सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ असंही एक माहेरपण… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
मी एक प्रथितयश डॉक्टर आहे. आधी सरस्वतीने, विद्यादेवीनें यशाची माळ माझ्या गळ्यात घातली होतीचं. तेव्हांच अलकाचीही माळ माझ्या गळ्यात पडली. आणि ती माझी अर्धांगिनी झाली.अलका माझी सहचारिणी ,चतुर, हुशार, कल्पक,चाणाक्ष बुद्धीची आहे, म्हणूनच तिने मला सुचवलं ,” तुम्ही तळमजल्यावर स्वतःच क्लिनिक काढा. वरच्या मजल्यावर राहून तुमच्या बरोबरीने, मी तुम्हाला हातभार लाविन. तिचं वाक्य मध्येच तोडत मी म्हणालो “म्हणजे माझी असिस्टंट होणार की काय तू ? त्यावर मानेला एक गोड हलकासा झटका देत ती म्हणाली ” नाही हो! जातीने लक्ष घालून, पेशंटची मी ‘ ‘पोटोबा शांती ‘ करून सेवा करीन. आश्चर्याने मी उदगारलो “अरे वा!म्हणजे नक्की काय करणार आहेस तू ? त्यावर मिस्किल हंसत अलका म्हणाली ” ऐका नां , म्हणजे असं बघा तुम्ही पेशंटच्या शरीराची काळजी घ्या. मी त्यांच्या मनाची आणि पोटाची काळजी घेईन. म्हणजे त्यांना पथ्याचं, खायला-प्यायला घालून तृप्त करीन .मानसिक आधार देऊन त्यांच्या मनाला सांवरणारा दिलासा देणार . आणि आपल्या संसाराला, तुमच्या पिठाला माझ्या मिठाची जोड देणार. तर मंडळी अशी मला सकारात्मक उर्जा घरातून मिळाल्यावर उशीर कशाला करायचा? शुभस्य शीघ्रम या वाक्याच्या सुमुहूर्तावर आमचं स्वप्न साकारही झालं होतं.
काही पेशंट निराश, उदास नकारात्मक विचारांचे होते. तर काही मोकळेढाकळे, दिलखुलास दिलाचे, बिनधास्त स्वभावाचे होते. श्रीमती नर्मदा वहिनींची गणनाही त्यात करावी लागेल. तपासणीसाठी दोन दिवस राहिलेल्या वहिनी आमच्या घराशी, क्लिनिकशी अगदी स्टाफशी सुद्धा इतक्या एकरूप झाल्या की स्वतःच दुखणंच विसरल्या. वहिनींच्या तपासण्या झाल्या.आणि नको ते संकट ओढवलं.वहिनींच्या पोटात लिंबाएवढी गांठ होती. आणि ती त्यांना अधून मधून क्लेश देत होती. त्यांना हे गाठं प्रकरण आपण कसं सांगावं ?हा भलामोठा यक्षप्रश्न अलकाच्या आणि माझ्या पुढे उभा होता. लवकरच मेजर रिस्की ऑपरेशन करावं लागणार होतं. वहिनीशी, त्यांच्या हंसर्या खेळकर हेल्पफुल नेचर मुळे,आमचं भावनिक नातं जुळलं होतं. पण नाईलाजाने आता त्यांना सगळी परिस्थिती सांगावीच लागणार होती. कारण पेशंटपासून, त्याची मानसिक तयारी व्हावी म्हणून ,कुठलीही गोष्ट लपवायची नाही. हे माझं ब्रीदवाक्य होतं. अखेर असें हे अवघड ऑपरेशनचे दुखणं सांगण्यासाठी मी निघालो. अलका बरोबर होतीच. वेळप्रसंगी वहिनींना ऑपरेशनचं ऐकल्यावर धक्का बसला तर त्यांना सांवरण्यासाठी ती सोबत आली होती. शेवटी काहीही न लपवता सारी परिस्थिती मी कथन केली.आणि प्रततिक्रियेसाठी वहिनींकडे अलकाने आणि मी बघितले.
क्षणभर त्या गांगरल्या आणि दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून हसतच म्हणाल्या “एवढ्चं नां डॉक्टर!अहो मग काढून टाका नं ती गाठ लवकर. अहो नऊ महिने माझ्या मुलांना मी पोटात वाढवलं.तेव्हा कुठे आज तीच सोन्यासारखी माझी मुलं मला आधार देत आहेतं. माझी लेकरचं आत्ता माझ्या कामास आलीत.पण ही बिनकामाची बांडगुळासारखी वाढवून त्रास देणारी गाठ, कशाला पोटामध्ये वाढवू ? माझी तयारी आहे डॉक्टर, सांगा कधी करायचं ऑपरेशन? हे पोटातलं निरर्थक बांडगूळ लवकरच काढायला हवं नाही कांहो डॉक्टर? त्यांचं बोलणं ऐकून मी निशब्द झालो. काय ग्रेट बाई आहे? वास्तव किती सहज स्वीकारलय ह्या वहिनींनी. मी पुढे म्हणालो ” वहिनी ऑपरेशन नंतर दोन महिने तुम्हाला इथे माझ्या देखरेखीखाली रहावे लागेल,माझ्या क्लिनिकमध्ये .लगेच वहिनींकडून उत्तर आलं. “अहो अगदी आनंदाने राहीनं मी, पण मग नंतर मात्र मला खडखडीत बरी करूनच घरी पाठवा हं! म्हणजे पुन्हा पेशंट म्हणून इथे यायला नको. वहिनींचा मुलगा म्हणाला “ दोन महिने ? आई,अगं किती कंटाळा येईल तुला!” त्यावर वहिनींचे उत्तर तयारच होतं. “नाही रे बाळा! कंटाळा कशाला येईल? उलट इथे माहेरी आल्यासारखं वाटतंय मला. वेळोवेळी उत्तम काळजी घेणारे हे डॉक्टर, माझ्या शरीराचे रोग बरे करणार आहेत. तर ह्या अलकाताई मला मानसिक आधार देऊन,सुग्रास पौष्टिक पथ्याचं जेवण देऊन, माझ्या आरोग्याची काळजीचं घेणार आहेत. ऑपरेशन नंतर मी खडखडीत बरी होणार. आणि मग? -मग महाराणी सारखी या पलंगावर झोपणार.आणि हो, या महाराणीची सेवा करायला या सिस्टर, मावश्या, मामा आहेतचं कीं माझ्या दिमतीला. सगळेजण मनापासून आणि आत्तापासूनच खूप प्रेमाने काळजी घेत आहेत माझी. याच्यापेक्षा माहेरचे सुख आणखी काय वेगळे असणार?
वहिनींच्या या आशावादी सकारात्मक बोलण्यावर सगळ्यांनी हसून खुशीची पावती दिली. आणि मी पण पुढच्या ट्रीटमेंट साठी सज्ज झालो .तर अलका पदर बांधून आनंदाश्रू पुसतं, स्वयंपाक घराकडे वळली. स्वतःशीच म्हणाली ‘ हो वहिनींना शिरा आवडतो नां? आजपासून या माहेरवाशिणीच्या माहेर पणाला सुरुवात करायला हवी, नाही का? असं हे आगळंवेगळं माहेर पण आणि आजार पण भोगून,सकारात्मक विचारांच्या बळावर बर्या होऊन,लवकरच वहिनी ठणठणीत झाल्या, आणि घरी गेल्या पण. अजूनही अधून मधून त्या आमच्या भेटीला येतात. अशी माणसं आयुष्यात येणं म्हणजे, एक थंडगार वाऱ्याची झुळूक असते आणि हा आनंद दायी गारवा आम्हाला वहिनीच्या सहवासात मिळाला. तर अशा या वयाने ज्येष्ठ आणि मनाने श्रेष्ठ असलेल्या वहिनी सगळ्यांच्या आवडत्या झाल्या आहेत.
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈