श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ दोन लघुकथा — रमा / मेसेज ☆ श्री मंगेश मधुकर ☆
(१) रमा
तीन महिन्यांपूर्वी दोघांची लग्न जमवणाऱ्या साइटवर ओळख झाली.प्रोफाइल आवडल्यानं तिनं पुढाकार घेतला.व्हरच्युल भेटी,मेसेजेस सुरू झाले.गप्पा मारताना इंटरेस्ट निर्माण झाला.हळूहळू एकमेकात गुंतत होते आणि प्रत्यक्ष भेटल्यावर प्रेमात पडले.त्यानंतर नियमित भेटीगाठीचं नवीन रुटीन सुरू झालं.दोघं नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटले.
“एक दिवस भेटलो नाही तर करमत नाही.आता एकटं रहावत नाही.”
“पुढ बोलू नकोस.सेम हिअर”ती लाजली.
“क्या बात है.लाजताना खूप सुंदर दिसतेस.”हनवटीवर हात ठेवून एकटक पाहत तो म्हणाला.
“असं का पाहतोयेस”
“जगातला सर्वात सुंदर लाजणारा चेहरा”
“बास,मुद्दयाचं बोल.”ती लाडीकपणे म्हणाली.
“थोडावेळ थांबायचं ना.मस्त स्वप्नांच्या दुनियेत होतो.धाडकन जमिनीवर आणलसं”
“बोल ना.पुढे काय”
“माझ्याशी लग्न करशील”गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला तेव्हा ती पुन्हा लाजली.
“जमाना कितीही मॉडर्न होऊ दे.‘लाजणं’ अजूनही वेड लावतचं.”
“आज आई-बाबांना आपल्या लग्नाविषयी सांगते.”
“मी पण डॅडींशी बोलतो.तसंही आपले फोन सारखे चालू असतात यावरून सगळ्यांना कल्पना आलीय.”
“आमच्याकडेही तीच परिस्थिती आहे.जावई पसंत आहे.”
“तुझा फोटो दाखवला तेव्हाच ममीनं सूनबाईना पसंत केली.”
—
पुन्हा भेटल्यावर तो म्हणाला “रविवारी पुढची बोलणी करायला घरी येतो.चालेल ना.”
“पळेल.”
“अजून एक महत्वाचं”
“रमा की रीमा”
“म्हणजे.समजलं नाही”ती गोंधळली.
“तुला कोणतं नाव आवडतं”
“अर्थात माझंच”
“तसं नाही गं.रमा की रीमा”
“रमा,मस्तयं”
“ठरलं मग,‘रमा’ हेच लग्नानंतर तुझं नाव.” तो उत्साहानं म्हणाला पण तिचा चेहरा पडला.
“म्हणजे माझं नाव बदलणार” तिनं नाराजीनं विचारलं.”
“हो.”
“का”
“सगळेच असं करतात.”
“माझंच का तुझं नाव बदल की..”
“जोक करतेस”तो मोठमोठ्यानं हसायला लागला.
“सुरवात तू केलीस”
“लग्नानंतर मुलींची नाव बदलतात.तशी पद्धत आहे.”
“ऐक ना.एकतर अशी पद्धत बिद्धत काहीही नाहीये आणि जरी असलीच तरी माझं नाव बदलायचं नाही”
“असं कसं!!,उगीच नको तो हट्ट करू नकोस.”
“माझं नाव मला खूप आवडतं.काहीही झालं तरी ते बदलू देणार नाही”
“हे बघ.फालतू विषय ताणू नकोस.”
“जन्मापासून सोबत असलेलं नाव बदलणं ही गोष्ट तुझ्यासाठी फालतू असेल पण माझ्यासाठी नाही.नाव बदलणं म्हणजे आतापर्यंतची ओळख पुसून टाकणं.यामागची वेदना तुला समजणार नाही आणि तसंही माझ्या परवानगी शिवाय हा निर्णय तू घेऊ शकत नाहीस.”तिच्या बोलण्यानं तो चिडला.
“‘रमा’ हे नाव फायनल.आता यावर चर्चा नाही”
“मी नाव बदलणार नाही.”
“विनाकारण इश्यू करतीयेस.लग्नानंतर मुलींचं नाव बदलणं हे फार कॉमनयं.”
“नाव न बदलणाऱ्यासुद्धा खूप जणी आहेत आणि हा निर्णय पूर्णपणे मुलीच्या इच्छेवर आहे. त्यासाठी जबरदस्ती नको.तसंही माझं नाव बदललं नाही तर काही फरक पडणार नाही.”
“लोक काय म्हणतील”
“लोकांपेक्षा तू माझ्या मनाचा विचार करावा असं वाटतं.”
“विनाकारण वाद नको.”
“एकमेकांचे स्वभाव,विचार आवडले म्हणून लग्नाचा निर्णय घेतला तर आता तू………”
“वा रे वा.म्हणजे माझीच चूक.अजूनही सांगतो,विषय ताणू नकोस.आमच्या घराण्यात असलं काही चालणार नाही.”
“सोयीस्कर भूमिका घेताना त्याला प्रथा,परंपराचं नाव द्यायचं अन आमच्या घराण्यात वगैरेच्या फुशारक्या मारायच्या ही टिपिकल मेंटॅलीटीयं.”
“माझ्या बायकोचं नाव ‘रमा’ असेल हे फायनल..”
“मी पण पुन्हा सांगते काहीही झालं तरी नाव बदलणार नाही.मान्य असेल तरच रविवारी या.नाहीतर.. ”
“काय!!!”तो जोरात ओरडला.
“ओरडू नकोस.शांतपणे विचार कर मग पुढचा निर्णय घेऊ”डोळे पुसत ती म्हणाली.पुढचे काही दिवस अजिबात संपर्क नसल्याने त्यामुळे दोघंही प्रचंड अस्वस्थ होते.घरी कळल्यावर वडीलधाऱ्यांनी दोघांना समजावलं आणि मान्य होईल असा तोडगा काढला.मनातली काजळी दूर झाली.मनापासून प्रेम असल्यानं दोघांनीही आपापला हट्ट सोडला अन तीन महिन्यांपूर्वी ‘लग्न’ थाटामाटात पार पडलं.प्रेमाच्या सारीपटात आपल्या माणसासाठी केलेली तडजोड प्रेमाची लज्जत वाढवते.ती जिंकली पण तो सुद्धा हरला नाही. तिनं नाव बदललं नाही पण तो मात्र बायकोला ‘रमा” म्हणतो अन तिलाही ते आवडतं.
लेखक : मंगेश मधुकर
==========================================================
(२) मेसेज
रोजच्याप्रमाणे नाश्ता करत असताना रेणू केक घेऊन आली.ते पाहून बाळूनं विचारलं
“हे काय गं”
“बाबा, रिक्षा ड्रायव्हिंगला आज पंचवीस वर्षे झाली म्हणून सेलिब्रेशन..”
“कशाला उगीच खर्च..”
“पोरीची हौस आहे तर करू द्यात की…..”बायको.
“पै न पै महत्वाचीय.अजून लेकीचं लग्न करायचयं.”केक कापत असतानाच राईड बुकिंगचा मेसेज आला.जवळचं पिकअप असल्यानं बुकिंग कन्फर्म करून बाळू रिक्षा घेऊन निघाला.पहिल्या कस्टमरला सोडल्यानंतर लगेचच बुकिंग मिळत गेली.बाळू सलग ड्रायव्हिंग करत होता नंतर लांबचं भाडं नसल्यानं थांबावं लागलं.जवळच्या ठिकाणची होती म्हणून तीन बुकिंग बाळूनं नाकारली.अखेर मनासारखं लांबच्या ठिकाणचं बुकिंग आलं.कन्फर्म केल्यावर लगेच कस्टमरचा फोन “दादा,कुठं आहात.रिक्षा बुकिंग केलंय.येताय ना”
“पाच मिनिटांत पोचतो.ट्राफिकमध्ये आहे.”बाळू.
“लवकर या ”कस्टमरनं फोन कट केला.पोचल्यावर बाळूनं फोन केला “सर,बिल्डिंगच्या गेटसमोर उभायं”
“ओके,आम्ही खाली येतोय परंतु पाच मिनिटं थांबावं लागेल.मिसेस तयारी करतीये.झालं की येतो”
बाळू वाट पाहत थांबला.दहा मिनिटांनी पुन्हा कस्टमरचा फोन “सो,सॉरी!!आमच्यामुळे तुम्हांला थांबांव लागतेय”
“जरा लवकर.”
“असं करा.बुकिंगप्रमाणे एकशे ऐंशी होतात.मी तुम्हांला दोनशे ऑनलाइन ट्रान्सफर करतो”
“त्याची गरज नाही.तुम्ही या” बाळू.
“दादा,आमच्यामुळे तुमचा बराच वेळ वाया गेला.मिसेसची आवराआवर अजून किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. म्हणून मी दोनशे रुपये पाठवलेत ते जमा झाले का तेव्हढं चेक करा.”बाळूच्या मोबाईलवर दोन हजार जमा झाल्याचा मेसेज आला होता. एवढे पैशे कशाचे? असा विचार डोक्यात असताना पुन्हा कस्टमरचा फोन आला.
“साहेब आलात का?कुठे आहात”बाळूनं विचारलं.
“अजून थोडा वेळ लागेल”
“तुम्ही भाड्याचे पैसे आधीच दिलेत तेव्हा नाईलाजये.या!!”
“दादा,एक घोळ झालाय..”
“आता काय झालं??”बाळू वैतागला.
“मी चुकून तुम्हांला दोन हजार पाठवलेत.”
“चुकून म्हणजे”
“अहो,दोनशेच्याऐवजी दोन हजार ट्रान्सफर झालेत.”
“मग”
“आम्ही येईपर्यंत मी पाठवलेले जास्तीचे पैसे परत पाठवा.प्लीज..”
“हंssम,बघतो.”
“पैसे जमा झाल्याचा मेसेज बघून खात्री करा मगच ट्रान्सफर करा”
“हा,मेसेज आलाय”
“गुड,आधी आठशे पाठवा ते मिळाले की पुढचे हजार पाठवा आणि पुन्हा एकदा सॉरी.खूप त्रास देतोय”
“जाऊ द्या.नुसतं सॉरी म्हणू नका.लवकर या.पैसे पाठवतो”कस्टमरनं सांगीतल्याप्रमाणे बाळूनं आधी आठशे मग एक हजार ट्रान्सफर केले.पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगण्यासाठी कस्टमरला बाळूनं फोन केला तर लागला नाही.पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण फोन बंदच येत होता.चालू असलेला फोन अचानक बंद झाल्यानं बाळूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.बँकेत फोन केला तेव्हा समजलं की खात्यात जमा काहीच नाही मात्र अठराशे रुपये वजा झाले होते.गोड गोड बोलून कस्टमरनं केलेली फसवणूक लक्षात आल्यावर संतापलेला बाळू बिल्डिंगच्या आत गेला पण शोधणार कोणाला??फक्त कस्टमरचा मोबाईल नंबर होता आणि तोही बंद.थोडावेळ बिल्डिंगच्या इथं घुटमळून निराश,हताश आणि चिडलेला बाळू कष्टाचे पैसे गेल्यानं प्रचंड अस्वस्थ होता.डबल खात्री करण्यासाठी बँकेत गेला.मेसेज दाखवला पण बँकवाल्यांनी कानावर हात ठेवले.घडलेला प्रकार कळल्यावर बायकोनं कस्टमरला शिव्यांची लाखोली वाहिली आणि बाळूलाही अतिशहाणपणाबद्दल सुनावलं.
संध्याकाळी कामावरून आल्यावर वडलांना घरात पाहून रेणूला आश्चर्य वाटलं.“बाबा.आत्ता यावेळेला चक्क घरी!!”बाळू काहीच बोलला नाही पण पडलेल्या चेहऱ्यावरून काहीतरी घडल्याचं रेणूच्या लक्षात आलं.सगळी हकीकत समजल्यावर ती म्हणाली
“जे झालं ते झालं.सोडून द्या.जास्त विचार करू नका”
“पैशा परी पैशे गेले वर फालतूचा डोक्याला त्रास..”
“आपण पोलिसांकडे जाऊ”
“तक्रार कोणाविरुद्ध द्यायची”
“सायबर सेलची मदत घेऊ”
“नको.उगीच नसती लफडी नकोत.अठराशे रुपये अक्कलखाती जमा करून गप्प बसू”
“ हा फसवण्याचा नवीन प्रकार आहे. तक्रार करायलाच पाहिजे.मोबाईल नंबर आणि ज्या अकाऊंटला पैसे गेले असतील तिथून काहीतरी मिळेल.पोलिस मदत करतील.”
“एक कळत नाहीये.भामट्यानं पैसे पाठवले नाहीत मग दोन हजार जमा झाल्याचा मेसेज कसा काय आला”
“एकदम सोप्पंयं”
“आ!!काय बोलातियेस” बाळूला रेणूकडून असं उत्तर अपेक्षित नव्हतं.
“मेसेज आल्यावर तुम्ही काय पाहिलं ”
“दोन हजार जमा झाले एवढंच”
“सर्रासपणे लोक किती पैसे जमा झाले एवढचं बघतात.कधी आले,कोणत्या खात्यावर जमा झाले हे तपासत नाही”
“आता मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला म्हणजे माझ्याच खात्यावर पैसे आले ना”बाळू.
“तिथंच तर भामट्यानं चलाखी केली”
“त्याच्याकडचा दोन हजार जमा झाल्याचा जुना मेसेज पाठवला अन तुम्हाला वाटलं की…..,”
“असं फसवलं होय.माझ्या मूर्खपणामुळे नुकसान झालं”
“बहुतेकजण असंच वागतात.मेसेज आल्यावर बँकेत किती क्रेडिट आणि डेबिट झाले एवढंच बघितलं जाते.अकाऊंट नंबर पाहीला जात नाही.सवयीचा परिणाम!!.”
“आता काय करायचं”
“आधी तक्रार करू आणि इथून पुढे पैशाचे व्यवहार काळजी घ्यायची.एवढी एकच गोष्ट आपण करू शकतो.”
“फुकटचा अठराशेला बांबू….”
“जाऊ दया.त्यावर आता जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका” बराच वेळ बायको आणि लेकीनं समजावल्यावर बाळूची उलघाल कमी झाली तरी शेवटचा ट्राय म्हणून त्यानं पुन्हा एकदा त्या कस्टमरला फोन केला पण नंबर स्वीच ऑफ होता. तितक्यात मोबाईलवर नवीन मेसेज आला “अभिनंदन!!तुम्हाला पन्नास हजाराची लॉटरी लागली आहे.पैसे पाठविण्यासाठी सोबत दिलेली लिंक ओपन करून माहिती द्या”मेसेज वाचून बाळूनं कपाळावर हात मारला
— (सत्यकथेवर आधारित)
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈