सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ ☆
हाताची कोपरं बाल्कनीच्या कट्ट्यावर टेकवून दोन्ही हात गालाला लावून रोहन बाल्कनीत उभा होता. सोसायटीत शिरणाऱ्या प्रत्येक कारवर तो नजर ठेवून होता.’आज आधी बाबा येतो का आई?एक खूप छान बातमी त्यांना सांगायचीय आणि नेमका आज त्या दोघांना उशीर होतोय’… रोहनचं विचार चक्र चालू होतं. ‘यापेक्षा आपण कला ऑन्टी बरोबर पिंकी ताईला आणायला तिच्या डान्स क्लासला गेलो असतो तर खूप बरं झालं असतं’.. ऑन्टी त्याला सांगून सांगून थकली,अन् शेवटी एकटीच गेली.
इतक्या दूर पायी चालत जायचा त्याला कंटाळा आला होता. शिवाय पैसे पण जवळ नव्हते सहा लॉलीपॉप आणायला!… चार आपल्या चौघांना, एक कला ऑन्टीला आणि एक’ विकीला’. ‘तोआपल्याकडे आलाय तर वेलकम सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं.’ विचार करून कंटाळला तसा तो दरवाजा उघडून कॉरिडॉर मध्ये आला. मोहितच्या घरातून अंकल ‘स्टेफीला’ फिरवून आणायला बाहेर पडले होते.”स्टेफीऽ स्टेफीऽ” रोहनने हाक मारली. कान टवकारून त्याच्याकडे बघून मान हलवत स्टेफी लिफ्ट कडे धावली.
कित्ती क्यूट आहे स्टेफी’ रोहन विचार करत होता. ‘सगळ्यांच्याच घरात एक ना एक ‘पेट’ आहे. डाॅगी तर खूप जणांच्याकडे आहेत. शिवाय मांजरे, बर्ड्स, फिश पण आहेत. शिवानीकडे तर गिनीपिग आहे, त्यांच्या टेरेस वरील मोठ्या टॅंक मध्ये कासव सुद्धा आहे. ऋषीकडे दोन ससे आहेत आणि मृणाल कडे मुंगुस !फक्त… फक्त आपल्याकडेच ‘पेट’ नाहीय. आईला कितीला सांगितलं नुसती हसते. म्हणते,” बघू या, पिंकी आणि तू जरा मोठे व्हा मग आणूया एखादा छानसा प्राणी.” बाबा तर हसत म्हणतो “आपल्या घरातच आहोत की आपण चार प्राणी!…. आणखी एकाची भर कशाला?… आपल्या घराला तू प्राणी संग्रहालय म्हण किंवा सर्कस!”… पण नाही, आज रोहन कडे सुद्धा एक छानसा, छोटासा प्राणी आलाय. दुपारची वेळ… कला ऑन्टी ने हाक मारली, “रोहन बाबा, जरा लवकर इकडे ये….हा बघ पिंजऱ्यात एक उंदीरआलाय.” रोहन धावत आला. “ओऽहोऽ हो!”… उंदीर बघून तो आनंदाने नाचायलाच लागला. पिंकी क्रीम बिस्कीट चे छोटे छोटे तुकडे करून पिंजऱ्यात टाकू लागली. दोघंजणं जाम खुष! “ताई तो कसा पिंजऱ्यात छान रन काढतोय बघ. आता आपण ह्याला सांभाळू. हाच आपला ‘ पेट’….आणि त्याचे नाव काय ठेवू या?”दोघेजण विचार करू लागली.”कास्मो, नाही तर बॉस्की” कसं आहे?” पिंकी म्हणाली. रोहननं नकारार्थी मान हलवली. “पिंकी ताई जसा मिकी माऊस असतो ना तसा हा विकी माऊस! विकी नाव छान आहे ना?” “हो रे, मस्तच!” पिंकी उद्गारली. तोपर्यंत त्यांच्या मित्र-मैत्रिणीचा घोळका घरात आला आणि पिंजऱ्या भोवती गोल करून उभा राहिला. “हाय कित्ती क्यूट!”… “त्याचे पाणीदार डोळे पाहिलेस?”…” आणि नजर बघ किती शार्प आहे.” ” सो नाईस!”…” सो एनर्जिक”… “कसा क्रिकेटर सारखा रन काढतोय बघ”… “यार तुमचा विकी आम्हाला फार आवडला.” सगळे मित्र-मैत्रिणी म्हणत होते. शेजारी राहणाऱ्या एक दोघांनी तर काहीतरी खाऊ आणून पिंजऱ्यात टाकला.
आई बाबा एकदमच घरी आले. दोघांना विकी माऊसची कथा इत्थंभूत सांगून झाली. “आपण आता विकीला पाळणार आहोत.बाबा बघ,आला की नाही आपल्याकडे पण एक पेट.” रोहनच्या तोंडाला खळ नव्हती. आई, बाबाला आपण कितीही सांगितलं तरी कमीच आहे असं त्याला वाटत होतं. शेवटी “विकी बाय”म्हणत तो खेळायला निघून गेला.
” काय वेडा मुलगा आहे. आता काय करायचं?” आई म्हणत होती. बघू या उद्या संध्याकाळी देऊन टाकू त्याला जलसमाधी.” बाबाचं हे बोलणं बॅट घेऊन जायला घरात आलेल्या रोहननं ऐकलं. त्या बिचार्या सहा वर्षाच्या चिमुरड्याला त्याचा अर्थही कळला नाही.
“जलसमाधी म्हणजे काय रे ?” रोहनने एक थोड्या मोठ्या मित्राला विचारलं. “जल मीन्स वॉटर अँड समाधी मीन्स?…. आय डोन्ट नो!” तोउत्तरला. दुसरा एक जण विकीला बघून गेलेला, एकदम जोरात ठासून म्हणाला ,”अरे वेड्या, तुझे बाबा विकीला पाण्यात बुडवून मारणार आहेत.”
“ओह् नो!”रोहन रडकुंडीला आला. धावत घरात आला.
“बाबा तू आपल्या विकीला मारणार आहेस? पाण्यात बु..ड.वू…न”…. हुंदके देत देत तो विचारू लागला.” हे बघ बेटा, तू अजून लहान आहेस. फक्त सहा वर्षाचा… काही गोष्टी तुला समजण्यासारख्या नाहीत. मी तुला उद्या समजावून सांगेन.” बाबा त्याची समजूत घालत होता.
रोहनचं रडणं आणखीनच वाढलं. “सारखं सारखं तू आणि आई मी काही विचारलं तर हेच म्हणता, तू अजून लहान आहेस, मोठा झालास की तुला आपोआप समजेल. कधी होणार मी मोठ्ठा?” विचारताना हुंदके आवरत नव्हते…. आणि परवा ते सतीश अंकल, तुझे दोस्त म्हणत होते, “कशाला तुला मोठं व्हायचय रे? मोठेपणीची दुःखं,त्रास, कटकटी, जबाबदाऱ्या… हे भगवान !मोठेपण चांगलं नसतं बच्चू ,जर मला आता देव भेटला आणि त्याने मला वर मागायला सांगितलं ना, तर मी म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”
क्रमशः भाग पहिला
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈