सुश्री अरुणा मुल्हेरकर
जीवनरंग
☆ सांगड… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
“अंजलीताई येऊ का? ” दारावर टकटक करीत निर्मलाताईंनी आवाज दिला. ” आज इकडे कुठे अशा दुपारच्या वेळी? ” ” सहजच! एकाच सोसायटीत राहतो पण भेटीगाठी होत नाहीत,म्हणून विचार केला आज जावं झालं.” ” या! या! बसा.” अंजलीताईंनी निर्मला ताईंचं स्वागत केलं.
या निर्मलाताई ढमढेरे, शेलाट्या, सावळ्या वर्णाच्या, असतील साधारण ५५च्या पुढे, पण मुख्य म्हणजे भारीच उचापत्या. कोणाकडे भांडण झालं, कोणाची मुलगी पळून गेली,कोणी कंपनीत फ्रॉड केला अशा प्रकारच्या बातम्या सोसायटीभर पसरतात त्या निर्मलाताईंकडूनच! निर्मलाताई म्हणजे वृंदावन सोसायटीतलं चालतं बोलतं बातमी पत्र!
शेजारच्या बिल्डिंग नंबर चार मध्ये राहणाऱ्या निर्मलाताई आज इतक्या दिवसांनी सौ.अंजलीताई माने यांच्याकडे आल्या, म्हणजे नक्कीच काहीतरी खबर काढण्यासाठी आल्या असाव्यात.
श्री.व सौ.माने, उच्च विद्या विभूषित.अंजलीताई रूपारेल कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. दोन वर्षे झाली त्यांना सेवानिवृत्त होऊन. डॉ.विद्याधर माने (पीएच.डी.) आय. आय.टी. मुंबई, येथे प्राध्यापक. मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख. आता सेवानिवृत्त असले तरी त्यांचे विद्यापीठात जाणे- येणे, पुस्तके लिहिणे ही कामे चालूच असतात. त्यांनी लिहिलेली कितीतरी पुस्तके संदर्भ पुस्तके म्हणून प्रसिद्ध आहेत.
नीलिमा आणि नीरज ही त्यांची दोन अपत्ये. नीलिमा,एम्.डी. ऑन्कॉलॉजिस्ट ( कॅन्सर स्पेशालिस्ट) म्हणून अंधेरीतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि नीरज कम्प्युटर्स सायन्स इंजिनीयर होऊन, अमेरिकेतील मॅसेच्यूसेट्स या विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं हे चौकोनी कुटुंब! त्यांच्या घरात प्रवेश केल्यावर कोणत्याही प्रकारचा श्रीमंती देखावा नाही,परंतु सरस्वतीचा वास आहे, सकारात्मक ऊर्जा आहे असे काहीसे जाणवते आणि मन प्रसन्न होते.
दिवाणखान्यातील सोफ्यावर बसून निर्मलाताईंची काकदृष्टी अगदी घरभर फिरत असल्याचे अंजली ताईंच्या नजरेतून सुटले नाही.
“काही हवं आहे का निर्मलाताई तुम्हाला? हे घ्या थंड पाणी प्या, दुपारच्या वेळी फार गरम होतं.” काहीतरी संवाद घडावा या हेतूने अंजलीताई त्यांच्याशी बोलू लागल्या.
इकडच्या तिकडच्या जुजबी गोष्टी केल्यानंतर गायकाने जसे समेवर येऊन धडकावे त्याप्रमाणे निर्मलाताईंनी भात्यातला बाण बाहेर काढला.” बऱ्याच दिवसात तुमची नीलिमा कुठे दिसली नाही येता जाता? बाहेरगावी गेली आहे का? ती डॉक्टर झाल्याचे पेढे खाल्ले होते, त्यानंतर पुढे काहीच कळले नाही.”
माने कुटुंब काळा सोबत राहणारं.नित्य देवपूजा,
सणवार,गौरी,गणपती,संक्रांतीचे, चैत्रगौरीचे हळदी-कुंकू,श्रावणातले उपास-तापास या गोष्टी त्यांच्या घरात अगदी रूढी,परंपरेप्रमाणे चालू होत्या, पण म्हणून त्याचे फार स्तोम नाही. देव धर्माचा कोणताही दिखावा नाही. सद्यपरिस्थितीनुसार जुन्या चालीरीतीत योग्य ते बदल करण्याची त्यांची नेहमीच तयारी. प्रत्येक चालीरीतीचा अभ्यास करून, त्यामागील शास्त्र समजून घेऊन त्यांच्या घरी परंपरेचे जतन होत असते. थोडक्यात हे माने कुटुंब परंपरा जपणारे सुधारक कुटुंब आहे, त्यामुळे निर्मलाताईंच्या प्रश्नाला खरे उत्तर देण्यास मागेपुढे पाहण्याची अंजलीताईंना काहीच गरज वाटली नाही.त्यांनी सत्य परिस्थिती अगदी खुल्या दिलाने निवेदन केली.
“अहो निर्मलाताई, नीलिमा आता इथे आमच्या सोबत राहत नाही. रोज अंधेरीला अपडाऊन करणे फार त्रासाचे असल्यामुळे, तसेच रात्री-बेरात्री जावे यावे लागत असल्यामुळे तिने कोकिळाबेन हॉस्पिटल जवळच टू बीएचके फ्लॅट घेतला आहे आणि ती व तिचा पार्टनर दोघे तिथेच राहतात.”
निर्मलाताईंना आश्चर्याचा धक्का बसल्याचे अंजलीताईंच्या तात्काळ लक्षात आले.” म्हणजे लग्न कधी झालं? आम्हाला काहीच माहित नाही!” ” लग्न नाही झालं अद्याप,परंतु गेले वर्षभर दोघे एकत्रच राहत आहेत. एकत्र राहून त्यांची पार्टनरशिप परस्पर पूरक आहे की नाही,दोघांचे स्वभाव,दोघांच्या आवडीनिवडी,एकमेकांना समजून घेणे या आणि अशा गोष्टी व्यवस्थित जुळल्या तर लग्न बंधन स्वीकारायचे असे त्या दोघांनी ठरविले आहे. “
अंजलीताईंनी निर्मलाताईंच्या शंकेचं निरसन केलं.
“हे तुम्हा दोघांना मान्य आहे?”
“अहो,आमच्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? मुलं चांगली जाणती आहेत, आपल्याहून त्यांना सर्वच बाबतीत अधिक ज्ञान आहे. नीलिमाने आमची पंकजशी ओळख करून दिली आहे.तोही हार्ट सर्जन आहे,चांगला देखणा रुबाबदार आहे. त्याचे वडील नाशिकमध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. एकंदरीत सर्वच चांगलं आहे. मग तुम्हीच सांगा आम्ही काय फक्त विरोधासाठीच विरोध करायचा का?” अंजलीताई नीलिमाताईंना त्यांची परखड मते सांगत होत्या.
आपल्या संस्कृतीप्रमाणे लग्न संस्थेवर त्यांचा विश्वास आहे परंतु जुन्या रुढीला चिकटून बसणे त्या दोघांनाही मान्य नाही. नुसत्या पत्रिका जुळवून आणि एक दोन भेटीत मुला मुलींची खरी ओळख आणि स्वभावाची पारख कधीच होत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्या निर्मलाताईंना सांगत होत्या, “आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. कितीही शिकलो सवरलो तरी आपण बायकाच नेहमी पडती बाजू घेऊन संसार सांभाळत होतो,पण आता तसं नाही.मुलगा आणि मुलगी दोघेही समान पातळीवर कामं करतात. अशा परिस्थितीत त्यांची मतं जुळली नाहीत,त्यांच्यातील वाद सतत वाढत राहिले तर त्याची परिणती काय? तर दोघातील फारकत! तशात एखाद दुसरं मूल असलं तर त्या निरपराध बालकाची अवस्था फारच केविलवाणी! ही परिस्थिती लक्षात घेता काही काळ एकत्र राहून एकमेकांना नीट ओळखूनच लग्न केलेलं चांगलं असं आता आमचंही मत आहे.”
मान्यांची डाॅक्टर कन्या नीलिमा ही तिच्या boy friend बरोबर लिव्ह इन मध्ये राहत आहे ही बातमी आता वार्यासारखी संपूर्ण सोसायटीत पसरणार याची अंजलीताईंना पक्की खात्री आहे.
नवा जमाना, नवे विचार! ते दोघे लग्न करणारच आहेत यातच श्री व सौ माने यांना समाधान आहे.
लोक काय म्हणतील याची त्या दोघांना पर्वा नाही. त्यांच्या मुलीवर आणि तिच्यावर झालेल्या संस्कारांवर दोघांचाही पूर्ण विश्वास आहे.
जुन्या नव्याची सांगड घालून ते दोघे आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत…
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈