सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ भूक ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
गाडी सुटली.चला, उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल सुमा नागपूरला! हूश्श! शुभानं मोठा सुस्कारा सोडला.एक मोठं काम पार पडल्यासारखं तिला वाटत होतं. … ती पोहोचल्यानंतर पुढं आई ,आत्यामध्ये तिच्या लग्नाबद्दल थोडीफार बोलणी होतील. किंवा तिच्या भविष्याबद्दलही! आत्या तिला गावी घेऊन जाईल कदाचित्. खरं तर तिला अचानक गावी परत पाठवावं लागलं ही गोष्ट शुभाला खटकत होती. काही झालं तरी सख्खी आते बहीण होती ती… पण नाईलाज होता. त्याच नाईलाजानं सोहमला सांभाळायला ब्युरोमधून एक आया नियुक्त करावी लागली होती. सुमा सोहमची मावशी होती, आया नव्हती. खूप प्रेमानं मायेनं तिनं सोहमला सांभाळलं होतं… पण…
शुभा घरी पोहोचली. आयानं सोहमला थोपटून झोपवलं होतं. ही पण आडवी झाली आणि डोळ्यापुढे आठवणींचा एक व्हिडिओच ऑन झाला. बाळंतपणासाठी शुभा माहेरी नागपूरला गेली होती. मुलगा झाला… दणक्यात बारसं झालं… आणि हळूहळू शुभाची रजा सुद्धा संपत आली. त्यामुळे परत आपल्या घरी जायचे वेध तिला लागले. पण बाळाला.. सोहमला.. सांभाळणार कोण? विश्वासू आया मिळायला तर पाहिजे. शुभाच्या मनातले विचार तिच्या आईनं आधीच ताडले होते… आणि एक तोडगा पण काढला होता. अजून पक्कं काहीच नव्हतं.पण त्यांनी बारशासाठी गावाकडून आलेल्या आपल्या नणंदेला आणि भाचीला थांबवून घेतलं होतं. दोघी मायलेकी संध्याकाळी देवाला अन् एका बाल मैत्रिणीला भेटायला गेल्या होत्या. त्यामुळे शुभाच्या आईला बोलणं सोपं झालं. “अगं एकेकाळी काय वैभवात राहिल्या होत्या शांतावन्सं!…ते लोक गावचे जमीनदार, मालगुजार का काहीतरी म्हणतात तिकडे!सगळे गाव त्यांच्या मालकीचे होते.पण हे हळूहळू उतरणीला लागलेले वैभव होते.पूर्वीच्या कित्येक पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं…
वारे माप पैसा उधळला…. व्यसनं केली…. अन् कर्जबाजारी झाले. आता नवऱ्याच्या पश्चात तुझी आत्या आणि सुमा रहाताहेत ना ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत. तसं त्यांच्या बोलण्याचा तोरा अजून कायम आहे. तू लहानपणापासून पाहिलेस कधी आपल्या शांताआत्याला माहेरी आलेलं? बघितलीस ना त्या सुमाची स्थिती. जवळजवळ वीस वर्षाची होत आलीय.धड शिक्षण नाही.कुठली कला अंगात नाही. एवढं तेवढं कुठं काम करावं तर जमीनदारीचा मोठेपणा आड येतो. नुसतं घरात बसून असते ती. मी वन्संकडं विषय काढला होता. नाही म्हणाल्या नाहीत.तयार होतील बहुतेक. थोडा पैशाकडून हात मोकळा सोड. काही कुणा परक्याकडं पैसे जाणार नाहीत.निम्मे पैसे त्यांना पाठव. निम्मे सुमाला दे. म्हणजे तिच्या अकाउंटवर वगैरे टाक. त्यामुळे ती पण जरा आनंदानं काम करेल.”
आणि खरंच हे सगळं मान्य झाल्यानं वर्षा-दीड वर्षांसाठी शुभा सुमाला आपल्या घरी घेऊन आली.
या अशक्त, हाडन् काडं शरीराच्या,खप्पड गालाच्या, रखरखीत झिपऱ्या झालेल्या केसांच्या, निस्तेज डोळ्यांच्या, गावंढळ, बावळट मुलीला हे काम जमेल का ?…ही शंका देवेन्द्रला वाटत होती. पण त्यानं शुभाच्या निर्णयाला विरोध केला नाही.
एक जोडी कळकट कपड्यानिशी आलेल्या तिला प्रथम शुभानं चांगले चार-पाच ड्रेस, टूथब्रश सहित सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू घेऊन दिल्या. तिची राहायची खोली ठीक करून दिली. सुमाच्या निस्तेज चेहऱ्यावर थोडे उपकृत झाल्याचे भावही शुभाला दिसले.
अजून महिनाभर रजा होती. तेवढ्या मुदतीत शुभानं सोहमला केव्हा केव्हा खायला काय करून द्यायचं ते शिकवलं….दिवसातून तीनदा कपडे बदलायचे… डायपर गॅप केव्हा, कसा द्यायचा. त्याला भरवताना स्वच्छ एप्रन आठवणीनं घालायचा, त्याची खेळणी दर दोन दिवसांनी धुवायची. या आणि अशा कितीतरी सूचना देत तिने सुमाला जरा घडवायला सुरुवात केली. इतर कामाला ‘मावशी’ होत्याच.
नंतर तिला सुमाला चांगलं राहायला शिकवलं. केसांना तेल पाणी लागलं, अंगावर चांगले कपडे आले. लहानपणा पासूनची खूप मोठी भूक भागल्याचं समाधान सुमाच्या चेहऱ्यावर आलं.
सोहमला सांभाळणं तिला छान जमू लागलं… अन् मग थोडं स्वयंपाक घरात वावरणंही तिला आवडू लागलं. फ्रिज, मिक्सर ,ज्यूसर, मायक्रो, वॉशिंग मशीन अशा सगळ्या आधुनिक वस्तूही ती चांगल्या हाताळू लागली. सकाळ संध्याकाळ सोहमला बाबा गाडीतून बागेत फिरायला घेऊन जाऊ लागली.पण तिच्यात थोडासा खेडवळपणाचा अंश होताच. तोंडानं विचित्र आवाज काढून ती सोहमला खेळवायची.”छीऽ हे असले आवाज नको बाई काढूस! इतकी खेळणी आहेत, वाजणारी,रंगीबेरंगी लाईट लागणारी… त्यांनी खेळव.” अशासारख्या शुभाच्या कितीतरी सूचनेनुसार सगळी कामं होऊ लागली आणि शुभा निश्चितपणे कामावर रुजू झाली.
सुमाला घेऊन दिलेल्या मोबाईलवर फोन करून ती मधून मधून तिच्या कामावर नजर पण ठेवू लागली. बघता बघता वर्ष उलटून गेले. सोहम केव्हाचा चालू पण लागला होता. त्याच्या मागे मागे पळणे, हे सुमाचे फार आवडीचे काम होते.फक्त हे कामच नाही तर सुमा आता युट्युब वरून रेसिपी पाहून नवीन नवीन पदार्थ पण करायला शिकली…. एकूणच काय ती घरातलीच एक होऊन गेली.
एकदा रविवारी शॅम्पू व कंडिशन्ड केलेले केस वाळवत ती उन्हात उभी होती.’ किती सुंदर आहेत हिचे केस!’ शुभाला जाणवलं. तिचं पहिलं रूप आठवलं. जणूआता तिने एकदम कातच टाकली होती. महिन्याला शुभा तिला काही पैसे हातखर्चाला देत असे. त्यामुळं पार्लरला जाणं, नवीन ड्रेस खरेदी करणं, शेजारच्या मैत्री झालेल्या मुलींबरोबर हॉटेलला जाणं, नव्या नव्या गोष्टी आत्मसात करणं,…..खरंच किती बदलली होती ती….हाडं न् काडं असलेल्या शरीराला गोलाई आली होती. खप्पड गाल चांगले गोबरे झाले होते. केस तर सुंदर होतेच, डोळ्यात आत्मविश्वासाची वेगळीच चमक आली होती. आणि तारुण्यात पदार्पण केलेल्या तिच्या चेहऱ्यावर तजेला पण आला होता.
शुभाला तिच्या प्रगतीचा फार अभिमान वाटू लागला होता. आठवी पास ती इतकं सफाईदार इंग्लिश बोलायला लागली होती की एक उच्च परिवारातील सुसंस्कृत मुलगीच वाटायला लागली होती.आत्याला ती सांगणार होती,’ सुमाला राहू दे काही वर्षं इथंच!… ब्युटीशियन,कुकिंग, ड्रेस डिझाईनिंग… किंवा असेच काहीसे कोर्स करेल ती इथं. पुढच्या आयुष्यात हे ज्ञान तिला खूप उपयोगी पडेल.’
…पण दिवसा दिवसा गणिक काहीतरी चुकीचं घडू पाहतंय अशी शंका शुभाच्या मनात येऊ लागली होती. आणि भलतीच शंका घेणे बरोबर नाही हे जाणत असलेल्या तिने बरेचदा ही गोष्ट तपासूनही पाहिली होती. जी मुलगी दाजी दिसल्यावर खाली मान घालून दुसऱ्या खोलीत निघून जायची, ती आता देवेंद्रच्या पुढे पुढे करतेय…. त्याला पाहताच तिची पूर्वीची बुजरी नजर आता जणू मोठ्या आत्मविश्वासनं त्याला आपल्यात गुंतवण्यासाठी आमंत्रित करतेय… हे चाणाक्ष शुभाच्या लक्षात येऊ लागले होते. हॉलमध्ये खेळणी पसरली आहेत..
सोहमला सुमा खेळवते आहे हे वर्षभरापासूनचे नेहमीचे दृश्य… पण काही वेळा ती त्या कामाबरोबरच व्हाटस् ॲप मधले विनोद, टीव्ही पाहत असलेल्या देवेंद्रला सांगत जोरजोरात नि:संकोचपणे, थोडीशी निर्लज्जपणे हसते आहे. त्याच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अशा तऱ्हेची दृश्यं पाहिल्यावर नुसती शंकाच नाही तर शुभाची खात्रीच पटली.
विचार करता करता तिच्या हे लक्षात आलं की, दीड वर्षांपूर्वीची गावातली सुमा आणि आत्ताची सुमा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. सुमाच्या इतर भुका शमल्या आहेत. सुग्रास अन्न खायची भूक… शहरातल्या मुलींसारखं फॅशनेबल राहायची भूक… गावात लाईट पण नव्हते त्यामुळे टीव्ही बघायची भूक… चांगली गाणी ऐकायची भूक… काहीतरी नवं शिकण्याची, करण्याची भूक…. उच्च वर्गाचं जीवनमान जगण्याची भूक…. इच्छा!सगळंच तिला मिळालं होतं. अशक्य गोष्टी शक्यप्राय झाल्या होत्या. खेड्यातल्या जमीनदारीचा माज म्हणजे केवढा मोठा देखावा, छल कपट होतं, हेही तिला जाणवलं होतं. एकूणच काय तर पोटाची भूक, मनाची भूक, बुद्धीची भूक अशा तिच्या सगळ्या भूका भागल्या जात आहेत, त्या बाबतीत ती शांत आणि निश्चिंत झाली आहे, पण आता तिच्यात नवी भूक…. शरीराची भूक … जोरात उसळी मारू लागली आहे. जणू एक मादी नराला आकर्षित करण्याचा खूप जोरात प्रयत्न करत आहे. शुभाला हेही जाणवलं की हे देवेंद्रवरचं प्रेम वगैरे नाहीय…. तिच्या तरुण शरीराला निसर्ग हे करायला भाग पाडतोय. जे सजीवांच्यात असतं ते…. नैसर्गिक आकर्षण… मादीचा नराला किंवा नराचा मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न! पण मानव प्राण्याला देवानं बुद्धी दिलीय. सत्सत् विवेक बुद्धी! काय नैतिक आहे काय अनैतिक आहे जाण्याची बुद्धी !…आणि सुमाचं हे आत्ताचं वागणं दुर्दैवाने नीतिमत्तेला धरून नाहीय.आपण आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे ही मानसिकता सुमामध्ये नाहीय. तिची बुद्धी काम करत नाहीय.
त्यामुळे तिच्या या भूकेला इथंच आडवणं भाग होतं. आईबरोबर शुभानं चर्चा केली….. आणि सुमाचं भवितव्य…. शिक्षण घेणं का लग्न करणं हे सर्व तिने आईवर आणि आत्यावर सोडलं.
पती-पत्नीमध्ये एक भूकेलं, तन- मन ‘और वो’ म्हणून प्रवेश करू इच्छित होतं. त्यामुळे तिला कशासाठी गावी पाठवत आहोत हे कळू न देता वेगळ्या तऱ्हेने तिला समजावून गावी परत पाठवणं भाग होतं आणि शुभानं तेच केलं होतं.
सोहमच्या रडण्याच्या आवाजानं आठवणींचा व्हिडिओ ऑफ झाला. ती भानावर आली. नव्या आयाची ओळख नसल्याने तो रडत होता. त्याला शांत करण्यासाठी आणि या नवीन आयाला कसं व्यवस्थित मॅनेज करायचं याचा विचार करत करत शुभा सोहमला कडेवर घेवू लागली.
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈