डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मन मोहाचे घर — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आज प्राजक्ताचं लग्न.. दोन्ही घरात आनंद आणि उत्साह अगदी भरभरून ओसंडून वहातोय

प्राजक्ता तिच्या मनापासून आवडलेल्या मित्राशी, शशांकशी आज लग्न करतेय. किती खुशीत आहेत हे दोघेही.  खरं तर प्राजक्ता आणि शशांक  एकाच शाळेत  होते. दोघेही चांगले मित्र, एकाच गल्लीत बालपण गेलं त्यांचं. पण पुढे प्राजक्ताच्या वडिलांनी लांब फ्लॅट घेतला आणि मग तसा त्यांचा आता जुन्या घराशी संबंध राहिला नाही फारसा. शशांक  सी ए झाला आणि एका मोठ्या कंपनीत त्याला छान जॉबही मिळाला. त्या दिवशी तो मित्रांबरोबर हॉटेल ध्ये गेला होता. समोरच्या टेबलजवळ बसलेली मुलगी त्याच्याकडे एकटक बघत होती.मग  ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, “ तू  शशांक का रे? मी  प्राजक्ता. आठवतेय का ?सायकल शिकताना मला ढकलून दिलं  होतंस ते? ”  शशांक हसायला लागला. “ बाई ग,अजून तशीच आहेस का ग?भांडखोर?झिपरी?” दोघेही हसायला लागले. एकमेकांचे सेल नंबर घेतले आणि  प्राजक्ता मैत्रिणीबरोबर निघून गेली.  प्राजक्ता डेंटिस्ट झाली आणि तिने एका  मैत्रिणीबरोबर  क्लिनिक उघडले.. त्या दोघींना खूप छानच रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांचे क्लिनिक मस्तच चालायला लागले. दिवसभर प्राजक्ता अतिशय व्यस्त असायची आणि तिला बाकी काही करायला वेळच नसायचा. त्यादिवशी अचानकच शशांक तिच्या क्लिनिक वर आला.” हॅलो,प्राजक्ता, किती वेळ लागेल तुला फ्री व्हायला? “ .. 

“ तरी अर्धा तास लागेलच..बसतोस का तोपर्यंत? “ प्राजक्ताने विचारलं. ‘ ओह येस ! ‘ म्हणत शशांक तिथेच टेकला.आत प्राजक्ताची पार्टनर राही काम करत होती. किती सुरेख होती राही दिसायला..

ती  डेंटल चेअरवरून बाजूला झाल्यावर शशांकला दिसलं..राही एका पायाने  लंगडत चालतेय.खूप नाही पण तिच्या पायात दोष दिसत होता. काम संपवून प्राजक्ता बाहेर आली .” बोल रे.काय म्हणतोस?” 

“ काही नाही ग,म्हटलं वेळ असेल तर तुला डिनरला न्यावे.मस्त गप्पा मारुया ..मग मी पोचवीन तुला घरी.” ’प्राजक्ता हो म्हणाली आणि राहीला सांगून दोघेही बाहेर पडले.  त्या  दिवशीची डिनर डेट फार सुंदर झाली दोघांची. शशांक म्हणाला, “ तुला माझा  धाकटा भाऊ माहीत आहे ना? सलील? फक्त दीड वर्षानेच लहान आहे माझ्याहून.आम्ही दोघेही लागोपाठ शिकलो .मी सीए  झालो आणि सलील इंजिनीअर.  सलील यूएसए ला एम.एस.  करायला गेला तो गेलाच. खूप छान आहे तिकडे नोकरी त्याला.मी जाऊन आलोय ना तिकडे. मस्त घर घेतलंय आणि खूपच पैसे मिळवतोय तो. म्हणाला मला, तू येऊ शकतोस इथे. पण मलाच नाही तिकडे जाऊन सेटल व्हायची हौस.  माझं काय वाईट चाललंय इथं? मस्त नोकरी आहे, मोठे पॅकेज आहे. मला फारशी हौस नाही परदेशात जाऊन कायम सेटल व्हायची. “ 

यावर प्राजक्ता म्हणाली, “ हो तेही बरोबरच आहे आणि इथे छानच चाललंय की तुझं.” 

त्या दिवशी प्राजक्ताची आई  म्हणाली,”अग रोज भेटताय,हिंडताय मग आता  लग्न का करून टाकत नाही तुम्ही?ठरवा की काय ते. पण आता  उशीर नका करू बर का.” .. प्राजक्ताने शशांकला त्या दिवशी  भेटून आपली आई काय म्हणते ते सांगितले.शशांक म्हणाला, “ बरोबरच आहे की. सांग,कधी करायचं आपण लग्न?मी एका पायावर तयार आहे.”  

प्राजक्ताचे आईबाबा शशांकच्या घरी जाऊन भेटले आणि  लग्न ठरवूनच परतले. पुढच्याच महिन्यात थाटात साखरपुडा झाला आणि आज  शशांक- प्राजक्ताचं लग्न सुमुहूर्तावर लागत होतं . लग्नासाठी खास रजा घेऊन अमेरिकेहून सलील  मुद्दाम आला होता. सगळं घरदार अगदी आनंदात होतं. प्राजक्ताचं लग्न झालं आणि चार दिवसांनी शशांक आणि प्राजक्ता हनिमूनला आठ दिवस बँकॉकला जाऊन आले. सगळ्यांना तिकडून करून आणलेली खरेदी दाखवली, हसत खेळत जेवणं झाली आणि  दुसऱ्या दिवशी शशांकचे ऑफिस होते. प्राजक्ता म्हणाली, “ मलाही क्लिनिकवर जायला हवं. बिचारी राही एकटी किती काम करणार ना? मीही उद्यापासून जायला लागते दवाखान्यात.’’ 

त्यादिवशी घरात कोणीच नव्हते. शशांक ऑफिसला गेला आणि काकाकाकू मुंबईला  गेले होते. प्राजक्ता अंघोळ करून आली  आणि तिला कल्पनाही नसताना अचानक सलील तिच्या बेडरूममध्ये काहीतरी विचारायला म्हणून आला. प्राजक्ता त्याला बघून गोंधळूनच गेली.टॉवेल गुंडाळूनच ती बाथरूम बाहेर आली होती.सलील तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतच राहिला आणि त्याने तिला मिठी मारली. न कळत नको ते दोघांच्या हातून घडले. सलीलचा तो उत्कट स्पर्श, धसमुसळा राकट शृंगार प्राजक्ताला आवडून गेला. 

“सॉरी प्राजक्ता  मला माफ कर.पण मला फार आवडलीस तू.’” .. सलील तिथून निघून  गेला. त्या रात्री शशांकचा नर्म मृदु शृंगार तिला नकोसा झाला. हे अतिशय चुकीचे घडतेय हे समजत असूनही सलील आणि प्राजक्ता स्वतःला थांबवू शकले नाहीत..  सलील आणि प्राजक्ता बाहेर भेटायला लागले कोणाच्याही नकळत. लग्नाला अजून महिनाही झाला नव्हता.सलीलची यूएसए ला जायची तारीख जवळ आली.त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर सगळे जमले असताना प्राजक्ता म्हणाली ”मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही अत्यंत रागवाल हेही मला माहीत आहे. शशांक सॉरी. मी सलीलबरोबर अमेरिकेला जाणार आहे.मला इथे रहायचे नाही. मी तुला बिनशर्त घटस्फोट देईन. मला काही नको तुझ्याकडून. पण मी सलीलशी लग्न करणार तिकडे जाऊन. तुझा यात काहीही दोष नाही पण मला सलील योग्य जोडीदार वाटतो ”.सलील मान खाली  घालून हे ऐकत होता. हे ऐकल्यावर सगळ्या कुटुंबावर तर बॉम्बस्फोटच झाला.

” अग काय बोलतेस तू हे?अग तुझं शशांकशी लव्ह  मॅरेज झालंय ना? अर्थ समजतो ना त्याचा?आणि काय रे गधड्या सलील? वहिनी ना ही तुझी? कमाल झाली बाबा.आम्ही हताश झालो हे ऐकूनच. प्राजक्ता,अग नीट विचार कर.हे फक्त शरीराचे आकर्षण नाहीये, आणि ते खरेही नसते.नातिचरामि ही लग्नातली शपथ तुलाही बांधील नाही का?” सासूबाई कळवळून म्हणाल्या. सलील म्हणाला “सॉरी शशांक.पणआता आम्ही मागे फिरणार नाही. तुझ्याशी लग्न ही चूक झाली प्राजक्ताची. ती माझ्याबरोबरच येणार आणि आम्ही तिकडे लग्न करणार हे नक्की.” त्याच रात्री प्राजक्ताच्या आई वडिलांनाही बोलावून घेतले आणि हे सगळे सांगितले.  ते तर हादरूनच गेले हे ऐकून.” अग कार्टे,हे काय  चालवलं आहेस तू?काही जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा की.  या बिचाऱ्या शशांकचे काय चुकले ग? कमाल आहे खरंच. शशांक, आम्हीच तुझी माफी मागतो रे बाबा ! “  आईबाबा  तळतळ करत बोलत होते. “ हे जर केलंस ना प्राजक्ता तर तू मेलीसच आम्हाला म्हणून समज.” बाबा उद्वेगाने म्हणाले. सलील आणि प्राजक्ता गप्प बसून सगळे ऐकून घेत होते. काहीही न बोलता प्राजक्ताने घर सोडले आणि ती सलील बरोबर हॉटेलमध्ये  रहायला गेली. 

सासूसासरे थक्क झाले, ‘ हे इतके यांनी ठरवलं कधी आणि पुढे काय होणार? ‘त्यांनी सलीलशी बोलणेच टाकले. त्यानी विचारलेही नाही की तू कधी परत जाणार आहेस. शशांक सुन्न होऊन गेला होता. काय तोंड दाखवणार होता तो जगाला? महिन्यांपूर्वी लग्न झालेली आपली बायको,जी आधी प्रेयसीही होती,ती आपल्या सख्ख्या भावाबरोबर अमेरिकेला निघून गेली? शशांकची झोपच उडाली. या मुलीने व्हिसा कधी केला,तिचे जायचे कधी ठरले काही काही पत्ता नव्हता कोणालाही.  ठरल्या वेळी सलील प्राजक्ता निघून गेले अमेरिकेला .. 

शशांक तर उध्वस्त व्हायचा शिल्लक राहिला. जगाच्या डोळ्यातली कीव सहानुभूती आश्चर्य त्याला सहन होईना.पण त्याने स्वतःला सावरले. त्या दिवशी तो आई बाबांना म्हणाला,”आई बस झालं. ती निघून गेली हा तिचा निर्णय होता. आपण का झुरत आणि जगापासून तोंड लपवत बसायचं?आपण काय पाप केलंय? तुम्हीही आता आपलं नेहमीचं आयुष्य  जगायला लागा. मीही हे विसरून नवीन आयुष्य सुरू करीन, अगदी आजपासूनच. अग, यातूनही काहीतरी चांगलं घडेल आई! “ त्याचे समजूतदारपणाचे शब्द ऐकून गहिवरून आलं आईला. .. ” शशांक,बाळा,माणसाने इतकेही चांगले असू नये रे की आपलं हक्काचंही आपल्याला सोडून द्यावं  लागावं! मला अभिमान वाटतो रे तुझा .माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय !  बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”  

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments