श्रीमती उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चार अनुवादित लघुकथा : खेळण्याचे दिवस / शंभर रुपये / धर्म अधर्म / मला खेळू द्या ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
१. खेळण्याचे दिवस
घरातलं कपाट खेळण्यांनी भरून गेलं होतं. पत्नीचा विचार होता, कुठल्या तरी भांगारवाल्याला खेळणी विकून टाकावीत. मुले मोठी झाली होती. ती आता खेळण्यांकडे बघतही नव्हती. ती वैतागाने पुटपुटली, त्यातली काही खेळणी सोडली, तर बाकीची अगदी नवीच्या नवी आहेत. ‘दर वर्षी वाढदिवस साजरा करायचो. खूप खेळणी यायची. त्यावेळी, इतर मुलांच्या वाढदिवसाला त्यातलीच काही खेळणी दिली असती, तर खेळण्यांचा असा ढीग लागला नसता. दर वेळी इतर मुलांच्या वाढदिवसाला बाजातून आणून नवीन नवीन खेळणी देत राहिलो. आता भांगारवाला काय देणार? शे-पन्नास.’
भाऊसाहेब म्हणाले, ‘जे झालं ते झालं. आपल्या मुलांचं लहानपण खेळण्यांशी खेळण्यात गेलं, ही आनंदाची गोष्ट आहे. आता तू म्हणालीस तर मी ही खेळणी गरीब मुलांच्यामध्ये वाटून येतो. बाकी काही नाही, तरी एक चांगलं काम केल्याचं समाधान’
पत्नी काहीच बोलली नाही, तेव्हा तिचा होकार गृहीत धरून त्यांनी एका मोठ्या पिशवीत खेळणी भरली आणि ते इंडस्ट्रीयल एरियाच्या मागे बनलेल्या झोपडपट्टीकडे गेले. त्यांच्या मनात येत होतं, मुलं किती खूश होतील ही खेळणी पाहून. भाजी-भाकरी काय, मुलं कशीही खातातच. शरीर झाकण्यासाठी कापडे कुठून कुठून, मागून मागून मुलं मिळवतात. पण खेळणी त्यांच्या नशिबात कुठून असणार? ही खेळणी पाहून त्यांचे डोळे चमकतील. चेहरे हसरे होतील. त्यांना असं प्रसन्न पाहून मलाही खूप आनंद वाटेल. यापेक्षा दुसरं मोठं काम असूच शकत नाही.
झोपडपट्टीजवळ पोचताच त्यांना दिसलं की मळके, फटाके कपडे घातलेली दोन मुले समोरून येत आहेत. त्यांना आपल्याजवळ बोलावून ते त्यांना म्हणाले, ‘मुलांनो, ही खेळणी मी तुम्हा मुलांना देऊ इच्छितो. यापैकी तुम्हाला पसंत असेल, ते एक एक खेळणं तुम्ही घ्या….अगदी फुकट.’
मुलांनी हैराण होऊन त्यांच्याकडे पाहिलं. मग एक दुसर्याकडे पाहीलं. मग खूश होत त्यांनी खेळणी उलटी-पालटी करून पाहिली. त्यांना खुश झालेलं बघता बघता भाऊसाहेबांनाही आनंद झाला. काही क्षणात त्यांना दिसलं, मुलं विचारात पडली आहेत. त्यांचा चेहरा विझत विझत चाललाय.
‘काय झालं?’
एका मुलाने खेळणं परत त्यांच्या पिशवीत टाकत म्हंटलं, ‘मी नाही हे घेऊ शकत. जर मी हे खेळणं घरी नेलं, तर आई-बाबांना वाटेल की मी मालकांकडून ओव्हरटाईमचे पैसे घेतले आणि त्यांना न विचारता त्याचं खेळणं घेऊन आलो. कुणी फुकटात खेळणं दिलय, हे त्यांना खरं वाटणार नाही. संशयावरूनच मला मार बसेल.’
दूसरा मुलगा खेळण्यापासून हात बाजूला घेत म्हणाला, ‘बाबूजी, खेळणं घेऊन करणार काय? मी फॅक्टरीत काम करतो. तिथेच रहातो. सकाळी उजाडल्यापासून ते रात्री अंधार पडेपर्यंत काम करतो. केव्हा खेळणार? आपण ही खेळणी कुणा लहान मुलांना द्या.’
मूळ कथा – खेलने के दिन
मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
२. शंभर रुपये
आलोक आपली पत्नी आभा आणि इतर नातेवाईकांना घेऊन, एक भाड्याचा टेंपो घेऊन, काही प्रेक्षणीय स्थळे पहाण्यासाठी सकाळीच निघाला होता. दिवसभर अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून प्रसन्न चित्ताने ते आता घरी परतू लागले होते. संध्याकाळ गडद होऊ लागली होती. थंडी पडू लागली होती म्हणून मग सगळे जण चहा घेण्यासाठी एके ठिकाणी थांबले. चहा घेऊन ते पुन्हा टेंपोत बसू लागले. टेंपोला लागून टेंपोचा ड्रायव्हर आत्माराम उभा होता. सगळे जण त्याच्या ड्रायव्हिंग कौशल्याची स्तुती करत टेंपोत चढू लागले.
आलोक म्हणाला, ‘मी सकाळपासून पहातोय. आपण सकाळपासून आत्तापर्यंत एकदाही हॉर्न वाजवला नाही. कुणालाही ओव्हरटेक केलं नाही. उलट मागून हॉर्न वाजवणार्यांना रस्ता देत गेलात. खरोखर आपण कमालीचे ड्रायव्हर आहात!’ त्याने भेट म्हणून शंभर रुपयाची एक नोट आत्मारामला दिली. त्याने कृतज्ञतापूर्वक नोट कपाळाला लावत म्हंटलं, ‘ मी ही नोट सांभाळून ठेवेन. खर्च नाही करणार!’
टेंपोत बसल्यानंतर आभा आपली नाराजी प्रगट करत म्हणाली, ‘ आपण चांगल्या कामाची नेहमी प्रशंसा करता. लोकांचा उत्साह, धाडस वाढवता, इथपर्यंत ठीक आहे! पण आत्ता ड्रायव्हरला शंभर रूपाये देण्याची काय गरज होती? ठरलेले पैसे तर आपण दिलेच होते.’ आलोक हसत म्हणाला, ‘कळेल तुलाही… मग तूच या गोष्टीचं समर्थन करशील.’
टेंपो घाटातून जाऊ लागला. धूसरता वाढली होती. समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. आत्माराम मात्र अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवत होता. भीतीने आभाने डोळे बंद केले आणि ती आलोकला चिकटून बसली. गाडी हळू हळू घाटातून बाहेर आली आणि सपाट रस्त्यावरून धावू लागली धूसरता नाहिशी झाली होती. आलोकने आभाला डोळे उघडायला सांगितले. आभा दीर्घ श्वास सोडत म्हणाली, ‘ आपल्या शंभर रुपयाची सार्थकता मला कळली.’
मूळ कथा – नो हॉर्न !
मूळ लेखक – अशोक वाधवाणी
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
३. धर्म- अधर्म
‘ए पोरा, थांब. थांब. तू ही जी दगडफेक चालवली आहेस, ती कुणाच्या सांगण्यावरून?’ दंग्यात सामील झालेल्या एका किशोरवयीन मुलाला पोलिसाने विचारलं.
मुलगा गप्प बसला.
‘तुझं नाव काय?’ यावेळेचा आवाज अधीक कडक होता.
तरीही तो गप्प बसला.
मग आपला आवाज थोडा मृदु करत पोलिसाने विचारले, ‘देवळात जातोस?’
त्याने नकारार्थी मान हलवली.
‘मशिदीत?’
त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
‘चर्चमधे जातोस की गुरुद्वारात?’
किशोर अजूनही गप्पच होता.
‘कोणतं धर्मस्थळ तोडायला आला होतास?’ पोलिसांचा आता स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता.
‘मी सगळी धर्मस्थळं तोडून टाकीन. ‘ तो मुलगा आपल्या मुठी आवळत म्हणाला.
‘कुठे रहातोस?’ पोलिसांनी आश्चर्याने विचारले.
‘अनाथाश्रमात. तिथे कुणालाच माहीत नाही, माझा धर्म कोणता आहे. लोकांना आपण जन्माला घातलेल्या मुलाचं पालन करता येत नाही, आणि निघालेत मोठे धर्माचं पालन करायला. ‘
क्रोध आणि तिरस्काराने बघत तो पुन्हा दगड हातात घेऊन दंगेखोरांच्यात सामील झाला. ‘
मूळ कथा – धर्म – अधर्म
मूळ लेखिका – सत्या शर्मा ‘ कीर्ति’
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
४. मला खेळू द्या.
नितिनने जोरदार शॉट मारला, तशी बॉल नाल्यात जाऊन पडला. आता त्या घाणेरड्या नालयातून बॉल बाहेर कोण काढणार?
चरणू मोठ्या आवडीने त्यांचा खेळ बघत होता. त्याला काही कुणी खेळायला घेतलं नव्हतं.
नितिन त्याला म्हणाला, ‘ए, त्या नालयातून बॉल बाहेर काढ. आम्ही तुला एक रुपया देऊ आणि खेळायलाही घेऊ.’
चरणूला लालसा वाटली. नाल्यात उतरण्यासाठी तो नाल्याच्या काठाला लटकला. अचानक त्याचे हात सुटले आणि तो घाणीत डोक्यावर पडला. ठाणे तडफडात हात-पाय मारायला सुरुवात केली. त्याने जशी काही आपल्या जिवाची बाजी लावली.
बाकीची मुले नाल्याच्या काठावर उभी राहून हसत-खिदळत होती. त्याने लावाकरात लवकर बॉल काढावा, म्हणून टी वॅट पहाट होती.
‘स्साला, खाली बघा… एका रूपायासाठी घाणीत घुसून …’
‘हे गरीब लोक इतके लालची असतात ना, एक रुपयाच काय, एका पैशासाठीसुद्धा ते आपला जीव देतील.’
एवढ्यात चरणू बाहेर आला. डोक्यापासून पायापर्यंत तो घाणीने लडबडलेला होता. हात, तोंड, कपडे सगळं घाणंच घाण.
‘हा घे तुझा रुपया आणि आण तो आमचा बॉल इकडे.’
चरणूने फेकलेल्या रूपायावर पाय ठेवून उभा राहिला आणि गंभीरपणे म्हणाला, ‘मी या एका रूपायासाठी इतका मोठा धोका पत्करला नव्हता.’
‘मग काय शंभर रुपये घेणार?’
‘नाही. मला तुमच्याबरोबर खेळायचं आहे.’
बाकीची मुले खदाखदा हसायला लागली जशी काही त्याने काही अजब गोष्ट सांगितलीय.
‘साल्या, तू आमच्याबरोबर खेळणार? अवतार बघ एकदा स्वत:चा, जसा काही एखादं डुक्कर चिखलात लोळून आलाय.’
‘मी खेळू इच्छितो. तुम्ही खेळा. मलाही खेळू द्या. बोला. खेळायला घेणार की नाही?’ आवाजावर जोर देत त्याने विचारले.
उत्तरादाखल नितिन चिडून म्हणाला, ‘सांगितलं ना एकदा… दे बॉल इकडे आणि पल इथून नाही तर… ‘
जो बॉल थोड्या वेळापूर्वी प्राण पणाला लावून चरणूने नाल्यातून काढला होता, तो बॉल रागारागाने त्याने पुन्हा त्या नाल्यात फेकून दिला. ‘बघतोच, तुम्ही तरी कसे खेळताय’, असा म्हणत तो गंभीरपणे तिथून निघून गेला.
मूळ कथा – खेलने दो
मूळ लेखक – डॉ. कमल चोपड़ा
अनुवाद – उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈