सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ हरवले ते गवसले कां ? – लेखक : श्री अनिल रेगे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

बरीच वर्षे झाली या घटनेला. पण अजूनही तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो. मी बहुतेक नववीत होतो तेव्हां. माझ्या वडलांची चुलत….चुलत बहिण दादरला राहत होती. तशी लांबची असली, तरी त्या काळी सर्व नातीगोती श्रद्धेने जपली जात. आमच्याकडे गोरेगांवला एक गृहस्थ घरी केसांसाठी आयुर्वेदिक औषधी तेल बनवीत. माझी  आत्या त्यांनी बनवलेली औषधी तेलं वापरत असे. 

‘त्या’ दिवशी त्या गृहस्थाकडून तेलाचा मोठा शिसा घेऊन तो आत्याकडे दादरला पोंचवण्याची जबाबदारी मला देण्यांत आली होती. त्याप्रमाणे मी आत्याकडे गेलो व तिला तो तेलाचा शिसा दिला. “किती झाले रे ?” आत्याचा नेहमीचा प्रश्न आला.

“पैशाविषयी कांही बोलू नकोस, असं काका म्हणालेत. बरं मी निघू ?” मी विचारले. 

“अरे थांब. चहा तरी घे.” मी मानेनेच ‘मला चहा नको’ अशी खूण केली. “बरं मग करंजी तरी खा” आत्याने आग्रह केला. मी करंजी-मोदकाला नाही म्हणणं, म्हणजे बगळ्याने माशाकडे पाठ फिरवण्यासारखे होते. मी तब्येतीत दोन करंज्या हाणल्या. तेवढ्यांत आत्याची मुलगी…मी तिला बेबीताई म्हणायचो ती एक पिशवी घेऊन समोर आली. अरे हो ! या बेबीताईविषयी सांगायचे राहिले. ती जन्मत:च मुकी व बहिरी होती. पण रूपाने अत्यंत देखणी. अगदी माला सिन्हाची ड्युप्लीकेट. माझ्यापेक्षा वयाने साधारण दहा वर्षांनी मोठी. बेबीताई मला खुणेने कांहीतरी सांगत होती. तेवढ्यांत आत्याच म्हणाली “अरे, ती गोरेगांवला जायचं म्हणतेय. नेशील कां व्यवस्थित तिला ?” आता या प्रश्नावर मी तरी काय बोलणार. मानेनेच ‘हो’ म्हणालो. “बेबीताई माझा हात सोडू नकोस हां !” हे वाक्य मी बोलून आणि खुणेने दोन्ही पद्धतीने तिला सांगितले आणि तिनेही मान डोलावून ‘कळलं’ अशी खूण केली. 

वेळ संध्याकाळची होती. दादर स्टेशनवर बरीच गर्दी होती. आम्हाला गाडीत चढायला मिळालं, पण बसायला जागा नव्हती.

जोगेश्वरी स्टेशन पार झालं आणि मी बेबीताईला ‘आता आपल्याला उतरायचं आहे’ अशी खूण केली. गोरेगांवला आम्ही उतरलो आणि संवयीप्रमाणे मी उजवीकडे चालायला लागलो. दोन-तीन मिनिटं चाललो असेन आणि माझ्या अचानक लक्षांत आलं, अरेच्च्या आपल्याबरोबर बेबीताईसुद्धा आहे, पण आत्ता ती कुठे दिसत नाही. मी थांबून मागे पाहिलं, पण गर्दीत कोणीच नीट दिसत नव्हतं. मी जोरजोरात हांका मारू लागलो. माझ्या हांका बेबीताईला कशा ऐकू येतील, हे सुद्धा माझ्या लक्षांत आले नाही. मी जाम घाबरलो. घसा कोरडा पडला. बेबीताई कुठे गेली असेल ? ती हरवली तर घरी काय सांगू ? शेवटी कांहीच सुचेना. मी वेड्यासारखा घराच्या दिशेने धावत सुटलो. बेबीताई माझ्याबरोबर येत होती आणि आता ती हरवली आहे, हे घरी कळल्यावर हलकल्लोळ माजला. “तू कशाला ही जबाबदारी घेतलीस ?” “थोडी तरी अक्कल आहे कां?” “अरे ती बिचारी मुकी पोर. कांही सांगू पण शकणार नाही” चारी बाजूनी माझ्यावर फैरी झडत होत्या. मी कांहीच बोलू शकत नव्हतो. तेवढ्यात आमच्या गोगटेवाडीतील दोन-तीन तरुण मुलगे आवाज ऐकून आमच्या घरासमोर आले.एकंदर परिस्थिती लक्षांत आल्यावर त्यांतला एकजण म्हणाला “काका आम्ही याला घेऊन पुन्हा स्टेशनवर जातो. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या पोलीस मित्रालाही सांगतो. तो नक्कीच मदत करेल. आम्ही निघतो आता.” आणि माझ्या खांद्याला धरून त्यांनी जवळजवळ मला ओढतच तेथून न्यायला सुरवात केली.

 “अरे हा मूर्ख कार्टा आणि याच्या भरोश्यावर एका तरण्याताठ्या मुलीला त्यांनी पाठवलंच कसं ? अरे हा बिनडोक पोरगा शाळेत दप्तर विसरून येतो. अक्कलशून्य आहे. आणि हा ही जबाबदारी घेतो ?” ते सर्वजण माझी सालं काढू लागले. मी गप्प होतो. तोंडातून शब्द निघाला तर मार पडायचा. 

आम्ही स्टेशनच्या दिशेने येताना त्यांतल्या एकाने विचारले “तू कुठून येत होतास ? जिन्याने की रेल्वे ट्रॅकच्या बाजूने ?” मी म्हणालो “रेल्वे ट्रॅकच्या दिशेने.” 

“अरे गाढवा, रेल्वे ट्रॅकच्या बाजूने कशाला ? जिन्याने पलीकडे उतरून घासबाजारच्या रस्त्याने यायला काय पाय मोडले होते तुझे ? ती नक्कीच जिन्याच्या दिशेने गेली असणार. तुला आधी नीट सांगता आलं नाही तिला ? च्यायला मीपण  कोणत्या गाढवाला विचारतोय ?” तो वैतागाने म्हणाला. आम्ही स्टेशनवर आलो आणि त्यांनी आपसांत ठरवलं. दोघेजण प्लॅटफॉर्म दोनवर चेक करतील व मी आणि एकजण प्लॅटफॉर्म एकवर चेक करू. (त्याकाळी गोरेगांवला दोनच प्लॅटफॉर्म होते). “कोणीही एकटी तरुण बाई दिसली तर लगेच तिला खुणेने विचारा ती बीनाताई आहे कां ?” आमच्यातला लीडर म्हणाला….

“अरे पण अनोळखी तरुणीला खुणा कशा करणार ? भलताच अर्थ काढून त्यांनी आरडाओरड केली तर लेने के देने पड जायेंगे” दुसऱ्याने शंका व्यक्त केली. मग सर्वानुमते कागदावर मोठ्या अक्षरांत “ आपण बिनाताई आहांत काय ? आम्ही आपल्याला न्यायला आलो आहोत.” अशा ओळी लिहून तो कागद त्यांना दिला. मी बरोबर असल्यामुळे आम्हाला तसा कांही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही दोन्ही प्लॅटफॉर्म या टोकापासून त्या टोकापर्यंत पालथे घातले. पण उपयोग शून्य. बेबीताई कुठेच दिसली नाही. शेवटी आमच्या लीडरने स्टेशन मास्तरांकडे तक्रार नोंदवायचे ठरवले. आम्ही चौघेजण स्टेशनमास्तरांच्या केबिनचा दरवाजा ढकलून आंत गेलो आणि माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. जिला शोधण्यासाठी आम्ही जंग जंग पछाडले होते, ती बेबीताई स्टेशन मास्तरसाहेबांच्या केबिनमध्ये ऐटीत खुर्चीत बसली होती. तिच्या हातात कॉफीचा ग्लास होता. मला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि खुणेनेच तिने स्टेशनमास्तरसाहेबांना माझ्याबद्दल कांहीतरी सांगितले. ते पुढे आले. कायरे मुला, कुठे हरवला होतास तू ? या ताई खूप घाबरल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी हा सर्व भाग चेक करायला लावला. मालाड ते बोरिवली संदेश पाठवले. गेला अर्धा तास आम्ही शोधतो आहे तुला. कुठे गेला होतास तू ?” त्यांच्या तोफखान्याने मी पुरता गारद झालो. शेवटी त्यांना मी सर्व हकीकत सांगितली. आमच्या वाडीतील मोठ्या मुलांना घेऊन मी बेबीताईला शोधायलाच आलो होतो, हे पण सांगितले. स्टेशनमास्तरसाहेबांनी त्यांच्या लॉगबुकांत सर्व नोंदी केल्या आमची नांवे पत्ता सर्व कांही लिहून घेतलं आणि आम्ही बेबीताईला घेऊन घरी आलो.

पण हा किस्सा इथेच संपत नाही, TRUTH IS STRANGER THAN FICTION (वास्तव हे कल्पितापेक्षा अद्भूत असतं) या सुभाषिताचा प्रत्यय आम्हाला यायचा होता.

वरील घटनेला चार-पांच दिवस उलटून गेले होते. आमच्या गोगटेवाडीच्या घरी सकाळीच एक पाहुणे आले. मी त्यांना लगेच ओळखले. तेच स्टेशन मास्तरसाहेब होते ते. मी त्यांची घरातल्या मोठ्या माणसांची ओळख करून दिली. स्टेशनमास्तर साहेबांचं आडनांव प्रभू होतं. ते म्हणाले “मी एका खास कामानिमित्त तुमच्याकडे आलो आहे. माझा भाचा चांगला शिकलेला आहे. **** बँकेत नोकरीला आहे. तुमच्या भाचीसाठी त्याचं स्थळ घेऊन मी आलो आहे.”

“अहो प्रभू साहेब, पण ही मुलगी बोलू शकत नाही, हे तुम्हाला माहित आहे कां ? बाकी सर्व दृष्टीने ती गृहकर्तव्यदक्ष आहे. स्वयंपाक उत्तम करते. दिसायला छान आहे. पण देवाने वाणी दिली नाही” माझ्या काकांनी थोडसं चांचरतच सांगितलं.

“काका, मला त्याची कल्पना आहे. त्या दिवशी अर्धा-पाऊण तास आम्ही खुणेनेच गप्पा मारत होतो. मध्ये मध्ये ती लिहून सांगायची. फार हुशार आहे तुमची भाची. माझा भाचा सर्व दृष्टीने चांगला आहे. फक्त त्याच्या पायांत किंचित दोष आहे. त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा किंचित तोकडा आहे. त्यामुळे तो थोडासा लंगडत चालतो. एवढा एक दोष सोडला तर लाखात एक मुलगा आहे. हुशार आहे. इंग्लीश विषय घेऊन बी.ए.ला फर्स्टक्लास मिळवला आहे. नंतर लॉची पदवी मिळवली. बँकेत ज्युनियर ऑफिसर आहे. निर्व्यसनी, रूपाने चांगला. बघा पसंत पडतो कां ?” प्रभू साहेब अगदी तळमळीने बोलत होते.

“ठीक आहे. शुभस्य शीघ्रम्. मी तुम्हाला पत्ता लिहून देतो माझ्या दादरच्या बहिणीचा. परवा रविवार. तुमच्या भाच्यालाही सुट्टी असेल. त्याला घेऊनच तिथे या. आम्ही तिथेच असू. दोघेही एकमेकांना बघतील व तुम्ही माझ्या बहिणीशी व तिच्या यजमानांशी बोलून घ्या.” काकांच्या बोलण्यावर प्रभू साहेबांनी मान डोलावली.

मग सर्व कांही चित्रपटांत घडतं तसं झालं. माझी आत्या तर घरी चालून आलेलं स्थळ पाहून आनंदाने वेडी झाली. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडले. विवाहाचा खर्च अर्धा-अर्धा करायचं ठरलं. हुंडा, मान-पान अशा बुरसटलेल्या पध्दतींना, दोन्हीकडच्या लोकांनी पूर्णपणे कात्री लावली. आणि पुढच्याच महिन्याचा मुहूर्त निघाला. 

“देवाच्या मनांत आलं तर तो एखाद्या गाढवाकडूनही मोठी मोठी कामे करवून घेतो.” माझी आत्या मला उद्देशून म्हणाली.  मला गाढव, अक्कलशून्य, मूर्ख, धांदरट ही सर्व विशेषणं ऐकण्याची आधीपासून संवय होती. त्यामुळे आत्याने मला दिलेल्या ‘गाढव’ या उपाधीबद्दल अजिबात वाईट वाटलं नाही. 

विवाहाच्या रिसेप्शनसमारंभाला मी स्टेजवर गेलो. “भावोजी मनापासून अभिनंदन” मी बेबीताईच्या ‘अहो’ना म्हटलं.

“अरे, तू काय अभिनंदन करतोस बाबा, मीच तुला मनापासून धन्यवाद देतो. तुझी आणि हिची त्यादिवशी चुकामुक झाली नसती, तर आमच्या भाग्यांत बीनादेवी कुठून आल्या असत्या ? तू त्या नळ-दमयंती आख्यानातल्या राजहंसासारखा आहेस आमच्यासाठी. केवळ तुझ्यामुळेच हा दिवस दिसतो आहे. तू सांगशील तिथे तुला माझ्याकडून पार्टी नक्की. शिवाय खास तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे. रिसेप्शन आटोपलं की देतो तुला.” बेबीताईचा  नवरा भलताच खूष दिसत होता. मी बेबीताईकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत अवघा आनंद दाटला होता. “बेबीताई तू खुश आहेस ना?” मी तिला खुणेने विचारले. त्यावर बेबीताई अशी बेफाम लाजली की ‘गाढव ते राजहंस’ या माझ्या व्यक्तिमत्व प्रगतीचे आईशप्पथ सार्थक झाले. 

लेखक:- श्री अनिल रेगे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments