सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-3 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

पाटणकर फॉर्मात आला होता. कारण आता त्याची गाठ भूताशी होती. थापा मारायला आणि बाता ठोकायला त्याला आता बराच वाव होता.

“आमच्या गावच्या विठोबाच्या देवळाचे आम्ही पुजारी.”  पाटणकर भूताशी वार्तालाप करीत होता. “पूर्व परंपरागत चालत आलेला हा मान आम्ही प्रयत्नपूर्वक जपत होतो. लहानपणी माझ्या मानेला एक गळू झालं होतं.काही केल्याने ते बरे होईना. तेव्हा माझ्या आईने विठ्ठल चरणी नवस बोलला  ‘देवा माझ्या लेकराला बरं कर, तो तुझी जन्मभर यथासांग पूजा करेन.’

विठुराया तिच्या नवसाला पावला. मी ठणठणीत बरा झालो.

यथावकाश मोठा झालो डॉक्टर झालो अन् मुंबईत आलो. विठुरायाची पूजा करायला दुसरे पुजारी आले. विठुरायाच्या पूजेत कधीच खंड पडला नव्हता. सर्वकाही यथासांग चालले होते. मी विठुरायाची वारी ही कधी चुकवली नाही.

आत्ताच करोनामुळेआमची वारी चुकली” म्हणून पाटणकरने करोनाच्या नावाने कडाकडा बोटं मोडली.

“भूत काय करत होतं रे? ऐकत होतं तुझं सगळं?”जोश्याचा बालिश प्रश्न!त्यावर पाटणकर म्हणाला, “आता तुम्ही कसे तल्लीन होऊन ऐकताहात ना ? तसेच ते पण माझे बोलणे तल्लीन होऊन ऐकू लागलं. माझ्या मानेवरची त्याची पकड थोडी सैल झाली होती”

पाटणकरच स्वप्न खूपच रंजक होत चाललं होतं आणि आमची उत्सुकताही शिगेला जाऊन पोहोचली होती.

“पुढे काय झालं?”मी पाटण्याला बोलत केलं.

“मी भुताकडे विठुराया बद्दल तक्रार केली. यंदा या करोनामुळे आम्हा वारकऱ्यांची वारी चुकली यात आमचा काय दोष? पणआता विठुराया आम्हा वारकऱ्यांवर रुसलाय.’ठेयेची बैसुनी मन करा रे प्रसन्न’ असं म्हणायला लागलाय आम्हा वारकऱ्यांना! मन अगदी व्याकूळ झालं आहे आम्हा वारकऱ्यांच ! काय करू ? आज दगडावर बसून त्यालाच आळवत होतो रे भुता… आणि गाणं म्हणत होतो ‘अजि म्या ब्रह्म पाहिले”

“मग? पुढे?” आमची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.

तू अगदी खरं बोललास. मी तुझ्यावर खुश आहे! भूत माझ्यावर खूश झालं होतं.

“चला! भूताशी तरी खरं बोललाआमचा पाटणकर.”असे म्हणून पेंडसेने मला चिमटा काढला.

“पण जोवर विठुराया का रुसला? चंद्रभागा का नाही हसली ? या प्रश्नांची उत्तरे तू शोधून काढत नाहीस तोवर मी तुझ्या मानगुटीवरच बसणार.

मी भुताला अगदी खरं खरं सांगायचं ठरवलं. ”पाटणकरचा चेहरा अगदी निरागस वाटू लागला होता.

“काय सांगितलंस?” आमची उत्सुकता ताणली गेली. पाटणकरने स्टोरी सांगायला सुरुवात केली….

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments