सौ ज्योती विलास जोशी
☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-2 ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
(करोनाचं हे दुसरं भूत….)
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ असे म्हणतात ना, अगदी तसेच झाले. मी एका दगडावर बसून ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ हे गाणे गुणगुणत होतो तितक्यात माझ्या मानेवर एक भूत येऊन बसलं.
पाटणकरने आमचे मनोरंजन विक्रम आणि वेताळ यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथेचा आधार घेऊन करायला सुरुवात केली.
“भुताने मला विचारले, कोणते गाणे म्हणत होतास? माझी अगोदरच भीतीने गाळण उडाली होती आणि त्यातच त्याने मला हा प्रश्न विचारला मी थरथर कापायला लागलो. त्याची माझ्या मानेवरील पकड आणखीनच घट्ट व्हायला लागली.
गाणं ना? ते, हे, आपलं, मी त, त, प, प करू लागलोआणि गडबडीने उत्तर दिले ‘अजि म्या भूत पाहिले’ झालं! त्यानं मला शब्दातच पकडलं!
तुझं भूत, इथंभूत सांग, नाहीतर तुझ्या शरीराची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायात लोळण घेतील. भुताने मला दम दिला.”
“भूत तुलाच तुझा भूतकाळ विचारत होतं?”पेंडसेने पाटण्याला विचारले. “होय! पण मी घाबरून गाणेही विसरलो आणि भूतकाळही!”
“मग काय झालं?” आम्ही सरसावून बसलो.
पाटण्याची कल्पनाशक्ती, सांगण्याची लकब, प्रसंग हुबेहूब मांडण्याची धाटणी इतकी अप्रतिम आहे की त्याच्या वक्तव्यातील निम्मे खरे-निम्मे खोटे असे गृहीत धरले असले तरी पठ्ठ्य प्रसंग असा उभा करतो की ‘एैसा भी होता है?’ असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
एव्हाना पाटण्याने त्याच्या स्वप्ननगरीत आम्हाला बरोबर खेचलं होतं अन् तो बोलू लागला.“माझ्या मानेवरची त्याची पकड आणखीनच घट्ट करीत ते माझ्याशी बोलू लागले,
भूतकाळ बदलता येत नाही पण तो आठवता येतो. म्हणून तर भूतकाळ या शब्दात भूत म्हणजे मी आहे. ते म्हणालं.”
पाटण्या अशी संकटाची वेळ कशी मारून नेतो ही उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती. तल्लीन होऊन आम्हीऐकू लागलो…..
त्याच्या बोलण्याच्या दिशेने कान टवकारले. पाटणकरने आपल्या स्वप्ननगरी चे दार उघडले.
क्रमशः….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈