सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ बरं… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(वृद्धाश्रम प्रथेची आणि संस्कृतीचा ऱ्हास यावर या निमित्ताने खूप बोललं गेलं. पण याही वेळी नानीने चर्चेत भाग घ्यायचं मात्र टाळलं. “काळाची गरज” या बॉक्समध्ये ती बरंच काही जमवून ठेवते.) – इथून पुढे
त्यादिवशी बाकावर पागेबाई एकट्याच बसल्या होत्या. नानीनं दुरूनच त्यांना पाहिलं. जरा उदासच वाटत होत्या. मग नानी त्यांच्या शेजारी जाऊन बसली. पागेबाईंनी लगेच त्यांचा हात धरला.
” काय झालं मायाताई ?”
“काही नाही हो! नेहमीचच.”
नानीने थोडा वेळ जाऊ दिला. फारसे काही प्रश्न विचारले नाहीत. मग त्याच सांगू लागल्या,
” किती वर्ष मी या दोघांना सांगत होते मला नातवाची पावलं दाखवा रे! आठ वर्षे झाली यांच्या लग्नाला. विषयच काढू द्यायचे नाहीत. मुल जन्माला घालण्यापूर्वीचं यांचं बजेट ठरलेलं असतं म्हणे! ते गाठेपर्यंत थांबायचं. अरे पण तुमच्या वयाचं काय रे? ते थांबणार आहे का? मूल जन्माला येणं महत्त्वाचं नाही का? ते वाढेलच की आपोआप. त्यासाठी बजेट कशाला हवं? निसर्गाच्या विरुद्ध जाण्याची किंमत आता मोजावी लागते. तारुण्य सरलं आता ivf च्या पाठी लागलेत. काय म्हणाव यांना? मोठ्यांचे सल्ले यांना पटत नाहीत. त्यांच्या अनुभवांशी यांचं काही देणंघेणं नसतं. यांचा विश्वास प्रगत विज्ञानावरच. फक्त विज्ञान हाच त्यांचा आधार हो! बाकी निसर्ग तत्वांशी यांचं नातच नाही. मान्य आहे रे बाबांनो तुम्ही सारे खूप प्रगत आहात, खूप पुढे गेली आहेत तुमची तंत्र. पण तंत्र, यंत्र आणि निसर्ग यांचा काही ताळमेळ आहे की नाही? सगळी नैसर्गिक मजाच हरवून बसतात जीवनातली. नाही का हो?”
नानी एकदम भानावर आली मायाताईंच्या प्रश्नाने. मायाताईंच्या डोळ्यात अश्रू होते. चेहऱ्यावर नैराश्य होतं. सगळे पेशन्स संपले होते.
नानी मात्र एवढेच म्हणाली, “नका इतके गुंतून घेऊ स्वतःला. काळ बदलतो, जीवन बदलतं. त्यांचं आयुष्य त्यांचे निर्णय. जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. आपण फक्त प्रार्थना करायची. ठेच लागली तर आधार द्यायचा. तोही त्यांना हवा असेल तर?”
” काय बोलताय तुम्ही? असं कुठे असतं का?”
असं म्हणत पागेबाई उठून गेल्या. त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे नानी पहात बसली. क्षणभर तिला वाटलं “हे कालचक्र फिरताना प्रत्येक मागच्या पिढीचं या पागे बाई सारखंच होतं का?”
नानीचीही पंच्याहत्तरी उलटली होती. नाना जाऊन वीसेक वर्ष झाली असतील.नानी निवृत्त झाल्यावर राघव म्हणाला, “नानी तू आता एकटी राहू नकोस.”
तसा हा निर्णय खूप मोठाच होता आणि नानीच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला पलटी देणारा होता. नानीला एकटं राहण्याची सवयी झाली होती. शिवाय दोघात तिसरा नकोच हाही एक विचार होताच. तशी नानी आर्थिक दृष्ट्या अवलंबूनही नव्हती. तिचे भरभक्कम पेन्शन होते. स्वतःची सेविंग्ज होती. नानांची थोडीफार पुंजी होती. पण त्याला तिने कधीही हात लावला नाही. फक्त नियोजन केलं आणि राघव साठीच राखून ठेवलं.
अनेक कडू गोड आठवणींना मागे ठेवून घराचा उंबरठा कायमचा ओलांडणं नानीला जड गेलं होतं. पण राघव बरोबर राहताना दोघांच्याही आयुष्यात होणाऱ्या बदलांचं काय करायचं याचं एक निश्चित धोरण तिनं आखलेलं होतं आणि म्हणूनच असेल राघव, राघवची बायको आणि रिमा यांच्या आयुष्यातलं तिचं होणार आगमन त्या वेळेपासून कुणालाही त्रासदायक वाटलंच नाही.
नानी खूप वेळा विचार करते की कुठलाही बदल ही समस्या कशी होऊ शकते? बदलाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खरी समस्या असते. नानी सतत एक सकारात्मक दृष्टिकोन जपत आली. तिचं एकच उत्तर असतं सगळ्यांवर,
” बरं.”
या “बरं” मध्ये खूप काही व्यक्त, अव्यक्त साठलेलं असतं. पण याचा अर्थ ती नव्या पिढीच्या ताब्यात गेली आहे असं मुळीच नाही. तिच्या अस्तित्वावर फक्त तिचाच हक्क आहे. त्यावर कुणीही कुरघोडी करू शकलेलं नाही. फक्त दोन वेगळ्या विश्वातली एक अस्पष्ट रेषा तिने जाणीवपूर्वक सांभाळलेली आहे. ती सांभाळताना होणारी उरातली धडधड, उदासीनता, चीड, तुलना या साऱ्या भावनांवर तिने मात नसेल केली पण त्यांना नीट हाताळले आहे. हे नक्की.
या साऱ्यांसोबत नानीबरोबर तिची आई, आजी यांच्या आयुष्याची ही आठवण असते. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक रिकाम्या जागा नानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असते.
रात्र खूप झाली आहे. राघव दिल्लीला गेलाय. अवंती काही दिवसांसाठी ऑफिसच्या प्रोजेक्ट निमित्त सिंगापूरला गेली आहे. रिमा अजूनही घरी आलेली नाही. तिचाही कोणी मित्र आहेच. सकाळी निघताना तिने आजीला सांगितले होते की, ती त्याच्याबरोबर आज एका लाईव्ह कन्सर्टला जाणार आहे. मालतीबाईंचीही सुट्टी होती. नानीच्या मनात पुष्कळदा येतं रिमाला एकदा विचारावं,” तुझं आणि त्याचं नक्की नातं काय आहे?”
पण नानीला खात्री आहे ती म्हणेल “अग आज्जी आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. आत्ता तरी.”
” आत्ता तरी” याचा नक्की अर्थ काय? अवंती जवळ सहजच बोलता बोलता नानीने विचारलं होतं,
” त्यांच्यात काही ठरतंय का?”
तेव्हां ती म्हणाली होती,
“नानी आज-काल मुलं काय मुली काय पटकन लग्नाच्या बंधनात पडत नाहीत. त्यांना सहवासातून एकमेकांची खरी ओळख करून घ्यायची असते. लग्न हा त्यांच्यासाठी फार पुढचा विचार असतो. नानीला प्रश्न तर पडलेच होते पण न विचारण्याचं धोरण तिने याही वेळेला राखलंच. फक्त अवंतीला म्हटलं मात्र, “तुम्हाला चालतय का हे सारं?म्हणजे तुला आणि राघवला?”
अवंती नुसतीच हसली.
” अहो नानी आमच्या चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? आजकाल मुलांना फारसं विचारलेलंही आवडत नाही. विचारत राहिलं की संवाद तुटायला लागतो आणि त्यांच्या जीवनाचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहेत.
नानीला एवढंच जाणवलं हळूहळू सूनही मागच्या बाकावर येत चालली आहे. नानीला गंमत वाटली.
आकाशात भुरकट ढगांच्या पदरातून चंद्र संथपणे सरकत होता. कुणाच्याही सुखदुःखाची त्याला जाणीव नव्हती.अथांग आभाळात तो मुक्तपणे भटकत होता. आजचा चंद्र ही नानीला वेगळाच भासला. तिच्या अंतरातून जणू काही नकळतच स्वर आले,” अरे बाबा! या मानवाने तुला तरी कुठे सोडले? विश्वाच्या मनातल्या तुझा गोजिरवाण्या रूपाची चिरफाडच झाली ना?”
मग नानी बेडरूम मध्ये आली. थोडा वेळ तिने टीव्हीवरची एक मालिका लावली. तिथेही हेच सारं होतं. ती कुणी एक इशा, अरुंधतीला म्हणजे तिच्या आईला जोरजोरात तिचं म्हणणं पटवत होती. ताड ताड तिच्या बाबतीत घडलेल्या सगळ्या गोष्टींबाबत तिला दोष देत होती. बिनदिकतपणे ती बोलतच होती. शेवटी नानीने टीव्ही बंद केला.
मोबाईलवर मेसेजची ट्युन वाजली. मेसेज रिमाचा होता.
” आज्जी प्रोग्रॅम नंतर आम्ही सगळे विक्रमच्या फार्मवर जाणार आहोत. खूप जण आहोत आम्ही. काळजी करू नकोस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर आम्ही निघू. गुड नाईट! टेक केअर!
नानीने मेसेजला उत्तर दिलं.
” बरं.”
त्याही वेळेला तिच्या मनात एकच विचार आला निदान रिमाने कळवले तरी.
– समाप्त –
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈