सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 5 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

विकासला ऑफिसमधल्या एका बाईचा कामासाठी फोन आला.

“सांभाळ ग बाई. तुझ्या नव-याला बायकांचे फोन येत असतात. त्यातून तू दिसायला ही अशी!”

यावर हसावं की रडावं, हेच मला कळेना.

“आता माझंच बघ ना. मी एवढी देखणी असूनही साहेब  बाहेरगावी जाताना कोणालातरी घेऊन  जातात. तिच्याविषयी जास्त चौकशी केली,  तर वस्सकन माझ्या अंगावर येतात.”

“नेहमी एकाच बाईला घेऊन जातात?”

“नाही. नेहमी वेगवेगळ्या बायका असतात. खूप बायका आहेत त्यांच्या ऑफिसात. कधी कधी पुरुषसुद्धा जातात बरोबर. आता अमेरिकेला गेलेत,  ते बरोबर एक बाई आणि दोन पुरुष आहेत, असं ऐकलं.”

“अगं,  कामाच्या संदर्भात जात असतील ना त्या बायका. त्यांचे वाईट संबंध असतील कशावरून?”

“…….”

“तसं मलाही जावं लागतं बरेचदा बाहेरगावी.”

“पुरुषाबरोबर?  आणि विकासला चालतं ते?”

“न चालायला काय झालं? ऑफिसमधल्या लोकांशी आमचे संबंध मैत्रीचेच असतात आणि बाई काय,  पुरुष काय,  कोणीतरी बरोबर आहे म्हटल्यावर विकास निर्धास्त असतो.”

“म्हणजे ह्यांचंपण असंच असेल का ग?”

“हो ग. तेही कामापुरताच संबंध ठेवत असतील त्यांच्याशी. उलट तूच काहीतरी बडबडून त्यांच्या मनात काहीबाही भरवून देऊ नकोस.”

मग ताई गंभीरपणे विचारात बुडून गेली.

तवा गरम आहे, तोवर पोळी भाजून घ्यायला हवी होती.

“एक सांगू तुला, ताई?  मी लहान आहे तुझ्यापेक्षा. पण जग जास्त बघितलंय मी. म्हणून तुला सांगावंसं वाटतं  आणि तसंही,माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही तुला या गोष्टी सांगणारं.”

ताई अजूनही गंभीर होती.  तिने मानेनेच ‘बोल’ म्हटलं.

“सौंदर्य, देखणेपणा या गोष्टी त्या त्या वयाच्या असतात. जन्मभर पुरत नाहीत त्या.  अर्थात तुला दिली तशी त्यांनी साथ दिली,  तर उत्तमच. पण  फक्त त्यावर अवलंबून राहू नकोस.  त्या शरीराच्या आत दडलेलं मन जास्त महत्त्वाचं असतं.  मला माझ्या लहानपणीची ताई आठवते. माझ्यावर माया करणारी, माझी काळजी घेणारी, मला सांभाळून घेणारी. तुझं लग्न झालं आणि माझी ती ताई हरवूनच गेली. तिला शोध. ती भावोजींना आणि सलील-समीपला जास्त आवडेल.”

“हो?”

“नक्कीच. आणि मग तुला आलेला हा एकटेपणा   जाणवणारी  ही असुरक्षितता संपून जाईल.

आपण लहान असताना भावोजींएवढे श्रीमंत नव्हतो. पण आपल्याला  आईबाबांनी कसलीच ददात भासू दिली नाही. अगदी लाडात वाढवलं आपल्याला. तशा तेव्हा आपल्या मागण्या, आपले हट्टही फारसे नसायचे म्हणा…….शिवाय आता तुला वाटते आहे, तशी असुरक्षितता कधीच जाणवली नाही आपल्याला. ”

ताई काहीच बोलली नाही.

“बघ. विचार कर यावर  आणि दुसरं म्हणजे, तसं होणार नाही. पण समजा,तुझ्यावर घर सोडायची पाळी आली,  तर स्वत:ला निराधार समजू नकोस. तुझं हे माहेर तुझ्यासाठी कायम उघडं असेल. मी -आणि हो,विकाससुद्धा-  तुला कधीच अंतर देणार नाही….. तू झोप आता. मी मागचं आवरून येते.”

रात्री झोपायला आले,  तेव्हा ताईचा चेहरा शांत,समाधानी वाटत होता. माझी चाहूल लागताच तिने डोळे उघडले.

“तुला गंमत सांगू?  त्या दिवशी आपण त्या कुठच्या मॉलमध्ये गेलो होतो. त्याच्याशेजारी त्या उंच बिल्डिंग होत्या बघ. फ्लॉरेंझा हाइट्स का काय त्या.  तो पत्ता सांगू या ड्रायव्हरला. त्याला वाटेल, तू तिथेच  राहतेस म्हणून  मला तिकडे नेऊन सोड तू. -असं मी तुला सांगणार होते. पण आता नाही सांगणार तसं. आता हाच पत्ता अभिमानाने सांगणार. तुझा खराखुरा पत्ता.  शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाचा.”

‘माझी ताई  हळूहळू डोकं वर काढतेय म्हणायची.’

“दुसरं म्हणजे, मी आणखी थोडे दिवस राहते इकडे. तू त्या इंग्रजीच्या शिकवणीचं बघ. ”

“अरे वा! ताssई! तू मनावर घेतलंस ना, तर लगेच शिकशील तू. आपण घरात इंग्लिशमध्येच बोलूया. तुला प्रॅक्टिस होईल चांगली आणि कॉन्फिडन्स येईल. म्हणजे युएस रिटर्न्ड साहेबांच्या स्वागताला फाडफाड इंग्लिश बोलणारी मड्डम.”

ताई  हसायला लागली.खदखदून. आणि मला माझं कौतुक करणारी, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी माझी ताई सापडली.

समाप्त

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments