श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ स्वप्न ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
साडेदहा वाजता पूजा दुकानात आली, तेव्हा बाळुने नुकतेच दुकान उघडले होते. बाळु दुकानाची साफसफाई करत होता. दोन तीन वर्षांत दुकानाने चांगलाच जम बसवला होता. पूजा मागच्याच वर्षी दुकानात कामाला लागली होती. सेल्सवुमन म्हणून. दुकान तसे छोटेसेच. शहराच्या नव्या उपनगरात. पूजा आणि अमित त्या कॉलनीतच रहात होते. संसाराची नुकतीच सुरुवात झाली होती. अमित,पूजा आणि पाच वर्षाची इशु.अमीतच्या पगारात जरा ओढाताणच होत होती, म्हणुन पूजाने नोकरी करायचे ठरवले. योगायोगाने कॉलनीमधल्याच या सराफी दुकानात पूजाला जॉब मिळाला.
सकाळचा गजर झाला. गजर बंद करून थोड्या वेळासाठी पुजा पुन्हा झोपली, तर झोपच लागून गेली. जाग आली तेव्हा साडेसात वाजले होते. घाईघाईत उठली. सगळ्यात आधी अमीतला आणि तिला चहा ठेवला आणि मग इशुला उठवायला गेली.
“इशु उठ..आधीच उशीर झालाय”
“अं….हो उठतेच”
“उठते नाही.. उठच”
खसकन तिचे पांघरूण ओढत पुजा म्हणाली. कुरकुर करत,डोळे चोळत इशु उठली आणि ब्रश करायला गेली. अमित उठलाच होता. दोघांनी चहा घेतला. नुकताच आलेला ‘लोकसत्ता’ घेऊन अमीत गैलरीत बसला. पूजाने टिफिनची तयारी सुरू केली.
काल रात्री येतानाच पुजाने भेंडी, फ्लॉवर आणला होता. सोलुन ठेवलेला मटार फ्रिजमध्ये असायचाच.इशुसाठीही भेंडी चिरायला घेतली. अमीतसाठी मटार फ्लॉवरची भाजी करायला घेतली. ते झाल्यावर पोळ्यांसाठी कणीक भिजवली.
साडेनऊ वाजता अमितचा टिफिन भरुन ठेवला आणि जरा निवांत झाली. तिला जरा उशिरा निघाले, तरी चालण्यासारखे होते.
“मम्मी, दिवाळीची सुट्टी कधी गं लागणार?”
“आहे अजुन दहा बारा दिवस.”कैलेंडरकडे नजर टाकत पुजा म्हताली.
तिला मागची दिवाळी आठवली.नोकरी लागल्यानंतरची पहिलीच दिवाळी. नको वाटली तिला दिवाळीची ती आठवण. सर्व जग दिवाळीचा सण साजरा करीत असते. आणि आपण..?
दिवसभर उभे राहुन पायात गोळे येतात. रात्री घरी जाण्याची वेळ निश्चित नाही. कसला आलाय सण?रात्री घरी येते तर इशु झोपुनच गेलेली असे. आपल्यासाठी दिवाळीची सुट्टी नाही की काही नाही.
साडेदहा वाजता इशुच्या शाळेची व्हॅन आली. तिला पोहोचवुन,कुलुप लावुन ती बाहेर पडली.किल्ल्या तळमजल्यावरील जोशी काकूंकडे दिल्या. दुकान पायी अंतरावरच होते. त्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ वाचायचा.
दुकान उघडून बाळुची साफसफाई चालू होती. जयंतशेठ बाहेरील बाकावर बसुन पेपर चाळत होते पुजा आत गेली. दुकानाच्या मागच्या खोलीतून तिने तिजोरीतुन दागिन्यांचे ट्रे काढले. त्याची चळत पुढे येऊन काउंटरवर ठेवली. तिजोरी पुन्हा लॉक करुन किल्ल्या शेठकडे दिल्या. स्टॉकबुक घेऊन सर्व आयटेम्स चेक केले, आणि सर्व माल शोकेसमध्ये लावला.
काऊंटरवर मागच्या बाजूला लक्ष्मी, गणपती, स्वामी समर्थांच्या तसबिरी होत्या त्याच्या बाजुलाच शेठजींच्या वडिलांचा मोठा फोटो. फुलाची पुडी सोडुन सर्व फोटोंना माळा घातल्या. उदबत्ती, निरांजन लावली आणि गिऱ्हाईकांकडे वळली.
एका मागून एक गिऱ्हाईक येत होते. आणि तेच पुजाला पण सोयीचे वाटत होते. एकदम दोन तीन गिर्हाईके आली की तिची तारांबळ उडे.शेठ तर फक्त गल्ल्याजवळ बसुन रहात. मोडीचे व्हैल्युएशन करणे .कोणाला काय मजुरीत सुट देणे एवढेच त्यांचे काम. बाकी सर्व पुजावरच.ती पण आता सरावाने तयार झाली होती.
दुपारी तासभर जेवणाची सुट्टी. तिला जरा मोकळा वेळ मिळे.घरी जाऊन जेवण करुन जरा वेळ अंथरुणाला पाठ टेकुन झोप घेई,की पुन्हा चार वाजता दुकानात.
संध्याकाळी मोबाईल वाजला. अमितचा फोन होता.
“हैलो पूजा.. कामात आहेस का?”
“हं..बोल तु”
“अगं माझा मित्र,तो सतीश नाही का? त्याला चेन घ्यायची आहे. तो संध्याकाळी येईल.तुमच्या दुकानात.”
“हं..बरं..बोल पटकन”
दुकानात गिर्हाईकांची गर्दी. एकिकडे मान तिरपी करुन पुजाने मोबाईल अडकवला होता.
“काही नाही गं..थोडी मजुरीत सुट वगैरे देता आली तर बघ.तसे त्याल मी सांगितले आहे म्हणून”
“ओके.. ठेवते मी फोन”
संध्याकाळी सतीश आणि त्याची बायको दुकानात आली. चांगली दोन तोळ्यांची चेन घेतली त्यांनी. सतीशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बायकोने त्याल घेऊन दिली. दोघे खुश होऊन निघुन गेले.
रात्री घरी येताना पुजाच्या डोक्यात विचार चालु.आपणही अमीतसाठी एक चेन घ्यावी का?नाही दोन तोळ्यांची.. एक तोळ्याची तर घेऊ शकतो.मनाशीच आकडेमोड करीत ती घरी आली.
रात्री जेवण झाल्यावर तिने अमीतजवळ विषय काढला. एकदा वाटले.. सरप्राईजच द्यावे. पण तिच्याच्याने राहवेना.
“अमीत.. तुझ्या पुढच्या वाढदिवसाला मी तुला सोन्याची चेन देणार आहे. चांगली एक तोळ्याची.”
“अरे वा..पगारवाढ झालेली दिसते आहे”
“नाही रे..तो कसला पगार वाढवतोय.पण एवढी सराफी पेढीवर मी काम करतेय.आपल्यासाठी आपण काहीच सोने घेत नाही”
“मग तुझ्यासाठी बनव ना काहीतरी”
“नको.. माझ्या गळ्यात आहे मंगळसुत्र. साध्या दोर्यामध्ये गाठवलेले का होईना. नंतर पुढे मागे करीन मी गंठण.इशुला पण चेन आहे बारश्याची.तुलाच काही नाही”
“मला काय गं..मी चेन घालायला तयारच आहे, पण मला वाटते की तुझ्यासाठी काहीतरी बनव.दिवसभर एवढी सोन्याचांदीच्या दुकानात उभी असते. त्याचा तुला नाही होत मोह कधी?”
पुजाच्या डोळ्यात पाणी तरळले. बायका येतात.. सुंदर सुंदर दागिने घेतात. आरशासमोर उभे राहून दागिने घालुन बघतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंद तिला आठवला. मनाशी तुलना होई.आपल्या नशीबात कधी येणार कुणास ठाऊक?दिवसभर मौल्यवान दागिने हाताळायचे..पण आपण मात्र लंकेची पार्वतीच.कसली खंत आणि कसला खेद?आणि हा म्हणतोय..तुला मोह होत नाही का?
“जाऊ दे..मी ठरवलं आहे. आणि मी ठरवले ते मी करणारच.”
म्हणता म्हणता वर्ष गेलं.दुकानातच सोन्याची भिशी होती. ती पुजाने लावली. वर्षभरानंतर भिशीचे पैसे आणि काही वरती थोडे असे मिळुन पुजाने एक सुंदर चेन घेतली.
आजच तिच्या अमीतचा वाढदिवस होता. लाल मखमलीच्या डबीत चेन घेऊन ती निघाली.शेठना सांगुन आज ती जरा लवकरच निघाली.येताना चौकातल्या केक शॉपमधुन तिने केक घेतला. इशु आणि अमीत तिची वाटच पहात होते. फ्रेश होऊन.. कपडे बदलुन ती हॉलमध्ये आली. केक टिपॉयवर ठेवला.त्याच्या बाजुला चेनची डबी.त्यातुन चेन काढुन तिने अमीतच्या गळ्यात अडकवली.फासा पक्का केला.
” हैप्पी बर्थडे.. अमीत”..पुजा म्हणाली.
लगेच इशु म्हणाली..
“हैप्पी बर्थडे.. पप्पा”
पुजाच्या डोळ्यात पाणी आले. आज तिने पाहीलेले एक छोटेसेच स्वप्न पूर्ण झाले होते. तिच्याकडे पाहुन अमीतही गहिवरला. छोटी इशु मात्र आळीपाळीने दोघांकडे पाहात होती.
तिला कळत नव्हते.. आज पप्पांचा वाढदिवस आहे.. तर मम्मी, पप्पा का रडताहेत?
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈