प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ ढवरा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆
त्यावेळी मी इयत्ता 3 रीत होतो. सुज्या आमच्या वर्गात होता. तो सगळ्यात लहान होता. दिसायला गोरापान लालभडक गाजरासारखा होता. त्याचे डोळे किंचित घारे होते. पण तो रडका होता. कोणी त्याची खोडी काढली की लगेच भोकाड पसरायचा. रडताना त्याचे गाल लालबुंद व्हायचे. याशिवाय तो अतिशय भित्रा होता. त्यामुळे वर्गातली जवळपास सगळीच मुले त्याच्यावर आपला हात साफ करून घ्यायची. त्याच्या डोक्यावरची टोपी सतत वाकडी असायची. म्हणजे तो ती सरळ घालायचा परंतू येताजाता कोणी ना कोणी सुज्याच्या डोक्यावर टपली मारून त्याची टोपी वाकडी होत असे.मग तो आणखीनच चिडिला जाऊन भोकाड पसरत असे.आमच्या वर्गात गुरुजींनी दहा -दहा मुलांचे गट पाडलेले असायचे. त्यांच्याकडे वेगवेगळी कामे सोपावली जायची. सुज्या माझ्या गटात होता. मी गट प्रमुख होतो. भूषण, आंध्या (आनंद), फरीद, परबती, पट्ट्या (सुनिल)ही सगळी आमची भित्री गँग होती. त्यातले त्यात मी थोडा डेअरिंगबाज असल्याने लीडर होतो.
एके दिवशी दुपारी वर्गातली मधली सुट्टी झाली. आम्ही खाऊ आणायला शाळे शेजारीच असलेल्या दुकानात गेलो. माझ्याकडे पाच पैसे होते त्याची मी चिक्की घेतली. तेव्हा त्या पाच पैश्याच्या मला चिक्कीच्या छोटया छोटया पाच वड्या मिळाल्या…! मी एक वडी तोडून तोंडात टाकली व दुसरी माझा जीवश्च कंठश्च मित्र भूषणला दिली. मग आंध्या पुढं येऊन म्हणाला, ” मलाबी दे की रं येक… मी कसा परवादिशी तुला पेरू दिला.” मी आठवू लागलो तेव्हा आठवले, सहा एक महिन्यापूर्वी कधीतरी आंध्याने ताराबाईकडून एक पेरू विकत घेतला होता. त्यावेळी आम्ही सगळे त्याच्या तोंडाकडे पहात होतो परंतू तो मात्र मोठया साहेबांच्या ऐटीत पेरू कडाकडा फोडून खात होता. त्याच्याकडे पाहून आमच्या तोंडातून अक्षराशः लाळ टपकायला लागल्यावर मग त्याने त्यातली एक फोड आम्हा पाच जणात वाटून दिली होती. त्यातला 5 वा खारट मिट्ट झालेला तुकडा माझ्या वाट्याला आला होता. तो ही मी मोठया आनंदाने चाटून खाल्ला होता. ते आठवून मी आंध्याला माझी एक चिक्कीची वडी दिली. मग फरीद आणि सुज्या अशी त्याची वाटणी झाली… त्यावेळी पैसा फार नव्हता परंतू आनंद मात्र उदंड होता. विशेषता: तो सहजीवनात अधिक वाटला जायचा. त्या कोवळ्या निरागस वयात सुद्धा आम्हाला एकमेकांची मने कळत होती आणि जपता सुद्धा येत होती हे त्यातले विशेष होते. त्या तेवढ्याश्या शिदोरीवर त्यातल्या अनेक मित्रांशी आजही माझी मैत्री घट्ट टिकून आहे.
माझ्याकडून चिक्कीचा एक तुकडा मिळाल्यामुळे सुज्या माझ्यावर जाम खुश झाला. चिक्कीचा तुकडा चघळतच तो म्हणाला, ” दोस्तांनो, तुमाला एक जम्मड सांगतो. ”
मी म्हटलं, ” काय? “
आंध्या म्हटला, ” सांग की लका. “
” आज ना आमच्या घरी ढवरा हाय, समद्यानी जेवायला या.” ढवरा हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकल्याने म्हटले, ” सुज्या ढवरा मजी काय रं? ”
तो म्हटला, ” मला पण माहित न्हाय पण आमच्या घरी सगळ्या गावाला मटान जेवायला हाय एवढं माहीत हाय. चार दिवस झालं आमच्या दादांनी दोन बोकडं खास ढवऱ्यासाठी घरात आणून ठेवल्याती,तुमी या जेवायला सगळी. उशीर करू नगा.” मटण म्हटल्यावर मी जिभल्या चाटायला लागलो. म्हटलो, ” व्हयं सुज्या येतो आम्ही तुझ्या घरी समदी. ”
” मला न्हाय जमणार मला बकऱ्याकडं झोपाय जावं लागतंय, तुमी जावा बाकीची. ” असं म्हणत आंध्यानं पहिली नकार घंटा वाजवली…
पाठोपाठ फरीद म्हटला, ” आमच्या घरी तर रोजच मटान असतं खाऊन कटाळा येतो मला, मी न्हाय येत.”
मग राहता राहिलो मी आणि भूषणच. मी खेदाने म्हटले, ” सुज्या आरं, आमाला बारक्या पोरांना कोण पाठवतंय रातचं जेवायला?मंग कसं येऊ? मला तर काईच कळंना?”
” आता बघा तुमचं तुमी. ” असं म्हणत सुज्या वर्गात पळाला.
वर्गात गेल्यावर माझं गुरुजींच्या शिकवण्याकडं काही केल्या लक्ष लागेना. मी एकासारखा फक्त सुज्याकडं पहात होतो. त्याच्या निमंत्रणाचं काय करायचं?हा एकच विचार राहूनराहून माझ्या डोक्यात घोळत होता….
अखेर मी सुज्याला पाठीमागून त्याच्या पाठीत ढोसून म्हटलं, ” आयला सुज्या, कसं काय करायचं? मला तर लयं मटान खाव वाटतंय. “
त्यो म्हणला, ” ये की मंग लेका.”
” येतो की पण कुणाबरं येऊ? “
” ये की तुमच्या वाड्यातली म्होटी पोरं घिऊन.”
” आयला सुज्या, लयभारी माझ्या तर लक्षातच येत नव्हतं, काय करावं त्ये.तू लयभारी आयड्या दिलीच! ”
” पण सुज्या, तुझ्या घरची काय म्हणणार न्हाईत ना? आमाला सगळ्यांनला जेवाय वाढत्याल ना? ”
” मंग? तुला काय वाटलं? मी हाय की! तू माझा मैतर म्हणल्याव कोण काय म्हणलं… “
” बरं येतु. “
” सुजाच्या घरी मटण खायला जाण्याच्या नादात दुपारापासून गुरुजींनी वर्गात काय शिकवलं त्यातलं मला काहीच कळलं नव्हतं… पाच वाजता शाळेची घंटा टण टण वाजल्यावरच मी भानावर आलो…! शाळा सुटल्यावर घरी जाता जाता मोठ्या पोरांना ही आनंद वार्ता सांगितली…! ते सगळे तयारच होते.
अंधार पडायला लागल्यावर तिन्ही संजेला आई कामावरनं घरी आली. मी तिला धावत जाऊन मिठी मारून म्हटले, ” आई मी मटान जेवायला जाऊ का? “
” कुटं? ”
“वडाच्या मळ्यात, सुज्याच्या घरी, त्यानं मला बोलावलंय.” मी एका हातानं चड्डी ओढत आईला एकादमात सगळं सांगितलं… “
” अगं बया! इतक्या लांब अन रातचं? नगं माझ्या राज्या… ”
” आई, सगळी पोरं निघाल्यात…”
” मंग जा.”
संध्याकाळ झाली तशी सगळ्या पोरांची जमवाजमव झाली. प्रमोद, रवी, संदिप, भाऊ, माझा मोठा भाऊ राजेंद्र, चंदर नाना,राज्या,प्रल्हादनाना असे करताकरता दहा पंधरा जणांचा मेळा जमला.
” ईज्या नक्की ढवरा हाय ना? ” माझ्या मोठया भावाने मला दरडावून विचारलं.
” व्हयं, सुज्यानं मला दुपारीच सांगितलंय, घरी दोन बोकडं पण आणून ठिवल्यात असं त्यो म्हणत होता.
” मंग चला… ”
मोठा भाऊ आमच्या टोळक्याचा प्रमुख होता. त्यानं इशारा केला तशी सगळी पोरं वडाच्यामळ्याच्या दिशेने रस्ता चालू लागली.
गावापासून वडाचा मळा साधारणपणे अडीच ते तीन किलोमीटर होता. पण मटण खायाच्या ओढीने सगळे खुशीत झपाझप पावले टाकीत चाललो होतो…
आमचा मोर्चा गावचा ओढा ओलांडून म्हस्कोबा मंदिराच्या पुढे निघाल्यावर लांबवर माईकचा आवाज येऊ लागला तसा आम्हाला धीर आला. त्यावेळी गावात कुठलेही कार्य असेल की तिथे स्पीकर वाजायचा. कार्यक्रम नियोजित ठिकाणी असल्याची ती एक खूणच होती.
आम्ही कार्यक्रम स्थळाच्या अर्धा किलोमीटर जवळपास आलो तेव्हा माईकवर सूचना चालू होती, ” देव -देव झालेला आहे.तरी, आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈