. तिला नक्कीच चांगला वर मिळेल.”
हरीशला बरं वाटलं. मुलीचं लग्न मोडल्यानंतर असा सकारात्मक विचार किती लोक करतात? लाटकर साहेबांच्याविषयी हरीशचा आदर दुणावला. संध्याकाळी फोनवर पत्नीशी बोलताना साहेबांची प्रतिक्रिया सांगायला विसरला नाही.
लाटकर साहेबांचं भाकित खरं ठरलं. हरीशच्या लेकीचं लग्न जमलं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. जावई चांगला भेटला त्याहून महत्वाचे म्हणजे लेकीला सुसंस्कृत सासू-सासरे लाभले याचा आनंद अधिक होता. हरीशला मात्र एक चुटपुट लागून राहिली होती. लेकीच्या लग्नाला नक्की येतो असं सांगून देखील लाटकरसाहेब आले नव्हते. फक्त अभिनंदनाची तार आली होती.
लग्न पार पडल्यानंतर हरीश कामावर रूजू झाला. लाटकर साहेबांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ते रजेवर होते. हॉस्पिटलहून ते कालच घरी परत आल्याचं आणि त्यांना आणखी पंधरा दिवसांची विश्रांती घ्यायला सांगितल्याचं कळलं. ही बातमी हरीशसाठी धक्कादायकच होती.
हरीश आपल्या पुतण्याला सोबत घेऊन साहेबांना भेटण्यासाठी ठाण्याला गेला. बेल वाजवताच एका सुस्वरूप तरूणीने दार उघडले.
“मी हरीश. साहेबांना भेटायला आलोय,” असं म्हटल्यावर, “हो, आत या. बाबांनी सांगितलंय, तुम्ही भेटायला येणार होता म्हणून. बसा. मी बाबांना निरोप देते.” म्हणत ती आत गेली. साहेबांना मुलगी आहे, हे पहिल्यांदाच हरीशला कळलं.
थोड्याच वेळात साहेब आले आणि समोरच्या सोफ्यावर बसत विचारलं, “हरीश पत्ता शोधायला तुला त्रास नाही ना झाला?”
“नाही साहेब, हा माझा पुतण्या सतीश. ह्याला या भागाची माहिती आहे, म्हणून त्याला सोबत घेऊन आलो.”
सतीशने साहेबांना नम्रपणे नमस्कार केला. ‘काका मी इथे जवळच माझा एक मित्र राहतो. मी त्याला भेटून लगेच येतो’ असं सांगून सतीशने निरोप घेतला.
“हा सतीश काय करतो?” साहेबांनी उत्सुकतेनं विचारलं.
“साहेब, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आठ दहा मोठ्या कंपन्यांत मिळत असलेली संधी नाकारल्या. राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास व्हायचा ध्यास घेतला आणि विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्यानं उत्तम यश मिळवलं आहे. कठोर परिश्रम हेच त्याच्या यशाचे गमक आहे. आता पोस्टींगची वाट पाहतोय. माझा मोठा भाऊ आणि वहिनी अपघातात गेल्या तेव्हा तो तीन वर्षाचा होता. आम्ही त्याला मुलासमान सांभाळलं आहे.”
इतक्यात लाटकरवहिनी चहाचा ट्रे घेऊन आल्या. हरीशने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि स्वत:ची ओळख करून दिली.
वहिनी हसत म्हणाल्या, “साहेब ऑफिसच्या गोष्टी कधीच घरी सांगत नाहीत पण ते तुमच्या कामाचं कौतुक मात्र मला अधूनमधून सांगत असतात.”
हरीश सहज म्हणाला, “साहेब, तुमच्या कन्येविषयी तुम्ही कधी बोलला नाहीत ते.”
लाटकर वहिनी गंभीर होत म्हणाल्या, “काय बोलणार ते? मी सांगते. दोन वर्षापूर्वी रेवाचं लग्न मोडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या सासरेबुवानी तिला दिवाणखान्यात बोलावलं. सगळी घरची मंडळी आधीच जमलेली होती. रेवा येताच सासरेबुवानी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “रेवा, तू आता या घरची सून आहेस. इथल्या रीतीरिवाजाप्रमाणे तुला चालावे लागेल. सकाळी नऊच्या आत ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण एक वाजता आणि रात्रीचे जेवण आठच्या आत तयार असायला हवे. मंगळसूत्र आणि बांगड्या सोडून बाकीचे सर्व दागिने सासूच्याकडे सोपव. ती लॉकरमध्ये ठेवून देईल. सणासुदीला माहेरी जाता येईल. परंतु त्याच दिवशी माघारी यावे लागेल. आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈