सौ. वृंदा गंभीर
जीवनरंग
☆ इंदू…. ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
“भालचंद्र पाटील”बोरगावचे पाटील. घरची परिस्थिती उत्तम. गावात नव्हे पंचक्रोशीत त्यांच्या शब्दाला मान होता. गावासाठी सतत धावणारे, उत्तम प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. गरिबांसाठी माया, ममता होती त्यांच्याकडे. गावात शिस्त होती. आदरपूर्वक दरारा होता त्यांचा त्यांना सगळे प्रेमाने आप्पा म्हणायचे … सगळं होतं पण मुलगा नव्हता. एकच मुलगी होती तिचं नावं “इंदू” होतं.
“इंदू, शाळेत जात होती गावात बारावी पर्यंत शाळा होती. पुढचं शिक्षण शहरात घ्यावं लागणार होतं. तिची दहावी झाली आता अकरावी, बारावी झाल्यावर काय असा प्रश्न पडला, तिला पुढे शिक्षण घायचं होतं खूप इच्छा होती.
कॉलेज सुरु झालं इंदू खूप अभ्यास करायची तिचा अभ्यास बघून आप्पांना वाटायचं पोरीचं स्वप्न पूर्ण करावं व तिला शिक्षणाला पाठवावे. इंदू बारावीला तालुक्यात पहिली आली तिचा पुढचा प्रवास सुरु झाला. तिला इंजिनियरिंग ला ऍडमिशन मिळालं,,, इंदू अभ्यासात हुशार असल्यामुळे ती लगेच सर्वांची लडकी झाली.
“इंदू ” दिसायला खूप सुंदर होती, उंच सडपातळ बांधा, गोरीपान, सरळ नका, धनुष्या सारखे गुलाबी ओठ, काळेभोर पाणीदार डोळे, रेशमी मुलायम दाट आणि लांबसडक केस, बघताच कुणीही प्रेमात पडावं अशीच होती.
इंजिनियरिंगचे दोन वर्ष झाले होते, इकडे आप्पांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले… आता आई एकटीच होती. तीही फार खचून गेली होती. कधी दोघे एकमेकांना सोडून राहिले नव्हते, त्यामुळे त्या खूप उदास झाल्या होत्या. इंदू म्हणाली ‘ मी कॉलेज सोडून गावी येते ‘. पण आई नको म्हणाली, इंदुची एक मावस मावशी होती, तिचा नवरा लोकांच्या शेतात काम करून घर चालवत असे, इंदूचे मामा तिच्या आईला म्हणाले, ”आक्का सखुला राहू दे तुझ्या जवळ. तुला सोबत होईल आणि दाजी शेती बघतील,” ते सगळ्यांना पटलं व सखू व बबन तिथे राहायला आली…
आता सगळी जबाबदारी पाटलीणबाई वर आली होती. गावातील लोक मदत करत होते, सखू, बबन छान काम करत होते सगळं कसं सुरळीत चालू होतं.
इंदूच इंजिनियरिंग पूर्ण झालं व ती M. S साठी ओस्ट्रेलिया ला गेली.
इकडे बबनची आई त्याला भेटायला म्हणून आली आणि एवढं वैभव बघून तिच्या लालच निर्माण झाली. तिने बबनला सांगितलं “ तू बघतो सगळं याला कोणी वारस नाही. मुलगी तर परदेशात गेली ती काय परत येते. तू हे सगळं तुझ्या नावावर करून घे. किती दिवस गरिबीत काढायचे.. आता हे आयत हाती लागलं आहे हे सोडू नको, , , , ”, बबन ने सखुला विश्वासात घेतलं, तिला सगळं सांगितलं. तिला पण श्रीमंतीचे स्वप्न पडायला लागले. ती त्याला हो म्हणाली, आणि, त्यांनी प्ल्यान तयार केला.
पाटलीणबाईकडून हळूहळू गोड बोलून वेगवेगळे कारणं सांगून सह्या घेतल्या. काही गावातील लोकांना स्वतःकडून करून घेतलं आणि सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली. त्यांचं वागणं बदलू लागलं लोकांची ओरड येऊ लागली. पाटलीणबाई बबनला म्हणाल्या “आमच्या जिवाभावाची लोकं आहेत असं त्रास देऊ नका. नाहीतर तुम्ही जाऊ शकता, ” सखू म्हणाली “ होय आक्का जावंच लागेल.. पण तुला. आता हे सगळं आमचं आहे आणि तूच आमच्या नावावर केलं आहे. ”
पाटलीणबाईला धक्का बसला व त्या जागेवरच गेल्या. पै पाहुणे जमा झाले गावाला हुरहूर लागली होती. काही लोकं बबनने फसवलं म्हणून पाटलीणबाई गेल्या असं म्हणत होते, तर काही लोकं त्यांनीचं सगळं बबनला दिलं असं म्हणत होते.
इंदू आली.. अंत्यसंस्कार झाले, ती तेरा दिवस राहिली व परीक्षा होती म्हणून निघून गेली.
आप्पांचे एक मित्र होते त्यांना आप्पा सगळं सांगत होते. ते इंदुच्या मामांना भेटले व त्यांनी एका वकिलाचा फोन नंबर त्यांना दिला. त्यांच्याकडे जायला सांगितलं. तेव्हा इंदूचे मामा म्हणाले “तुम्ही चला आपण जाऊन येऊ “ त्यांनी एक दिवस ठरवलं व वकिलांना भेटायला गेले.
बबन व सखू सातव्या अस्मानावर होते. फुकटच मिळालं होतं. पैशाची, माणसांची किंमत राहिली नव्हती. उग्रट, टाकून बोलणं होतं. माणसं तुटली होती……
मामा वकिलांकडे गेले, वकिलांना सगळं सांगितलं. त्यांनी मामाला सांगितलं की असं होऊ शकतं नाही कारण प्रॉपर्टी सगळी इंदुच्या नावावर आहे आणि ती जेव्हा लग्न करेल तेंव्हाच तिला मिळेल.. असं मृत्यूपत्र केलेलं आहे. आता कुठे मामाच्या जीवात जीव आला होता.
दुसऱ्या दिवशी पोलीस व वकील गावात आले. बबन कुठे आहे? असा कडक आवाज दिला, सखू बाहेर आली, पोलीस बघून घाबरली व ते शेतात गेले असं सांगितलं, ‘ जा बोलून आणा त्याला ‘ वकील म्हणाले, सखुने एका मुलाला बबनला बोलवायला पाठवलं.
बबन आला, “ पोलीस? मी काय केलं.. तुम्ही इकडं कसे, ” असं बोलल्यावर वकील म्हणाले
“ आम्हाला इथे दुसरा केअर टेकर ठेवायचा आहे. तू घर खाली कर, ” तेंव्हा बबन म्हणाला “ हे माझं आहे पाटलीणबाईने माझ्या नावावर केलं आहे. ” असं म्हणत त्याने पेपर वकिलांच्या अंगावर फेकले, वकील व पोलीस हसायला लागले व “ खोटे कागदपत्र तयार करून धमकी देऊन सह्या घेतल्या आहेत, पण ही प्रॉपर्टी ज्याची आहे तिची सही कुठे आहे. ”
बबन गडबडला व म्हणाला म्हणजे, तस वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून वाचायला सुरवात केली तशी बबनच्या पायाखालची जमीन सरकली. खोटे कागदपत्र व फसवणूक केली म्हणून बबन सखुला अटक झाली. गावातील लोकांनी साक्ष दिली. पाटलीणबाई याच्या त्रासाने गेल्या त्या जाण्यासारख्या नव्हत्या तोही आरोप झाला व जन्मठेपेची शिक्षा त्यांना मिळाली.
वकिलांनी केअर टेकर ठेवला व प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात दिली,,,
इंदूच M. S पूर्ण झालं. ती भारतात आली. एका कंपनीत तिला जॉब मिळाला. तिचं काम हुशारीने ती CEO झाली. तिच्याच कंपनीत एक हँडसम मुलगा मॅनेजर होता. त्याच नावं ” राहुल “. तो इंजिनियर होता, खूप हुशार आणि टॅलेंटेड होता. घरची परिस्थिती नाजूक होती. त्याची खूप मोठी स्वप्न होती. त्याला एका मोठ्या कंपनीचा मालक व्हायचं होतं. तो न थकता काम करत होता.
इंदूला पण तो आवडायला लागला. दोघं मीटिंगला बरोबर असायचे, विचार जुळत होते. त्यांना एका मिटिंगला जायचं होतं दिल्लीला. दोन तीन दिवस लागणार होते. दोघेही गेले. त्या कपंनीने त्यांची राहण्याची सोय एका आलिशान हॉटेलमध्ये केली होती. ते तिथे पोहचले व फ्रेश होऊन मीटिंगला गेले, मिटिंग छान झाली. दुसऱ्या दिवशी डील फायनल झालं, त्या कंपनीने पार्टी ठेवली.
राहुल व इंदू पार्टीला गेले, तिथे खूप लोकं आले होते. त्यांना हे दोघं कपल आहे असं वाटतं होतं त्यातल्या काहींनी विचारलं देखील पण इंदू हसून शांत राहिली. राहुलला पण इंदू आवडत होती, पण परिस्थितीमुळे तो बोलत नव्हता.
मामा इंदुला भेटायला आले. इंदूबरोबर बोलतांना त्यांना राहुल दिसला. मामांना तो आवडला दोघांनाही विचारलं.. ते हो म्हणाले, पण राहुल म्हणाला “ माझी परिस्थिती नाजूक आहे, माझे स्वप्न खूप मोठे आहेत. ” तेंव्हा मामा म्हणाले “ तुम्ही दोघं हुशार होतकरू आहात, एकमेकांना ओळखता.. प्रेम आहे, पुढे अजून चांगलं होईल.”
मामा राहुलच्या आई वडिलांना भेटले व लग्न ठरवलं, राजेशाही थाटात लग्न पार पडलं…
कष्टाने त्यांनी स्वतःची कंपनी उभी केली, गुण्यागोविंदाने संसार करत होते. इकडे सगळं राहुलचे आई वडील सांभाळत होते.
वाईट परिस्थितीत संयम ठेवला व कष्ट करायची तयारी ठेवली म्हणून ते एका कंपनीचे मालक झाले. फक्त श्रीमंत मुलगा हवा म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या मुलींनी इंदूचा आदर्श घ्यावा. दोघांची साथ असेल तर जग जिंकता येत हेच खरं,,,
© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈