सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
जीवनरंग
☆ “चित्राहुती…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
मुंज मुला रे मुंज मुला
चल म्हण रे ओम भवती
मंत्र जपावा गायत्री
कर संध्या तू रोज परि……
असे मधुर आवाजात कोणीतरी मुंज म्हणत होते (मुंज म्हणजे मुंजीच्या वेळेस गायले जाणारे गीत) प्रशस्त असा गोखल्यांचा वाडा. चारी बाजूंनी सजावट केलेला वाडा खूपच रुबाबदार दिसत होता. वाड्याच्या मोठ्या दरवाजासमोर सुरेख रांगोळी काढली होती. वाड्याच्या मधोमध अंगणात राघवचे मौंजीबंधन
म्हणजे आप्पासाहेब गोखल्यांच्या
नातवाचे मौंजीबंधन अगदी थाटात सुरू होते. आठ वर्षाचा छोटा बटू म्हणजे राघव खूप गोड दिसत होता.
भरपूर नातलग मंडळी जमली होती. आप्पासाहेबांचे चिरंजीव गोपाळराव आणि त्यांच्या पत्नी गायत्रीताई पुण्यवचन बसले होते.
होम सुरू असताना आप्पासाहेब गुरुजींना म्हणाले,
“गुरुजी, माझ्या नातवाला ( राघवाला) सगळे नियम नीट समजावून सांगा, म्हणजे रोज संध्या करताना किंवा सर्व नियमांचे पालन करताना तो मला सारखे प्रश्न विचारणार नाही.”असे म्हणून आप्पासाहेब हसू लागले. नातू राघव मात्र कावराबारा होऊन पाहत होता आता मला कसले नियम सांगतायत हे गुरुजी असे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सर्व विधी पार पाडत असताना गायत्री मंत्र सांगण्याचा विधी आला आणि गुरुजींनी गोपाळरावांना सांगितले,
“गोपाळराव, राघवाच्या कानात गायत्री मंत्र सांगा बरं आता”. तेव्हा गोपाळरावांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्र सांगितला. भिक्षावळीचा विधी यथासांग पार पडला…… प्रत्येक जण भिक्षा घालत असताना राघव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे “ओम भवती भिक्षाम देही” म्हणत होता.
यज्ञोपवीत घातलेला, डोक्याचे संजाब केलेला, हातात झोळी, एका हातात पळसाची काठी खूप गोड दिसत होता राघव. उपनयन सोहळा अगदी आनंदात पार पडला. चार दिवस सगळी पाहुणे मंडळी राहिली आणि मग आपापल्या घरी गेली. आता खरा दिनक्रम सुरू झाला होता राघवचा.
रोज सकाळ संध्याकाळ आप्पासाहेब राघवकडून संध्या करून घेत होते. एक दिवस राघवने आजोबांना विचारले,
“आजोबा यज्ञोपवीत का घालायचे”. तेव्हा आप्पासाहेब हसले आणि म्हणाले,
“सांगतो बर बाळा,आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितले आहे त्या प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार आहे बरं का? यज्ञोपवीत म्हणजे कापसाचे तीन धागे ते कायम छातीवर ठेवावेत कारण त्याचे घर्षण झाल्याने विद्युतभार निर्माण होतो,सर्व रक्तवाहिन्या प्रसरण पाहून जागृत होतात. आपली विचार क्षमता वृद्धिंगत होते आणि आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर बिनचूक उत्तरे आपली आपण शोधू शकतो. आता मी काय करू या चिंतेतून सुटण्याचा यज्ञोपवीत हा एक मार्ग आहे. राघवला जानव्याचे महत्व पटल्यामुळे तो जानव्याला खूपच जपत होता. गायत्री मंत्रही अगदी मन लावून म्हणत होता.
संध्या करून झाल्यानंतर आजोबांसोबत राघव जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात आला. आजोबांनी त्याला पाटावर बसण्यास सांगितले. आप्पासाहेब ही त्याच्या बाजूला जेवावयास बसले. राघव चे बाबा, काका सारी भावंड ही जेवावयास बसली होती. सर्वजण पाटावर बसले होते व समोर भोजनपात्र ठेवले होते. स्वच्छ शेणानी सारवलेल्या स्वयंपाक घरात जेवणाची पाने मांडली होती. आप्पासाहेबांनी भोजनपात्रावर बसल्यावर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय म्हणावयास सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ घरातील सर्वजण अध्याय म्हणू लागले. राघवलाही रोज ऐकून पंधरावा अध्याय पाठ झाला होता. तोही त्यांच्याबरोबर हात जोडून म्हणू लागला. अध्याय म्हणून झाल्यानंतर अप्पासाहेब राघव कडे पाहून म्हणू लागले,
“राघवा, जेवण करणे म्हणजे केवळ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी जेवण करावयाचे नाही तर तोही एक वैश्वानर अग्नीला शांत करण्यासाठी केलेला एक यज्ञ आहे, म्हणून तो करण्याच्या आधी म्हणजेच जेवण करण्याच्या आधी काही नियम आपल्याला पूर्वजांनी घालून दिलेले आहेत त्याचे आपण अगदी व्यवस्थित पालन केले पाहिजे.”असे म्हणून आप्पासाहेबांनी राघवला सांगितले,”जमिनीवर बारीक कीटक असतात व ते आपल्या ताटामध्ये येऊ नयेत म्हणून ताटा भोवती एक पाण्याची रेषा काढावयाची व नंतर ताटाच्या उजव्या बाजूला चित्राहुती ठेवावयाची. हे दोन्हीही कर्म करताना मंत्र म्हणावयाचे जेणेकरून आपण ठेवलेली चित्राहुती जमिनीवरचे कीटक खातील. त्यांचे पोट भरेल व ते आपल्या ताटातील अन्न खाणार नाहीत.”
असे म्हणून आप्पासाहेबांनी स्वतः उजव्या हातात पाणी घेतले व राघवलाही उजव्या हातात पाणी घ्यायला लावले व तोंडाने एक मंत्र म्हणावयास लावला.
“सत्यम् त्वर्तेन परिषिञ्चामि।अन्नम् ब्रह्म रसा विष्णुर्भोक्ता देवो महेश्वर:।”
असे म्हणून भोजनपात्रभोवती वर्तुळाकार रेषा काढावयास लावली व नंतर त्या रेषेवर उजव्या बाजूला चित्राहुती ठेवतानाही
परत मंत्र म्हणावयास लावला.
“चित्राय स्वाहा। चित्रगुप्ताय स्वाहा। यमाय स्वाहा। यमधर्माय स्वाहा। अमृत परस्तरण मसि।सर्वेभ्यो भूतेभ्य: स्वाहा।”
असे म्हणून आप्पासाहेबांनी चित्रहुती ठेवावयास सांगितल्या. आता आप्पासाहेबांना राघवच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न दिसत होते. त्याला या मंत्राचा अर्थ हवा होता. त्याच्या चेहऱ्यावरची कुतूहल पाहून आप्पा हसले आणि विचारले,
‘काय झाले राघवा.’ राघव म्हणाला,
“आजोबा, या मंत्राचा मला अर्थ सांगा”. आप्पासाहेब म्हणाले,
“काळजी करू नको, मी तुला अर्थ सांगणार आहे त्याशिवाय आज आपण जेवण करावयाचे नाही.”
आप्पा राघव सोबत सर्वांनाच सांगत होते,”आपल्या भोजनपात्राखाली मंडल केलेले असते. मंडल कशासाठी करतात तर आपल्या भोजनपात्राखाली मंडल करण्यामुळे पात्र स्थान निश्चित होते व मंडलावर सर्व देवांचा वास असतो म्हणून ताटा भोवती उजव्या हातात पाणी घेऊन, मंत्र म्हणून, वर्तुळाकार रेषा काढतात. चित्र आणि चित्रगुप्त हे आपल्या कर्माची नोंद ठेवणारे आणि यम आणि यम धर्म हे मानवी जग रहाटीवर नियंत्रण ठेवणारे असल्यामुळे त्यांना आहुती देऊन आदर व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून चित्राहुती ठेवताना हे मंत्र म्हटले जातात.”
राघवचे समाधान झाले होते. त्याने आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हटला व भोजनपात्राभोवती पाण्याची वर्तुळाकार रेषा काढली व नंतर मंत्र म्हणतच चित्राहुतीही घातली. सर्वांनी प्रसन्न मनाने भोजन केले.
भोजन झाल्यानंतर आप्पा सागू लागले,
“आपली भारतीय संस्कृती इतकी आदर्श आहे की ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपल्या साऱ्या परंपरांची आणि त्या मागच्या शास्त्रीय दृष्टिकोनाची माहिती देत आली आहे. राघवा, आज मी जे सर्व काही तुला सांगितले ते तू आयुष्यभर लक्षात ठेव आणि तुझ्या पुढच्या पिढीला याचे महत्त्व पटवून दे तरच तिचे पालन केले जाईल आणि त्याचे फायदेही पुढच्या पिढीला देखील मिळतील”. राघवही हसत हसत हो म्हणाला.
आज इतक्या वर्षानंतर राघवला त्याच्या मुंजीची ही सारी घटना आठवत होती कारण आज आप्पा साहेबांच्या जागेवर राघव साहेब होते आणि त्यांच्या नातवाची मुंज झालेली असल्यामुळे त्याला संस्कृतीचा परिपाठ देण्याची वेळ आज राघववर आली होती. राघव गालातल्या गालात हसला कारण आज हयात नसलेल्या त्याच्या आजोबांची म्हणजेच आप्पासाहेबांची त्याला सारखी आठवण येत होती व त्यांनी सांगितलेले सर्व धडे राघव आता त्याच्या नातवाला देत होता. एक सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक घडवण्याची कला जी त्याला त्याच्या आजोबांनी शिकवली होती तीच शिकवण आज नातवाला देताना राघवचा ऊर अभिमानाने भरून आला होता. राघव नातवाला चित्राहुती घालताना चा मंत्र शिकवत असताना पाहून स्वर्गातून आप्पासाहेबही तितक्याच समाधानानी हसत असतील नाही का?
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈