सौ ज्योती विलास जोशी
☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-1 ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
(करोनाचं हे दुसरं भूत….)
‘करोना’ नावाच्या एका अस्मानी संकटाने सगळ्यांची बोलती बंद केली हे जरी खरं असलं तरी,आम्ही मात्र सर्व त्याच्याविषयीच बोलू लागलो.
आताशा करोनाच्या नावाने बोटं मोडीत दिवस सुरु होतो अन् त्याला शिव्या शाप देत संपतो. आम्हा चांडाळ चौकडीच्या गप्पांच्या कट्ट्यावर देखील या करोनानेच धुमाकूळ घातला आहे.
त्यात आमचा ‘पाटण्या’ म्हणजे पाटणकर रोजची करोना अपडेट देणार! मग काय विचारता…तो येताच करोना जणू आम्हा सर्वांच्या काया प्रवेश करतो आणि आपले अस्तित्व दाखवू लागतो.
पाटणकर म्हणजे एक अजब रसायन आहे. भविष्याची चिंता नसलेला, भूतकाळात डोकावणारा, आणि वर्तमानाला प्रेझेंट समजून चालणारा असा हा, थापा मारतो की बाता हे आम्हाला अजून उमगलेले नाही.
त्याच्या थापा म्हणाव्यात तर तो आम्हा कुणाचेही थापा मारून नुकसान करीत नाही किंवा त्याच्या बोलण्याने आम्हा कुणाचीही फसवणूक होत नाही. आणि बाता म्हणाव्यात तर त्याच्या बोलण्याला एक सत्याची झालर असते.
थापा असोत वा बाता, स्वतःची टिमकी वाजवायला तो कधीही विसरत नाही.
असाच तो आजही कट्ट्यावर आला ते ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत.
“आज अचानक करोनाला बगल देऊन एकदम विठुरायाचा काया प्रवेश? ‘गो करोना’ म्हटलेलं ऐकलं की काय करोना ने?” मी पाटणकरला टोकलं.
“अरे,आज एकादशी. सकाळी-सकाळी कानावर पडलेलं गाणं मनात रुंजी घालतय तेच गुणगुणत आलोय झालं!” पाटणकरने गाणे गाण्याचं प्रयोजन सांगितलं.
“आता पूर्ण गाणं म्हण” आम्ही आग्रह धरला. आणि आशा ताईंच्या आवाजातील हे गाणे पठ्ठ्याने पूर्ण म्हटलं की हो!
आज ना तो नेहमीसारखा न्यूज रीडरच्या भूमिकेत होता, ना करंट विषयावर बोलायच्या मूडमध्ये! स्वतःचे बूड स्थिरस्थावर करून तो म्हणाला, “अरे यार, मी काल एक स्वप्न बघितले.आणि त्या स्वप्नात एक भूत!”
आम्ही तिघांनीही एकदम एकमेकांकडे पाहिलं. पाटणकरचे स्वप्न म्हणजे एक शुद्ध आणि स्वच्छ थाप असणार असे आम्हा तिघांना एकाच क्षणी वाटलं असा वे. पण दुसऱ्याच क्षणी रोजच्या, करोना भूताच्या चावून चोथा झालेल्या विषयापेक्षा पाटणकरच्या स्वप्न नगरीत जायचे आम्ही तिघांनी ठरवले.
“अरे पाटणकर रात्रभर पाहिलेले स्वप्न एक तासात सांगून पूर्ण होणार का? माझा खोचक प्रश्न त्याला विशेष आवडला नाही. “नाही म्हणजे तीन तासाचा पिक्चर पण त्याची स्टोरी सांगायला तुला सहा,साडे सहा तास लागतात म्हणून म्हटलं, ”मी माझी सफाई दिली.
“अरे ऐका रे” त्याने दटावले. स्वतःच्या स्वप्न सफरीवर आम्हाला न्यायला तो उतावळा झाला होता.
करोनामय वातावरण रंजक होईल म्हणून आम्ही ही त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.
क्रमशः….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈