श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

संध्याकाळचे साडे सात वाजले असतील. रस्त्यावरचे दिवे मंदपणे जळत होते. रिक्षातून उतरून तो घरात पाऊल टाकतच होता, तेवढ्यात कुणीतरी ‘अविनाश’ अशी हाक मारल्याचं त्याने ऐकलं. मागे वळून पाहिलं. घराशेजारच्या वळचणीखाली दाढीचे खुंट वाढलेला एक खंगलेला वृद्ध गृहस्थ उभा होता. अविनाशने त्यांना ओळखलं नाही.

ते गृहस्थ दोन पावले पुढे येत क्षीण आवाजात म्हणाले, “तू मला ओळखलं नसणार. मी रामदास काका. तुझा मित्र दिनकरचा बाबा..” 

“काका, तुम्ही? माफ करा. खरंच मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. या आत या.” अविनाशने असे म्हटल्यावर ते हळूच आत येऊन खुर्चीवर बसले आणि संथपणे म्हणाले, “कसा ओळखशील?….. मला पाहून तीस वर्षे तरी लोटली असतील. अंगात पांढरा शुभ्र शर्ट, स्वच्छ पांढरे मर्सराईज्ड धोतर नेसलेला, डोक्यावर काळी टोपी आणि कपाळावर तिरूमानी रेखलेला काकाच तुझ्या स्मृतीपटलावर असणार. त्यात तुझी काहीच चूक नाही. 

मीच कर्मदरिद्री आहे. केशवसारख्या माझ्या सत्शील आणि नि:स्वार्थी मित्राला मी ओळखू शकलो नाही. माझा स्वत:विषयीचा फाजील आत्मविश्वास नडला. मी अहंकाराच्या नशेत इतका चूर झालो होतो की मला कुणाचीच तमा बाळगावीशी वाटली नाही. त्यामुळे माझं सगळंच नुकसान झालं. सारासार विवेकबुद्धीच नष्ट झाली होती म्हण हवं तर. राखी बांधण्यासाठी, भाऊबीजेला ओवाळण्यासाठी म्हणून येणाऱ्या माझ्या सख्ख्या बहिणींना यापुढे असले थोतांड घेऊन माझ्या घरी येऊ नका म्हणून त्यांना दूर लोटलं होतं.” 

“काका, आता ते सगळं विसरा. इकडे कसं येणं केलंत?”

“अविनाश, मी अजूनपर्यंत केशव आणि माझी झालेली अखेरची भेट विसरलेलो नाही. माझ्या डोळ्यांसमोर तो भेटीचा प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा तरळतो आहे. मध्यंतरी केशव गंभीर आजारी असल्याचे मला कळलं होतं. एकदा भेटून त्याची माफी मागावी असं मनात होतं पण दुर्दैवाने ते अखेरपर्यंत जमलं नाही. असो.”

तितक्यात आतून चहा आला. चहा घेतल्यानंतर काकांना बोलायला थोडंसं त्राण आलं. ते परत बोलायला लागले.   

“अविनाश, त्या दिवशी साधारण रात्रीचे नऊ वाजले असतील. त्यावेळी आजच्यासारखी फोन किंवा मोबाईलची सुविधा नव्हती. मला कामावरून यायला खूप उशीर होतो हे माहित असल्यानं, केशव मला त्यावेळी भेटायला आला होता. माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत तो मोठ्या उत्साहाने म्हणाला, ‘रामदासा, आज दुपारीच अविनाशला ‘क्लार्क कम टायपिस्ट’ म्हणून नेमणुकीचं पत्र मिळालं आहे. आधी तुलाच ही आनंदाची बातमी सांगायला आलोय. दिनकरनेही लेखी परीक्षेत आणि इंटरव्यूत नक्कीच बाजी मारली असती बघ.’ 

त्यावर मी कुत्सितपणे हसत म्हणालो, ‘केशव तुझं अभिनंदन करतो. परंतु मी काय सांगतो ते ऐक. तू आता माझ्या दिनकरबद्दल बोललास ना ते खरं आहे, तो ही स्पर्धा परीक्षा नक्कीच पास झाला असता. परंतु त्याचा जन्म  बॅंकेतला कारकून होण्यासाठी झाला नाहीये. माझा मुलगा दिनकर आणि सर्वच मुलं डॉक्टर, इंजिनियर वा चार्टर्ड अकाउंटट होण्यासाठी जन्माला आली आहेत. माझी मुलं हुशारच आहेत आणि मी देखील त्यांना शिकवायला समर्थ आहे हे लक्षात ठेव.’  

केशव मला मध्येच तोडत बोलला, ‘रामदासा, तुझा काही तरी गैरसमज होतोय. अरे मी दिनकरची हुशारी पाहूनच तो ह्या स्पर्धा परीक्षेत सहज पास होऊ शकला असता अशा अतिशय सदहेतूने बोललो, बाकी काही नाही.’ 

मी त्याला तुच्छपणे म्हणालो, ‘केशव, तुझ्या तुटपुंज्या पगारातून त्याला उच्च शिक्षण देणे शक्यच होणार नाही. त्यात तुला दारूचे व्यसन. तुझ्या हाताशी दोन पाचशे रूपये कमावणारा का होईना एक मुलगा हवाच. दुसरं असं की तुझ्या उरावर तिघा मुलींच्या लग्नाची जबाबदारी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. मला पांडवांच्यासारखे पाचही मुलेच आहेत. मला त्यांच्या लग्नाची चिंता नाही.’  माझा प्रत्येक शब्द केशवच्या काळजाला कापत गेला असणार आहे.           

आपल्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवत केशव एवढेच म्हणाला, ‘रामदासा, तुला एकच सांगतो की एवढा अहंकार बरा नव्हे. अहंकार आणि स्वाभिमान या दरम्यान एक अत्यंत अस्पष्ट सूक्ष्म अशी पुसट रेषा असते. तुझी मुलं खूप हुशार आहेत हे तू गर्वाने सांगतानाच, माझा मुलगा अविनाश किती सामान्य कुवतीचा आहे, हे तू सुचवायचा प्रयत्न केला आहेस. तुझ्या मुलांना शिकवायला तू समर्थ आहेस हे सांगताना, माझ्या असमर्थतेची जाणीव करून दिलीस. तुझं म्हणणं खरेही आहे कारण मला तुझ्याइतका पगार नाहीये. दुसरं असं की एक अहंकारी व्यक्तीच दुसऱ्याला कायम कमी लेखत असते. असो.’ 

‘हे तुला सगळं कबूल आहे ना? मग मी जे बोललो आहे त्यात काय चुकलं माझं?’ मी फटकळपणे बोलून गेलो.  

‘रामदास, एक लक्षात ठेव, तुझी मुले अगदी लहानशी गोष्ट देखील तुझ्या मदतीशिवाय करू शकत नाहीत. परंतु माझ्या अविनाशला मी प्रत्येक वेळी समर्थ आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज अविनाशने जी नोकरी मिळवलेली आहे ती त्याच्या स्वत:च्या हिंमतीवर मिळवली आहे. त्यात माझा वाटा शून्य आहे. वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून मला न विचारताच त्याने अर्ज केला. पुण्याला लेखी परीक्षेला येण्या-जाण्यासाठी लागणारे वीस रूपये रेल्वे भाडे त्याने एका मानलेल्या मामाकडून उसने मागून घेतले. लेखी परीक्षा देऊन पुण्याला मुलाखतीला जाताना देखील कुणाकडे तरी पैसे उसने घेऊन गेला. सिलेक्शनचे हे सगळं दिव्य पार पाडल्यानंतर, अविनाशला ओळखणाऱ्या दोघा प्रतिष्ठितांची नावे आणि सह्या हव्या होत्या. त्या सह्याही त्याने स्वत:च्या हिमतीवर मिळवल्या.’ 

‘माझ्याकडे पाठवलं असतंस तर मी सही केली असती, त्यात काय?’ मी गुर्मीतच म्हणालो.

‘अरे, त्याने मला विचारलं असतं तर तुझ्याकडे पाठवलं असतं ना? आज त्या एकोणीस वर्षाच्या पठ्ठ्याने सिव्हील सर्जनकडून फिटनेस सर्टिफिकेटही आणलं आहे. मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. माझ्या वयाच्या एकेचाळीसाव्या वर्षी मी माझ्या मुलाला स्वत:च्या पायावर उभा राहताना पाहतोय. भले तो आज क्लार्क कम टायपिस्ट का असेना, परंतु भावी आयुष्यात तो स्वत:च्या जिद्दीवर यशाचे शिखर गाठेल याची मला खात्री आहे. माझ्या मुलाच्या कर्तृत्वावर असलेला हा आत्मविश्वास आहे. हा माझा अहंकार नव्हे, कारण अहंकार कधीही घातकच ठरतो. असं म्हणतात की जिथे कुठे अहंकार उफाळून वर येतो तिथे शनी महाराज शीघ्रपणे पोहोचतात आणि त्या अहंकारी माणसाला तुडवूनच ते पुढे जातात. रामदास, एकदा कृष्ण सुदाम्याची मैत्री आठवून पाहा. अरे मैत्रीत अहंकाराची भावना तर सोड, तरतम भाव देखील नसतो. अर्थात अशा गोष्टींवर तुझा विश्वासच नाहीये तर तुला अशा गोष्टी सांगूनही काही उपयोग नाही म्हणा. येतो गड्या, स्वत:ला सांभाळ.!’

  – क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments