सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ ३ अनुवादित लघुकथा – प्रेशरकुकर / यातनांचं गाठोडं / अहिंसावादी पार्टी – मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव ☆ मराठी अनुवाद : सौ. गौरी गाडेकर

☆ (१) प्रेशरकुकर… ☆

खचाखच भरलेली चर्चगेट-विरार लोकल मीरा रोड स्टेशनवर थांबताच लोकांची गर्दी, कोंडलेला श्वास सोडत बाहेर पडली. जणू त्यांना एखाद्या गॅस चेंबरमधून मुक्त केलंय आणि आता ते मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. 

त्यात शांतिलालही होते. ट्रेनमधून उतरून लांब लांब टांगा टाकत शांतिलाल सरळ जाऊन रिक्षाच्या रांगेत थांबले. जवळजवळ दहा मिनिटांनी त्यांचा नंबर लागला. 

बेल वाजवली. दरवाजा उघडता उघडता पत्नी म्हणाली,” आज पुन्हा उशीर झाला?परवा माझं उद्यापन आहे. सगळं सामान आणलंय ना? की नेहमीसारखाच आजही वेळ नाही मिळाला?” 

पत्नीला बाजूला  सारून शांतिलालजी आत सोफ्यावर डोळे मिटून बसले.

काही वेळाने पत्नीला म्हणाले,” ऐक.ऑफिसात कामाचं खूप प्रेशर आहे. बॉसकडून उलटसुलट बोलणी आणि ओरडा खाण्यापेक्षा उशिरापर्यंत बसून मी आपलं काम कसंबसं पुरं करतो. टार्गेट पुरं झालं नाही, म्हणून बॉस आपली भडास स्टाफवर काढतो. तू तर दिवसभर घरातच असतेस ना? मग आवश्यक ती खरेदी आटपून घेत जा.”

“असं कसं? दोघांनी मिळून केलं,तर पूजेचं सगळं आयोजन व्यवस्थित होईल ना! लग्न करून आले,तेव्हापासूनच  तुमच्या ऑफिसचं रडगाणं ऐकते आहे. मल्टिनॅशनल कंपनीची नोकरीआणि मुंबईचं नाव ऐकून मी लग्नासाठी होकार दिला होता. आमचे बाबा सरकारी ऑफिसात साहेब होते. माझ्या आईला कधी बाजारहाट करावा लागला नाही. दुकानदार नाहीतर बाबांच्या ऑफिसातला प्यून घरी सगळं सामान आणून द्यायचे. तसंही आमच्याकडे बायका बाहेरची कामं करत नाहीत. कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न असतो तो.” 

त्याच वेळी प्रेशरकुकरची शिटी वाजली. शांतिलाल स्वतः किचनमध्ये गेले. पहिल्यांदा त्यांनी लक्षपूर्वक कुकरकडे बघितलं आणि मग ते विचार करायला लागले,’ या कुकरकडे तरी बघा . वरून प्रेशर आहे आणि खालून आग लागते आहे ,तरीही शिटी वाजवत काय मस्त काम करतो आहे! अनावश्यक वाफ बाहेर टाकायची ,हे त्याला बरोबर माहीत आहे.’ 

मग काय? पुढच्याच क्षणी ऑफिसची चिंता सोडून शिटी वाजवत ते पत्नीला सामोरे गेले. 

मूळ हिंदी लेखक:डॉ. रमेश यादव 

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (२) यातनांचं गाठोडं ☆

हलतडुलत  बस आली आणि वृद्धाश्रमासमोर थांबली. आतापर्यंत पिकनिकच्या मूडमध्ये असणारी मुलं अचानक शांत झाली. 21 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणून पिकनिक स्पॉटनंतर त्यांना या वृद्धाश्रमात स्टडीटूरसाठी आणण्यात आलं होतं. वृद्धाश्रमाचे पदाधिकारी त्यांची वाट बघत होते. वही आणि पेन सांभाळत मुलं बसमधून खाली उतरली. एकमेकांची ओळख करून देणं, थोडा खेळ, खाणंपिणं झाल्यावर पाच-पाच मुलांचा गट बनवण्यात आला आणि त्यांना वृद्धांच्या खोलीत त्यांच्याशी बोलण्यासाठी पाठवण्यात आलं. 

निकिता आपल्या गटाबरोबर ज्या खोलीत गेली, तिथे एक आजी झोपल्या होत्या. कर्मचार्‍याने सांगितलं की या आजी हल्लीच आल्या आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही,म्हणून त्या बाहेर आल्या नाहीत. त्या खोलीत शिरताच मुलांनी आजींना नमस्कार केला. त्यांची चाहूल लागताच आजी उठून बसल्या. आजीचा चेहरा बघताच निकिता सुन्न झाली.दोघींची नजरानजर झाली आणि त्यांच्या अंतःकरणातून प्रेमाचा लाव्हा फुटला. धावत जाऊन निकिता आजीला बिलगली आणि हमसून हमसून रडू लागली. आजीही तिचे पापे घेऊ लागली. समोरचं दृष्य बघून सगळे चकित झाले. रडण्याचा आवाज ऐकून टीचर आणि इतर लोकही तिथे आले.हे काय झालं अचानक? कोणालाच समजत नव्हतं. प्रयत्नपूर्वक टीचरनी दोघींना शांत केलं. 

पाणी पिऊन निकिताने सांगितलं,” टीचर, ही माझी आजी आहे. घरच्यांनी मला सांगितलं की आजी गावी गेली आहे. हा वृद्धाश्रम म्हणजे आजीचा गाव आहे,का टीचर? “

हे ऐकताच खोलीत विलक्षण शांतता पसरली. एकमेकींपासून दूर राहण्याची वेदना निकिता आणि आजी -दोघींच्याही चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. 

“टीचर,मला घरी नाही जायचं. मी आजीबरोबर इथेच राहीन आणि आजीची काळजी घेईन. जेव्हा मी आजारी पडायचे, तेव्हा आजीला दिवस-रात्र एक करताना पाहिलंय मी. मम्मी-पापा तर ऑफिसात निघून जायचे. टीचर,ही माझी फक्त आजी नाही, माझी मैत्रीणही आहे. जिथे  कुठे राहू, आम्ही दोघी एकत्र राहू .मम्मी-पापा माझ्याशी खोटं का बोलले कोणास ठाऊक! ” 

निकिताचा दबलेला ,घुसमटलेला आवाज शांततेला चिरून जात होता. बालमनाला लागलेल्या  ठेचेने सगळ्यांच्या  यातनांचं गाठोडं उघडलं गेलं होतं. 

मूळ हिंदी कथा: ‘पीडा की गठरी’

मूळ लेखक : डॉ. रमेश यादव

अनुवाद: सौ. गौरी गाडेकर. गोरेगाव (पश्चिम), मुंबई, फोन नं. 9820206306

☆ (३) अहिंसावादी पार्टी ☆

जंगलात निवडणुकीचा धूमधडाका चालू होता. त्यामुळे प्राणी आणि प्राणिनेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. लहानसहान पुढारी आपली रोटी भाजून घेण्यासाठी अचानक सक्रिय होऊन मांड्या ठोकत होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी हिंसक पुढार्‍यांनी अहिंसेचा जप सुरू केला होता. एकजूट करून निवडणूक लढण्याच्या इराद्याने लहान पक्षांच्या काही प्राणिनेत्यांनी जंगलाबाहेर तलावाकाठी गुपचूप भेटायचं ठरवलं होतं. कोल्हा,अस्वल,लांडगा, बोका,बगळा वगैरे पुढारी अगोदरच पोहोचले होते. दुसर्‍याची विचारपूस करता करता आपलंच घोडं पुढे दामटत होते. या सर्वपक्षीय पार्टीचा नेता कोण होणार आणि जनतेला आपल्याकडे कसं वळवायचं , यावर चर्चा चालली होती. स्वतःविषयी सांगत नेतेपदासाठी आपणच कसे पात्र आहोत,हे सांगत होते. अस्वलानंतर  लांडग्याने आपली बाजू मांडली,” मित्रांनो, आमच्या टोळीने शिकार करणं पूर्णपणे बंद केलं आहे. शिळंपाकं खाऊन आम्ही कसंबसं भागवतोय. खरं सांगायचं तर परस्परांचा आदर-सन्मान करत आपण सर्वांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे.त्यामुळे गरीब आणि असाहाय्य लोकांवर जुलूम होणार नाही. या त्यागामुळे या दलाचा नेता आमच्या समाजातीलच असला पाहिजे. ” सर्वांनी लांडग्याच्या समाजाच्या त्यागवृत्तीची प्रशंसा केली. 

हे ऐकून बोका म्हणाला,” बंधूंनो, माझ्याबरोबरच माझ्या समाजानेही शपथ घेतली आहे,की आता आम्ही उंदरांची शिकार करणार नाही. लोककल्याणासाठी एवढा त्याग तर केलाच पाहिजे. म्हणून नेता आमच्या समाजातीलच असायला हवा.”

आता बगळ्याची पाळी होती. आपलं समर्थन करताना तो बोलला,” मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. मेलेले मासे खाऊन आणि पाणी पिऊन आम्ही गुजराण करत आहोत. त्यामुळे नेतेपदाचा आम्हालाही अधिकार आहे. “

संयुक्त दलाच्या नेतेपदाविषयी एकमत होत नाही, म्हटल्यावर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि सिटांचं वाटप यावर चर्चा सुरू झाली. या मुद्द्यांवरून खूप बाचाबाची झाली; पण ते ठाम निर्णयापर्यंत पोहोचले नाहीत. 

तेव्हा बगळाभगत म्हणाला,” मित्रांनो,तुम्ही चर्चा चालू ठेवा. मी पटकन तलावाचं ताजं पाणी पिऊन येतो.” आणि तो तलावाच्या दिशेने चालू लागला. थोडं लांब गेल्यावर त्याने मागे-पुढे बघितलं आणि एका पोहोणार्‍या माशावर पटकन आपल्या चोचीने झडप घातली. पोटपूजा झाल्यावर तो पुन्हा सभास्थानी आला. त्याच्या चेहर्‍यावरची टवटवी बघून लांडगाही पाणी प्यायला म्हणून तिथून निघाला. थोडं पुढे गेल्यावर एक कोंबडी त्याच्या नजरेस पडली. त्याने पुढचामागचा विचार न करता लगेच तिला पकडलं. मागून कोल्हा येत होता,हे बघून शिकारीचा थोडा हिस्सा त्यालाही दिला. ढेकर देत दोघेही सभास्थानी पोहोचले. बोका थोडाच मागे राहणार होता? “जरा जाऊन येतो,” म्हणून थोडा पुढे गेला, तोच त्याला शेतात काही उंदीर दिसले. सफाईदारपणे त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन उंदरांना गट्टम केलं. जेव्हा तो सभास्थानी पोहोचला,तेव्हा बघितलं तर,झाडावर तीन कावळे कावकाव करत आपल्या भाषेत ओरडत होते,” राज की बात कह दूं तो…” 

सगळ्यांना धक्का बसला.मग सर्व नेत्यांनी मिळून त्यांना आश्वासन दिलं,” बंधूंनो, काळजी करू नका. तुमच्या समाजासाठीही काही खास व्यवस्था करण्यात येईल.” 

यानंतर सर्वसंमतीने संयुक्त मोर्चाची घोषणा करण्यात आली. पार्टीचं नाव ठेवलं-अहिंसावादी पार्टी’.त्याबरोबरच सगळ्यांना सांगण्यात आलं,की सर्वोच्च नेतेपदाची निवड निवडणुकीनंतरच केली जाईल. या घोषणेनंतर प्रेस नोट जारी करण्यात आली.

मूळ हिंदी कथा: डॉ.रमेश यादव 

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ramesh Yadav

Very nice 👍💐💐🎉