प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ पसंत आहे मुलगा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆
(मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता. बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.) — इथून पुढे ….
मी तर सुन्नच झालो होतो! कसं आणि काय रिऍक्ट करावं तेच मला समजत नव्हतं. तरीपण स्वतःला सावरत मी म्हणालो,” खरं सांगू मावशी, त्यादिवशी तिथे मी माझ्या स्वतः बद्दल काहीच सांगत नव्हतो. महेश, त्याचा गुणी स्वभाव, तुमचे गाव, तुमची शेतीवाडी, महेशची पुढची स्वप्न या सगळ्या बाबतीत मी भरभरून बोललो. ती पार्टी खरोखरच खूप छान होती अन मोठी सुद्धा होती. वाडा केवढा सुंदर आणि भव्य होता! आत शिरताच मी म्हटलं, ” महेशराव आता तुम्ही या भव्यवाड्याचे जावई होणार असं दिसतंय… महेश सुद्धा त्यावर खूप लाजला होता त्यावेळी, शिवाय मुलगी खूप सुंदर देखणी होती. अगदी महेशला शोभेल अशीच होती. बी.ए करते आणि अभ्यासात सुद्धा हुशार होती महेश ने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिने खूपच छान उत्तरे दिली होती.
ते लोक सुद्धा मोठया उत्सुकतेने महेशची चौकशी करत होते, त्याच्याबद्दल चांगलं बोलत होते मला तर तिथून माघारी येईपर्यंत शंभर टक्के खात्री वाटत होती की, हे लग्न जवळपास जमलेच! महेश पण खूप खुश होता, अगदी वाड्याच्या बाहेर येऊन सगळे लोक आम्हाला टाटा बाय-बाय करत होते. पण पुढे हे भलतेच कसं झाल? मावशी, त्यांनी मला पसंत करण्याचा प्रश्नच येत नाही. मी त्यांना एवढं सुद्धा म्हटलं की, आम्ही दोघे बी.ए.स्सी करतोय. आमच्या लग्नाला अजून खूप वेळ आहे पण महेश घरात थोरला आहे त्याच्या आईवडिलांची इच्छा आहे की मोठ्या मुलाचं लग्न लवकर व्हावं. त्यांच्या त्या हौसे पोटी तर महेश मुलगी पाहायला तयार झाला आहे. शिवाय लग्नानंतरही महेशचं शिक्षण चालूच राहणार आहे. त्याला पी एस आय व्हायचं आहे. मी त्यांना सगळं खरं खरं सांगितलं मावशी. पण हे असं घडलंच कसं?” मी माझा प्रमाणिकपणा सिद्ध करण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
” अरे तू त्यांना सगळं सांगितलंस पण जे सांगायचं ते कुठं सांगितलंस? ” महेशच्या आईने भलताच तिरकस प्रश्न विचारला त्याने मी पुरताच गांगरलो.
” म्हणजे, काय नाही सांगितलं मी मावशी? “
” आधी जेवण कर मग सांगते.“
” आई…? ” महेश जवळपास आईवर मोठ्याने ओरडलाच होता.
माझं तर जेवणावरून लक्षच उडालं होतं…मी महेशकडे एक कटाक्ष टाकला तर तो लगेच खाली बघून जेवत असल्याचे मला खोटे खोटे भासवत होता.
मला जेवताना घामच फुटला होता! ” मावशी सांगा ना प्लिज मी काय सांगायचं राहिलं ते… “
” अरे काही नाही, आधी जेवण कर. “
मी अस्वस्थ झालो होतो त्यामुळे मी पटकन ताटात हात धुतला.
माझ्याकडून नकळत काय अपराध झाला होता ते मला कळेना. असं काय झालं होतं की ज्याने महेशच लग्न मोडलं होतं? असं काय माझ्याकडून त्या मंडळींना सांगितलं गेलं होतं की, ज्याने त्यांनी महेशला सोडून मलाच पसंत केलं होतं? माझा हेतू स्वच्छ होता. मित्राने सोबत मुलगी पाहिला बरोबर नेलं होतं. नवरदेव तोच होता. मी त्यांना सुरुवातीलाच नवरदेव म्हणून महेशचीच ओळख करून दिली होती. त्याच्याबद्दल जेवढं काही सांगता चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगितलं होतं. ती मुलगी आपल्या मित्राची पत्नी होणार अगदी आपल्या जिवलग मित्राची पत्नी म्हणजे आपली लाडकी वहिनी असणार त्यामुळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. मग नेमके चुकले कुठे? मावशींचा रोख आणि सगळा रोष तर माझ्याकडेच होता. आत्तापर्यंत त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. महेशला आणि मला त्यांनी कधीच वेगळं मानलं नाही.
तेव्हा हा सगळा नेमका काय प्रकार आहे? ते मला काहीच समजत नव्हते…. याच विचारात हात धुवून ताट बाजूला सारून मी उठून खाटेवर बसलो. महेशने सुद्धा तसेच केले.
मावशी आमच्या दोघांची ताटे घेऊन आत गेल्या आणि बडीशेपचे तबक घेऊन बाहेर आल्या. त्यांनी चमच्याने माझ्या हातावर बडीशेप वाढताच मी अजिजीने म्हटले, ” मावशी सांगा ना प्लिज माझे काय चुकले ते ?मी त्यांना काय सांगायला पाहिजे होतं? “
” अरे जाऊ दे बाळा ते फार महत्त्वाचं नाही आणखी दोन स्थळं आल्यात महेशला. होऊन जाईल त्यातलं एखादं फायनल. “
” नाही मावशी पण मला कळायलाच पाहिजे माझं काय चुकलं ते! तुम्ही मला आईसारख्या, महेश मला माझ्या भावासारखा आहे. “
” अरे जाऊ दे नको मनाला लावून घेऊस, होतं असं कधी कधी. लहान आहेस तू. नकळत होतं असं कधी कधी, तुझा तरी काय दोष त्यात? “
” नाही मावशी, तुम्ही मला सांगाच काय झालं ते?तुम्हाला माझ्या आईची शपथ! ” मी शे शेवटचे अस्त्र बाहेर काढले तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, ” तुझी जात…! “
” आई तुला नको म्हटलं होतं ना…? ” महेश नाराजीने म्हणाला कारण त्याला मला दुखवायचं नव्हतं. लग्नापेक्षा जातीपेक्षा त्याला आमची मैत्री मोठी वाटत होती म्हणून तो आईला सुरुवातीपासून अडवत होता.
” माझी जात? “
” हो अरे तुझी जात तू त्यांना सांगायला पाहिजे होतीस… मग हे पुढचं काही घडलंच नसतं… म्हणजे त्यांनी तुला पसंत करण्याचा प्रश्नच आला नसता. महेशलाच पसंत केलं असतं… “
ते ऐकताच मी महेशकडे पाहिलं तर तो माझ्या डोळ्याला डोळा मिळवू शकत नव्हता ! जे काही घडलं ते आमच्या दोघात होतं ते माझ्या लक्षात आलं होतं परंतु मी मावशींना त्याचं उत्तर देऊ शकत नव्हतो की मुलगी पाहायला जाताना रस्त्यातच महेशने मला आवर्जून सांगितलं होतं की तिथे पाहुण्यांनी काही विचारले तर तू तुझी जात सांगू नकोस.आमच्यातलाच आहे असं सांग.तुझी जात सांगू नकोस नाहीतर घोळ होईल. मलाही त्याच्या असं म्हणायचे खूप वाईट वाटले होते परंतू त्याच्या भूमिकेतून कदाचित ते योग्य असेल म्हणून मी त्याला विरोध केला नाही. जिवलग मित्राला इतकं तर सहकार्य आपण नक्की करू शकतो या भावनेने मी त्याला होकार देवून सहकार्य केले.
आमच्या दोघांचं हे असं ठरलं होतं त्याप्रमाणेच तर मी तसे केलं होतं.तिथे पाहुण्यांनी माझा विषय काढला तेव्हा मी महेशने सांगितलं होतं तसंच सांगितले होते परंतू त्याचा परिणाम असा उलटा होईल हे त्याला बापड्याला तरी काय माहीत होतं ! त्यामुळे आमच्या दोघांच्याही ते प्रकरण चांगलच अंगलट आलं होतं…
महेशला माझी खरी जात माहीत होती परंतू त्या पाहुण्यांना कुठे माहीत होती? त्यांनी दोघांनाही सारखेच जोखले.
त्यांनी माझ्यातले चांगले गुण पाहिले, माझे वागणे बोलणे पहिले अन मला पसंत केलं.
पण मी माझी खरी जात सांगितली असती तर त्यांनी खरेच असे केले असते काय….?
तसे झाले असते तर कदाचित आम्हा दोघांनाही नाकारलं असतं. हो ना?
खरंच, या दुनियेत माणूस मोठा की त्याची जात? हाच विचार करत महेशच्या घरून थेट एसटीत बसून मी माझ्या घरी परतत होतो…
– समाप्त –
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈