श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

तू सध्या काय करतेस ? – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर

पद्मा हॉटेल जवळ श्री ने रिक्षा सोडली. हातावरील घड्याळाकडे नजर टाकली. चार वाजुन पाच मिनिटं झाली होती. बापरे. पळा आता. बस मिळण्याची शक्यता तशी कमीच. तो धावत धावतच स्टैंडवर गेला. नाशिक-पुणे शिवशाही निघण्याच्या तयारीत होती. मिळाली बस एकदाची. बसमध्ये चढला, सीट नंबर शोधून काढला.१७आणि१८या जोडसीटवरील १७नंबर त्याचा होता.१८नंबरच्या विंडो सीटवर एक मुलगी बसली होती. तिच्या शेजारी जावुन बसला.

तो बसला आणि बस सुटलीच.श्री ने बैग वरती रैकमध्ये ठेवली. खिशातून मोबाईल काढला. इयर पीन कानात घालून गाणे सेट केले आणि मग इकडेतिकडे नजर टाकली.

शेजारी बसलेल्या मुलीकडे त्याची नजर गेली. तोंडाला रुमाल बांधला असल्यामुळे ती कोण.. कशी दिसते.. किंबहुना मुलगी आहे की बाई आहे हे सुद्धा त्याला समजत नव्हते. डोळ्यावर चष्मा. ती पण गाणे ऐकण्यात तल्लीन झाली आणि. त्याने दुर्लक्ष केले. त्याला कशातच उत्साह वाटत नव्हता. छे! उगाचच नाशिकला आलो.काही उपयोग झाला नाही येथे येउन.

नाशिकरोडला गाडी थांबली. काही जण नव्याने गाडीत चढले. बसने नाशिकरोड सोडले. रेल्वे पुल ओलांडून सिन्नरच्या दिशेने गाडी निघाली.

थोड्या वेळाने शेजारी बसलेल्या मुलीने तोंडाचा स्कार्फ काढला. हो..मुलगीच होती ती. त्याच्याच वयाची. अजुनपर्यंत ते दोघे एकमेकांशी एका शब्दानेही बोलले नव्हते. त्याने तिच्याकडे पाहिले. कुठेतरी बघितल्या सारखा चेहरा वाटतो हा. ओळखीचा वाटतो. डोक्याला त्याने खूप ताण दिला. पण आठवत नव्हते.

चटकन त्याला आठवले. मोबाईल मधून त्याने शाळेतील मित्र मैत्रीणींचा ग्रुप शोधला. सागरमल मोदी शाळेतील त्यांचा whats app वर ग्रुप होता. वेगवेगळ्या मुलींचे DP बघीतले.

अरे हो..हि तर इशा.इशा चंद्रात्रे.आपल्याच वर्गातली. पण ही कशी आपल्याला ओळखत नाहीये.

“हाय”

“अं…हो……हाय.”

“तु इशा ना ? इशा चंद्रात्रे?”

“हो..तु कसं ओळखतोस? मी नाही ओळखलं तुला”

“नाही? अगं मी श्री.. श्रीकांत देवधर.. सागरमल मोदी.. काही आठवते का?”

“अय्या तु तो श्री?मी खरंच नाही ओळखलं”

“बरोबर आहे.. शाळा सोडून पण दहा वर्ष झाली”.

आता ती जरा ओळख दाखवत होती.. पण तरी तुटकपणे.बोलण्याची तिची फारशी इच्छा दिसत नव्हती.

“तु आहेस ना..What’s up वर.सागरमल मोदी च्या ग्रुपवर? मग माझा  DP बघितला नाही कधी? “त्याने विचारले.

“नाही. मी ग्रुपवर आहे फक्त. तेवढ्या पुरती. विक्रांतने घेतले मला ग्रुपवर. पण मला नाही फारसा इंटरेस्ट”.

ती जरा उदासच वाटली. मग जरावेळ दोघेही नुसते गप्प बसुन राहिले. त्याला वाटले.. हिने जरा आपल्याशी बोलावं.चार पाच तास आपण एकत्र प्रवास करणार. इतक्या वर्षांनी भेटलो, प्रायमरी शाळेत आपण एकत्र होतो. त्यानंतर आपले नाशिक सुटले. आता कोण कोण भेटतात.. कोण काय करतात, हिला विचारावे. तेवढाच वेळ पण जाईल. पण ही आपली मख्ख. खिडकीतून बाहेरच बघत बसली आहे. आणि बाहेर तरी काय आहे बघण्यासारखे? रस्त्याची कामे? वाळुचे,खडिचे ढिग?

त्यानेही विषय वाढवला नाही. हिलाच जर बोलायची इच्छा नसेल तर जाऊ द्या ना. आपल्याला तरी काय पडली आहे?

जरा वेळाने तिला कोणता तरी कॉल आला.

“हो..हो..बसले मी गाडीत.. हो..वेळेवर सुटली गाडी.”

“..हो गं बाई.पोहोचल्यावर फोन करते..कसले टेन्शन?”

“काही टेन्शन वगैरे नाहीए मला.. हो..ठेव फोन तु”.

मघापासून तो पहात होता.हि कुठल्यातरी दबावाखाली आहे. म्हणुनच फारशी कशातच उत्सुकता दाखवत नाहिए.विचारावं का हिला?

बोलेल का ती आपल्याशी मनमोकळेपणाने?

“काय करतेस तु सध्या इशा?” शेवटी त्याने सुरुवात केली.

“यंदाच B.E. पुर्ण केलं. E & TC मध्ये”

“मग आता पुढे काय?”

“बघायचे. चालू आहे शोध जॉबचा”.

“कैम्पस मध्ये नाही काम झालं?”

“नाही रे. त्यांना सगळे मेरीटवाले लागतात. मला Agrigate 5o% च आहे”

“तु पुण्याला ये.पुण्यात मस्त जॉब आहेत”.

“तु पुण्यात असतोस?”

“हो.तु आता पुण्याला कशासाठी निघाली आहेस?”

“जाऊ दे.सोड तो विषय. मला ना आता हे जॉब वगैरे विषय काढले ना की एकदम फ्रस्ट्रेशन येतं”.

“वा गं वा.तु तेव्हा तर एकदम डैशिंग होतीस.ते कुठे राणीभवन का कुठे जायसीच ना? मारामाऱ्या शिकायला?”

“ए गप हं.काही पण बोलु नकोस. आणि मारामाऱ्या नाही हं.त्याला आत्मसंरक्षण म्हणतात. ते शिकवायचे तिथे.”

“मग ते शिकुन तर एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजेस.ते का अर्धवट सोडलस तु?”

“हो.चौथीनंतर मी तेथे गेलेच नाही. बाबा संघाचे काम करतात ना.. त्यांनी खूप फोर्स केला.. म्हणून मी गेले. जेमतेम

 दोन तीन वर्ष.”

आता ती जरा मोकळी होउन बोलायला लागली होती. पण तिच्या उदासीनतेचे कारण काही सांगत नव्हती. जरा वेळ तसाच गेला.

आता उन्हाची तिव्रता कमी झाली होती. सुर्य अस्ताला जात होता.

खिडकीतून गार हवा आत येत होती. इशा बाहेर मावळतीच्या सुर्याकडे पहात होती. डोक्यात असंख्य विचार. 

होईल का आपले काम?

मिळेल का आपल्याला हा तरी जॉब?त

विचारावे का ह्याला?

मघा तर म्हणत होता.. पुण्यातच असतो म्हणून.

असेल कुठे त्याची ओळख?

 “इंटरव्ह्यू आहे पुण्यात?”अचानक श्री ने विचारले.

ती दचकली. याने कसे ओळखले.

“अं..! काही विचारले का तु आत्ता?”

“हो.मी विचारले की तु इंटरव्ह्यू साठी पुण्याला चालली आहे का?”

“तु कसं ओळखलं?”

चला, म्हणजे आपण अंदाजानी खडा टाकला, तो बरोबर लागला.

“ते सोड.कुठे आहे तुझा इंटरव्ह्यू? कुठली कंपनी?”

“श्री जाऊ दे ना. कशाला विचारतो आहेस.अजून कशात काही नाही. नाशिकला दोन ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. दोन्हीकडून हात हलवत आले.आता हा तिसरा प्रयत्न. मला त्याचेच टेन्शन आहे. इजा-बिजा-तिजा होते की काय. अजून तु काही विचारु नकोस”

“हे बघ,तु हा इंटरव्ह्यू दे तर खरं. आणि नाही झाले काम ना.. तर काही निराश होऊ नकोस.आपल्या आहेत ओळखी.होऊन जाईल कुठेही तुझे काम” 

क्षणभर थांबून तो म्हणाला,

“अगं कुठेतरी कशाला.. आमच्या राजुमामाचीच कंपनी आहे. त्याला लागतात तुमच्या सारखे B.E. चे फ्रेश मुलं..मुली.E.&TC वाले”.

ती खिडकीतून बाहेर बघत बसली. जणू काही आपल्या शेजारी कोणी आहे.. कोणी आपल्याशी बोलत आहे याची जाणीवच नव्हती. डोक्यात विचार. नुसते विचार. आता आपण घरी भार होऊन रहाण्यात अर्थ नाही. बाबांनी परीस्थिती नव्हती तरी इतके शिकवले. कोठून कोठून पैसे आणून त्यांनी म़ाझे शिक्षण पुरे केले. पुर्वी सारखे काम होत नाही त्यांना आता. आता काही नाही तर, आपला आपण खर्च तरी सोडवला पाहिजे. त्यांच्याकडे आता पैशासाठी हात पसरणे नको वाटते. पण नाही मिळत जॉब. काय करू? इंटरव्ह्यू साठी गेले की अंगाला कंप सुटतो. पाय लटपट करायला लागतात.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments