डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे

घड्याळात रात्रीच्या नऊचे ठण ठण ठण ठण टोले पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली. माझ्या समोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं, त्यांचा अंत्यविधी करायचा होता.या पंधरा मजली इमारतीत हजारों कुटुंबे होती, पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं. जो तो आपापल्या कोषात मग्न. दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल, काम्युटरवरील WhatsApp, Facebook book, Twitter, Instagram च्या आभासी जगात व्यस्त.

सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली. प्रत्येकाचे RIP, भावपूर्ण श्रध्दांजली, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती, ओम शांती सारख्या मेसेजेसनी WhatsApp फुल झालं. Vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं, केलंय आपण सांत्त्वन हीच धारणा सगळ्यांची. पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही, मदत करणे तर दूरच.

बरे माझे नातेवाईकही भरपूर, सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे. बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.

“चांगल्या डाॅक्टरला दाखवा, ट्रिटमेंट करा, काळजी करु नका,  होतील बाबा बरे, अशा संदेशांनी, होय संदेशच, आभासी जगातला. कोणी video call वरही बोलले, पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची.कोणाच्या घराचं बांधकाम, मुलांच्या परीक्षा, नोकरीतून रजा न मिळणं, कोणाचा भराला आलेला शेती हंगाम, अर्थात कोणी येणार नव्हतंच.

“अहो, काहीतरी करा ना. रात्र वाढतेय, पिंटू ही पेंगुळलाय, पण झोपत नाहीय. आजोबांना सारखं उठवायला सांगतोय, कसं समजावू त्याला.”

“होय ग, मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला”

साडेनऊचा टोला घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं, जुन्या काळातलं, ठण ठण टोल देणारं, माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं, अनेक वेळां दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं…

दुपार पासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले. जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले, “नाही जमणार हो मला यायला, माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे, त्याला आणायला जायचंय.”

चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो. अरे भाईसाहब, मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे, उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे…

तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला, “आलो असतो रे, पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी. प्रबोधनात्मक भाषण तर असतेच, पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस. धीर धर,स् वतःला सांभाळ.”

सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर, अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा अशौच (मयतीत जाणं,सुतकीय कार्य) प्रसंगी आज नाही येता येणार मला.

शेजारचा “स्वामीनाथन” नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील “सुत्रावे” वीकएंडला गेलेला….

दुसर्‍या माळ्यावरील “कोटनाके” कवी संमेलनासाठी जाणार होते. प्रत्येकाची काही ना काही कामे. घाबरू नको, येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.

काय करू..? आज पावसानेही हैराण केलेलं. दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती, आता त्याचाही जोर वाढला होता, मला तर भडभडून आलं.

मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती, पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 

शेवटी मनाचा निग्रह करून उठलो, माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता. हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.

“संतोष” माझा काहिसा कापरा, आर्त, दाटलेला, अवरूध्द स्वर ऐकून तो म्हणाला, “काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी”

अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही. मदतच नाही मिळाली रे मला कोठे.”

“ओह…बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका. माझे चार दोस्त आताच बोलावतो. करू आपण सगळं व्यवस्थित”. त्याने फटाफट मोबाईल वरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.

ये महेश, येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील ? होय आपल्या बाबासारखेच आहेत ते. या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. दिनेश, शिवा आणि मधुकरलाही सांगशील…

सगळं कसं फटाफट झालं पाहिजे, रात्र वाढतेय, पाऊसही हैराण करतोय.

संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्या पासुन तर तिरडी बांधण्या पर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.

“मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो” “अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा, माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही, बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही.

चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली. बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला. संतोषनं मला सावरलं, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत, मला मुखाग्नी द्यायला लावला. पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला. बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला. चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला, “चला दादानु, घरी चला… वहिनी वाट बघत्याल “संतोषनं मला घरी सोडलं. 

“येतो दादा”…

“थांब संतोष” मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या, “घे संतोष”…

हे काय दादानु, पैसे नकोत मला.” 

“अरे तुम्ही खर्च केलात, वेळेवर धावून आलात, ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती, याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे. पण शेवटी हा व्यवहार आहे. घ्या हे पैसे”

दादानु…”तुमचे बाबा आमचे बी बाबाच की. नको मला पैसे.

शेवटी काय असतं दादानु, “माणूस मरतो हो, माणुसकी नाही. इथे व्यवहार गौण ठरतो दादा, येतो मी…”

वहिनीस्नी सांभाळा. पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.

बाहेर पाऊसही आता मंदावला होता. बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती… 😥

या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती…..!

नर देह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments