सुश्री शीला पतकी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ “ती, आरसा, आणि मी” भाग – १ ☆ सुश्री शीला पतकी 

नापास शाळेच्या ऍडमिशन सुरू झाल्या.. पालक विद्यार्थी हितचिंतक अशा नापास मुलांना घेऊन माझ्याकडे येत असत. कुणाकडे पैसे नाहीत, कोणी खूप गरीब आहे, दहावी मध्ये नववी मध्ये नापास होऊन शिक्षण थांबले आहे, असे खूप विद्यार्थी येतात. 

सकाळी नऊ वाजता माझे काम सुरू  झाले आणि एक रिक्षावाले गृहस्थ आले. त्यांनी आपली ओळख करून दिली आणि म्हणाले “माझी मुलगी येथील एका कन्या शाळेत होती पण शाळेने तिला काढून टाकले आहे. इयत्ता नववीमध्ये शिकत होती. तेव्हापासून ती घरीच आहे.”

मी त्यांना मध्येच थांबून विचारलं, “अहो पण शाळेतनं काढायचं कारण काय?”

त्यावर ते दोन मिनिट गप्प राहिले आणि मग त्यानी मला सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी माझी मुलगी तळत्या तेलात पडून गंभीर जखमी झाली. तिचा चेहऱ्याचा भाग, मानेचा भाग, हात, म्हणजे जवळपास अर्ध शरीर भाजून निघाले तिचे.. सात आठ महिने दवाखान्यातच गेले ..ती जगेल असे मुळीच वाटत नव्हते. पण माहित नाही आमच्या सुदैवाने की तिच्या दुर्दैवाने ती जगली. त्यानंतर तिचा चेहरा, कातडी विद्रूप झाल्यामुळे तिच्या बाई म्हणतात की त्यांच्या शाळेतील मुली तिला घाबरतात, आणि अशी विद्रूप मुलगी आम्हाला वर्गात नको ” …..हे सांगताना त्यांना अक्षरशः रडायला येत होते. त्यांनी हुंदका दिला.

मी उठून त्यांना पाण्याचा ग्लास पुढे केला.. पाठीवरती थोपटलं ..आणि म्हणलं, “काळजी नका करू, आपण करू काहीतरी. ..तुम्ही मुलीला घेऊन या !”

ते म्हणाले, “बाई ती खूप निराश झाली आहे. आता दीड दोन वर्ष झाले ती घरीच आहे. कोणाशी फार बोलत नाही, मिसळायचा तर प्रश्नच नाही. तिला कोणी मिसळूनच घेत नाही. घरातली खोली आणि ती ! बरं, लहानगा जीव, काय समजते हो 14/ 15 वर्षाच्या मुलीला. आमच्या डोळ्यासमोर तिचं सगळं भविष्य उभं रहातं.”….

मलाही थोडं आश्चर्यच वाटलं .. “भाजली आहे ना, एवढं काय काळजी करण्यासारखं, होईल बरं. हल्ली प्लास्टिक सर्जरी वगैरे करतात.” 

ते म्हणाले, “हो, पण त्याला ठराविक कालावधी जावा लागेल…. मुलगी बऱ्यापैकी हुशार आहे. घरी बसून खूप कंटाळली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत प्रवेश दिला तर फार उपकार होतील.”

मी म्हणाले, “उपकाराची भाषा करू नका. शिक्षण घेणं हा तिचा हक्क आहे. आपण तिला शिकवूयात.”

माझ्या शब्दाने त्यांना खूप धीर मिळाला. मी म्हणाले, “मुलीला घेऊन या. मी तिच्याशी बोलते आधी, आणि मग आपण ठरवू.”

ते थोडे सुखावले होते. त्यांना कुठेतरी खात्री वाटत होती की इथे माझ्या मुलीला प्रवेश मिळेल. ते तातडीने घरी गेले आणि एका तासाभराने आपल्या मुलीला आणि बायकोला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले. 

तोपर्यंत काही ॲडमिशनचे इंटरव्यू चालले होते. मी मुलांशी, पालकांशी बोलत होते, त्यांचे समुपदेशन करत होते. त्यानंतर समोरचे पालक बाहेर पडले. मी खाली वाकून काही फॉर्मवरती टिपणं करत होते आणि हे  रिक्षावाले गृहस्थ पुन्हा ऑफिसमध्ये प्रवेश करते झाले. सोबत त्यांची पत्नीही होती. त्यानी सांगितले, “बाई, मुलीला घेऊन आलो आहे. आपण तिच्याशी बोला.” 

सुरुवातीला तिची आई माझ्याशी बोलली. त्या म्हणाल्या, “दिवाळीचं तळण तळत होते हो, आणि ही पोरगी धावत आली आणि त्या मोठ्या कढईत पडली.” ते सगळं ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. त्या वेदना, ते हॉस्पिटल, सगळं त्या वर्णन करून सांगत होत्या. मी म्हणलं, “एवढ्या लहान लेकराने हे कसं सोसलं असेल ना ?” 

इतक्यात ती मुलगी आत आली. सुरेखा तिचं नाव होतं आणि मीही इतर मुलांना जसा दिलासा देण्यासाठी त्यांच्या नावाने हाक मारते ये ये …तसं मी हिला हाक मारली “ये ये सुरेखा …”

सुरेखा आत आली. तिला पाहिलं आणि मी खुर्चीवरून नकळत उठले. समोर तिचं रूप पाहून मला काय वाटलं मी सांगू शकत नाही.. भीती, किळस.. भयानक चेहरा होता.. डोळे बाहेर आलेले, गालाची हाडं वर आलेली, त्याच्यावर जळलेलं मास थोडंसं लोंबणारे.. जागोजागी असंख्य जळकट सुरकुत्या, मानेभोवती अशाच सुरकुत्यांचे जळकट जाळे.. केस तुटके तुटके भुरे.. डोक्यावर थोड्याशा जखमा भाजलेल्या.. ओठ भाजल्याने किंचित पुढं आलेले, कानाच्या पाळ्यांची तीच अवस्था.

मी तिच्या हाताशी पाहिलं, हातावरचं मांस दिसावं तसा तांबूस रंग होता. दोन्ही हाताची बोटं आतून मुडपलेली होती आणि अगदी बारीक बारीक बोटं म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या पक्षाच्या पिलाचा जसा रंग असतो ना आणि शरीर असतं तसं ते सगळं होतं. …

मी एक क्षणभर म्हटलं हे रोज बघू शकतो का आपण…? मुळात तिच शरीर अतिशय कृश होतं. म्हणजे हाडं आणि लोंबणारी कातडी.. बाहेर आलेले डोळे.. तुटके केस ..  हे थोडक्यात वर्णन ….आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला ‘शीला पत्की, सामाजिक सेवा करायला निघाला आहात, हे सोसणार आहे का तुम्हाला ? दररोज नुसतं बघणं तरी काय भयानक होतं ते, छे छे, हे होणे नाही…!’

… पण माझ्या दुसऱ्या मनाने मला सांगितलं… ‘मग तू समाजसेवेचा खोटा आव आणतेस का? इतकं साधं तुला सोसता येत नाही.. फक्त बघायचे तर तुला एवढी किळस आली… ती कशी ते सगळं रूप घेऊन समाजात मिरवेल ना? काय सांगणार आहेस तिला तू ? ‘

… आणि मग कुठून अवसान आलं माहित नाही, आतून एक आवाज आला.. ‘नाही नाही, हीच माझी परीक्षा आहे’ ….आणि मी मलाच आजमावण्यासाठी असेल बहुदा.. तिला म्हणलं ” हाय सुरेखा….” आणि तिचा तो मांसल वेडावाकडा हात मी हातात घेतला… तो स्पर्श अगदी थंड होता. कुणीतरी पहिल्यांदा तिचा हात प्रेमाने हातात घेत होतं.. कुणीतरी तिला स्पर्श केला होता.. आणि तिच्या त्या चेहऱ्यावर ओठामधून एक छानसं हसू फुटलं. म्हणजे डब्यात ठेवलेल्या जाईच्या कळ्या उमललेल्या असाव्यात आणि एखादी तळातली कळी न उमललेली ..वरची फुलं काढल्यावर अलगद आणि पटकन उमलते ना तशी तशी ती हसली..! मला वाटतं खूप दिवसांनी ती हसली असावी….. मी माझी स्वतःची परीक्षा घेणं किंवा स्वतःला आजमावणं याच्यासाठी तो हात तिच्या हातात तसाच ठेवला आणि दोन मिनिटांनी त्या स्पर्शात काय संवेदना होती माहित नाही, मी तिच्या दुःखाशी तद्दूप झाले. क्षणभरात दिसणारे विद्रूप रूप माझ्यासमोरून नाहीस झालं आणि माझ्यासमोर दिसत होती एक छोटी मुलगी, तिला पुन्हा एकदा आपलं आयुष्य फुलवायचं आहे, माझ्या थोड्या मदतीची याचना ती करत होती. 

बस्, मी ठरवलं आणि तिला प्रवेश दिला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. बहुदा मी स्वतःला तिला सहन करू शकते का हे आजमावत होते.

तिला प्रवेश दिल्यामुळे तिचे आई-वडील दोघेही रडायला लागले‌. “बाई फार उपकार झाले. आज तुम्ही माझ्या मुलीला जवळ घेतलेत.”

मी त्यांच्याही पाठीवरून हात फिरवला. त्यांना धीर दिला… शाळेचे नियम समजावून सांगितले आणि सुरेखाचा प्रवेश झाला ..!

पण इथे मुद्दा संपला नव्हताच. आमच्या मुख्याध्यापकांना मी तिचा विषय समजून सांगितला. त्या दोघी खूप चांगल्या होत्या. मी त्यांना सांगितले, “आपल्याला त्या मुलीला समजून घ्यायचे आहे.”

…तिथे मुख्याध्यापक म्हणून काम करणारी माझी मैत्रीणच होती आणि त्या माझ्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या, वयाने मोठ्या होत्या.. आई होत्या. त्यानी त्या गोष्टी समजून घेतल्या!

शाळा सुरू झाली. मुलींचा वर्ग, मुलांचा वर्ग सुरुवातीला एकत्रच असे. मग ऍडमिशन सगळ्या झाल्या की मुला मुलींचे वर्ग वेगळे करत असू…

मी तेव्हा सेवासदन मध्ये नोकरी करत होते. मी एक तास सकाळी आणि एक तास संध्याकाळी शाळेमध्ये उपस्थित राहत असे. बाकी सगळे व्यवस्थापन माझा स्टाफ पाहत होता. शाळा माझी अगदी माझ्या संस्थेला लागूनच होती त्यामुळे मुख्याध्यापकांच्या परवानगीने मधल्या सुट्टीतही मी एक चक्कर टाकून जात असे. त्याप्रमाणे मी मधल्या सुट्टीत गेले. मुख्याध्यापिका म्हणाल्या, “बाई बरं झालं तुम्ही आलात. एक प्रॉब्लेम आहे…”

मी म्हणाले, “काय झालं ..?”

त्या म्हणाल्या, “ह्या मुलीबरोबर कोणी डबा खायला तयार नाही, हिला कोणी एक एकत्र बसून घेत नाहीत. आम्ही खूप समजून सांगितलं दोन-तीन दिवस, पण मुली ऐकायलाच तयार नाहीत. तुम्ही काही करता का पहा…”

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments