सौ. प्रांजली लाळे
जीवनरंग
☆ अवकाळी… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆
ह्या वर्षी उन्हानीही जोर धरलेला. पाण्यासाठी पाणवठे शोधत बाया बापड्या दारोदार भटकल्या. वीस रुपयाला एक बादली विकत घेतली. घरात अन्नाचा कण नसला तरी पाण्याला पैसे मोजावेच लागले. पै पै साठी कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांना पाण्यासाठी तरसावं लागलं..
दिनेशच्या गावाकडल्या घरात आईबाप रहायचे त्याचे. तो मात्र शहरात रहायचा ऐटीत.. ए.सी. रुमचा आरामदायक वेल फर्निश्ड फ्लॅट.. सुंदर बायको, मुलं.. रमला होता संसारात. वर्षाकाठी गावाकडून येऊन शेतावरचे वर्षभराचे धान्य भरून द्यायचे बापू.. माई-बापूने कष्ट करून त्याला शिकवून मोठा सायब बनवलं.. पण तो परत गावाकडे फिरकला नाही. माय-बापू फोन करायचे पण हा टाळून द्यायचा गावाकडे यायचं.. इतका स्वार्थी कसा होऊ शकतो कोणी?
ह्या वर्षीचा दुष्काळ फारच परीक्षा घेत होता. बापू आता थकले होते.. माय माऊली बिचारी कोंड्याचा मांडा करत होती. बापूंनी फोन केला दिनेशला.. सत्य परिस्थिती सांगितली.. ” ह्या वर्षी म्या काय बी पिकवू शकलो नाय बग.. तुला ह्या वर्साला बाहेरून इकत घ्यावं लागंल सर्व ..त्वा काय आला नाय मदतीला.. म्या आता हतबल झालो बग.”
दिनेशही हे ऐकून थोडा हतबुद्ध झाला खरा, पण शहरातील वारं लागलेला शहरी नागरिक झाला होता तो.. बायकोही म्हणाली, “काय फरक पडणार आहे? घेऊ इथून शॉपिंग मॉलमधून विकत.” वर्षभराचे बजेट बिघडताना दिसत असले तरी गावाकडे जाणं मान्य नव्हते..
उद्या बापूंना जमीन विकण्याचा प्रस्ताव देणार होता तो.. भरघोस पैसा मिळाला की माय बापूंना शहरात घेऊन येणार.. तेवढीच बायकोला मदत !! सर्वतोपरी निर्णय बापूंचा होता अर्थातच…. आर्थिक बजेट बिघडतंय वाटायला लागलं तसं दिनेशनं गावाकडं दोन-तीन दिवस जायचं ठरवलं.. बायकोला हा स्वार्थी निर्णय पटल्याने तीही चक्क निघाली त्याच्याबरोबर..
दारासमोर गाडी उभी राहिली. बापू खाटेवर बसून होते आणि माय काय तरी निवडत बसलेली. लेकरं अचानक दारात दिसल्यावर कोण आनंद झाला तिला.. थकलेल्या हातांनी नातवंडाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवताना आकाश ठेंगणं झालं होतं.. बापू मात्र थंड नजरेनं शुन्यात बघत बसले होते.. शेतकऱ्याचं आयुष्य असंच असतं.. वरुणराजा कोपला आणि धरणीमाय तप्त झाली की काय बी खरं नसतं.. शेतीवर असलेलं अमाप प्रेम त्यांना अस्वस्थ करत होतं..
दिनेश बापूंजवळ जाऊन बसला.. मायनं तांब्याभर पाणी आणलं.. गटगटा प्यायला.. ‘तृप्त!!’ असा त्याच्या मनातला आवाज ऐकू आला स्वतःलाच.. हातपाय धुवून अंगणात चटई टाकून पहुडला. बायको, मुलं सवय नसल्याने आतमध्ये झोपले.. दिनेशला अंगणातल्या सावलीत गाढ झोप कधी लागली ते कळलंच नाही.
दिनेश झोपला तसं बापू शेजारी येऊन बसले असावेत.. की भास होता कोणास ठाऊक !! डोळे उघडले तसे बायको, मुलं सुद्धा अंगणात येऊन बसलेले दिसले.. मायनं सर्वांसाठी चहा आणला होता.. बापू वावराकडं चक्कर मारायला गेले होते.
मायजवळ विषय काढलाच त्यानं.. “काय ठेवलंय ह्या गावात आता?? ना पाऊस ना शेती !! बापूंना म्हणावं विकून टाकूया शेती आता.. तुम्ही चला माझ्या बरोबर शहरात..”
माईच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे पळाला.. अनपेक्षित होते सर्व.. “नाही रे बाळा, ही जमीन आपली आई आहे.. तिच्याशी प्रतारणा कशी करायची? बापू कधीही मान्य नाही करणार. बापूंनी पै पै गोळा करून ही जमीन विकत घेतली आहे.. तु विचारशील, पण जरा जपून.. बापू आणि मी इथेच राहिल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. ‘आमचं भागतयं.” नजर चुकवून माय बोलली..
बापू आले संध्याकाळी.. पाहुणे आले म्हटले की गोडधोड व्हायला हवं ना.. गावातील सावकाराकडून व्याजावर पैसे घेऊन आले येताना.. थोडेफार तरी लेकरांच्या हातात टेकवायला म्हणून.. हातपाय धुवून देवासमोर हात जोडून जेवायला बसले.. पिठलं भाकरी.. वरण भात वरपून खाल्ला सर्वांनी. पोरांनाही हा नवीन पदार्थ आवडला.. आजी आजोबांचे घर भारी आवडलं. शेणाने सारवलेले अंगण, ओसरी, स्वयंपाक घर आणि एक खोली.. हवेशीर, शुद्ध हवा.. बायकोही सासूच्या हातचे पदार्थ खाऊन खुश !!
“माई हे पदार्थ आम्हाला रोज खाऊ घालायला चला नं आमच्या बरोबर..” माईच्या डोळ्यात आसू तरळले. ती खुश होती लेकरं आली तर.. भोळी होती ती.. खरंच वाटले तिला.. ती रात्री बापूंना हा विषय बोलणार होती..
बापू बाहेर खाटेवर आकाशात पहात पहुडलेले.. माईनं सुपारी कातरुन आणून दिली.. तशी अस्वस्थता अधिक गहरी होत गेली तिच्या मनातली.. ” लेकाचा मनसुबा कळलाय नव्हं तुम्हाला??” बापू तसे समजून चुकले होते.. त्यांनी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले होते की ही गोष्ट लगेच लक्षात आली होती. पण बोलून फायदा नव्हता.. पोटाची भूकही महत्वाची होती.. निर्णय घ्यावा तर लागणार होता..
‘हो किंवा नाही’ ह्या मनस्थितीत रात्र न झोपता सरली.. माईला तो दिवस अजूनही आठवत होता ज्या दिवशी ती बापूंचा हात धरुन मापटं ओलांडून ह्या गावात आली. एक छोटसं खोपटं होतं बापूंचं.. रुबाबदार दिसायचे बापू.. दिलदार मनाचा रांगडा गडी.. .. माई तशी साधी, सालस. दिसायला सोज्वळ आणि सोशिक. घरात सासु सासरे, नणंद.. सर्वांचे निमूटपणे केले.. बापूही जमिनीच्या एका तुकड्यावरुन वीस एकर जमिनीवर आले.. घोर मेहनतीचे फळ !! एकमेकांच्या साथीने संसार उभा राहिला.. आणि आज अशी वेळ यावी.. दोघांचेही डोळे ओलावले..
झुंजुमुंजू झाल्या. बापू सकाळधरनं गायब झाले ते कोणाला दिसलंच नाही.. दिनेश, सुनबाई सगळेच उठले.. माईनी डोळ्याला पदर लावला.. काही विपरीत तर घडलं नसलं ना? ” दिनेश.. अरं आपलं बापू कुठं बी न्हाय दिसत..”
दिनेश वैतागून “काय गं माई, काय झाले? असतील शेतावर..”
“नाही ना.. शेजारचा म्हादबा बी येऊन गेला आत्ता.. तो शेतावरनंच आला. तो बी हेच विचारत होता..कुठे गेले बापू म्हणून..”
दिनेशची चांगलीच तंतरली. त्याचं प्रेम होतं बापूंवर.. पण स्वार्थही होताच थोडा.. पैसा महत्त्वाचा वाटायचा त्याला.. पण जे घर, जिथं तो लहानाचा मोठा झाला.. जी जमीन, जिने त्याला महागाचे शिक्षण मिळवून दिले. तो बाप, ज्यानं त्याला घाम गाळून शिकवले.. त्यालाच तो विसरला?? माई धायमोकलून रडायला लागली.. आता मात्र दिनेश हलला.. गावभर मंदिरं, नातेवाईक, शेजारी, सारं सारं शोधलं.. दिनेश हतबल झाला.. ‘कुठे आहात तुम्ही बापू? तुमच्या विना घर कसे वाटतेय?’ सूनबाई माईजवळ बसून राहिली.. लेकरं घाबरली बिचारी.. घर पोरकं तर होणार नाही ना?? एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत होती..
अचानक पावसाची थेंबं टपटप पडायला लागली.. सगळीजणं एकमेकांना सांभाळत होती. माईंना दिलासा देत होती. तो दिवस सांत्वनाचा होता की अजून काही?? पण एकत्र राहण्याचे महत्त्व समजत होते दिनेशला.. हरवलेल्या बापूंना शोधायचेच होते.. पण माईलाही सावरायचे होते. सतत पडणाऱ्या पावसानं तप्त जमीन तृप्तं झाली होती.. पाऊस अवकाळी का होईना, धरणीमाय शांत झाली होती. बापूंसाठी प्रार्थना करत सर्वजण कधी झोपले कळलंच नाही..
सकाळी फटफटल्यावर दिनेशला बाहेर गडबड ऐकू आली. पोलीस दिसले चार-पाच. पोटात भितीचा गोळा आला.. ब्रम्हांडं आठवले.. बापू?? बायकोला आवाज देत बाहेर पळालाच.. पाहिले तर बापू माणसांच्या गराड्यात बसलेले मान खाली घालून..
पोलिसांनी जुजबी चौकशी करुन दिनेशच्या खांद्यावर थोपटले.. ” सांभाळा आपल्या वडिलांना..काल पहाटे हायवेवर मोठ्या ट्रकसमोर आले होते. पण ट्रकवाल्याने एअरब्रेकने गाडी थांबवली..”
बापरे हायवे तर इथून एक गाव ओलांडून आहे.. कसे गेले असतील बापू?? दिनेश मनातल्या मनात बोलला. काहीच बोलत नाहीयेत.. नशीब त्यांच्या एका ओळखीच्या माणसानं ओळख पटवली. ” सांभाळा.. वडील पुन्हा मिळत नसतात कधीच..” इन्स्पेक्टर बोलले..
सर्वजण निघून गेल्यानंतर बापूंना जी मिठी मारली ना दिनेशने, ती आयुष्यात कधीच मारली नव्हती.. स्काॅलरपणाचा अहंकार बाळगत बापाच्या अडाणीपणाला तुच्छ समजत जगत होता तो.. सर्व अहंकार विरघळला होता त्या मिठीत !!! जोरदार हंबरडा फोडत म्हणाला “बापू तुम्ही मला हवे आहात “…
बापूंच्या निस्तेज डोळ्यात एक चमक दिसली.. डोळ्यातून घळघळा पाणी आलं.. ” चला बापू आपल्या घरात.. तुम्ही कुठेही नाही जायचं.. आम्हीच येणार. दर सहा महिन्याला.. तुम्हाला आणि तुमच्या धरणीमायला, दोघांनाही भेटायला…”
© सुश्री प्रांजली लाळे
मो न. ९७६२६२९७३१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈