डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
काल पूजा लग्न होऊन सासरी गेली. घर किती रिकामे रिकामे झाले मोहिनी बाईंचे.. त्यांना त्या उदास घरात बसवेनाच. बंगल्याच्या अंगणात सहज आल्या आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या क्षणभर. शेजारच्या बंगल्यातल्या पद्माची हाक आली, “ मोहिनी,ये ना ग जरा.मस्त चहा पिऊया दोघी.” मोहिनी बाई म्हणाल्या “अग तूच ये पद्मा. मी चहा केलाच आहे तो घेऊन येते .ये गप्पा मारायला.”
मोहिनीने चहाचा ट्रे आणला. पद्मा तिची अगदी सख्खी शेजारीण. लग्न होऊन दोघी जवळपास एकदमच सासरी आल्या आणि चांगल्या मैत्रिणी झाल्या. दोघीही एकमेकींच्या मदतीला तत्पर असत,एकमेकींची सुखदुःख शेअर करत. पद्माची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. दुर्दैवाने पद्माचा नवरा फार लवकर कॅन्सरने गेला आणि पद्मा फार एकटी पडली. पण त्यावेळी मोहिनी आणि तिच्या नवऱ्याने – उमेशने तिला खूप आधार दिला. मुलं अमेरिकेहून महिनाभर आली,आईला तिकडे घेऊन गेली.चार महिन्यांनी पद्मा इकडे परत आली. म्हणाली, “ मी इथेच रहायचा निर्णय घेतलाय मोहिनी. थोडे दिवस तिकडे ठीक आहे ग, पण माझं सगळं विश्व इथे भारतातच नाही का? मी मुलांना तसं समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटलं देखील.आता पुढचं पुढे बघू.” मोहिनीने तिला दुजोरा दिला आणि पद्मा बंगल्यात एकटी रहायला लागली. .
आत्ताही पद्मा मोहिनीला म्हणाली “ खूप सुंदर केलंस ग लग्न पूजाचं. सुटलीस ग बाई. प्रसाद सुद्धा आलाय सिंगापूरहून ते उत्तम झालं.कुठे गेलाय ग? “
“अग कालच मुंबईला गेले सूनबाई आणि तो तिच्या माहेरी. आता मी आणि हे दोघेच आहोत हा आठवडाभर.”. पद्मा म्हणाली “ मोहोनी,प्रसादच्या लग्नाला नाही तुला काही त्रास झाला, पण पूजाच्या लग्नाला केवढा विरोध ग उमेशचा? मला सांग,एवढी शिकलेली मुलगी,आपल्याला आवडेल,योग्य वाटेल तोच जोडीदार निवडणार ना? नाहीतरी उमेश अतीच करतात. जणू काही पूजावर मालकी हक्कच आहे यांचा. तीही वेडी बाबा बाबा करत किती ऐकायची ग त्यांचं.”
“ मोहिनी, इतकी आदर्श आई असूनही ही मुलगी लहानपणी तुला नव्हती कधी attached. पण मग काय जादू झाली तेव्हा की आई आणि दादाचे महत्व समजले. मलाच काळजी वाटायला लागली होती.पण बाई, झालं सगळं नीट. देवाला असते काळजी./’ पद्मा म्हणाली.
मोहिनी म्हणाली “ हो ना ग “ .. .पण खरी गोष्ट फक्त आणि फक्त मोहिनीलाच माहीत होती. मोहिनीचं मन झोपाळ्याच्या झोक्याबरोबरच मागं गेलं.मोहिनीला लग्नानंतर वर्षभरात प्रसाद झाला.अगदी शहाणं बाळ होतं ते. कधी हट्ट नाही कधी खोड्या नाहीत. आईवडिलांचे लाड करून घेत प्रसाद मोठा होत होता. तो सहा वर्षाचा झाल्यावर ध्यानीमनी नसताना मोहिनीला दिवस गेले. हे गर्भारपण आणि बाळंतपण जडच गेलं तिला. मोहिनीला सुंदर मुलगी झाली तीच ही पूजा. तिची आई येऊन राहिली दोन महिने म्हणून मोहिनीला खूप विश्रांती मिळाली. उमेशचे लेकीवर जगावेगळं प्रेम होतं. प्रसाद लहान असताना त्याने फारसे त्याला जवळ घेतले, फिरायला नेले असं कधी झालं नाही, पण उमेश पूजाला मात्र खूप खेळवायचा, बागेत न्यायचा. पूजा मोठी व्हायला लागली.उमेश म्हणाला, “आता ही शाळेत जाईल ग.आपण हिला जवळच्याच शाळेत घालू म्हणजे आपल्या नजरेसमोर राहील “ मोहिनी उमेशकडे बघतच राहिली.
“ हे काय उमेश?प्रसादच्याच शाळेत मी तिचं नाव घालणार आणि जाईल की स्कूल बसने. सगळी मुलं नाही का जात? भलतंच काय सांगता? मी ऍडमिशन घेऊन टाकलीय तिची.” पूजा शाळेतून आली की आधी बाबांच्या गळ्यात पडे. “बाबा ,आज शाळेत असं झालं, मी पहिली आले. “ सगळ्या गोष्टी पूजा बाबांशी शेअर करी. आई आणि भाऊ तिच्या गावीही नसत. मोहिनीला हे फार खटके. विशेष म्हणजे जेव्हा तिच्या मैत्रिणी सांगत की आई मुलीचं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं, तेव्हा तर मोहिनीला वाटे,हे आपलं आणि पूजाचं का नाही?ही मुलगी इतकी कशी वडिलांनाच attached? नाही, त्यात काही चूक नाही,पण आपणही हिच्यासाठी सगळं करतो, प्रसाद किती लाड करतो, पण हे म्हणजे अजबच आहे हिचं. उमेशला आपली मुलगी फक्त आपलं ऐकते,आईला अजिबात महत्व देत नाही याचा कुठेतरी सूक्ष्म आनंदच व्हायला लागला. हौसेने मोहिनीने एखादा सुंदर फ्रॉक आणावा आणि तिने तो बाबांना धावत जाऊन दाखवावा.उमेश म्हणे .. ‘ छानच आहे ग बेटा हा फ्रॉक पण तुला निळा रंग आणखी सुंदर दिसला असता.’ हट्ट करून पूजा तो फ्रॉक बाबांबरोबर जाऊन बदलून आणायची आणि मगच तिचे समाधान व्हायचे. उमेश मोहिनीकडे मग जेत्याच्या नजरेने बघायचा. हे असं का व्हावं हेच मोहिनीला समजेनासे झाले. प्रसादच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं. “आई, तू आणलेली कोणतीच गोष्ट कशी ग पूजाला आवडत नाही? किती सुरेख चॉईस आहे तुझा. माझे मित्र तर नेहमी म्हणतात ‘प्रसाद, तुझे सगळे कपडे मस्त असतात रे.छानच आहे काकूंचं सिलेक्शन. ’पण मग तू कोणतीही गोष्ट आणलीस की बाबा ती बदलून का आणतात ग? “ मोहिनी त्याला जवळ घेऊन म्हणे, “ अरे,नसेल आवडत त्या दोघांना माझी निवड. जाऊ दे ना. तुला आवडतंय तोपर्यंत मी आणत जाईन तुझे कपडे हं.” काय होतंय हे समजण्याचं प्रसादचं वय नव्हतं.
प्रसादला बारावीत फार सुंदर मार्क्स मिळाले. उमेश प्रसादजवळ बसला आणि म्हणाला,” वावा,जिंकलास रे प्रसाद. आता तू मेडिकलला जा. तुला हसत मिळेल ऍडमिशन.मग तू मोठं हॉस्पिटल काढ. माझं स्वप्न आहे तू डॉक्टर व्हावंस असं.” त्यावेळी प्रसादने त्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलं होतं .. . ” पण माझ्या स्वप्नांचं काय बाबा? मला अजिबात व्हायचं नाहीये डॉक्टर.मी इंजिनिअरच होणार.मी तिकडेच घेणार प्रवेश. बोलू नये बाबा,पण तुम्ही माझा विचार कधी केलात का लहानपणापासून? माझी आई भक्कम उभी आहे आणि होती म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्हाला तुमच्या पूजाशिवाय दुसरं जग आहे का? ती करील हं तुमची स्वप्नं पुरी. मी नाही तुमच्या अपेक्षा पुऱ्या करणार !” प्रसाद तिथून निघूनच गेला.आपल्या या मुलाकडे उमेश बघतच राहिला.असं आजपर्यंत त्याला कोणी बोलले नव्हते. मोहिनी हे सगळं ऐकत होतीच.
ठरल्याप्रमाणे प्रसादने इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली आणि तो गेला कानपूरला.आता उमेशने आपलं सगळं लक्ष पूजावर केंद्रित केलं. तिचं एक वेळापत्रकच आखून दिलं. स्वतः तिच्याबरोबर अहोरात्र बसून तिची तयारी करून घेऊ लागला. सतत मनावर बिंबवू लागला ‘ पूजा,तुला डॉक्टर व्हायचंय. इतके इतके मार्क्स पडलेच पाहिजेत तुला.’ पूजा जिद्दीने अभ्यासाला भिडली. मोहिनी हे नुसतं बघत होती. तिला पूजाची अत्यंत काळजी वाटायला लागली. पूजाचा कोंडमारा होतोय हेही लक्षात आलंच तिच्या. एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈