श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.) – इथून पुढ़े
मी – तुम्हाला शिरीष गोखले माहित असतील ना?
MR – हो, का?
मी – मी त्यांच्याकडे गेल्या महिन्यात ऑर्डर्स दिली होती, त्याने कुठल्या एजन्सी कडे दिली काही कळत नाही, अजून माल आला नाही, म्हणून..
- R -मॅडम, शिरीष माझा मित्रच. तो सध्या डिस्टर्ब मूड मध्ये आहें.
मी – काय झालं? आजारी आहें का तो?
- R.-आजारी नाही. त्याची बायको घर सोडून गेली आहें कायमची.
मी – का? एवढा चांगला नवरा आणि..
- R-शिरीष चांगलाच आहें हो. पण त्याची बायको तऱ्हेवाईक आहें, कुणाशी तिचे पटत नाही, त्यांची रोज भांडणे व्हायची. आता मात्र ती कायमची घर सोडून गेल्याचे मला समजले आणि त्यामुळे शिरीष…
मी – त्या मूळे शिरीष सतत दारूच्या नशेत. कुणाला भेटत पण नाही, फोन केला तर हॅल्लो करतो आणि ठेऊन देतो.
आशुच्या लक्षात आले, शिरीष कडे फोन आहें.
मी – तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहें का?
MR- आहें
अस म्हणून त्याने आशूला शिरीषचा लँडलाईन नंबर दिला.
शिरीष सतत दारूच्या नशेदेत त… काय हे, एवढा हुशार देखणा पुरुष आणि याची बायको याच्याशी भांडतेच .. आणि आता सोडून गेली म्हणे…
दैव देत आणि कर्म.. असच नाही का… मला असा नवरा मिळाला असता तर.. आयुष्य म्हणजे आनंदाच झाड झालं असत..
आशूने मिळालेल्या फोन नंबर वर फोन लावला.
आशु – हॅल्लो, शिरीष बोलतात काय?
शिरीष दारूच्या नशेत होता. मोठया प्रयासाने त्याने रिसिव्हर उचलला.
शिरीष – कोण बोलताय?
आशु – मी आशा, रत्नागिरीहुन, जय मेडिकल..
शिरीश ची खाडकन दारू उतरली. तो रेसिव्हर सांभाळत उत्तरला
शिरीष – कोण मॅडम? कसा काय फोन केला? आणि माझा नंबर कुठे मिळाला?
आशू – नंबर कसा मिळाला हे महत्वाचे नाही, तुमचे काय चालले आहें?
शिरीष – कसले आणि काय?
आशु – मला कळले आहें तुम्ही व्यसनात अडकला आहात. माझी इच्छा आहें की तुम्ही आज पासून हे व्यसन बंद करा आणि पूर्वीसारखे कामाला लागा.
शिरीष – हो मॅडम, आज पासून नव्हे आता पासून व्यसन बंद.
आशु – माझा तुमच्यावर विश्वास आहें, ठेवते.
आशूने फोन ठेवला, शिरीषआश्यर्य चकित झाला,्जी आपल्याला आवडते ती जय मेडिकलची मालकीनीने स्वतः आपल्याला फोन केला.आपण तिला आवडतो की काय?मग तिच्या गळ्यातील काळे मणी आणि कुंकू.. याचा अर्थ काय?
थोडी तब्येत बरी झाल्यानंतर शिरीष रत्नागिरीत आला. आल्या आल्या तो जय मेडिकल मध्ये आला. त्याला पहाताच आशूला मस्त वाटलं. त्याची तब्येत बरी दिसताच तिला आनंद झाला.
आशू – कशी आहें तब्येत?
शिरीष – कशी दिसते? चांगली आहें.
आशू – आयुष्यात असे प्रसंग येत असतात, स्त्रियांवार सुद्धा येतात पण कोण व्यसने सुरु करत नाही, त्याला तोंड द्ययच असत.
शिरीष – तुमच्यावर असे प्रसंग आले नाहीत म्हणून..
आशू – आले होते नव्हे त्यात मी अडकले आहें पण..
शिरीष – कसला प्रसंग मॅडम..
आशू – हे दुकान आहें, सांगेन.. कुणाला तरी सांगावे असे वाटते.. पण आज आणि इथे नको.
शिरीष – मग केंव्हा?
आशू – मी फोन करेन तुम्हाला..
बर अस म्हणून आणि चहा पिऊन शिरीष गेला.
शिरीष कोल्हापूरात गेला पण रोज आशुचा फोन येईल म्हणून वाट पहात होता. पण चार दिवस झाले तरी तिचा फोन आला नाही.
इकडे आशू विचार करत होती, खरच हे संबंध वाढवावे की आत्ताच कट करावेत. आपल्याला हे झेपेल? जय चें काय,? आपली बहीण, भाऊ, विजू आते, काका? डॉ परांजपे फॅमिली? आणि आपला अजून घटस्फोट नाही झालेला? शिरीषचा पण नाही झालेला.
शिरीष आपल्याला हवासा वाटतो, सतत सोबत असावासा वाटतो. त्याच्या खांद्यावर मान ठेऊन समुद्राकडे पहात राहावंसं वाटतं.अजून आपण तरुण आहोत, तरुण स्त्री च्या सर्व इच्छा भावना आपल्यालाही आहेत.
पाच दिवस वाट पाहून मग शिरीषने तिला कॉल लावला. ती खुप आंनदीत झाली. तिने आपला सर्व भूतकाळ त्याला सांगितला.त्याला खुप वाईट वाटलं.त्यानेही आपली घरची परिस्थिती, आईवडील, नोकरीं, लग्न, मूल न होणं वगैरे सांगून आपलं मन मोकळ केल.
आणि मग रोज रात्री उशिरा जय झोपल्यावर त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले. शिरीषने तिला जीवनसाथी बनण्याची इच्छा व्यक्त केली.आशुने सर्व अडचणी सांगितल्या. अजून घटस्फोट न घेतल्याचे सांगितले. त्यावर त्याने इतकी वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल असे सांगितले आणि पुढील आठवड्यात आपण रत्नागिरीमध्ये येत असून त्यावेळी मराठे वकिलांना भेटूया, असे सांगितले. तसेच आपली पत्नी बहुतेक या महिन्यात आपणाकडून घटस्फोट मागणार अशी बातमी आपल्याला कळली असल्याने ती पण अडचण नाही, असे सांगितले.
आशू आंनदात होती. तीच मन मोरासारखे थुई थुई नाचत होते. गेली कित्येक वर्षात ती देवळात गेली नव्हती. आता ती देवळात जाऊन देवाचे दर्शन घेत होती. येताना फुलांच्या दुकानात जाऊन रोज कुठल्या न कुठल्या फुलाचा गजरा घेऊन केसात माळत होती.तिने स्वतः साठी फारसे ड्रेस किंवा साडया घेतल्या नव्हत्या, आता मात्र तिने जय साठी कपडे घेतलेच पण आपल्यासाठी शोभणारे ड्रेस तसेच साडया, सॅन्डल्स घेतले. घरात नवीन फर्निचर घेतले.
शिरीष पुढील आठवड्यात आला म्हणजे वकिलांना भेटून घटस्फोटची नोटीस दयायची,अशा आंनदात आशू होती. शिरीष पण घटस्फोट घेईल, मग आतेला, बहीण भावाला सांगायचे असे तिने ठरवले. सर्वाना आनंदच होईल हे तिला माहित होते.
रोज रात्री त्या दोघांचा फोन ठरलेला होता.शनिवारी रात्री तिने फोन लावला, दुसऱ्यादिवशी दुकान बंद म्हणून तिला बोलण्यास वेळ होता.
“हॅल्लो शिरीष… तिने लाडाने त्याला विचारले
“कोण? तू मेडिकलवाली काय, माझ्या नवऱ्याला फुस लावतेस?”पलीकडून खेकसत एका स्त्रीचा आवाज आला.
आशू घाबरली
“कोण.. कोण.. शिरीष आहें…
“शिरीष हवाय तुला? तुला लाज वाटतं नाही एका लग्न झालेल्या पुरुषाला रात्रीअपरात्री फोन करायला..आणि तिने असभ्य भाषेत शिव्या द्यायला सुरवात केली.
आशू गडबडली. तिने फोन खाली ठेवला.पाच मिनिटानंतर पुन्हा फोनची रिंग वाजली, तिला वाटले शिरीषचा फोन असेल. पलीकडून तीच बाई बोलत होती
“ए भवाने, मी शिरीष गोखलेची बायको बोलते आहें, मला कळलं हल्ली माझा नवरा रत्नागिरीत पडलेला असतो, कोणी मेडिकलवाली भुलवते आहें त्याला, पण लक्षात ठेव मी जिवंत असेपर्यत काही घडणार नाही, मी दोघांना जेलमध्ये घालेन, माझ्या नवऱ्याचा नाद सोड, दुसरा कुणी पकड…. आणि ती बरीच बडबडत राहिली,शिव्या देत राहिली.
आशू सुन्न झाली. तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली एका मिनिटात. आशू रडू लागली, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ठोकरच बसते आहें.
मग दुसऱ्या दिवशी शिरीषचा फोन आला, तो रडत तिची माफी मागत होता. हे पण संकट जाईल अस म्हणत होता, पुन्हा आपण एकत्र येऊ अस म्हणत होता, तिने त्याचे म्हणणे ऐकले आणि शांतपणे रेसिव्हर खाली ठेवला.
शिरीष नावाचा चॅप्टर तिने बंद केला. पुन्हा ती देवळात जायची बंद झाली, गजरा माळायची बंद झाली. आता घर, रोजचे जेवणं, डबा घेऊन दुकानात जाणे, जयचा डबा, त्याची शाळा, केंव्हातरी विजू आतेकडे जाणे, भावाबहिणीला फोन करणे बस्स..
तिच्या दुकानात रोजच M. R. येत असत, त्यांच्या गप्पातून तिला कळलं, शिरीषने पुण्याला बदली घेतली. मग काही दिवसांनी कळलं, शिरीषने कंपनी बदलली आता तो मराठवाड्यात असतो. त्याच्या बायकोचे आणि त्याचे रोज भांडण होते, मारामारी रोजची इत्यादी.ती निर्वीकार मानाने सर्व ऐकत होती.
एका दिवशी ती नेहेमीप्रमाणे दुकानात असताना एका कंपनीचा MR तिला म्हणाला
“तुम्हांला कळलं का मॅडम, शिरीष गोखलेने आत्महत्या केली म्हणे.
ती किंचाळली “काय?’
“म्हणजे अजून गेला नाही तो, हॉस्पिटल मध्ये आहें पण सिरीयस आहें अशी बातमी आहें ‘.
तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं.ती मनातल्या मनात रडू लागली.पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.
– क्रमशः भाग तिसरा
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈