श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

एखादा दिवस असा उगवतो की काहीच करायची इच्छा होत नाही. फक्त कंटाळा आणि कंटाळा. सुट्टी असूनही प्रचंड बोर झालेलो. काय करावं सुचत नव्हतं. एकदम कपाट आवरायची लहर आली. पसारा बाहेर काढताना जुनी लाल डायरी सापडली. उत्सुकतेनं पानं चाळताना ‘मन’ जुन्या दिवसात गेलं. तीसेक वर्षापूर्वीच्या नोंदी,सहा आकडी लँडलाईनचे नंबर पाहून गंमत वाटली. एका नंबर जवळ नजर थबकली. त्यावर कधीच फोन केला नाही की त्या नंबरवरून कधी फोन आला नाही तरीही. . . . . . आपल्या मोबाईलमध्ये नाही का काही नंबर उगीचच सेव्ह असतात अगदी तसंच. जुन्या आठवणीत हरवलो असताना मोबाईलच्या आवजानं वास्तवात आणलं.

“कुठं आहेस”ऑफिसमधल्या मित्राचा फोन.

“घरी”

“म्हणजे तुला कळलं नाही ”

“काय झालं. मी कायम ऑनलाइन नसतो. ”

“व्हॉटसप चेक कर. उद्या नवीन सीईओची व्हिजिट आहे. आत्ता सगळ्यांना कंपनीत बोलावलयं”

“अशी एकदम अचानक व्हिजिट”

“उद्या आल्यावर डायरेक्ट विचार”मित्र वैतागला.  

“माझ्यावर कशाला चिडतोस. ”

“मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. . सोड ना लवकर ये. बाय” 

कसं असतं ना आपलं आयुष्य!!

काहीवेळा पूर्वी काय करावं सुचत नव्हतं अन आता डोक्यात कामांचा विचार सुरू झाला. गडबडीत आवरून ऑफिसला पोचलो. सीईओ येणार म्हणून सगळेच टेंशनमध्ये आणि दडपणाखाली होते. जो तो रेकॉर्ड अपडेट करण्याच्या प्रयत्नात आणि आमचे साहेब तर प्रचंड अस्वस्थ. क्षुल्लक कारणावरून चिडत होते. दिसेल त्याला झापत होते. अशा तणावपूर्ण वातावरणात काम करून रात्री उशिरा घरी आलो अर्थातच शांत झोप लागली नाही.

सकाळी नेहमीपेक्षा लवकरच ऑफिसला पोचलो. वातावरण रोजच्या सारखं  नव्हतं.  सगळ्यांच्या चेहऱ्यावर अदृश्य तणाव होता आणि तो क्षण आला. पाचच मिनिटांत सीईओ पोचत आहेत असा निरोप आल्यावर सगळे एकदम दक्ष. काही वेळातच महागडी काळ्या रंगाची कार दारात थांबल्यावर साहेब दार उघडायला धावले आणि सगळे डोळे फाडून पाहू लागलो. गाडीतून उतरलेल्या सीईओंना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.

 ऊंच,स्मार्ट,गोरा रंग,चाळीशी पार केलेली तरी देखणंपण लपत नव्हतं,काळा गॉगल लावलेल्या मॅडमना पाहून दबक्या आवजात चर्चा सुरू झाली. साहेबांनी बुके देऊन स्वागत केलं आणि टीमची ओळख करून द्यायला सुरवात केली तेव्हा मॅडमनी थांबवलं. “नो फॉर्मॅलिटीज, ओळख नंतर होईलच. लेट्स स्टार्ट द वर्क” मॅडमचा पवित्रा बघून दिवस कसा जाणार याचा अंदाज आला. अभिवादनाचा स्वीकार करत जात असताना मला पाहून अचानक मॅडम थांबल्या अन गॉगल काढून हसल्या तेव्हा भीतीची लहर सर्वांगातून गेली. विचारांच्या भुंग्याचं कुरतडणं सुरु झालं.  

“मॅडम तुझ्याकडं पाहून हसल्या का रे?”मित्रानं विचारलं. ) 

“मला काय माहिती. जा त्यांनाच विचार. . ”

“जुनी ओळख वाटतं?”

“डोंबल!!त्या कुठं मी कुठं,आज पहिल्यांदाच बघितलं. ”

“मग तुझ्याविषयी रिपोर्ट गेलेला दिसतोय. बेस्ट ऑफ लक”मित्रानं विनाकारण टेन्शन वाढवलं. मॅडम प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन माहिती घेऊ लागल्या. माझ्या इथं आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली तेव्हा मॅडम “येस आय नो अबाऊट हिम” एवढं बोलून कामासंदर्भातले प्रश्न विचारून पुढे गेल्या. दोनदा झालेल्या भेटीत मॅडमचं वागणं वेगवेगळं होतं. आपल्याकडून मोठी चूक झालीयं आणि त्याची दखल मॅनेजमेंटनं घेतलीय याची खात्रीच पटली. कोणत्याही क्षणी केबिनमधून बोलावणं येईल या धास्तीनं काम करत होतो पण तसं काहीच झालं नाही. दिवसभर मॅडम मिटिंग्स,प्रेझेंटेशन यामध्ये बिझी होत्या. दुपारी चार नंतर ‘ऑल द बेस्ट,किप अप द गुड वर्क’ म्हणत मॅडम कंपनीतून बाहेर पडल्या तेव्हा सगळ्यांनी मोठ्ठा सुटकेचा नि:श्वास सोडला.

“या पठ्ठ्यानं मॅडमना जिंकलेलं दिसतंय”मित्रानं पुन्हा खोडी काढली.   

“ए बाबा,गप ना. कशाला उगीच?”

“अरे गंमत केली. उगीच चिडू नकोस. ”

“तसं नाही रे. कालपासून टेन्शन होतं पण बाईंनं जास्त छळलं नाही. ”साहजिकच मॅडमविषयी चाय पे चर्चा सुरू झाली. इतक्यात फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मिस्टर अनिल”

“येस”

“धीस ईज सीईओ हियर. . . . . . ” अनपेक्षितपणे मॅडमचा आवाज ऐकून जबरदस्त झटका बसला.  

“गुड मॉर्निंग,सॉरी!!गुड इव्हीनिंग माफ करा. ”माझी त्रेधा तिरपिट उडाली.  

“घरी जायच्या आधी मला भेटा. महत्वाचं बोलायचंयं. सी यू”

“कोणाचा फोन होता रे”मित्रानं विचारलं.

“काही सिरियस नाही ना. घाबरलेला दिसतोयेस. ” 

“ नाही रे . डोन्ट वरी” घरी निघताना मघाच्याच नंबरवरुन हॉटेलचा पत्ता असलेला मेसेज आला. म्हणजे मघाशी खरंच सीईओंचा फोन होता. पोटात भीतीचा गोळा आला.

हॉटेलवर पोचल्यावर तिथला हायफायपणा पाहून आत जायची हिंमत होईना. दारातच घुटमळत होतो. परत फिरावं असं वाटत होतं. तितक्यात मॅडमचा फोन “आलात का,मी रेस्टॉरेंटमध्ये आहे. तिथ या”आत शिरताना छातीची धडधड वाढली. बावरलेल्या नजरेनं पाहताना एका टेबलावर मॅडम दिसल्या. समोर जाऊन उभा राहिलो.  

“बसा”मॅडम सांगितलं.

“नको”

“मिस्टर अनिल,बसा” मॅडम चढया आवाजात म्हणल्यावर निमूटपणे खुर्चीवर बसलो. बेचैनीमुळं उजवा पाय जोरजोरात हलायला लागला.  मॅडम फक्त एकटक पाहत होत्या त्यामुळे जास्तच अवघडलो. दोन ग्लास पाणी पिलं तरी घशाला कोरड पडली.

“रिलक्स,मी तुम्हांला खाणार नाही” 

“मॅडम,नक्की झालंय काय?माझी काय चूक ये ?इथं का बोलावलंय”

“मि. अनिल सगळं कळेल. जरा धीर धरा. ”मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला. तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र… 

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments