सौ. वृंदा गंभीर
जीवनरंग
☆ बाळ… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
किती सुंदर भावना ममतेची, मायेची, वत्सल्याची भावना. बाळाची चाहूल लागली कि जगच बदलून जातं सगळं. जग सुंदर निसर्गरम्य दिसायला लागतं. एक आई जागृत होते, जी स्वतः एक मुलगी, बायको, सून, वहिनी, बहीण असते ती अचानक आई होते. तिचं जग बाळाभोवती फिरायला लागतं. आई होणं सोपं नाही, पण आई शिवाय स्त्री जन्माला ही अर्थ नाही. ‘आई’ किती सुंदर शब्द ‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे ‘आई’ म्हणून म्हणतात ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’.
अशीच एक ममतेची कथा आज घेऊन आले आहे.
“वसू, ये वसू, अगं मुलाचं लग्न जमलं म्हणे तुझ्या, काय करते गं मुलगी? कुठली आहे?, किती शिकली आहे?, घराणं कसं आहे?, कुणी सुचवलं हे स्थळ तुला!” एक ना अनेक प्रश्न विचारत पमी घरात आली.
पमी आणि वसू दोघी बालपनाच्या मैत्रिणी पण सख्या बहिणी सारख्या. एकमेकांना अजिबात करमत नाही दोघींशिवाय. कुठेही एकत्र असतात. सगळं एकमेकींच्या मनाने विचार करून निर्णय घेतात. पण हा एवढा मोठा निर्णय पहिल्यांदा वसू आणि घरच्यांनी घेतला होता कारण पमी गावी गेली होती.
वसू- “अग हो हो, सांगते सगळं, जरा बस तरी, पाणी पी मग बोलते तुझ्याशी…..”
पमी म्हणाली, “का केलं असं वसू मला काही कळू दिलं नाही, माझं काही चुकलं का? कि कुठे कमी पडले मी? सांग बरं…..”
वसू – “अग पमी, तुझं काही चुकलं नाही. मलाच फार वाईट वाटत होतं गं. क्षणा क्षणाला तुझी आठवण येत होती, पण काय करू, काकांना बरं नाही म्हणून तू गावी गेलेली, मग कसं कळवायचं तुला. तू लगेच इकडे आली असतीस, म्हणून नाही सांगितलं… आम्ही ठरवलं गं तू आल्यावर पुन्हा मुलगी बघायला जायचं, तर उद्याच जाऊ या आपण.” तेंव्हा कुठे पमी शांत झाली. व दुसऱ्या दिवशी सगळे मुलगी बघायला गेले.
रानडेच्या दारात गाडी थांबली. गाडी बघून रानडे बाहेर आले व त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सगळे घरात आल्यावर त्यांचेशी पमीची ओळख करून दिली. निवांत चहा नाष्टा झाला व मुलीला बोलवणं गेलं. उंच, गोरीपान, सडपातळ, कळेभोर केस, बोलके डोळे, स्मित हास्य, जशी स्वर्गातली अप्सरा, अशी नेहा समोर आली. पमी तर बघतच राहिली तिच्याकडे.
नेहाने सर्वांना नमस्कार केला व समोर बसली, पमीने विचारले “तू काय करते? शिक्षण किती झालं तुझं?”
नेहा म्हणाली, “मावशी मी डाॅक्टर आहे. गायनिक स्पेशल आहे.”
पमीला खूप आनंद झाला. तीने नेहाच्या तोंडावरून हात फिरवला व पर्स मधून पैसे काढून तिच्या हातावर ठेवले. नेहा नको नको म्हणत होती पण पमी म्हणाली “हे सुनमुख बघितलं म्हणून आहे ग, ठेव तुझ्याकडे आशिर्वाद म्हणून.” सगळे जण हसायला लागले. जेवणं करून सर्वांचा निरोप घेऊन पाहुणे निघाले.
महिन्यावर लग्न आलेलं होतं. धावपळ सुरु होती. कामं वाढलेली होती. लग्न थाटामाटात करायचं होतं कारण ओम हा नावाजलेला डाॅक्टर होता. त्याच्या स्टेटस प्रमाणे लग्न व्हावं असचं सर्वांना वाटत होतं.
लग्नाचा शुभदिवस उजाडला व लग्न छान पार पडलं….. नेहाचा गृहलक्ष्मी म्हणून जोरात गृहप्रवेश झाला. खूप नातेवाईक, मित्र मंडळी स्वागताला आलेली होती. थट्टा मस्करी सुरू होती. खूपच सुंदर अविस्मरणीय असं वातावरण होतं. सगळे विधी पार पडले. पाहुणे आपापल्या घरी गेले व नेहाचा आणि ओम चा संसार सूरू झाला. हसत खेळत असा हा प्रवास सुखकर सुरु झाला.
बोलता बोलता लग्नाला एक वर्ष झालं. आता लोक विचारायला लागले, काही गोड बातमी आहे कि नाही ? नेहा लाजून सांगत असे, “नाही अजून, होईल, अजून कुठे आमचं वय झालं…”
एक दिवस वसू पमीला म्हणाली, “तू विचार बरं नेहाला, तुम्ही काही विचार केला का, उशिरा मुलं वगैरे.” तेंव्हा नेहा हॉस्पिटल मधून आल्यावर पमीने नेहाला विचारले. तेंव्हा नेहा म्हणाली “मावशी, आहो तसं काही नाही, आई होणं मलाच आवडणार आहे. बाळ ही भावनांचं पूर्णत्वाकडे नेणारं आहे, पण खरंच अजून तरी काही नाही. मी ओम बरोबर बोलते व ट्रीटमेंट सुरु करते.”
पमी हो म्हणाली व “लवकर बघ बाई काहीतरी, एखादं झालं कि तुम्ही खुशाल पाळणा लांबवा, आमचं काही म्हणणं नाही,” असं बोलून पमी गेली.
आता नेहाच्या मनाला ही बाळाचे वेध लागलेले होते. तिच्या डोक्यात फक्त बाळ आणि बाळच होतं. तिचं दुसरीकडे लक्ष लगात नव्हते. मन चलबिचल होत होतं… ओम घरी येताच नेहा ने लगेच बाळाचा विषय काढला. ओम ला पण बाळ हवं होतं. दुसऱ्या दिवशी दोघांची ट्रीटमेंट सुरु झाली. काही टेस्ट केल्या. ओम मध्ये शुक्राणूंची कमतरता होती. त्याला टॅबलेट सूरू केल्या. खूप प्रयत्न करूनही उपयोग होतं नव्हता. नेहा एक गायनिक होती. ओम डाॅक्टर असून निराश झाला होता. पण नेहा म्हणाली, “आपण टेस्टटयूब बेबीचा वापर करून आई बाबा होऊ शकतो.” त्यांनी हे घरात सर्वांना सांगीतले. सगळे सुशिक्षित असल्यामुळे सर्वांचा होकर आला.
नेहाच्या हाताला यश आले व तब्बल पाच वर्षांनी नेहाला आई होण्याची चाहूल लागली. नेहा आता आणखी खूपच सुंदर दिसायला लागली. घरातील सगळे तिची काळजी घेत होते. हॉस्पिटल चा ताण वाढतं होता. तरीही तिने स्वतः ट्रीटमेंट घेतली आणि त्यात ती सक्सेस झाली म्हणून अशा अनेक बायका तिच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला यायला लागल्या. नेहा सर्वांना प्रेमाने आपुलकीने समजून सांगत ट्रीटमेंट देत होती.
नेहाचे नऊ महिने पूर्ण होताच दहाव्या दिवशी नेहाने सुंदर मुलाला जन्म दिला. ती खूप खुश होती कारण तिचं स्त्री त्व पूर्ण झालेलं होतं. ती ‘आई’ झालेली होती. तिच्यासाठी तिचं बाळ हेच जग झालेलं होतं. नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ आता तिच्या कुशीत होतं. नऊ महिने सहन केलेला त्रास, रोज झालेले बदल, प्रसूती वेदना, सगळं सगळं ती विसरलेली होती कारण ती ‘आई’ झाली होती.
आई ममत्व, वात्सल्य, प्रेमाचा महासागर असते. कले कलेनं बाळ वाढत असतं. त्याचं कौतुक बघण्यात दिवस निघून जात असतात. जी मुलगी आईला त्रास देते, आई ला हट्ट करते, ती आज आई झालेली असते. तिला आई काय असते ते कळतं. म्हणून म्हणतात ‘आई होण्यासाठी वीस वर्ष वाट पहावी लागते व बाप होण्यासाठी पंचवीस वर्ष वाट पहावी लागते तेंव्हा आई आणि बाप कळायला लागतो.’
नेहा पुन्हा हॉस्पिटल मध्ये येऊ लागली. खूप अशाळभूत नजरेने महिला तिच्याकडे येऊ लागल्या. बहुतेकांना बाळ होत नव्हतं. कुणाला उशिर होत होता, काहींना पंधरा वीस वर्ष झालेली होती. क्वचित ठिकाणी अपयश येतं तो नशिबाचा भाग म्हणावा लागेल. नेहाने कित्तेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, कित्तेक घरात दिवे लावले, कित्तेक आज्जी आजोबा आनंदाने राहू लागले.
आज विज्ञान कितीतरी पुढे गेलेलं आहे. परंतु ज्यांना काहीच गोळ्या औषध घ्याव्या लागत नाही तरीही त्यांना मुलं होतात, वाढतात, मोठी होतात, ती लोकं किती भाग्यवान म्हणावी लागतील. असो तो सृष्टीचा नियम आहे. पण देवाने काय दिलं, देव आहे का ?असा प्रश्न ज्यांना पडतो ना त्यांनी हे नक्कीच लक्षात घ्यावं, जेंव्हा बाळासाठी पैसे मोजावे लागतात, समाजाचे बोलणे ऐकावे लागतात, वांझपणाचा कलंक लागतो तेंव्हा नक्कीच देवाला शरण जायला हवं.
नेहा सुसंस्कारी आई होती म्हणून तीने चिन्मय ला छान संस्कार दिले. चिन्मय परदेशात जाऊन आई सारखा गायनिक सर्जन होऊन परतला. नवीन टेक्नॉलॉजी शिकून आल्याने कुणाच्याही पदरी निराशा येऊ नये म्हणून सेवा देऊ लागला व वंशाचा दिवा घरोघरी पेटवण्याचा प्रयत्न करत प्रत्येक आई च्या चेहऱ्यावर हसू आणू लागला कारण ‘आई’ ही वत्सल्य, आशा, किरण असते. जिथे आशा संपते तिथे किरण येतात व
आईला पूर्णत्वाकडे घेऊन जातात.
© सौ. वृंदा पंकज गंभीर
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈