सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ विकी माऊस – भाग-२ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
(सतीश अंकल म्हणाले होते, ” जर मला देव भेटला आणि त्याने मला वर मागायला सांगितला तर मी त्याला म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”) आता पुढे….
‘त्यांना काय माहित आमची लहान मुलांची दुःखं ! मोठी माणसं कधी आम्हाला मनासारखं करू देत नाहीत. खेळू देत नाहीत. टीव्ही पाहू देत नाहीत… सारखं आपलं नो..नो,डोन्ट… डोन्ट… डोन्ट! काही शंका विचारली तर ओरडा खावा लागतो…. पुन्हा ती शाळा… होमवर्क’ रडत असला तरी रोहनचं विचार चक्र चालूच होतं. स्टडीरूम मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्या समोर तो अखंड बसून होता. नंतर कसाबसा चार घास खाऊन झोपला.
सकाळी उशिरा, कलाऑन्टीने उठवल्यावर उठला. रेंगाळत पेंगाळत बसला. आज मेच्या सुट्टी दिलेल्या होमवर्कला तो हात पण लावणार नव्हता. बोर्नविटा पिता पिता दोन-चार चमचे विकीच्या पिंजऱ्यात गेले. त्याचे निरीक्षण करता करता त्याच्याशी खूप गप्पा मारून झाल्या. विकीला खायला कायआवडेल
याचे ऑन्टी बरोबर डिस्कशन ही झाले. रोहन बाबा ‘ त्याला ‘ घरात सांभाळणार आहे हे ऐकून ऑन्टी गालातल्या गालात हसत होती.
आंघोळ, नाश्ता आवरल्यावर ऑन्टीने टीव्ही लावून दिला. तो आणि पिंकी मिकी माऊस, डॉगी प्लूटो ,डोनाल्ड डक, गुफी पेटे यांची दंगा मस्ती पळापळी पहाण्यात रंगून गेले. थोडे टॉम अँड जेरी… नंतर थोडा छोटा भीम…. वेळ कसा गेला कळलंच नाही. मधून मधून विकीला पाहण्याचा मोह ही रोहन आवरू शकत नव्हता.
संध्याकाळी बाबा जरा लवकर घरी आला होता. बाबाच्या अवतीभवती घुटमळत बाबाला काय आणि कसे सांगायचे, पटवून द्यायचे याचे प्रॅक्टिस रोहन करत होता. चहा पिता पिता बाबा म्हणाला,” रोहन बेटा बैस इथं. पहिल्यांदा तुझं काय म्हणणं आहे ते सांग.” पुन्हा डोळ्यात आपण होऊनच अश्रू दाटून आले. जे बोलायचं ठरवलं होतं ते काहीच आठवेना. मग जे सुचलं ते बोलू लागला, “बाबा, गणपती बाप्पाचा पेट ॲनिमल उंदीरच होता ना?….. मग माझा?”…. त्याला पुढे बोलू न देता बाबा म्हणाला, “अरे ती पुराणातली कथा आहे… आणि तो उंदीर गणपती बाप्पाचे वाहन होता. बाप्पाला पाठीवर बसवून नेणारा उंदीर किती मोठा असेल…. कल्पना कर. आणखी म्हणजे शंकराचे वाहन नंदी, विष्णूचे गरुड, कार्तिकेयचे मोर! त्यावेळी आत्ता सारख्या स्कूटर, बाईक, कार नव्हत्या ना.” हे सगळं आपल्या मनाने रचून या चिमुरड्याला पटेल असं करून सांगताना बाबाला घाम फुटला .
बाबाचे बोलणे ऐकता ऐकता रोहन बाबाच्या मांडीवर डोके ठेवून सोफ्यावर कधी आडवा झाला त्याला कळलेच नाही.
“तो उंदीर आपल्या आपणच पिंजऱ्यात आलाय” रोहन म्हणाला. “तो पण इतक्या वर आपल्या आठव्या मजल्यावर! मग राहू दे ना तो इथे.” “ठीक आहे, हे बघ आपल्या घरात मुंग्या, झुरळे, कोळी, डास, माश्या, पाली असे कितीतरी जीव जंतू आपण होऊन शिरतात. तसाच हा उंदीर! त्यांना कोणी पाळत नाही. ते सगळे आपल्याला त्रास देतात. रोगराई पसरवतात. मागं एकदा तुला आठवतंय? एका उंदरानं पिंकीच्या दोन वह्या, एक पुस्तक पूर्णपणे कुरतडून टाकलं होतं. आणखी म्हणजे कावळा चिमणी यासारख्या पक्षांना पण कोणी पाळत नाही.” बाबाचं म्हणणं थोडं थोडं रोहनला पटू लागलं होतं.
“तू त्या उंदराकडे बघ, त्यानं पिंजऱ्यातलं काही खाल्लंय?”रोहननं उठून काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं.कालपासून विकीला सगळ्यांनी दिलेला खाऊ पिंजऱ्यात तसाच पडून होता. विकी फास्ट रन पण काढत नव्हता. त्याच्या डोळ्यातली चमक पण नाहीशी झाली होती. रोहनला हे बघून खूप वाईट वाटलं. पुन्हा तो बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर आडवा झाला. रोहनच्या डोक्यावर, केसातून हात फिरवता फिरवता त्याला थोपटत बाबा म्हणाला,” बाळा, पिंजऱ्यात तो काहीच खाणार नाही. असाच मरून जाईल. त्याला कळलंय की आपण मृत्यूच्या सापळ्यात अडकलोय. जर आपण आता त्याला बाहेर सोडलं तर तो बाहेर पळून जाईल. ‘पेट’ म्हणून आपल्या घरात थांबणार नाही. एखादं मांजर किंवा कुत्रा त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकेल. किंवा तो आणखी कोणाच्यातरी घरी जाऊन उत्पात माजवेल.”बाबा त्याला आपण ‘पेट’का पाळत नाही याबद्दल बरेच काही सांगत होता.रोहन विचारात गुंतला होता, ‘बाबाच्या बोलण्यातलं काही आपल्याला समजतंय काही नाही, काही पटतंय काही नाही! पण बाबाचं असं प्रेमानं थोपटणं आपल्याला खूप छान वाटतंय’
पुन्हा रोहनच्या मनात शंका आली,” बाबा तू मला रागवू नकोस. मी तुला एक विचारतो. टीव्हीवर तर मिकी माऊस, पेटे का कोणीतरी ती कॅट… प्लूटो, गुफी डॉग्स सगळे एकत्र खेळतात. दंगा करतात. कॅट माऊसला नाही खात!.. मग ते सगळं खोटं असतं का? टॉम- जेरी, छोटा भीम काहीच खरं नाही ?”
“हे बघ, आत्ता तुला ही सगळी कार्टून सिरीअल्स आवडतात. हो ना?… मग मनात काही शंका न आणता ती एन्जॉय कर. अरे हे फॅन्टसी मध्ये रमायचंच वय आहे बाळा. जसा जसा मोठा होत जाशील तसं तसं तुला सगळं आपोआप समजेल.” बाबाचं म्हणणं त्याला पटलं होतं. ‘म्हणजे आपण थोडे थोडे मोठे आणि स्ट्रॉंग होऊ लागलोय.’त्याच्या मनात विचार आला .
बाहेर पिंकी ताई आणि मित्र-मैत्रिणींचा गलका त्याला ऐकू आला. खेळायला बाहेर जाता जाता त्याला वाटलं,’ आपण आता थोडे थोडे बिग आणि स्ट्रॉंग झालोय. मग आता सारखं रडायचं नाही. बाबाला हे सांगताना की बाबा तू विकीला जलस्नान का जलसमाधी जे काय ते देऊ शकतोस. त्यानं दोन्ही डोळे ताणून धरून डोळ्यातलं पाणी रोखलं.
…… पण विकीच्या पिंजऱ्याजवळ जाऊन ” बाय बाय विकी ! ” म्हणताना त्याच्या डोळ्यातून दुष्ट अश्रू गालावर ओघळलेच !…
— समाप्त —
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈